अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
महाराष्ट्राचे "वल्लभभाई पटेल' गृहमंत्री ना.जयंतराव पाटील
राष्ट्रात देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्रीपदाला आदर, दरारा, मान, प्रतिष्ठा, महत्त्व, प्रभुत्त्व प्राप्त करून दिले आणि "पोलादी पुरुष' म्हणून लौकिक मिळवला. तेव्हापासून पंतप्रधानपदाखालोखाल देशाचे गृहमंत्री पद महत्त्वाचे-मानाचे ठरले. महाराष्ट्रात ना.शरद पवार गृहराज्यमंत्री होईपर्यंत कोण गृहराज्यमंत्री आहे हे लोकांना ठाऊक देखील नसे. ना.शरद पवारसाहेबांनी 1973 साली गृहराज्यमंत्री पदाला राज्यात असे ग्लॅमर, ग्लोरी आणि सुपरस्टारडम् प्राप्त करून दिले की त्यानंतर प्रत्येक आमदाराला आयुष्यात एकदा तरी गृहराज्यमंत्री व्हावे, असे वाटू लागले. महाराष्ट्रात गृहमंत्रीपद गाजवले ते 1960 च्या दशकात स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी. त्यानंतर आर.आर. आबा पाटलांनी. ना.जयंत पाटील यांनीही आता गृहखात्यावर आपली "मोहोर' उठवलेली दिसू लागली आहे. ना.जयंत पाटील हे यशस्वी अर्थमंत्री होतेच आता ते तेजस्वी गृहमंत्री म्हणून तळपताना दिसू लागले आहेत.
ना.जयंत पाटील हे पश्र्चिम महाराष्ट्रातील श्रेष्ठ नेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव. महाराष्ट्रात एस.एम.जोशी, बापूसाहेब काळदाते, भाई वैद्य या समाजवाद्यांनी कटकारस्थाने केली नसती तर 1978 साली "पुलोद'चे मुख्यमंत्री राजारामबापू पाटीलच झाले असते. जनता दलाचे त्यावेळी अध्यक्ष असलेल्या राजारामबापूंनी वसंतदादांचे सरकार पाडण्याची पूर्ण तयारी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून केली होती, पण केवळ राजारामबापुंना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही या दुष्टपणापोटी समाजवाद्यांनी शरद पवारांना नेतृत्व देऊन "पुलोद'ची स्थापना केली. अर्थात राजारामबापुंनी वाळव्यात आपले समाजाभिमुख साम्राज्य उभारले. वाळवा सहकारी साखर कारखान्यापासून शिक्षणसंस्था, सहकारी बॅंका, पतपेढ्या असे विकाससंस्थांचे जाळे उभारले आणि परिसरात क्रांती घडवून आणली. वसंतदादांनी सांगलीचा, यशवंत रावजींनी कऱ्हाडचा, शंकरराव मोहिते पाटलांनी अकलूजचा केला तसा त्या 70 ते 80 च्या जमान्यात राजारामबापुंनी वाळव्याचा केला.
ना.जयंत पाटलांना असलेला थोर कृतीशील विचारवंत सहकारमहर्षी राजारामबापू पाटलांचा समाजसेवेचा वसा आणि राजकारणाचा वारसा कदाचित आजच्या "जनरेशन नेक्स्ट' राजकीय नेत्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल असे वाटले म्हणून मुद्दाम त्या इतिहासाची राजाराम बापुंच्या नावे सुवर्णाक्षरात लिहिली गेलेली पाने आम्ही उलगडून संदर्भ दिला. ना.जयंत पाटील पैसे नव्हे तर पुण्याई कमावण्यासाठी राजकारणात आले याचे कारण हा पिढीजात संस्कार हे आहे. "प्रोफेशनल' लीडर्सच्या जमान्यात जयंतरावांसारखा "डिव्होशनल' लीडर राजकारणात दिसतो याचे रहस्य वडिलांच्या शिकवणुकीत आहे. "कमिशन'साठी आटापिटा करणाऱ्या राजकारण्यांच्या भाऊगर्दीत ना.जयंतरावांसारखा मंत्रिपद हे "मिशन' समजून काम करणारा नेता उठून दिसतो.
ना.जयंतराव मितभाषी आहेत. गरजेपेक्षा अधिक ते बोलत नाहीत. आर.आर.आबा पाटील म्हणजे 24 ु 7 चालणारे, अखंड बोलणारे एफ.एम.रेडियो चॅनल होते. त्या पार्श्र्वभूमीवर ना.जयंत पाटील यांचे मोजके बोलणे म्हणजे गणेश विसर्जनाची अनंतचतुर्थीची वाजतगाजत 24 तास चाललेली पुण्याची मिरवणूक संपल्यावर यावी तशी निवांत शांतता आहे. दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जी स्वभाववैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती आहे तिच्याशी ना.जयंत पाटील यांचे खूपच साम्य असल्यामुळे पुढील सर्व मान्य मुख्यमंत्री ते असतील अशी अनेकांची अटकळ आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग कमी बोलतात पण जे बोलतात त्यामागे विचार, तत्त्व, सत्त्व, महत्त्व, प्रभुत्त्व, विद्वत्ता, अनुभव असतो. तसेच ना.जयंत पाटलांचे आहे. "राजकारण' न करणारा "राजकारणी' असे ना.जयंत पाटील यांचे वर्णन करावे लागेल. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा ज्या मंत्र्यांच्या चरित्र आणि चारित्र्यामुळे उजळली आहे त्यात जयंत पाटील अग्रभागी आहेत. निष्कलंक चारित्र्य, वादातीत नेतृत्व आणि निर्विवाद कर्तृत्व हे जयंतरावांच्या प्रतिमेचे पैलू आहेत. गांभीर्य हा त्यांचा स्वभाव आहे. मुख्यमंत्री असून विलासराव देशमुख हे सर्व विषय, मुद्दे "लाईटली' "कॅज्युअली' घेण्याबद्दल प्रसिद्ध (?) होते पण जयंत पाटील "सिरीयसली' आणि "सिन्सीअरली' सर्व विषय हाताळतात हे त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि आता त्यांच्याशी "इंटरऍक्शन' करीत असलेले ज्येष्ठ पोलीस अधिकारीदेखील सांगतात.
सेवाभावाने सत्ता स्वीकारण्याचा आणि सत्ता ही समाजाचे विश्र्वस्त या नात्याने राबवण्याचा मूलमंत्र म.गांधींनी दिला होता. "राष्ट्रवादी' जयंत पाटील त्या अर्थाने सच्चे "गांधीवादी' आहेत. त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांची ही विश्र्वस्ताची भूमिका पदोपदी जाणवते. मग ते खाते अर्थ असो अथवा गृह. आपण जनतेची "अमानत' सांभाळतो आहोत या त्यांच्या भावनेमुळेच त्यांच्यावर कधी भ्रष्टाचार, गैरकारभार, पक्षपाताचे आरोप झाले नाहीत. होऊच शकत नाहीत कारण त्यांनी स्वत:साठी एक अघोषित आचारसंहिता आखून घेतली आहे. कायदा आणि त्याचबरोबर नितीमत्तेच्या चौकटीत बसणारेच काम मी करणार हा त्यांचा बाणा असल्यामुळे त्यांच्याभोवती "चमचे' नाहीत, तसेच "दलाल' ही नाहीत. सामान्यांतला सामान्य माणूस कुणाच्याही मध्यस्थीशिवाय आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय थेट जयंतरावांपर्यंत पोचू शकतो, दाद मागू शकतो. जयंतराव पोलीस अधिकाऱ्यांच्या गटबाजीला थारा देत नाहीत. "लॉबींग'ला दाद देत नाहीत. राष्ट्रवादीतल्या गटबाजीत ते जसे नाहीत तसेच प्रशासनाच्या गटबाजीत देखील नाहीत. यामुळे त्यांच्या न्यायनिवाड्याबद्दल, नि:पक्षपातीपणाबद्दल पोलीस खात्यात विश्र्वास आहे. बदल्याबढत्यांमुळे बदनाम न झालेले गृहमंत्री म्हणून आर.आर.आबांसोबत जयंत पाटलांचेच नाव घ्यावे लागेल.
महाराष्ट्राचेच गृहमंत्री असलेल्या ना.जयंत पाटील यांच्यापुढील आव्हान सोपे नाही. मुंबईतली गुन्हेगारी ही आता पूर्वीप्रमाणे फक्त खून, दरोडे, खंडणी, गॅंगवॉरपुरती मर्यादित राहिलेली नाही. स्मगलींगचा जमाना आता मागे पडला. अंडरवर्ल्ड किंवा माफीयांचे कारनामे आता चर्चेचा विषय राहिले नाहीत. आता "दादा-भाई-अण्णा-तात्या' यांची जागा "व्हाईट कॉलर क्राईम' घेतो आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला दाऊदपेक्षा "सत्यम' स्कॅमच्या राजूसारख्या लोकांकडून अधिक मोठा धोका आहे. "व्हाईट कॉलर' क्राईमचा नवा आक्राळविक्राळ अवतार "सायबर क्राईम'च्या रूपाने भस्मासुरासारखा मुंबई गिळंकृत करू पाहतोय. पण या सर्वांपेक्षा जबरदस्त आव्हान आहे. दहशतवादीकृत्यांचे-आत्मघातकी दहशतवाद्यांचे! "ग्लोबल टेररिझम्'चा "लोकल' तडाखा मुंबईने 26/11 ला अनुभवला आणि 1993 च्या बॉम्बस्फोटापेक्षाही मोठा धक्का मुंबईकरांना बसला. दाऊद इब्राहीम आता "स्मगलर' राहिला नाही. भारतासाठी तो आता दुबई आणि कराचीत बसून भारतातील दहशतवादी कृत्यांची सूत्रे हलविणारा "प्रति-ओसामा बिन लादेन' झाला आहे. अल कायदा आणि लष्करे तोयबासारख्या दहशतवादी संघटना हिंदू आणि मुस्लीमांमध्ये दंगली घडवून आणण्यासाठी चिथावणीखोर दहशतवादी कृत्ये करीत आहेत ही सर्वात घातक गोष्ट आहे. धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्यासाठी पोसला-जोपासला जाणारा "हिंदुत्ववादी' दहशतवाद हे आणखी एक विचित्र आव्हान नव्याने निर्माण झाले आहे. भूखंड माफीया नव्याने उदयास आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या असूया, स्पर्धा, गटबाजीत गुन्हेगारी टोळ्यांना हाती धरून एकमेकांविरुद्ध "सापळे' रचून कर्तबगार अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी कुभांड रचून एकमेकांना तुरुंगात पाठविण्याचे अघटित पुन:पुन्हा घडते आहे. राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आता आपले आंदोलन उग्र आणि हिंसक केल्यामुळे "न्यूज चॅनल्स'वरुन प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊन अधिक विध्वंसक करू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्यामुळे आता राजकीय पक्षही अधिक आक्रमक होणार आहे. या परिस्थितीचे आव्हान गृहमंत्री जयंत पाटील यांच्या समोर आहे. अर्थात संयम, सहनशक्ती, सौजन्य, समंजसपणा याबरोबरच निर्धार, कणखरपणा, कर्तव्य, कठोरता यांचीही गरज आहे. महाराष्ट्राच्या सुदैवाने गृहमंत्री जयंत पाटील हे आव्हान स्वीकारण्यास समर्थ आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्यावर विश्र्वास ठेवून निर्धास्त आहे!
Tuesday, August 4, 2009
महाराष्ट्राचे "वल्लभभाई पटेल' गृहमंत्री ना.जयंतराव पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment