Tuesday, August 18, 2009

"पर्यावरणाचा ऱ्हास हे संपूर्ण जगाचे दुर्भाग्य मानवाने ओढवून घेतले रोगराई, अनारोग्य'

"पर्यावरणाचा ऱ्हास हे संपूर्ण जगाचे दुर्भाग्य
मानवाने ओढवून घेतले रोगराई, अनारोग्य'
सध्याचा काळ कमालीच्या गतीने, अस्वस्थतेने, अशांतीने व अनिश्र्चितेने भरलेला दिसतो. आज सर्वत्र एक प्रकारची अनियंत्रितता, अराजकता व बेफामपणा जाणवतो. मजा आणि सुख या दोघातला फरक जाणून घेतला तर मजेच्या मागे लागलेला मनुष्य इंद्रिय सुखे, तात्कालिक विषय सुखे उथळ व अल्पकालीन स्वरुपाची भोगताना दिसतो. मनाला शांती, आनंदाचा स्पर्श होत नाही. सुखाची ओळख होताना दिसत नाही. केवळ सुख मिळवताना मग त्या अनुषंगाने सुखाची साधने शोधत राहणे, ही मनोवृत्ती बनताना दिसते.
आज सर्वत्र नजर टाकली तर असे दिसते की मानवाने आपल्या भौतिक सुखासाठी जंगलांची बेसुमार केलेली कत्तल हा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण मानले पाहिजे. कोणत्याही देशात वनसंपत्ती कशी व किती उत्तम रीतीने जोपासली जाते यादृष्टीने तेथील पर्जन्यमान अवलंबून असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ढग अडवण्यासाठी जशी डोंगरांची गरज आहे त्याचप्रमाणे जंगलांमुळेही पाऊस पडण्यास मदत होते. पर्यावरणाच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीची होणारी प्रचंड प्रमाणावरची धूप.
निसर्ग संपत्तीचा होणारा विनाश संपूर्ण मानव जातीच्या दृष्टीने घातक म्हणता येईल. कारण निसर्ग म्हणजे त्यात वनस्पती, वृक्ष, वनौषधी हे अंर्तभूत आलेच. वेगवेगळ्या वनौषधींपासून मिळणारी किंवा तयार केली जाणारी औषधे किंवा औषधे बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल या दृष्टीने बघताना पर्यावरणाचा ऱ्हास प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे.
संपूर्ण जगाकडे नजर टाकताना जगावर ओढवणाऱ्या आपत्ती, मग त्यात भूकंप, महापूर, वादळे ही सर्व विनाशकारी तर आहेतच. पण त्यात होणारी प्रचंड मनुष्यहानी हा काळजीचा विषय ठरावा. पर्यावरणाचा विकास व समतोल राखण्याच्या दृष्टीने भारतीयांना आपल्या पूर्वजांनी केलेला विचार अधिक प्रेरणादायी ठरावा. प्राण्यांप्रमाणे वनस्पती, झाडे, पाने, फुले यांनाही भारतीय संस्कृतीत, मानव जीवनात मानाचे स्थान देण्यात आलेले आहे. जसे देवदेवतांना विशिष्ट फुले अथवा पाने वाहण्यात येतात. याच्या मागेही एक शास्त्र विकसित केले गेलेले दिसते. निसर्गाशी रोजच्या जीवनात नावाने का होईना मनाचा संबंध व स्मरण रहावे म्हणून झाडांची, नद्य़ांची, फुलांची हाक मारण्याची प्रथा निर्माण झाली. जसे गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, अलकनंदा, भागीरथी, शरयू, सिंधू, कावेरी ही नावे मुलींना ठेवून देशातील नद्यांचे स्मरण केले जाई.
चक्रीवादळे, नद्यांना येणारे महापूर, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक, प्रचंड आगी, पाण्याचे तीव्र दुष्काळ, उष्णतेची कमालीची तीव्रता यामुळे निसर्गावर होणारा परिणाम आज आपण सारेजण बघतो आहोत.
मानवाच्या जगण्याच्या पर्यावरणातील व परिस्थितीतील काही उणीवा सर्वत्र अशा अवनतीला कारणीभूत होऊ शकतात. मानवाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक असणाऱ्या भौतिक सामग्रीत मुख्यत: अन्न व पाणी यांचा पुरवठा व लोकसंख्या यांच्या प्रमाणात आवश्यक असणारा समतोल ढळल्याने विपरित परिणाम झाला. अन्न पाण्याचे दुर्मिक्ष्य होण्याने माणसांची उपासमार होते. त्यामुळे अन्न पाण्याचे दुर्मिक्ष्य होण्याने माणसांची उपासमार होते. अनेक रोगांच्या साथींचा प्रादुर्भाव होतो. नव्या रोगांना अवसर मिळतो.
आरोग्य ही संकल्पना व घटना मुख्यत: सजीवांना लागू पडणारी आहे. ज्यांचे शरीर जीवंतपणे कार्य करते त्यांना आरोग्य व आजाद हे शब्द लागू पडतात. प्रत्येक सजीव प्राणी, वनस्पती, मानव यांचे जिवंतपणाचे कार्य मूळ रचनेप्रमाणे व घडणीप्रमाणे चालते तेव्हा त्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना आनंद, सुख व समाधान यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. रोगट प्रवृत्तीचा समाज आपल्या घटकात परस्परांमध्ये अविश्र्वास, वैरभाव वाढवितो आणि नागरिकांचे इतरांनी शोषण करता येण्यासाठी त्यांचा साधन म्हणून उपयोग करता येईल, असे त्यांच्यात परिवर्तन करतो. आजादी किंवा रोगट समाजामध्ये परस्परांविषयी अविश्र्वास, असूया, मत्सर, तिरस्कार व वैरभावना सातत्याने वाढत जातात व समाजाच्या ऐक्याला तडे पडतात.
पर्यावरणाचा समतोल बिघडत जाण्याची ही आजची जगभरची समस्या आहे. या समस्येची उकल सर्वत्र आपापल्या परीनेच सुरू आहे. आज प्रदुषणाला जबाबदार असलेल्या घटकांमध्ये डॉयाक्सिनचा नंबर बराच वरचा आहे. अगदी थोड्या प्रमाणातल्या डॉयाक्सिनमुळे प्रयोगशाळेत प्राणी मेल्याची उदाहरणे आहेत.
पर्यावरण म्हणजे नेमके काय याची साधी व सोपी व्याख्या करताना पर्यावरण म्हणजे एखाद्या किंवा विचारधीन सजीवाच्या सुयोग्य जीवनाविषयक परिस्थिती ही सजीवानुरुप आणि भौगोलिक परिस्थितीनुरुप बदलत असते.
पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक म्हणजे भूमी, पाणी, वनस्पती हे म्हणता येतील. वनस्पतींच्या वाढीसाठी मातीची आवश्यकता असते. मातीचा कस हा पुन्हा, ही माती कुठल्या खडकांपासून तयार झाली यावर अवलंबून असते. प्रदूषणामुळे कर्करोगात वाढ, ओझोन विवर वाढ, त्वचेच्या कर्करोगात वाढ, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढणार, सागर किनाऱ्याजवळची शहरे त्यामुळे पाण्यात बुडणार, दक्षिण धु्रवावरचा बर्फ वितळणार अशा अनेक बातम्या आपल्या कानावर पडतात. पाश्र्चात्य देशात पर्यावरणाचे प्रश्र्न समजावून देणाऱ्या संस्था आहेत. वृत्तपत्रातून स्तंभ आहेत. अभ्यासक्रमात हा विषय सक्तीचा केला जातो.
पृथ्वीवरील निसर्ग संरक्षण या विषयासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या फारच थोड्या संस्था आहेत. एक संस्था मात्र अशी आहे की, तिचे सदस्य खरोखरच स्वत:चे जीव धोक्यात घालून निसर्गसंरक्षण आणि प्रदूषण विरोधाचे काम करतात.
या संस्थेचे जगभर नावाजलेले नाव म्हणजे "ग्रीन पीस.' ऍलन थॉर्नटन हे या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. ऍलनचा जन्म कॅनडाच्या ओंटारियो राज्यात विंडसर या ठिकाणी झाला. हे ठिकाण अमेरिकेच्या सीमेवर डेड्रॉईट या औद्योगिक शहराच्या उत्तरेस आहे. त्या शहरात होणाऱ्या प्रदुषणाचा मारा थॉर्नटनला लहानपणापासून अनुभवावा लागला होता. लेकईटीच्या काठावर होणारे माशांचे मृतदेह तो लहानपणापासून पहात होता. डेट्राइटच्या कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे लक्षावधी मासे मारले गेले. मोटार गाड्यांचा रंग व घरातील भिंतींचा रंग वायुप्रदुषणामुळे उडून जायचा. प्रदुषणामुळे भिंतींचा रंग उडून जातो तर आपल्या शरीराचे काय असा प्रश्र्न ऍनलनला सतावीत असे. देवमासे व कील यांची हत्या थांबवण्याचे काम "ग्रीन पीस' या संघटनेने सुरू केले.
पृथ्वीवरील जनसंपदा आणि वैविध्यपूर्ण प्राणीसृष्टी वाचविण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ झटत आहेत. त्याचबरोबर काही शास्त्रज्ञांची नजर भविष्याकडे लागली आहे. शास्त्रज्ञांच्या मते पर्यावरणाला आणखी एक धोका म्हणजे वाढती लोकसंख्या. ज्या प्रमाणात एखाद्या शहराची वाढ होते तेव्हा त्या शहराच्या समस्याही वाढत जातात. लोकसंख्या वाढली की साहजिकच राहत्या घरांचा प्रश्र्न आला. घरे वाढली की जमिनीचा प्रश्र्न आला. जमिनीची गरज निर्माण झाली की जंगलतोड सुरू होणारच किंवा शेतजमीन कमी होत जाणार. या सर्वांचा परिणाम पर्यावरणावर होत राहणार.
पर्यावरणाला धोका पोहोचवणारा आणखी एक उद्योग शेती. शेतीसाठी वन हलवले जाते. रासायनिक खतामुळे पर्यावरणाची खूप हानी होते. किटकनाशकांमुळे मेलेले किटक खाऊन पक्षी व इतर प्राणी प्रदूषित होतात. ही किटकनाशके भूजलात मिसळून मानवी शरीरात शिरतात. गवतावरील व पाण्यातील किटकनाशके दुसऱ्या जनावरांच्या पोटात जातात आणि दुधावाटे आपल्या पोटात जातात.
प्रदूषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. वायुप्रदूषण नैसर्गिक कारणांमुळेही होते. भूतलावर अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैविक प्रक्रिया घडून येतात. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तू दुसऱ्या एखाद्या पोषणाला उपयुक्त ठरते. मुक्त ठरते. भूतलावर भूकंप ज्वालामुखी यांचा उद्रेक होतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. विषारी वायू, धूळ, धूर यामुळे वातावरण प्रदूषित होते. कुजण्याची प्रक्रिया जीवाणंमूळे होत असते. त्या प्रक्रियेत दुर्गंधीयुक्त वायू तयार होतात आणि पर्यावरण दूषित होते. पाणी, जमीन व वातावरण हे तीन घटक महत्त्वाचे आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे प्रदूषणकारी वाहने. एकूण जगाचा विचार केला तर 50 कोटींपेक्षा अधिक कार, ट्रक्स, बसेस व दुचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. दरवर्षी त्यात प्रचंड भर पडत आहे. आपल्या देशात 1990 पर्यंत 30 लाखांपेक्षा अधिक वाहने रस्त्यावर धावत होती. त्यातील 20 लाख वाहने पेट्रोलवर धावणारी आहेत.
मोठ्या शहरांमध्ये दर दिवशी 800 ते 1000 टन दूषित पदार्थ ते वातावरणात सोडतात. मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्तासारख्या महानगरात या वाहनांमुळे 70% कार्बन-मोनाक्साईड, 50% हायड्रो कार्बन्स, 30 ते 40% सल्फर, 30% कणरूप घनपदार्थ इत्यादी दूषित प्रदूषणकारी घटक हवेत सोडले जातात. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल इंधनात टेट्राइथिल लेड हे शिशाचे संयुग वापरले जाते, आणि हे शिसे धुरावाटे वातावरणात पसरले जाते.
सन 1991 मध्ये इराक व अमेरिका व इतर राष्ट्रांच्या सहभागाने युद्धाचा भडका उठला. या युद्धात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे रासायनिक अस्त्रे यांचा सर्रास वापर झाला. तशातच कळस म्हणजे तेलविहीरींना आगी लावण्यात आल्या. आखाती युद्धाने साऱ्या जगाची झोप उडविली होती. कुवेतमधील जवळपास 750 पेक्षाही अधिक तेलविहिरींना आगी लावण्यात आल्या. दर दिवशी 19 कोटी गॅलन्स एवढे तेल जळून त्याचा धूर तयार होत होता. त्याचे परिणाम पर्यावरणावर, ऋतुमानावर झाले. शास्त्रज्ञांच्या मते अकाली हिवाळा सुरू झाला. या ढगांमुळे पृथ्वीचे तापमान कमी होईल, अशी भिती व्यक्त करण्यात आली.
हवेच्या प्रदूषणात शिसे, पारा, कॅडमियम, जस्त, झिरकोनियम निकेल, अँटिमनी व आर्सेनिक अशा प्रकारच्या धातूंपासून पृथ्वीवरचे पर्यायाने संपूर्ण जगाचे नुकसान होत आहे. पर्यावरणाचा अमाप ऱ्हास होत आहे.
वायुप्रदुषणामुळे आर्थिक नुकसानीबरोबर मानवी आरोग्यावर परिणाम होतो. आणि त्यामुळे विविध रोग उद्‌भवतात. पाळीव प्राणी, गुरे, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी प्राण्यांवर प्रदूषणामुळे विपरित परिणाम होऊन नुकसान होते.
प्रदूषणामुळे उद्‌भवणाऱ्या धुरामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. वाहतुकीचा खर्च वाढतोच पण अंधुक प्रकाशामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. कारखान्यांमुळे बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषक वायूंच्या नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा बसवावी लागते. विद्युत उर्जा केंद्रे व अणू उर्जा केंद्रे त्यामधून निर्माण होणारी धूळ अलग करण्यासाठी व धुरावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. कारखान्यातील सांडपाण्यामुळे, विषारी वायुमुळे, मळीमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्‌भवतात.
पर्यावरण हा विषय एकविसाव्या शतकात फार महत्त्वाचा ठरणार आहे. मानव शेती करू लागला. तेव्हापासून पर्यावरणावर परिणाम करणारा घटक असं स्वरुप त्याला प्राप्त होऊ लागलं. शेतीसाठी जंगलतोड केली गेल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झालेला दिसतो.
संपूर्ण पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मग पुढे प्लेग, मलेरिया किंवा आज आपण सर्वजण बघत असलेला "स्वाईन फ्लू' हा याचाच परिणाम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पर्यावरणाचा समतोल ढळला की रोगराई व अनारोग्य हे वाढणारच.

No comments:

Post a Comment