भारताच्या आर्थिक भवितव्याचे शिल्पकार - प्रणवकुमार मुखर्जी
भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे अर्थमंत्री मा. प्रणव मुखर्जी, ज्यांना बंगालची सारी जनता "प्रोणबदा' या सन्मानाने ओळखते, त्यांच्या बरोबरच्या भेटीचा दुर्मिळ योग नुकताच घडून आला. दिल्लीमध्ये "प्रोणबंदा'च्या समवेत ध्यानी मनी नसताना भेटीचा योग जुळून आला. अचानक घडलेली ही भेट आज नजरेसमोर अजूनही तरळते आहे.
भारतामध्ये आज काही नेते असे आहेत की ज्यांना जनतेच्या हृदयात मानाचे स्थान आहे. अत्यंत प्रेमळ, निगर्वी समंजस, उमद्या मनाचा, प्रभावी वक्तृत्वाची देणगी लाभलेला, सदैव प्रसन्नचित्त असणारा हा नेता जनतेच्या गळ्यातला लाडका "ताईत' न बनला तर नवलच!
भारताच्या लाडक्या प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधींचा हा अत्यंत विश्वासू सहकारी ज्याने कोणत्याही पदाची अजिबात अपेक्षा केली नाही परंतु त्यांच्या कार्यक्षमतेमुळे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री अशी वेगवेगळी मंत्रिपदाची जबाबदारी आपसूकच चालून आली. एवढेच काय, सध्याचे आपले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह निवडणुकीपूर्वी हृदय विकाराच्या आजाराने जेव्हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्या कठीण कालावधीत तेव्हा माननीय सोनियाजींनी कोणाचा विचार केला असेल तर तो फक्त प्रणव मुखर्जींचा!
देशाचा "हंगामी पंतप्रधान' म्हणून प्रणव मुखर्जींनी ही जबाबदारी तेवढ्याच ताकदीने सांभाळली. हृदय विकाराच्या आजारातून बरे होऊन आल्यावर मा मनमोहनसिंह यांनी प्रथम आभार कोणाचे मानले तर प्रणव मुखर्जींचे. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे पण देश सांभाळणारी व्यक्ती देखील तितक्याच तोलामोलाची, निःस्पृह, कर्तबगार, खंबीर असणे देखील गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज भारताचा विकसिनशील देश म्हणून सारे जग आपल्या प्रगतीकडे पहात असताना आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण, परराष्ट्रांबरोबर सलोख्याचे संबंध जपणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे देशाचे धोरण ठरवणे त्याच बरोबर देशाचे आर्थिक नियोजन करणे अशा तऱ्हेची विविध जबाबदारीची कामे उत्कृष्टपणे सांभाळली आहेत.
भारताचे आतापर्यंचे पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, नरसिंहराव, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंह प्रत्येकाने प्रणवबाबूंच्या कार्याची दखल घेतलेली आहे. त्यांच्या अंगभूत नेतृत्वामुळे साहजिकच महत्त्वाची केंद्रीय मंत्रिमंडळातली पदे चालून आलेली आहेत. हे स्वकर्तृत्व खचितच अभिमानाचे आहे. यात कोणाचेही लांगूलचालन नाही, कोणाचीही मर्जी राखणे नाही केवळ आपल्या स्वसामर्थ्यावर आपली ताकद अजमावून समोर आलेले काम करत राहाणे यालाच खरा कार्यकर्ता म्हणता येईल. संसदेत आणि संसदेबाहेर सुसंस्कृत संवाद झाला पाहिजे यावर त्यांचा दृढ़ विश्वास आहे. अर्थमंत्री म्हणून या ना त्या कारणाने भारतातील आर्थिक सुधारणांमध्ये ना. प्रणव मुखर्जी गुंतलेले होते. आर्थिक सुधारणा करण्यात त्यांची भागीदारी आणि कामाचा वाटा मोठा आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा करून ज्ञान मिळवणे तसेच आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना पर्यायाने देशाच्या विकासाला, उन्नतीला कसा होईल याकडे त्यांचा कल होता. भारत हा एक गरीब देश राहाणार आणि भारतीय जनता गरिबीतच जीवन कंठणार अशी काही काळ्या दगडावरची रेघ नाही, हे प्रणव मुखर्जी बाबूंनी प्रथम पासूनच ठरवलेले असावे आणि त्यानुसार त्यांचे अर्थमंत्री म्हणून केलेले काम फार मोलाचे व देशाच्या दृष्टीने प्रगतीचे व महत्त्वाचे तर नक्कीच ठरावे.
तसे पाहिले तर अर्थशास्त्र हा एक रुक्ष विषय आहे पण ज्याला अर्थकारण समजले नाही तर समाजकारण आणि राजकारण यालाही फारसा अर्थ राहात नाही. 1989 पासून आपल्या देशाने अर्थकारणात नवीन निर्णायक वळण घेतले. जागतिकी करण, निर्गुंतवणूक, परकीय भांडवल, परकीय चलनाची गंगाजळी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व त्यांच्या आगमनाचा भारतीय सामान्य जनतेवर होत असणारा बरा-वाईट परिणाम अशा सर्व बाबी गेली दहा-वीस वर्षे चर्चेत आहेत. आणि यात समज असण्यापेक्षा गैरसमजच जास्त असल्याचे आढळून येेते. कोणताही राजकीय पक्ष देशातल्या अर्थकारणाविषयी भूमिका घेत असताना आपल्या राजकीय स्वार्थाचे घोडे सर्वात पुढे ठेवत असतो हा सार्वत्रिक अनुभव आहे.
मा. प्रणव मुखर्जी निःस्पृह आहेत, अलिप्त आहेत तसेच उत्तम राजकारणी देखील आहेत. राज्यकर्त्याच्या वर्तुळात वावरणारे आहेत. राजकारणाच्या वर्तुळाचे घटक सुद्धा आहेत. पण त्यांचा दृष्टिकोन व्यापक जनहिताचा आहे आणि चांगल्या अर्थकारणातून व्यापक जनहित साधता येते यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.
सामर्थ्यशाली असणे याचा अर्थ निरनिराळया लोकांसाठी निरनिराळा असतो. ज्यांची पहिली पिढी साक्षर होते त्यांना शिक्षणामुळे सामर्थ्य प्राप्त होते असे वाटते. भूमिहिन शेतकऱ्याला असे वाटते की, आपल्याला जमिनीचा छोटा तुकडा जरी मिळाला तरी आपण शक्तिशाली होऊ. बेकार तरुणाला वाटते की उत्पादक रोजगार मिळाला तर आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. ज्यांच्याबाबतीत जाती आणि धर्माच्या नावाने भेदभाव केला जातो त्यांना वाटते की, आपला माणूस म्हणून स्वीकार झाला आणि सन्मानाची वागणूक मिळाली तरी सामर्थ्याचा लाभ होईल पण याचा साधा अर्थ असा की सामर्थ्यशाली म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला त्याकडे सामर्थ्यहीन माणसाच्या नजरेने पाहिले पाहिजे. भरती आली की जशी सर्व बोटी वर उचलल्या जातात तसेच सामर्थ्यशाली होण्यासाठी एक भरती नक्कीच उपयुक्त आहे ती म्हणजे आर्थिक विकासाची भरती होय.
दारिद्र्य हा सामर्थ्यशाली बनण्यामधला सर्वात मोठा अडथळा आहे. दारिद्र्यामुळे शिक्षणाची वाट बंद होते. दारिद्र्यामुळे रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाहीत. दारिद्र्यामुळे आई आपल्या मुलीला बालवयातच लग्न करून उजवून टाकते. आता ही गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे की कुटुंबाची मिळकत चांगली असेल तर शिक्षणावर अधिक पैसा खर्च केला जातो. मुलांना चांगले अन्न व वस्त्रे मिळू शकतात. राहाण्यासाठी चांगले घर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. माणूस हक्क संरक्षणासाठी अधिक आग्रही बनू शकतो आणि त्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची त्याची इच्छा व तयारी होऊ शकते. व्यक्तिगत अथवा सामूहिक पातळीवर परिणाम घडविणाऱ्या निर्णयाकरिता दबाव आणण्याची माणसाची क्षमता वाढते.
एक सामान्य माणूस म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून जर आपण एवढा विचार मान्य केला तर संपूर्ण देश चालविणे, देशाचे आर्थिक नियोजन करणे त्याचबरोबर देशाला जागतिक स्तरावर पोहोचवणे व जागतिक स्पर्धेत आपल्या देशाची शान व मान कसा उन्नत राहील याकडे जी व्यक्ती आपले तन-मन व सारी शक्ती पणाला लावते ती नक्कीच मोठी आहे. म्हणूनच प्रणव मुखर्जींचे काम फार प्रभावी आहे, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
ज्या देशातील दरडोई उत्पन्न वरच्या स्तराचे असते तेथील माणसांना आपण शक्तिहीन आहोत असे सहसा वाटत नाही. उदा. अमेरिकन माणूस तपासा. गरीब किंवा दरिद्री देशांमधील लोकांना असहाय्य वाटत असते आणि आपण बळीचे बकरे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात सतत घर करून असते, म्हणूनच प्रणवजींनी अर्थमंत्री या नात्याने काही ठोस विचार केलेला आढळतो.
सातत्याने आणि स्थिरपणाने आर्थिकविकास झाला तर दारिद्र्याची पातळी खाली यायला मदत होते. भारतामध्ये दारिद्र्य रेषा जितकी खाली जाईल तितक्या प्रमाणात लक्षावधी लोक सामर्थ्यशाली बनतील, ही मा. प्रणवजींची धारणा आहे.
भारताचे वर्णन बरेच वेळा एक दरिद्री देश असे केले जाते, हे प्रणवजींना मुळीच मान्य नाही. आपल्या देशात बरेच लोक गरीब आहेत हे खरे आहे. पण अशी कोणतीही काळ्या दगडावरची रेघ नाही जी सांगते की, गरीबांनी कायम गरिबच राहिले पाहिजे किंवा देशात दरडोई उत्पन्न कमी आहे अशा देशांनी सदासर्वदा त्याच स्थितीत राहिले पाहिजे.
गुंतवणूक झाली तर विकास होतो. त्याचप्रमाणे विपूल प्रमाणात असलेली नैसर्गिक संसाधने वापरात आणण्यासाठी मनुष्यबळाचा वापर झाला तर विकास होतो. एका बाजूला दारिद्र्यातून बाहेर पडू इच्छिणारे कोट्यवधी लोक आहेत तर दुसऱ्या बाजूला असे दिसते की त्यांच्यासाठी अजून कितीतरी संधी शोधायच्या राहून गेल्या आहेत.
मा. प्रणव मुखर्जी केवळ कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून मोठे नाहीत तर त्यांच्यात एक सामान्य कार्यकर्ता दडलेला आहे. पक्षाचे काम मग ते कोणतेही असो मन लावून करावयाचे ही प्रेरणा आज कित्येक वर्षे त्यांच्या मनात जागृत असल्याने इंदिराजी असो अथवा राजीवजी असो प्रणवबाबूंना वगळून कोणतेही काम पूर्ण होईल असा विश्वास वाटलाच नाही. कॉंग्रेस पक्षाने त्यांना वेळोवेळी जी म्हणून जबाबदारी दिली ती त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारली व तडीस नेली. त्यांच्यात ही कामाची तडफ कोठून आली असा प्रश्न कोणाच्या मनात आलाच तर त्याचे साधे उत्तर म्हणजे देश उन्नतीची प्रामाणिक तळमळ! मी या देशाचा जबाबदार नागरिक आहे तेव्हा माझा देश सामर्थ्यशाली असला पाहिजे, मग त्या वेळेस मंत्रिपद असो किंवा नसो माझे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार ही आंतरिक प्रेरणा मा. प्रणवजींच्या प्रत्येक कृतीत दिसते.
सामर्थ्यशाली भारतात प्रत्येकाला रोजगार मिळू शकेल किंवा एखादा उद्योग वा व्यवसाय करता येईल. प्रत्येकाला वेगवेगळ्या उपभोग्य वस्तूंचा आस्वाद घेता येईल आणि सेवांचाही लाभ घेता येईल. खास करून अन्न-वस्त्र उपलब्ध होईल आणि शिक्षण व आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल. प्रत्येकाला रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांच्या पलीकडे जाऊन इतर गोष्टींचा जीवनात आस्वाद घेता येईल, आत्मविकास साधता येईल अथवा प्रत्येकाला अत्यंत निर्भीडपणे आणि दडपण न येता राजकीय व मानवी हक्क व अधिकारांचा वापर करता येईल या दृष्टीने प्रत्येक भारतीय सक्षम व सशक्त झाला पाहिजे, ही प्रणवजींची धारणा आहे.
मा. प्रणवजींचा दृढ़ विश्वास आहे की आर्थिक सुबत्तेमुळे आणि संपन्नतेमुळे भारत सामर्थ्यशाली राष्ट्र बनेल. सातत्य टिकवून मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होणे आवश्यकता आहे. विकसनशील उद्योगांची संधी मिळालेल्या प्रत्येक भारतीयाला सामर्थ्यवान व्हायचे असेल तर हे मूलभूत आर्थिक कार्य होणे आवश्यक आहे, हा विश्वास प्रणवजींच्या मनात ठासून भरलेला होता. आजच्या परिस्थितीत जगात भारताबद्दल आदर आहे. काही देशांना भारताविषयी प्रचंड कौतुक वाटते, भारत अग्निबाण सोडू शकतो, उपग्रह सोडू शकतो अथवा पुढच्या काही वर्षात अमेरिका, रशियाप्रमाणे चांद्रयान मोहिमांची तयारी करू शकतो किंवा पोखरणचा अणुस्फोट करू शकतो याचे कारण प्रणवजींनी काही ठोस आराखडे फार पूर्वीच बांधले होते. स्व. राजीव गांधींच्या अत्यंत विश्वासातला हा शिलेदार सर्वसामान्य जनतेचे भाग्य कसे विकसित होईल याचा विचार करीत राहिला.
आर्थिक सुबत्तेमुळे विकास वाढीचा दर किमान 8 टक्के असावा व ही गती आपण टिकवून धरली पाहिजे व सुयोग्य आणि वक्तशीर आर्थिक धोरणांना कार्यवाहीच्या यंत्रणेची जोड मिळाली तर आपल्याला कार्यक्षेत्र विस्तृत करता येईल आणि गुंतवणूक वाढविता येईल असा साधा विचार प्रणवजींच्या मनात तरळून गेला आणि मग पुढे भारताने जी विकासाची गती घेतली ती आपण सारेजण आज अनुभवतो आहोत. विकसनशील उद्योगांची संधी मिळालेल्या प्रत्येक भारतीयाला सामर्थ्यवान व्हायचे असेल तर भारताचा आर्थिक विकास प्रथम झाला पाहिजे व सद्यस्थितीत आपण परदेशातून घेतलेले हजारो कोटींचे कर्ज कसे फेडता येईल किंवा या कर्जाची व्याप्ती कशा प्रकारे कमी करता येईल हा विचार प्रत्येक अर्थमंत्र्याच्या अखत्यारितला आहे, असे म्हणावेसे वाटते. भारताचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री या नात्याने त्यांनी विविध पदांवर कामे केलेली आहेत. त्यांना या कामाची पूर्ण माहिती आहे आणि दीर्घ अनुभवही आहे.
सन 1935 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मिराती किरनदार या खेडेगाव, विरभूम जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण एम.ए. (इतिहास) एम. ए. (पोलिटिकल सायन्स) एल एल बी, डी.लिट विद्या सागर युनिव्हर्सिटी कलकत्ता येथून शिक्षण पूर्ण झालेले व व्यवसायाने शिक्षक व पत्रकार म्हणून कार्यास प्रारंभ केलेला आहे. तसेच त्यांनी निखिल बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.
लोकसभेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच राज्यसभेच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव, कायद्याचे सखोल ज्ञान, परराष्ट्रांतल्या मान्यवर व्यक्तींशी उत्तम सलोख्याचे संबंध, जनतेशी असणारा सुसंवाद असे हे चतुरस्त्र प्रतिभा व ज्ञान असणारे व्यक्तिमत्त्व आपल्या देशाला लाभले व देशहिताची कळकळ व उन्नतीसाठी त्यांनी जे जे काम अंगिकारले ते गौरवशाली आहे, असेच म्हणावे लागेल.
Tuesday, August 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment