Tuesday, August 18, 2009

महाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबा "दीपस्तंभ', "आधारस्तंभ' आर.आर.आबा!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
महाराष्ट्राचे आधुनिक गाडगेबाबा
"दीपस्तंभ', "आधारस्तंभ' आर.आर.आबा!
माननीय रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील म्हणजे "आबा' हे महाराष्ट्राला अलीकडच्या काळात लाभलेले प्रिय व आदरणीय असे व्यक्तिमत्त्व आहे की, त्याबाबत "तेथे कर माझे जुळती' असे उद्‌गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात. महाराष्ट्रात मंत्री अनेक झाले, पण ज्यांची कारकीर्द "अविस्मरणीय' याच शब्दात वर्णन करता येईल, अशा मोजक्या मंत्र्यांपैकी "आबा' एक होते. महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. आबांच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात अशा काही आदर्श गोष्टी आहेत की ज्यामुळे त्यांचा आदर्श हा राजकारण्यातल्या प्रत्येक तरुणासाठी दिपस्तंभ ठरू शकतो. आबा हे स्वयंभू, स्वावलंबी, स्वयंप्रज्ञ आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना वडिलोपार्जित किंवा घराण्याचा वारसा म्हणून आमदारकी, नामदारकी मिळालेली नाही. ती त्यांच्या स्वत:च्या पुण्याईवर स्वकष्टाने त्यांनी मिळवली आहे.
आबांचे वैशिष्ट्य म्हणजे ते उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला त्यांच्या विषयी जो आपलेपणा वाटत होता तो दुर्मिळ स्वरुपाचा होता. आजही राष्ट्रवादी महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षपदी आबा असल्यामुळे हा पक्ष रयतेला आपला आहे, असे वाटते.
आबांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृती मागे सामान्य माणसाचा विचार असतो. मंत्री म्हणून ग्रामविकापासून गृहखात्यापर्यंत त्यांनी उपक्रम राबवले तेवढे अन्य कुणा मंत्र्याने क्वचितच राबवले असतील.
समाजाला हितकारक असे निर्णय घेण्याची प्रेरणा आबांमध्ये दिसते, याचे कारण ते ग्रामीण जीवनाशी पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. "ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेले ध्येयवादी नेते' ही आबांची ओळख आहे. "शिक्षणातून ग्रामीण पूनर्रचना व ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण' हा महात्मा गांधीचा मूलमंत्र आबांनी ग्रामस्वच्छता अभियानाच्या रूपाने अंमलात आणून दाखविला. ग्रामस्वच्छता व ग्रामीण विकास याबाबत आबांनी केलेले कार्य इतके मोठे आहे की लोकांनी आपणहून त्यांना "आधुनिक गाडगेबाबा' अशी पदवी दिलेली आहे. स्वत:च्या कौटुंबिक जीवनाची अजिबात पर्वा न करता आबा अहोरात्र लोकांसाठी तळमळीने कार्य करीत असतात.
तरुण पिढीवर मद्य आणि मदिरा यांचा होत असलेला दुष्परिणाम लक्षात घेऊन आबांनी गृहमंत्री असताना डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. राज्य सरकारचा महसूल त्यामुळे कमी होणार होता. पोलिसांचे हप्ते बंद होणार होते. काही राजकीय नेत्यांच्या आणि उच्च पदस्थांच्या कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकी या डान्सबारमध्ये होत्या. त्यांचा दबाव धुडकावून लावणे महाराष्ट्रात एकाच माणसाला शक्य होते ते म्हणजे आबा! याचे कारण आबा पापाच्या पैशाला स्वत: कधी शिवले नाहीत आणि दुसऱ्याला पापापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न त्यांनी कधी सोडला नाही. आबांना मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी डान्सबार बंदीपासून रोखू शकले नाहीत. याचे आणखी एक कारण म्हणजे आबांनी जेव्हा समाजहिताचा नैतिक निर्णय घेतला त्या प्रत्येक वेळी त्यांनी लोकमत आपल्या बाजूने खंबीरपणे उभे केले. मी जे काही करतो आहे ते लोकांसाठी करतो आहे व लोकांचा याला हार्दिक पाठींबा आहे. या त्यांच्या आत्मविश्र्वासामुळे इतर सर्व शक्ती निष्प्रभ ठरल्या.
आबांनी फक्त विकासयोजना आखल्या नाहीत. ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी त्या नियोजनबद्ध रीतीने अंमलातही आणल्या. आबा हे एक उत्कृष्ट नियोजक आणि संयोजक आहेत. ते एक क्रियाशील विचारवंत आहेत. त्यांचे निर्णय समस्यांच्या चिंतनातून आणि अनुभवातून घेतले जातात. त्यांची उक्ती कृती, निर्णय किंवा योजना पुस्तकी किंवा कपोलकल्पित नसते. त्यांच्या विचारांना वास्तवाचे अधिष्ठान असते. त्यामुळे त्यांनी आखलेल्या योजना कधी अपयशी ठरत नाहीत. 1995 साली जेव्हा शिवसेना-भाजपा युतीचे शासन सत्तेवर आले तेव्हा आबा विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षातील आमदार म्हणून त्यांनी इतकी अभ्यासपूर्ण व मर्मभेदी भाषणे केली की युती सरकारचे मंत्री आबा बोलायला उभे राहिल्यानंतर हादरलेले, घाबरलेले असत. आबांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला, यात आश्र्चर्य नाही.
विधिमंडळाचे नियम, कार्यपद्धती यांचा गाढा अभ्यास आबांनी केलेला आहे. सामान्य माणसांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे. कारण ते स्वत: सामान्य माणसासारखे जीवन जगत असतात. विचाराने प्रगल्भ आणि पुरोगामी असलेल्या आबांची लोकहिताची तळमळ इतकी प्रभावी ठरत असे की त्यांचे कुठल्याही आवेश आणि अभिनिवेशा शिवाय कोठले भाषणही सभागृहाला मंत्रमुग्ध करून टाकत असे. मंत्री नसताना त्यांनी आदर्श आमदाराचा वस्तुपाठ दाखवून दिला. तर मंत्री म्हणूनही ते स्वत:चे असे एक वैशिष्ट्य आणि वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी झाले.
महाराष्ट्राला राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतरावजी चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील आणि विद्यमान कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष शरद पवार या सर्वांचा जो वैचारिक वारसा आहे तो जपणारे इतकेच नव्हे तर पुढे नेणारे नेते म्हणून आबांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात ठळकपणे नमूद करावे लागेल.
कोणतीही राजकीय पार्श्र्वभूमी नसताना तसेच सत्ता, संपत्ती आणि राजकीय पाठीराखा नसताना आबांनी सांगली जिल्ह्यातील सावळज मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी होऊन लोकांच्या पुढे एक नवा आदर्श उभा केला. जि.प.सदस्य म्हणून काम करताना आबांनी दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्र्न, रोजगार हमीचे प्रश्र्न, बॅंकंाचे धोरण, बेरोजगारीचे प्रश्र्न सोडविण्यात स्वत:ला झोकून दिले. स्वच्छ चारित्र्य, प्रचंड जनसंपर्क जनतेचे प्रश्र्न सोडविण्याची प्रामाणिक धडपड, विकास योजनांचा अभ्यास या गुणांमुळे आबा सामान्य लोकांच्या गळ्यातले ताईत बनले. दारिद्र्य शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही हे त्यांनी "स्वत: कमवा व शिका' योजनेत शिक्षण घेऊन, सिद्ध करून दाखविले.
लोकशाही ही केवळ राज्य करण्याची पद्धती नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. त्याची जाण ठेवून मा.आबांनी लोकशाही मार्गाने विधिमंडळात सामान्य माणसाचे प्रश्र्न सोडविण्यासाठी आपल्या प्रभावी वक्तृत्वाचा वापर केला. प्रचंड ध्येयवाद, दृढ निर्धार, अभ्यासू वृत्ती, निर्भयता आणि सडेतोडपणा यांच्या बळावर आबा एक व्यासंगी संसदपटू बनले.
समाजकारणात संधी मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण सात्विकतेच्या गोष्टी करतो व संधी मिळताच सैतान बनतो. मा.ना.आबा मात्र याला अपवाद ठरले. गृहमंत्रीपदासारखे लोकांच्या दृष्टीने आर्थिक मिळकतीचे पद सुद्धा त्यांनी एखाद्या व्रतस्थ संन्याशाप्रमाणे सांभाळले.
आबांचे संभाषण चातुर्य आणि बोलण्यातील आपुलकी हे गुण त्यांच्याकडे आईकडून झालेले आहेत. 1975 साली आबांच्या एस.एस.सी.परीक्षेच्या काही दिवस अगोदर आबांचे वडील रामराव पाटील यांचे निधन झाले. शेतकरी कुटुंबातील कमालीच्या दारिद्र्यामुळे आणि वडिलांच्या अकाली निधनाने या कुटुंबाला हलाखीचे जीवन जगावे लागले. अगदी त्या दिवसाचा प्रसंग म्हणजे वडिलांच्या अंत्यसंस्काराचे विधी आटोपल्यानंतरचा हा प्रसंग. आबांना सावळजला एस.एस.सी.परिक्षेला जायचे होते. पण अंगावरील शर्ट फारच खराब व फाटका होता. त्या स्थितीत आबांनी घरातील माळ्यावरील वडिलांचा जुना व ढगळा शर्ट शोधून काढला व शिप्यांकडून तो स्वत:च्या मापाचा करून दुरूस्त केला व तो जुना शर्ट घालून ते सावळजला परीक्षेसाठी गेले व सावळज केंद्रावर प्रथम क्रमांकाने पास झाले हा हृदय हेलावणारा प्रसंग खुद्द आबांनीच एका सभेत सांगितल्याचे आठवते. कोणतीही गोष्ट प्रामाणिक प्रयत्नातून केल्यास यश निश्र्चित मिळते, हे आबांच्या जीवनाचे सूत्र आहे.
राज्याचे शासन करताना समाजातील प्रत्येक घटनेचा, समस्येचा अभ्यास करावा लागतो. तासन्‌तास माहिती घ्यावी लागते. संदर्भ शोधावे लागतात. आकडेवारी घ्यावी लागते आणि स्वत:च्या नोटस्‌ काढाव्या लागतात. हे सारे कष्ट आबांनी कधीही त्रागा न करता, न कंटाळता केले, कारण त्या मागे समाजसेवेची नितांत कळकळ होती. केवळ सभा जिंकण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठीची ही हाव नव्हती तर जनहिताची, अन्यायाला वाचा फोडण्याची, सामान्य माणसाला न्याय देण्याची, लोकशाहीला बूज राखण्याची आणि महाराष्ट्र राज्याला उन्नत करण्याची तळमळ होती आणि आबांची ही भावना प्रामाणिक व नि:स्वार्थी आहे, असेच म्हणावे लागेल.
मा.आर.आर.उर्फ आबा यांच्या उपक्रम शीलतेचे एक अभिनव, कौतुकास्पद व तितकेच उपयुक्त उदाहरण म्हणजे त्यांनी राज्यात आणलेली "महात्मा गांधी तंटामुक्त गाव' ही योजना होय. या योजनेचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2007 पासून झाला. भारताच्या 60 व्या स्वातंत्र्यदिनापासून मा.आबांनी आणलेली ही महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना म्हणजे ग्रामीण पुनर्रचनेचा आदर्श वस्तूपाठ होय. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने सुरू होणाऱ्या या योजनेला महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा व सहिष्णुतेच्या तत्त्वज्ञानाची नैतिक बैठक आहे. ग्रामीण भागात आज क्षुल्लक कारणांवरून खून, मारामाऱ्या, तंटेबखेडे, राजकीय हेवेदावे यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे जातीय वाद, अकारण द्वेष, मत्सर या अवगुणांमुळे सामाजिक सद्‌भाव व भावनिक ऐक्य धोक्यात आलेला आहे. याचा ताण राज्यातील पोलीस यंत्रणेवर, प्रशासनावर पडतो.
सावळज केंद्रावर प्रथम क्रमांकाने एस.एस.सी.पास झालेले आबा पुढे शांतीनिकेतन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत बी.ए.च्या वर्गात राज्यशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठात दुसरे आले. बी.ए.झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन नामांकित वकील होण्याचे ठरविले. पुढे एल.एल.बी.चे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला गेले. परंतु तिथला खर्च परवडणार नाही हे लक्षात आल्यानंतर ते सांगलीला परत आले व तिथल्या एम.एस.लॉ.कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आबा लॉ च्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करत असतानाच सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्या वेळेस जिल्हा परिषदेत अनेक प्रस्थापित नेते होते. सहाजिकच आबांना कॉंग्रेसचे तिकीट मिळाले नाही. त्याच वेळेस शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली होती आणि आबांना शरद पवारांचे विचार मनोमन पटले आणि त्यांनी पुढे पुलोदमार्फत सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली.
आबांच्या आयुष्याला इथे नवी कलाटणी मिळाली. कवढे महांकाळ, तासगाव हा सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला आणि कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करून आबा विक्रमी मतांनी निवडणुकीत विजयी झाले. कोणतीही राजकीय पार्श्र्वभूमी नाही. तसेच सत्ता, संपत्ती किंवा राजकीय पाठीराखे नसताना सावळज मतदारसंघातून हा तरुण नेता विक्रमी मतांनी विजयी तर झालाच पण पुढे मा.शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा गृहमंत्री झाला, ही खचितच अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
आबांचे नेतृत्वगुण ते लहान वयात शाळेत शिकत असतानाच दिसून आले होते. आबांचे शालेय शिक्षण त्यांच्या अंजनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सावळजमधील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये झाले.
विद्यार्थी दशेपासूनच आर.आर. उर्फ "आबा' हजर जबाबी, हुशार व प्रामाणिक होते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा ठळक गुण होता. शिक्षकांनी शाळेत त्यांना मोठेपणी कोण होणार? असे विचारले असता आबांनी "मी वकील होणार' असे उत्तर दिले. पुढच्या आयुष्यातली ध्येय दिशा स्पष्ट होती. समाजाविषयी जी तळमळ होती त्याची प्रेरणा बालवयापासूनच जोपासली गेली. शाळेतील निवडणुका म्हणजे विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना लोकशाही शासन प्रणालीची "रंगीत तालीम' देण्याची प्रक्रिया. आबांनी इथेही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शाळेतील निवडणुकीत भाग घेऊन शाळेचे जनरल सेक्रेटरी बनण्याचा अनुभव गाठीशी बांधला. आदर्श नागरिकाचे धडे विद्यार्थी जीवनापासूनच शिकण्यास सुरुवात केली.
ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री असताना खेडेगावातली पिण्याच्या पाण्याची सोय करून ज्या माता-भगिनींना दोन दोन मैलांवरून पाणी आणण्याचा त्रास सहन करावा लागत होता तो त्रास आबांनी कमी केला. त्या स्त्रियांना आपल्या डोक्यावरून पाण्याचे हंडे आणावे लागत होते ते सर्व बंद झाले. त्यामुळेच ग्रामीण भागातला महिला वर्ग आबांच्या पाठीशी निवडणुकांमध्ये ठामपणे उभा राहिला. आबांच्या खंबीर नेतृत्वाची झलक इथे सुद्धा सहज दिसली.
पाणी पुरवठ्याचा जसा त्रास होता तसाच त्रास शौचालयाचा होता. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागत होते पण आबांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागातली ही अडचण दूर झाली. त्यामुळेही ग्रामीण भागातल्या महिला वर्गाच्या अडचणी दूर करण्यात आबांचे नेतृत्व शंभर टक्के यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल.
आबांच्या विचारांना वास्तवतेचे भान आहे. त्यांचे विचार ग्रामीण जीवनातील समस्यांच्या चिंतनातून आणि अनुभवातून प्रगल्भ झालेले आहेत. त्यांचे विचार केवळ पुस्तकी नाहीत किंवा त्यांच्या मनातल्या कल्पना केवळ कागदी न राहता त्यांनी त्या प्रत्यक्षात कृतीत आणून समाजाला त्या दाखवून दिलेल्या आहेत. सामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व्रत आज अखंडपणे सुरू आहे. विधिमंडळात काम करत असताना सुद्धा समस्यांना वाचा फोडण्याचे त्यांचे काम सुरूच होते. विधिमंडळाचे नियम आणि कार्यपद्धती यांचा गाढा अभ्यास केलेला असल्याने व सामान्य माणसाच्या समस्यांची उत्तम जाण असल्याने त्यांचे विचार वेळोवेळी पुरोगामी व प्रगमनशील ठरलेले आहेत. त्यांच्या जवळ अभ्यासूवृत्ती आहे, परिस्थितीची जाणीव आहे. विचारांची मांडणी करण्याची प्रभावी शैली आहे व त्यांच्याकडे असणाऱ्या जनहिताच्या तळमळीमुळे त्यांनी विधिमंडळात काम करताना सुद्धा आपल्या कामाचा ठसा प्रभावीपणे उमटविला. विधिमंडळातली त्यांची भाषणे म्हणजे एका आदर्श लोक प्रतिनिधीच्या लोकोत्तर कार्याचा आदर्श वस्तूपाठ होय.
जनहिताच्या तळमळीने अहोरात्र काम करणारा हा लोकनेता स्वत:च्या कौटुंबिक जीवनाचीही पर्वा करीत नाही. आपल्या आदरणीय मातोश्रींबाबत आबांना विलक्षण आदर वाटतो. आईच्या आशीर्वादाने कोणत्याही कार्याची सुरुवात आबांना करायला आवडते. आईच्या संस्काराचे सामर्थ्य मोठे असते. तीच्या केवळ आशीर्वादाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. मा.आबांसारखा प्रामाणिक, नि:स्वार्थी, सज्जन व चारित्र्यसंपन्न नेता ज्या मातेने महाराष्ट्राला दिला म्हणून महाराष्ट्राची तमाम जनता भागीरथी बाईंची सदैव ऋणी राहील.

No comments:

Post a Comment