सच्चा मुंबईकर - अच्छा कॉंग्रेसवाला
नबाब मलीक - दिल जितनेवाला
महाराष्ट्राचे कामगार मंत्री नबाब मलीक म्हणजे मुंबईच्या "सेक्युलर' कल्चरचे खरे प्रतीक आहेत. "मजहब नही सिखाता आपस में बैर रखना' यावर मनापासून श्रध्दा असल्यामुळे एकीकडे मुंबईतील मुस्लीम समाजाचे एकमुखी नेतृत्व लाभलेल्या नबाब मलीक हिंदू कार्यकर्त्यांमध्येही तेवढेच लोकप्रिय आहेत. नबाबसाहेब नेहमी म्हणतात की, इथे लोकांचे धर्म वेगवेगळे असले तरी संस्कृती एक आहे आणि ती म्हणजे भारतीय! या सांस्कृतिक स्नेहबंधनामुळेच आपले राष्ट्रीय ऐक्य विशाल, बळकट आणि टिकावू झाले आहे. सर्व धर्मांचा पाया भारतीय जीवनमूल्यांशी एकरुप झालेला असल्यामुळे भारत अध्यात्मिक वृत्तींचा देश असूनही सर्वार्थाने सेक्युलर आहे. नबाब मलीक हे उदारमतवादी, पुरोगामी, आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या कसोटीवर राजकारण, समाजकारण करणारे नेते असल्यामुळेच मा. शरद पवार साहेबांसारख्या "सेक्युलर' नेतृत्वाच्या मनात ते भरले आणि त्यांनी कामगार खात्यासारख्या मुंबईच्या दृष्टीने संवेदनाशील खात्याची जबाबदारी नबाब मलीक यांच्यावर सोपवली.
नबाब मलीक यांनी कामगार खात्याचे आव्हान ताकदीने पेलले आहे असे म्हणावे लागेल. मुंबईच्या कामगारांनी ज्यांचे नेतृत्व स्वीकारले ते मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ठरले हा इतिहास आहे. कॉ. एस.ए.डांगे, जॉर्ज फर्नांडीस, राजा कुलकर्णी, डॉ. शांती पटेल, एस.आर.कुलकर्णी, डॉ. दत्ता सामंत, दत्ताजी साळवी, दस्तूर, आर.जे.मेहता अशा कामगार नेत्यांनी मुंबईच्या कामगार चळवळीत इतिहास निर्माण केला. अर्थात गिरणी संपाच्या अपयशापासून मुंबईतल्या कामगार चळवळीला उतरती कळा लागली. साडेतीन लाख गिरणी कामगारांचे जीवन डॉ. दत्ता सामंत यांच्या दुराग्रहामुळे उद्वस्त झाले. मराठी कामगार देशोधडीला लागला. गिरणी कामगार गावी परतल्यामुळे मुंबईतला मराठी माणसांचा टक्काही कमी झाला. मुंबईतल्या कामगारांनीच कामगार नेत्यांकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. "ब्ल्यू कॉलर' कामगार वर्ग "व्हाईट कॉलर' कर्मचारी वर्गासारखा वागू-बोलू लागला. मध्यवर्ती कामगार संघटनांची जागा कारखान्यांमधील, आस्थापनांमधील स्थानिक कामगार प्रतिनिधींच्या लोकल कमिटयांनी घेतल्यामुळे मॅनेजमेंटचे पंटर त्या कमिटयांचे सूत्रधार झाले. जागतिकीकरणामुळे भारतीय कारखानदारीच धोक्यात आली. कारखानदारांना पूर्वी कामगार संपाच्या धमक्या, इशारे, नोटीसा देत. आता कारखानदारांना कारखाने बंद करण्यासाठी निमित्त, बहाणे, कारण हवे असल्यामुळे तेच कामगारांना कारखान्यात टाळेबंदी, बंद करण्याच्या धमक्या देऊ लागले. नबाब मलीक यांच्यापुढे कामगार मंत्री म्हणून असलेल्या आव्हानांपैकी महत्त्वाचे आव्हान कामगारांच्या नोकऱ्या, रोजीरोटी वाचवणे हे आहे, असे आम्ही म्हणतो ते या पार्श्र्वभूमीवर.
विशेष म्हणजे कामगार मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नबाब मलीक यांनी सरकार कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी कठोर भूमिका घेतली आणि कारखाना बंद करणारच असाल तर सर्व कामगारांची सगळी देणी दिल्याशिवाय तुम्हाला कारखान्याखालील जमीन विकता येणार नाही, या कागदावर जाहीर झालेल्या धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली. राजकीय दबाव आणि आर्थिक दडपणांना झुुगारुन नबाब मलीक यांनी कामगारांची केलेली पाठराखण नोंद घेण्याजोगी आहे.
एकेकाळी मुंबईचे राजकारण कामगार चळवळीच्या अनुषंगाने चालायचे. म्हणून वसंतदादा पाटील, रजनी पटेल, नरेंद्र तिडके असे राजकीय नेतेही गिरणी कामगारांच्या प्रतिनिधिक अशा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार झाले. कामगार चळवळीतील सर्व पक्षांचे नेते विधानसभा, लोकसभा यावर वेळोवेळी निवडून आले. शिवसेनेच्या वाढीत भारतीय कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती यांचा मोठा वाटा होता. कॉंग्रेसच्या "व्होट बॅंके'त इंटक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा मोठा हिस्सा होता. आज नबाब मलीक यांना कामगारांमधील ही राजकीय संवेदनाशीलता जागी करण्याचे मोठे आव्हान आहे. पुन्हा यातला अवघड भाग असा की हे काम कामगार नेत्याचे असून नबाब मलीक यांना मात्र ते मंत्री म्हणून पार पाडायचे आहे.
नबाब मलीक हे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री आहेत. जरी मुंबईतील कामगार नेते मवाळ आणि कामगार चळवळ दुर्बळ झालेली असली तरी मुंबईतली कामगारांची संख्या वेगळया आणि नव्या व्यवसायात वाढली आहे. शॉपींग मॉल्स, मल्टीप्लेक्स, आय.टी.पार्कस्, सेझ, अम्युझमेंट पार्कस्, आस्थापने यात मोठया संख्येने तरुण कामगार-कर्मचारी यांची भरती चालू आहे. कॉलसेंटर्समध्ये लाखो सुशिक्षित तरुणांची भरती चालू आहे. पण या तरुण कामगार-कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या कामगारांप्रमाणे राजकारणात इंटरेस्ट नाही. 1980 पूर्वीच्या मुंबईतल्या कामगारांना स्वतःची अशी राजकीय मते, राजकीय पक्ष, राजकीय लाडके नेते होते. डाव्या पक्षांचा, समाजवादी-कम्युनिस्ट पक्षांचा राजकीय आधार आणि मतदार हा मुंबईतला कामगार वर्ग होता. कामगारांना नबाब मलीक हे आपले वाली, कैवारी, पाठीराखे वाटतात ही वस्तुुस्थिती आहे. मालकांच्या, उदयोगपतींच्या दबावाखाली न येता कामगारांच्या बाजूने न्याय देणारा मंत्री-नेता हा नबाब मलीक यांचा लौकिक त्यांच्या कारकिर्दीतून निर्माण झाला आहे. कामगार मोठया आशेने, अपेक्षेने त्यांच्याकडे येतात आणि कधीही निराश होऊन जाण्याची पाळी त्यांच्यावर येत नाही.
नबाब मलीक यांच्या या "प्रो-वर्कर्स' कामगाराभिमुख प्रतिमेचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुंबई-ठाणे परिसरातील सुमारे 50 विधानसभा मतदारसंघात मोठा लाभ होऊ शकतो. यासाठी "कामगार मंत्री जणू कामगार नेता' ही नबाब मलीक यांची प्रतिमा आघाडी सरकारने नीट "एन कॅश' राजकीय दृष्टया करायला हवी. आजही मुंंबई-ठाण्यातील मतदारसंघात निम्मे मतदार कामगार-कर्मचारी वर्गातील, औदयोगिक आस्थापनातील आहेत. कामगारांच्या युनियन्स मोडून पडल्यामुळे आता या कामगारांना न्याय देण्याचे काम कामगार मंत्री या नात्याने फक्त नबाब मलीकच करू शकतात आणि करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी सचिन अहीर हे एक कामगार नेते आहेत, अशावेळी कामगार नेते सचिनभाऊ आणि कामगार मंत्री नबाब मलीक यांनी मिळून जर मुंबईतील निवडणुक प्रचारमोहिमेची सूत्रे सांभाळली तर जो विजयाचा विक्रम लोकसभा निवडणूकीत "आघाडी'ने केला त्याचीच पुनरावृत्ती मुंबईत विधानसभा निवडणुकीत या दोघांच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय रहाणार नाही.
Tuesday, August 4, 2009
सच्चा मुंबईकर - अच्छा कॉंग्रेसवाला नबाब मलीक - दिल जितनेवाला
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment