Tuesday, August 18, 2009

मा. शरद पवार साहेबांची व्युहरचना, पुन्हा सत्तासंपादनाची अचूक योजना


अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मा. शरद पवार साहेबांची व्युहरचना
पुन्हा सत्तासंपादनाची अचूक योजना

केंद्रीय कृषीमंत्री आणि अ. भा. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब सध्या पक्षनेत्या कार्यकर्त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठका घेत आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करुन एकत्र लढविणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
शिवसेना-भाजपा युतीसोबत यावेळी प्रकाश आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांचे रिपब्लिकन पक्ष जातील आणि रामदास आठवले अखेरच्या क्षणी पुन्हा राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीकडून 5 जागा, एक विधानपरिषदेची जागा आणि रामदास आठवले यांच्यासाठी महाराष्ट्र मंत्री मंडळात मंत्रीपद या मुद्यावर तडजोड करतील, असे बोलले जाते.
महाराष्ट्रातील लोकसभा विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली असल्यामुळे जी राजकीय समिकरणे बदलली आहेत त्यांचा ना. शरद पवार साहेबांइतका दुसऱ्या कुणीच अभ्यास केलेला नसावा. त्यामुळे सध्या ते ज्या बैठका घेत आहेत त्यात बदललेली राजकीय समिकरणे ते कार्यकर्त्यांना समजावून राष्ट्रवादी कॉंग्रेसची मतदार संघनिहाय भूमिका स्पष्ट करीत आहेत.
महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा मतदारसंघांची झालेली फेररचना समजावून घेतल्याशिवाय विधानसभा निवडणुकीची व्युहरचना आणि पूर्वतयारी करता येणार नाही हे मा. पवारसाहेब बजावून सांगत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मा. पवारसाहेब अस्वस्थ असल्याचे जाणवत होते, पण साहेबांचे वैशिष्ट्य हे की त्यांची अस्वस्थता ही निष्क्रियता, निराशा हतबलता निर्माण करणारी कधीही नसते. उलट "क्रिएटीव्ह रेस्टलेसनेस' म्हणजे सर्जनशील अस्वस्थता असते.
अस्वस्थता ठेवून राजकीय जीवनात यशस्वी होता येत नाही हे पवार साहेब जाणतात आणि म्हणूनच ही अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा, विचारमंथन करून कुठे कमतरता राहिली आणि ती भरून काढण्यासाठी कोणते प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत याची चाचपणी सुरू केली.
मा. शरद पवार साहेब 13 निवडणुका आजवर लढले. त्यात व्यक्तिशः त्यांचा कधीच पराभव झाला नाही. पण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही हेही खरे आहे.
"चुका लक्षात घेऊन लगेच कारवाई केली तर पुढल्यावेळी 100 टक्के यश मिळते' हा मा. पवार साहेबांचा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचा "मेसेज' म्हणजे आत्मपरीक्षणाची संधी आहे.
मा. पवारसाहेब नेहमी सांगतात की "निवडणुकीआधी आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना समजावून घेतले पाहिजे. लोकांची मतदान करताना चूक होते आणि आपल्याला अपेक्षित मते पडत नाहीत, असे समजून कार्यकर्त्यांनी मतदारांना दोष देणे योग्य नाही.'
मा. पवार साहेबांनी मुंबईत नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या विचारमंथन बैठका झाल्या त्यात आवर्जून सांगितले की, "आपल्या देशात लोकशाही टिकली आहे ती सुज्ञ, जाणकार मतदारांमुळेच. पटले नाही तर नेता उमेदवार कितीही मोठा असो लोक, मतदार त्याला निवडणुकीत धडा शिकवून थेट रस्त्यावर आणतात.'
"नेत्यांपेक्षा देशातील सर्वसामान्य माणूस जास्त शहाणा आहे. तो देश चालला पाहिजे. नेत्यांनीही धडा घेऊन वागण्यात सुधारणा केली पाहिजे, अशा पद्धतीने निर्णय करतो', असे मत मांडून मा. पवार साहेब म्हणाले की, "आपण शहाणपणाने वागलो तरच लोक पाठीशी रहातील हे लक्षात ठेवा.'
"लोक आपल्या सर्वांपेक्षा शहाणे आहेत, त्यांना कमी लेखू नका. दोषही देऊ नका. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण कमी पडलो, चुका केल्या हे प्रांजळपणाने कबुल करायला हवे.' हा मा. पवारसाहेबांचा मुद्दा राष्ट्रवादीलाच नव्हे सर्व पक्षांना लागू होणारा आहे.
मा. पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या या विचारमंथन बैठकीत काय झाले त्याचे विश्लेषण करताना काय करायला हवे तेही सांगितले.
मा. पवारसाहेब म्हणाले की, "या घडल्या गोष्टींचा शांतपणे विचार करून आपल्या वागण्या-बोलण्यात-कामात आमुलाग्र बदल केला पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहचलं पाहिजे. "लोकशाही जिवंत ठेवून स्वराज्याचे सुराज्य करायचे असेल तर शेवटच्या तळागाळातील माणसांशी संपर्क साधा,' असा म. गांधींनी दिलेला संदेश लक्षात ठेवा.
"आपण शेवटच्या माणसाशी किती संपर्क ठेवला हा प्रश्न प्रत्येक नेत्या-कार्यकर्त्याने आपल्या मनाला विचारून पाहावा,' असा सल्ला मा. पवारसाहेबांनी दिला.
मा. पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या आठवडाभराच्या विचारमंथन बैठकात मांडलेला एक मुद्दा नवा आणि लोकांच्या मनातील गृहित समजाला धक्का देणारा होता.
मा. पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडणून आले हा चुकीचा समज आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जगातील महामंदीचा फटका भारताला कमी प्रमाणात बसला. यामुळे मध्यमवर्गीय, अधिकारी, कर्मचारी, उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक वर्गाने कॉंग्रेसला मते दिली ही गोष्ट समजून घ्या आणि मनसेला कॉंग्रेसच्या विजयाचे अकारण श्रेय देऊ नका.
मा. पवारसाहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत आणखी एक मुद्दा विचार करायला लावणारा मांडला आणि तो म्हणजे निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेस हा एकच राष्ट्रीय पक्ष स्विकारला आणि बाकीचे प्रादेशिक पक्ष (यात राष्ट्रवादीही आला) नाकारले हे खरे नाही.
"देशभरात प्रादेशिक पक्ष नाकारले असा निष्कर्ष काढून नाऊमेद होण्याचे कारण नाही असे प्रतिपादन करुन मा.पवार साहेब म्हणाले की अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेस-भाजपा या राष्ट्रीय पक्षांना मागे टाकून जागा मिळवल्या आहेत'.
मा. पवारसाहेब प्रगट चिंतनाच्या मूडमध्ये होते. ते म्हणाले की "निवडणूक निकालांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की मी सगळयांवर विश्र्वास ठेवला, पण अनेकांनी त्याचा गैरफायदा घेतला.'
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांत एकवाक्यता, सहकार्याची भावना, दुसऱ्या मित्रपक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची भावना दिसली नाही हे मा. पवारसाहेबांनी बोलून दाखवले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचेच काही नेते, कार्यकर्ते करीत असलेल्या राजकीय नाटयावर टिपणी करताना मा. पवारसाहेब म्हणाले की, "काही राष्ट्रवादी नेते आत्तापासूनच उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून उभे राहण्याची धमकी देत आहेत. पण मी यावेळी सावध आहे.'
"कोणाच्या सांगण्यावरून डोळे झाकून उमेदवारी देणार नाही, विश्र्वासाने ज्यांनी चांगले काम केले असेल त्यांनाच उमेदवारी देईन, मंत्र्यांनादेखील सरसकट उमेदवारी मिळेल असे त्यांनी गृहित धरु नये' असेही मा. पवारसाहेबांनी बजावले.
कॉंग्रेसला चार शब्द सुनावताना मा. पवारसाहेब म्हणाले की, "अखेरच्या क्षणापर्यंत जागा वाटपाची बोलणी कॉंग्रेसने लांबवू नयेत. जर जागावाटप लवकर झाले तर उमेदवार ठरवून लगेच कामाला लागता येईल.'
मा. शरद पवारसाहेबांचे विचार स्पष्ट आहेत. आता प्रश्र्न असा आहे की राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते त्यापासून बोध घेऊन कसे वागतात.
मा. शरद पवारसाहेबांच्या निदर्शनास एक गोष्ट आम्हाला आवर्जून आणून दयावीशी वाटते आणि ती म्हणजे जनता दल इत्यादी बाहेरच्या पक्षातून राष्ट्रवादीत घुसखोरी करुन पवारनिष्ठा नेत्या, कार्यकर्त्यांना नडणाऱ्या नेत्यांनाही मा. पवार साहेबांनी समज दिली पाहिजे आणि ऐकले नाही तर गचांडी धरुन पक्षाबाहेर काढले पाहिजे.
मा. पवार साहेबांनी चिंतन शिबीरात मांडलेल्या विचारांनुसार यशाचा एक फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीसाठी पवार साहेबांनी मांडला आहे. पण यात अस्तनीतील निखाऱ्या प्रमाणे वागणाऱ्या काही पक्षद्रोही नेत्यांचा अजून कठोरपणे समाचार घ्यायला हवा होता असे आम्हाला वाटते.
महाराष्ट्रात असे अनेक अस्तनीतील निखारे मा. पवारसाहेबांना ताप-मनस्ताप-संताप देतात हे आम्हाला ठाऊक आहे पण अशा निखाऱ्यांमधला "दगडी कोळसा 'आमच्या गोरेगावातच आहे.
गोरेगावात मा. पवारसाहेबांचे नेतृत्व मानणारे, मा. पवारसाहेबांना राजकीय गुरू मानणारे, दैवत मानून श्रध्देने त्यांच्या विचाराचे अनुसरण करणारे आमच्यासारखे जे तरुण आहेत त्यांच्यापुढे विरोधी पक्षांचे नव्हे तर राष्ट्रवादीतल्या छुप्या बेडुकरावांचेच आहे.
बेडुकराव जसे पावसाळा येईपर्यंत जमिनीत खोलवर स्वतःला गाडून घेऊन लपून बसतात आणि पावसाळा आला की डरॉंव डरॉंव करीत जमिनीवर येतात तसे गोरेगावातील राष्ट्रवादीतले काही "बेडुकराव' निवडणुकाजवळ आल्या की तेवढयापुरते डरॉंव डरॉंव करीत बाहेर पडतात.
गोरेगावातील हे असले राजकीय "बेडुकराव' गोरेगावकरांसाठी स्वतः काही करीत नाहीत आणि दुसरा कुणी काही करीत असेल तर त्याला करू देत नाहीत.
मा. पवारसाहेबांच्या सच्च्या अनुयायांचे राष्ट्रवादीत राहून पाय खेचणे हाच या बेडुकरावांचा फुलटाईम उदयोग आहे.
मा. शरद पवारसाहेबांनी विविध राजकीय पक्षात "बेडुकउडया' मारीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या या बेडुकरावांना तंगडी धरुन पक्षाबाहेर फेकावे अशी गोरेगावातील राष्ट्रवादीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत "मनसे' शिवसेनेला खाऊन टाकणार आहे.
2000 पर्यंतच्या झोपडया अधिकृत केल्यामुळे 65 लाख झोपडपट्टीवासीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे उभे राहणार आहेत.
अशावेळी मुंबईतल्या 36 पैकी 24.25 जागा आघाडी सहज जिंकू शकेल पण या आघाडीत राहून बिघाडी करणाऱ्या गोरेगावातील "बेडुकरावां'सारख्या उपटसुंभांचा मा. पवार साहेबांनी कठोरपणे बंदोबस्त करायला हवा !

No comments:

Post a Comment