Tuesday, August 4, 2009

साई भक्तांच्या भावनांशी खेळू नका देव-देवता-सत्पुरुषांचे मार्केटिंग करू नका

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
साई भक्तांच्या भावनांशी खेळू नका
देव-देवता-सत्पुरुषांचे मार्केटिंग करू नका

शिर्डी संस्थानचे व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विश्र्वस्त मंडळातर्फे होत असते. नुकताच या व्यवस्थापकीय मंडळाने एक धक्कादायक निर्णय घेतला. परमपूज्य, साक्षात भगवंताचा अवतार मानल्या जाणाऱ्या साईबाबांच्या पादुका शिर्डीहून थेट अमेरिकेला पाठविण्यात येणार आहेत. या पादुकांसोबत विश्र्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारीही सपत्नीक अमेरिका वारी करणार आहेत. अर्थात साईबाबांच्या पादुकांच्या दर्शनापासून लाखो भक्त काही काळ वंचित होणार आहेत. शिवाय पादुकांच्या बहाण्याने विश्र्वस्त आणि अधिकारी मौज-मजा-मस्ती-चंगळ करायला संस्थानच्या खर्चाने अमेरिकेला जाणार आहेत. आज या निर्लज्ज मंडळींनी पादुका अमेरिकेला नेण्याचा घाट घातला आहे, उदया हे पाप पचले तर साक्षात साईबाबांची मूर्तीही जगभर घेऊन फिरायला, मिरवायला ही नादान मंडळी कमी करणार नाहीत.
शिर्डीतील गावकरी आणि भाविक यांची अर्थातच या पादुका स्थलांतराच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया झाली आहे. त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आजवर ही बातमी शिर्डीबाहेर गेली नव्हती. पण आता आज आम्ही गौप्यस्फोट केल्यानंतर ती वणव्यासारखी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पसरणार आहे. ठिकठिकाणचे साईभक्त चवताळून उठणार आहेत. आम्ही स्वतःएक निस्सीम साईभक्त आहोत. या बातमीमुळे आम्ही विलक्षण अस्वस्थ, बेचैन, संतप्त, प्रक्षुब्ध झालो. अशीच स्थिती ही बातमी कळल्यावर देशभरातील लाखो साईभक्तांची होणार आहे. आमच्या मते शिर्डीवासीयांनी पादुका स्थलांतराच्या प्रश्र्नावर तीव्र आंदोलन उभारले पाहिजे. मुंबईतील साईभक्तांनी मुंबई हायकोर्टात या प्रश्र्नावर एकतरी जनहित याचिका दाखल करून हे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिर्डी संस्थानची मनमानी आणि तऱ्हेवाईक, धंदेवाईक (गैर) कारभार हा नेहमीच साईभक्तांच्या संतापाचा विषय राहिला आहे.
शिर्डी संस्थानच्या विश्र्वस्तांनी जगभरात साईभक्तांची संख्या वाढविण्याकरता आणि कोटयवधी रुपयांच्या देणग्या अमेरिकेतून मिळाव्यात यासाठी हे पादुका-स्थलांतर आणि परदेशगमन आयोजित करीत असल्याची सबब सांगितली आहे. पण साईबाबांच्या महतीचा आणि पुण्याईचा हा प्रसार नसून निव्वळ बाजार आहे असे आमचे मत आहे. शिर्डी संस्थान साईबाबांच्या अवताराचं मार्केटींग करण्याचा हीन प्रयत्न करु पहात आहेत. या देव-देवतांच्या मार्केटींगबद्दल ख्यातनाम, विद्वान आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुरू डॉ. उदय निरगुडकर म्हणतात. "अलीकडे देवस्थाने भाविकांना ग्राहक समजून एक बिझनेस म्हणून मार्केटींग टेकनिक्सचा वापर करु लागली आहेत. भारतात देवस्थाने हा सर्वाधिक टर्नओव्हर असलेला बिझनेस आहे. भाविकांची बाजारपेठ हे सतत वाढत जाणारे मार्केट आहे. एकीकडे कारखाने, कॉलेजेस, अणुभट्टया वाढत असतानाच दुसरीकडे मठ, आश्रम, देवळांची ही संख्या वाढत आहे'.
गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, अक्षरधाम, भद्रेश्र्वर, अंबाजी, शंकेश्र्वर, सिक्कीममध्ये हनुमानटोक, गुवाहाटीचे कामाक्षी मंदिर, तेजपूरचे महाभैरव, उत्तरांचलमध्ये बैजनाथ, मनालीचे हिडींबा मंदिर, गुरगावचं शितलादेवी मंदिर, अरुणाचलमधील परशुराम कुंड, मणिपूरचं गोविंदजीचं देऊळ, आंध्रमध्ये श्री शैल्य मुखलिगंम, गुनुपुडी, गोव्यात मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी, भगवती, चंडेश्र्वर. कर्नाटकात विरुपाक्ष, चामुंडेश्र्वर, चन्नकेशर, छत्तीसगडचं महामाया, पानिपतचं शुध्द महादेव. मुंबईचे सिध्दीविनायक, मुंबादेवी, बाबुलनाथ, महाराष्ट्रात घृष्णेश्र्वर, त्र्यंबकेश्र्वर, अष्टविनायक, अकरा मारुती, पंढरपूर, तुळजापूर, शनि शिंगणापूर, गाणगापूर, शिर्डी, राजस्थान मधील उदयपुरचं सासबहु, जयपुरचं गोविंददेवजी, बंगालमधील काली, रामकृष्ण मिशनचं मंदिर, शिवाय काशी, विश्र्वनाथ, हरिद्वार, वैष्णोदेवी, बद्रिनाथ, केदारनाथ, तिरुपती, अयोध्या अशी भारतातल्या प्रमुख मंदिरांची सूची आहे. त्यात तिरुपती प्रमाणेच शिर्डीच्या साईमंदिराचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. त्याचमुळे पादुका स्थलांतर प्रकरणामुळे भाविकांना बसलेला धक्का जबरदस्त आहे.
भारतातील देवस्थानांचं हे सर्वात मोठ क्षेत्र संपूर्णतः अनियोजित आहे. मंदिरे, देवळे, मठ, आश्रम, संस्थानांच्या कारभारात पुरेशी पारदर्शकता नाही. या पसाऱ्यांमध्ये धंदा पाहणारे संस्थानात मात्र व्यावसायिक दृष्टया परिपूर्ण व्यवस्थापन देण्यात हयगय करतात. भाविकांना मिळणाऱ्या सेवा सुविधांचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला जात नाही. अक्षरधाम वरील हल्ला आणि सिध्दीविनायक मंदिराला येत असलेल्या धमक्या यामुळे अनेक देवस्थानांची सुरक्षा व्यवस्था आता वाढली आहे. पण आपत्कालीन व्यवस्थापनाची तरतूद नसल्यामुळे अनेक देवळांमध्ये चेंगराचेंगरी होऊन माणसे मेल्याच्या घटना मोठया संख्येने वारंवार घडतात. भाविक दान म्हणून जे पैसे टाकतात त्यांच्या विनियोगातही पारदर्शकता नसते. चॅरीटी कमिशनरच्या कार्यालयातील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांची तुटपुंजी संख्या आणि कालबाहय कायदे, नियम यामुळे शासनाचेही या देवस्थानांवर फारसे नियंत्रण रहात नाही.
ग्राहक पंचायतीच्या धर्तीवर भाविक पंचायती, ग्राहक न्यायालयांच्या प्रकारे भाविक न्यायालये यासाठी स्थापन करावीत अशी सूचना मध्यंतरी काही विचारवंतांनी केली होती. पण जिथे सरकारने नेमलेली शिर्डीसारखी विश्र्वस्तमंडळे आहेत तिथेही भाविकांना न्याय, चांगली वागणूक, पुरेशा सोयी मिळत नाहीत हे खरे दुर्दैव आहे.
श्रध्दा ही माणसांची गरज आहे. श्रध्दा वैयक्तिक तितकीच सामूहिक असते. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे, देवळे बांधत त्यांची काळजी घेत. या देवळांमधून कला, संस्कृती फुलत असे. अनाथ, अपंगांना आधार मिळत असे. समाजसेवेचे अनेक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वी देवळातूनच चालत असत. आता टी.व्ही., लॅपटॉपवरुन पूजा-आरत्या लाईव्ह प्रक्षेपित होऊ लागल्या आहेत. अनेकदा संस्थानांचे विश्र्वस्त नेमताना जो राजकीय हस्तक्षेप होतो आणि सग्या-सोयऱ्यांची सोय राज्यकर्ते लावतात त्यामुळेही भाविकांवर अन्याय होतो, त्यांच्या श्रध्दा पायदळी तुडविल्या जातात. शिर्डी संस्थानवरील नेमणुका "राजकीय' असल्याचा आरोप नेहमीच केला जातो आणि त्यात तथ्य आहे. पण आता मात्र या मंडळींनी ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा निर्लज्जपणा चालवला आहे. साईंच्या पादुका अमेरीकेला न्याल तर खबरदार एवढाच इशारा आम्ही आज देत आहोत !

No comments:

Post a Comment