अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मराठी माणसा माणसा
कधी होशील मराठी माणूस ?
खानदेशच्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचा "अरे मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?' ही कविता प्रसिद्ध आहे. सध्या मराठी माणूस-भाषा-संस्कृती यावर विचारमंथन चालू आहे. म्हणून "मराठीपणा-मराठी बाणा' या संदर्भात काही लिहावे असे ठरवले. 21 वे शतक हे जागतिकीकरणाचे ग्लोबल व्हिलेजचे शतक आहे. छोट्याशा खेड्यातला "लोकल' माणूस देखील इंटरनेटच्या माध्यमातून "ग्लोबल सिटीझन' बनला आहे. अशावेळी पूर्वप्रतिष्ठित, पूर्वपरिचित अशी ओळखीची, अस्मितेची चिन्ह पुसली, बदलली जाणं साहजिक असतं. आज केवळ मराठी भाषा, संस्कृती आणि माणूसच नव्हे तर जगभरातले सर्वच भाषिक एका संभ्रमावस्थेत आहेत. सर्वच भाषिकांना आपली ओळख पुसण्याची भीती वाटते आहे. इंटरनेटमुळे सर्वच भाषांच्या डोक्यावर इंग्रजी भाषा बसते आहे, त्यामुळे जगभरच्या स्थानिक भाषा आपली लढाई इंग्रजीशी आहे, असे मानतात. पण महाराष्ट्रात मात्र मराठी भाषिकांची लढाई शिवसेना-मनसेच्या आंदोलनांमुळे रोजगाराच्या क्षेत्राशी निगडित झाली आहे. त्यामुळे ती हिंदी भाषिकांविरुद्धची लढाई होत चालली आहे. इंग्रजी पाट्या बदलण्याचा आग्रह जरी मराठी नेत्यांचा असला तरी इंग्रजीला त्यांचा अन्यथा विरोध नाही.
जगात फ्रेंच, बंगाली, तामिळी हे कडवे भाषावादी मानले जातात पण ग्लोबल इंग्रजीच्या प्रवाहापुढे त्यांचेही काही चालेनासे झाले आहे. भाषा हे संस्कृतीचं वाहन मानलं जातं. आता जगाची संस्कृतीच एक होत चालल्यामुळे जगाची भाषादेखील इंग्रजी हिच एक होणार काय? अशी चर्चा जगभर चालू झाली आहे. मराठी बोलणं, मराठी पदार्थ करणं, सणवार, उत्सवसमारंभ, व्रतवैफल्य, मराठी पोशाख, मराठी नाटकं, मराठी गाणी, मराठी पुस्तकं या मराठीपणाच्या खुणा, खरे तर मराठी माणसाच्या जीवनात आजही ठळकपणे आहेत, तरीदेखील त्याला मराठीच्या भाषा-संस्कृती-समाज म्हणून भवितव्याची "ग्लोबलायझेशन'च्या संदर्भात चिंता वाटते आणि म्हणून मराठीपणा-मराठी बाणा हा पुन्हा एकदा मराठी माणसांच्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय होताना दिसतो आहे.
1947 पर्यंत भारतावर थेट इंग्रजांचं राज्य होतं. आश्र्चर्य म्हणजे इंग्रजांचं साक्षात राज्य असताना महाराष्ट्रात मराठी माणसाला कधी त्याची भाषा, संस्कृती, अस्मिता धोक्यात आली आहे, असे वाटले नाही. पण स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांनी आज मराठी माणसाला असुरक्षित वाटते आहे. कारण यावेळी मराठी माणसाच्या इच्छा, आकांक्षा, कार्यकर्तृत्वाचा कक्षा विस्तारून जागतिक झाल्या आहेत. त्यावेळी फक्त इंग्रज राज्यकर्त्यांपुरती मर्यादित असलेली इंग्रजी भाषा आता सर्वसामान्यांच्या शिक्षणापासून वाचनापर्यंत आणि प्रशासनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत सर्वत्र वरचढ ठरली. विष्णूशास्त्री चिपळुणकरांसारख्या मराठी समाजसुधारकाने ज्या इंग्रजीचे "वाघीणीचे दूध' म्हणून स्वागत केले ती "वाघीण' आता आपली मराठी पिल्ले खाईल की काय अशी भीती मराठी माणसाला वाटू लागली आहे. कारण सत्ता-संपत्ती-रोजगाराची संधी इंग्रजीशी निगडित होत आहे आणि मराठी ही शिपाई, घरगडी आणि मोलकरणींची भाषा म्हणून हिणवली जाते आहे. तरी बरं एका पाहणीनुसार मुंबईतल्या 70 टक्के कामवाल्या मोलकरणींची मुलं इंग्रजी माध्यमातच सध्या शिकत आहेत. मुंबईतल्या सफाई कामगारांपैकी 40 टक्के मुलं इंग्रजीत शिकताहेत. मराठी माध्यमांच्या खाजगी शाळांत शिकणारी बहुसंख्य मुलं कनिष्ठ मध्यमवर्गीय कारकून, शिक्षक अशा पांढरपेशा व्यवसायातील लोकांची आहेत. याचा अर्थ मराठीत शिकणारी मुलं आता कनिष्ठ मध्यमवर्गातून फक्त येत आहेत. गरीबांना दारिद्र्यातून, अवहेलनेतून बाहेर पडण्याचा मार्ग इंग्रजी शाळा वाटतो आहे. श्रीमंतांना प्रतिष्ठा इंग्रजीत वाटते आहे. त्याचमुळे मराठी शाळा बंद पडून इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे. पण हे महाराष्ट्रात नाही सर्वच राज्यांच्या महानगरात घडते आहे. पण मराठी शाळांचे बंद पडणे स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत पाठविणाऱ्या मराठी माणसालाही क्लेशकारक वाटते, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. किंबहुना देशासाठी सीमेवर जाऊन लढण्यासाठी, मरण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे म्हणणाऱ्या कोणालाही तो लढणारा, मरणारा तरुण आपला मुलगा असावा असे वाटत नाही. तर तो शेजाऱ्याचा हवा असतो तसेच मराठी शाळांमध्ये मराठी माणसांनी आपली मुले घातली पाहिजेत, या प्रश्र्नावर झाले आहे. अर्थात मराठी शाळांच्या बंद पडण्याशी मराठी भाषा-अस्मिता यांचा प्रश्र्न निगडित करण्याची तशी गरज नाही. महाराष्ट्राशेजारच्या गोवा राज्यात 90 टक्के मुले इंग्रजीत शिकतात, 70 टक्के लोक कोकणी आणि बाकीचे कोकणी व इंग्रजी बोलतात. रोजच्या जीवनात मराठी भाषेचा वापर करणारे गोव्यात 5-10 टक्केसुद्धा नाहीत. पण तरी गोवा आपण मराठी मानतो. गोवेकर स्वत:ला मराठी मानतात. म्हणजे शाळा किंवा माध्यमापलीकडे मराठीपणा आहे. याचाच हा पुरावा आहे.
मराठी माणूस मराठी खाद्यपदार्थ तरी आता कितीसा खातो? खास मराठी पदार्थाची मराठी उपहारगृहे देखील मराठीच्या बरोबरीने दाक्षिणात्य खाद्यपदार्थ ठेवतात. पंजाबी, चायनीज सुद्धा देतात. खास काही दिवशीच मराठी माणसे बाहेर मुद्दाम मराठी पदार्थ खातात. मराठी लग्नात देखील आता पंजाबी, चायनीज, थाई फूडचे स्टॉल लागतात. फेटे उत्तर भारतातून आले. लग्नात जोडे पळवण्यासारखे खेळ कुठे मराठी आहेत? मेहंदी, संगीत, नाचगाणी कुठे मराठी आहेत? हिंदी चित्रपटांमुळे देशभरातील लग्नसोहळ्यांचे अज्ञाता हिंदुस्थानीकरण झाले आहे. अर्थात तरी काही बिघडलेले नाही. हे सर्व समाविष्ट असूनही मराठी लग्न अद्याप मराठी वाटते. मग मराठी संस्कृतीची काळजी करण्याचे काय कारण? मराठी संस्कृतीचे हे परिवर्तित रूप मराठी म्हणूनच स्वीकारण्यास काय हरकत आहे?
आपल्या भारतीय बाजारपेठा चिनी मालाने भरल्या आहेत पण चिनी भाषिक किंवा भाषा इथे न आल्यामुळे हे चिनी आक्रमण आपल्या लक्षात येत नाही. पण खेळण्यांपासून घरातली प्रत्येक वस्तू, शोभेची वस्तू चीनमधून येते तेव्हा ती इथल्या आधीपासूनच्या मराठी वस्तुंना हद्दपार करीत नाही का? आकार, प्रकार, रंगसंगती संस्कृती घेऊन येतात. इंग्रजी भाषा मराठी भाषेवर आक्रमण करीत असताना चिनी संस्कृती आपल्या मराठी संस्कृतीवर केवढे मोठे आक्रमण करीत आहे, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. अर्थात चिनी वस्तू वापरल्यामुळे मराठी संस्कृती लयाला जाईल असे मानण्याचेही कारण नाही. एकेकाळी भारतात विदेशी वस्तुंची होळी झाली. बाबू गेनू शहीद झाला. म.गांधींच्या आदेशानुसार विदेशी कपड्यांची होळी झाली. पण त्याकाळी विदेशी कपड्यांचा एक तागा येत असेल तर आज एक लाख तागे विदेशातून येतात. पण ते विदेशी म्हणून निषेधार्ह नव्हे चक्क स्वागतार्ह ठरत आहेत. यालाच कालाय तस्मै नम: म्हणतात.
आम्हाला मराठी माणूस-संस्कृती-अस्मिता यांची चिंता वाटत नाही. कारण मराठी माणसाचे मराठीपण बाह्य गोष्टीत नाही. ते त्याच्या मनात आहे. मराठी माणूस महाराष्ट्राबाहेरच नव्हे तर देशाबाहेर जरी गेला तरी तो "मराठी माणूस' राहतोच. हे मराठीपण त्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यात समईसारखे जोवर तेवत आहे. तोवर मराठीला, मराठी संस्कृतीला धोका नाही!
Tuesday, August 4, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment