Tuesday, August 18, 2009

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे "कप्तान' अर्थमंत्री ना.दिलीप वळसे पाटील

अग्रेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे "कप्तान'
अर्थमंत्री ना.दिलीप वळसे पाटील
कोणत्याही देशाचे, कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यामध्ये अर्थमंत्री म्हणून प्रत्येक अर्थमंत्र्याचे असे विशिष्ट स्थान अबाधित असते. भारताचा केवळ विचार करावयाचा झाला तर केंद्र सरकारचे पहिले अर्थमंत्री सी.डी.देशमुख या मराठी केंद्रीय मंत्र्यांची कारकिर्द फार गाजलेली आहे, असे म्हणावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या महाराष्ट्र विषयक धोरणातील तत्त्वे मान्य न झाल्यामुळे चिंतामणरावांनी उर्फ सी.डी.देशमुखांनी तडकाफडकी राजीनामा सादर करून देशात खळबळ उडवून दिली होती. हे आता फार थोड्या लोकांना माहिती असेल. निर्भय, निष्पक्ष, चारित्र्यवान, नीती संपन्न असे चिंतामणराव देशमुख देशाचे अर्थमंत्री असताना एक महाराष्ट्रीयन मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामचा दर्जा राखला व ठसा उमटवला होता. महाराष्ट्राला त्याच प्रकारचा लाभलेला अर्थमंत्री म्हणजे ना.दिलीप वळसे पाटील!
ना.दिलीप वळसे पाटील हे मा.शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर कॉंग्रेसच्या मूळ विचारांचा फार मोठा प्रभाव आहे, असे दिसते. स्पष्ट वक्तेपणा, निर्भयता, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, लोकाभिमूख नेतृत्व, प्रचंड जनसंपर्क, सामाजिक कामातली जनहिताची तळमळ, करारी व्यक्तीमत्त्व असे त्यांचे विविध गुण त्यांच्या सहकाऱ्यांना व नेत्यांना माहिती असल्याने त्यांच्या कामाविषयी, निष्ठेविषयी अथवा निर्णयाविषयी कोणीही संशय घेत नाही. ना.दिलीप वळसे पाटील यांचा स्पष्ट वक्तेपणा, सडेतोडपणा तर आहेच पण त्या बरोबर एखाद्या विषयाचा गाढा अभ्यास करण्याची पद्धत किंवा एखाद्या किचकट प्रश्र्नातल्या खाचाखोचा किंवा अडचणी असोत. एखाद्या प्रश्र्नाच्या मूळाशी हात घालून त्याचे संदर्भ शोधणे त्या प्रश्र्नाच्या सोडवणूकीच्या दृष्टीने अभ्यास करणे हे दिलीपरावांनी कधीच सोडलेले नाही.
सन 1990 मध्ये आंबेगाव या लहानशा खेडेगावातून पुणे जिल्ह्यातून ते आमदार म्हणून निवडून आले. आणि कार्य सुरू झाले. विधानसभेच्या कार्याचा त्यांनी काळजीपूर्वक सखोल अभ्यास केला. जनतेच्या प्रश्र्नाबाबत, समस्येबाबत त्यांना सामाजिक जबाबदारीची तळमळ असल्याने त्यांनी धाडसी निर्णय घेतले. "अर्थमंत्री' मग तो देशाचा असो किंवा "महाराष्ट्राचा' असो कामाचे स्वरुप थोड्याफार फरकाने सारखेच असते. समोरचे प्रश्र्न त्याच प्रकारचे असतात आणि त्यांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात कमी जास्त असते.
कोणतेही अंदाजपत्रक विविध प्रकारच्या वस्तू एकाच पिशवीत कोंबाव्यात तसे असते. ज्या दिवशी अंदाजपत्रक सादर होते त्यावर मल्लिनाथी होऊन निष्कर्ष काढले जातात. आणि त्यावर विरोधकांतर्फे टीका केली जाते. एके काळी अंदाजपत्रक हा पवित्र मसूदा मानला जायचा. पण अलीकडे अंदाजपत्रक म्हणजे एक जादूच्या गोष्टींची शैली बनली आहे, असे दिसते.
आर्थिक जबाबदाऱ्या व अंदाजपत्रक व्यवस्थापनाशी निगडीत असा एक कायदा आहे. आणि त्या कायद्यामुळे काहीशी शिस्त जरूर आली आहे, असे जरी असले तरी अंदाज पत्रकात ज्याची काहीही तरतूद केलेली नसते, अशा गोष्टी करण्याचे आश्र्वासन पाळावे लागते. कितीतरी खात्यांमधून त्यांना दिलेला निधी पूर्णपणे खर्ची पडत नाही तरीही ते आणखी मागत राहतात. याबाबत ना.दिलीप वळसे पाटील "एक सावध सावकार आहेत' असे म्हणावे लागेल. कोणतीही घोषणा करण्यासाठी पुढाकार घेणे, उत्स्फूर्त पुढाकार घेणे किंवा नाट्यमय घोषणा करीत राहणे ही ना.दिलीप वळसे पाटील यांची कामाची पद्धत कधीच नव्हती.
ना.दिलीप वळसे पाटील यांनी 1990 मध्ये आमदार म्हणून पहिली निवडणूक यशस्वीपणे जिंकल्यावर नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही किंवा त्यांच्या पदरी कधी पराभव स्विकारावा लागला नाही. निवडणुकीत जिंकल्यानंतर विधानसभेचा आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर विधानसभा व विधान परिषदेच्या कामांचा, कायदेकानूनचा त्यांनी सखोल अभ्यास केला. मग पुढे माध्यमिक शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, उर्जामंत्री अशी विविध प्रकारची मंत्रिपदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. कामांचा दांडगा अनुभव, निर्णय घेण्याची क्षमता व कायद्याचे ज्ञान या सर्वांच्या जोरावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सर्वांवर पाडली.
वीजनिर्मिती क्षेत्रात मोठ्या सुधारणांचा धमाका करता येईल, असे हे मोठे क्षेत्र आहे. मग ते एखाद्या राज्याचे असो नाहीतर देशाचे असो. ना. दिलीपरावांच्या काळात वीजनिर्मितीत कमी गुंतवणूक होण्याचे कारण म्हणजे तिथे माजलेली बजबजपूरी. या क्षेत्रात प्रत्येक भागात मग वीजनिर्मिती, ट्रान्समिशन आणि वितरण व नियमन प्रत्येक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती क्षेत्रात ना.दिलीपरावांनी केलेले कार्य असाधारण आहे. याचे कारण देशामध्ये गुजरात राज्यानंतर महाराष्ट्राचा वीजनिर्मितीतला वाटा मोठा आहे व महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मग ते चंद्रपूर असो किंवा नागपूर जवळचे कौदा असो औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे स्थापन करणे म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासारखे आहे.
राजकीय क्षेत्रात आज उच्च स्थानी असणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये ना.दिलीपराव वळसे पाटील यांचे स्थान मोठे आहे. ते राजकारणात पूर्ण वेळ सक्रिय असले आणि त्यांच्या प्रेरणा इतर नेत्यांसारख्या असल्या तरी श्रद्धा आणि मार्ग वेगळे आहेत. राजकीय जोडतोड, गटबाजीपेक्षा एक विशिष्ट मार्ग ठरवून पुढे जाणे हे त्यांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. लहानपणापासून आलेल्या प्रत्येक अपयशावर मात करत त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरत गेले. ज्या काळात अपयश वा मोठे आव्हान नसेल तेव्हा आलेख स्थिर राहीला हे धान्यात घेतले तरी अपयशातून आव्हान झेलत मोठे होणारे हे व्यक्तिमत्त्व आहे, हे सहज लक्षात येते. प्रचंड परिश्रमातून त्यांनी यशाचे गणित मांडले व एक आदर्श जीवन उभं राहीलं.
ना.दिलीपरावांचे वक्तृत्व लोकांच्या मनाला हात घालणारे, विचारांना चालता देणारे आणि पुरेसे आक्रमक आहे. त्यामध्ये जाती, द्वेष किंवा विस्तार नाही. आक्रस्ताळेपणा नाही तर समन्वयाची भावना आहे. एखादा विचार मांडल्यावर त्याचा खरेपणा कळून आल्यावर त्या विचाराचा पाठपुरावा करत राहणे ही ना. दिलीपरावांची वृत्ती आहे. विचाराची सत्यता, जाण कळल्यावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. समाजकारणात संधी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जण सात्त्विकतेच्या गोष्टी करतो व संधी मिळताच सैतान बनतो. ना.दिलीपराव याला अपवाद ठरलेले आहेत. अर्थमंत्रीपदाचे लोकांच्या दृष्टीने आर्थिक मिळकतीचे पद त्यांनी एखाद्या व्रतस्थ संन्याशाप्रमाणे सांभाळले. लोकशाही ही केवळ राज्य करण्याची पद्धत नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. याची जाण ठेवून ना.दिलीपरावांनी लोकशाही मार्गाने विधिमंडळात सामान्य माणसाचे प्रश्र्न सोडविण्यासाठी आपल्या प्रभावी वक्तृत्वाचा वापर केला. प्रचंड ध्येयवाद, दृढ निर्धार, अभ्यासू वृत्ती, निर्भयता आणि सडेतोडपणा याच्या बळावर ना.दिलीपराव एक व्यासंगी संसदपटू ठरले. सामान्य माणसांच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. कारण ते स्वत: सामान्य माणसासारखे जीवन जगत असतात. ना.दिलीपराव हे स्वयंभू, स्वावलंबी आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना वडिलोपार्जित किंवा घराण्याचा वारसा म्हणून आमदारकी, नामदारकी मिळालेली नाही. ती त्यांनी त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वावर, पुण्याईवर स्वकष्टाने मिळविली आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे सामान्य माणसाचा विचार असतो. समाजाला हितकारक असे निर्णय घेण्याची प्रेरणा ना.दिलीपरावांमध्ये दिसते याचे कारण ते ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेले आहेत. ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेले ध्येयवादी नेते ही ना.वळसे पाटीलांची खरी ओळख आहे. ना.दिलीपराव वळसे पाटील हे एक उत्कृष्ट नियोजक आणि संयोजक आहेत. ते एक क्रियाशील विचारवंत आहेत. त्यांचे निर्णय समस्यांच्या चिंतनातून आणि अनुभवातून घेतले जातात. त्यांची उक्ती किंवा कृती, निर्णय किंवा योजना पुस्तकी किंवा कपोल कल्पित नसते. त्यांच्या विचारांना वास्तवाचे अधिष्ठान असते. महाराष्ट्राला राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्व. यशवंतराव चव्हाण आणि विद्यमान कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष शरद पवार या सर्वांचा जो वैचारिक वारसा आहे तो जपणारे इतकेच नव्हे तर सर्वांना पुढे नेणारे नेते म्हणून ना.दिलीपरावांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात ठळकपणे नमूद करावे लागेल.
कोणतीही राजकीय पार्श्र्वभूमी नसताना तसेच सत्ता संपर्क आणि राजकीय पाठीराखा नसताना आंबेगाव या पुणे जिल्ह्यातल्या मतदार संघातून विक्रमी मतांनी विजयी होऊन लोकांच्या पुढे एक नवा आदर्श उभा केला. स्वच्छ चारित्र्य, प्रचंड जनसंपर्क, जनतेच्या प्रेमाखातर जनतेचे प्रश्र्न सोडविण्यात स्वत:ला झोकून दिले.
राज्याचे शासन करताना समाजातील प्रत्येक घटनेचा समस्येचा अभ्यास करावा लागतो. तासन्‌तास माहिती द्यावी लागते. संदर्भ शोधावे लागतात आणि स्वत:च्या नोटस्‌ काढाव्या लागतात हे सारे कष्ट ना.दिलीपरावांनी कधीही त्रागा न करता, न कंटाळता केलेले आहे. कारण त्या मागे समाजसेवेची नितांत कळकळ आहे. केवळ सभा जिंकण्यासाठी किंवा प्रसिद्धी टिकविण्यासाठी ही हाव नाही तर सामान्य माणसाला न्याय द्यायची उन्नत तळमळ आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.ना.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच काही शिकायला मिळाले ही दिलीपरावांची भावना व कबूली आहे. शरदरावांनी महाराष्ट्राचे राजकारण फार काळ केले असल्याने व राज्यातल्या प्रत्येक गावातली त्यांना खडानखडा माहिती असल्याने त्यांच्या निरीक्षणाचा व कामाचा अनुभव ना.दिलीपरावांच्या फायद्याचा ठरला. मा.शरदरावांची धोरणे, कामाची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता हे सारे गुण मग ना.दिलीपरावांमध्ये उतरले नाही तर नवलच!
आजच्या घडीला मा.शरद पवारांच्या इतका जनसंपर्क, प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख, अनेक नेत्यांच्या कामाच्या पद्धतीची जाण, देशस्तरावरचे राजकारण स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा तर स्व.वसंतदादा पाटील यांच्या सारखी तडफ हे गुण ना.दिलीप वळसे पाटील यांनी आत्मसात केले, नव्हे प्रत्यक्षात स्वत:च्या अंगी बाणवले. आणि हे सारे करताना स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतापासून निश्र्चयपूर्वक दूर ठेवले.
"अर्थमंत्री' या नात्याने काम करीत असताना महारष्ट्रातला गरीब वर्ग, ग्रामीण वर्ग आणि समाजातले वंचित भाग म्हणजे आदिवासी, अपंग, रुग्ण आणि वृद्ध ज्यांची संख्याही आज लाखोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी कर आकारणी किंवा कर विषयक सवलती जाहीर करताना ना.दिलीप वळसे पाटील यांनी समन्वयाची भूमिका पार पाडलेली दिसते. अर्थशास्त्र म्हणजे "संभाव्यतेचे शास्त्र पण दिसते मात्र अशक्य कोटीतल्या कलाकृतींसारखे' अशी अर्थशास्त्राची व्याख्या भारताच्या अर्थमंत्र्याला किंवा एखाद्या राज्याच्या अर्थमंत्र्याला रुचेल आणि संवादी वाटेल. त्याचे कारण म्हणजे दरवर्षी अंदाजपत्रकाच्या रुपाने आशेची जादूई किल्ली वापरण्याचे कौशल्य दाखवावे लागते. अंदाजपत्रकात मोठ्या कौशल्याने मिळकत आणि खर्च यांचा तोल सांभाळलेला असतो. कराचे दर, कर सवलती, विकास आणि सामाजिक न्याय सुधारणा आणि स्थितीवाद या साऱ्यांचा तोल अर्थमंत्र्याला साधावा लागतो. या सर्व परिस्थितीत व प्रणालीत अर्थमंत्री हा केवळ अर्थमंत्री म्हणून न राहता त्याला सर्व प्रकारचे साधक बाधक निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. अथवा रोष पत्करावा लागतो. कर सवलती या उद्योगाशी निगडित असल्याने साहजिकच औद्योगिक प्रगती, उद्योजकांची मानसिकता, उद्योजकांसाठी विकास योजना, उद्योजकांचे प्रश्र्न या सर्वांचा विचार करणे, अर्थमंत्री म्हणून तर आवश्यक ठरते.
अर्थमंत्र्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मग नवे रस्ते बांधणी प्रकल्प, नवीन निर्माण होणारे विमानतळ, हॉस्पिटल्स आणि नवीन उभी राहणारी तारांकित हॉटेल्स, शेती व लघुद्योग, रोजगाराचे प्रश्र्न, राज्याच्या विकासकारी योजना, विकास योगदानांचा पाठपुरावा करण्यासाठीचे नियोजन, उद्योगक्षेत्राची वाढ असे एक ना हजार विषय अर्थशास्त्राशी संबंधित असतात. त्या सर्वांचा अभ्यास ना.दिलीपरावांनी काळजीपूर्वक केलेला आहे.
प्रत्येक घरातली स्त्री ही घरची "अर्थमंत्री' असते कारण घरच्या खर्चाचे नियोजन व नियंत्रण तिला करावे लागते. याचा संदर्भ देऊन असे म्हणावे लागेल की नामदार दिलीपरावांच्या पत्नींची त्यांना मोलाची साथ आहे. आपल्या पत्नीने राष्ट्राच्या आर्थिक बाबींचे अंदाजपत्रक बनवणे व ते यशस्वी हे खचितच साधे काम नाही हा विचार त्यांनी कधी ना कधी तरी केला असणार. मा.दिलीप वळसे पाटलांना त्यांच्या या पुढच्या वाटचालीत आणि देशकार्यात आमच्या शुभेच्छा!

No comments:

Post a Comment