शासन जिंकले! दु:शासन हरले!
सरकार रडले! विद्यार्थी लढले!
11 वी ऑनलाईन प्रवेशातील गोंधळाविरुद्धची एक मोठी लढाई जिंकल्याचे आम्हाला समाधान आहे. 10 वी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11 वीत, त्याला सोयीस्कर कॉलेजात ऍडमिशन मिळेल आणि एकही विद्यार्थी प्रवेशावाचून वंचित राहणार नाही, असे लेखी आश्र्वासन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, समक्ष भेटीत दिल्यानंतर, आम्ही देखील शिक्षणमंत्र्यांच्या शब्दावर विश्र्वास ठेवून, आमचे "हल्लाबोल आंदोलन' स्थगित करीत असल्याची घोषणा, मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या, भरगच्च पत्रकार परिषदेत केली.
परवा सकाळी या अनुकूल घटनाक्रमाला प्रारंभ झाला. "हल्लाबोल' आंदोलनाची घोषणा, आम्ही गिरगावातील मराठा महासंघाच्या सभागृहात झालेल्या विद्यार्थी-पालकांच्या मेळाव्यात केल्यापासूनच सरकार दरबारी, त्यावर चर्चा आणि चिंता होत होती. अभिजीत राणे आणि त्यांचे लढाऊ बाण्याचे सहकारी, नुसते पोकळ धमक्या देणारे, इशाऱ्यांच्या बेडुकउड्या मारणारे नाहीत, तर थेट रस्त्यावर उतरून राडा करणारे, गरुडभरारी घेऊन सापनागांनाही वेधणारे आहेत, हे ठाऊक असलेल्या, शिक्षण आणि पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांची , "राडा' होण्याच्या आत, तोडगा काढण्यासाठी एकच पळापळ सुरू होती. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी तर आमच्या "हल्ला बोल' आंदोलनाच्या घोषणेनंतर आता यशस्वी माघार, चुकांची कबूली आणि घोळ निस्तरण्याची ग्वाही एवढाच उपाय महाराष्ट्र शासनापुढे असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. आता अभिजीत राणे यांनी पेटवलेल्या आंदोलनाच्या मशालीतून जर उद्या महाराष्ट्रात भडका उडाला तर येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पार कचरा होईल, असे इशारे "आघाडी'तील काही नेत्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिल्यानंतर तर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. "अभिजीत राणेंना उद्याच सकाळी माझ्या बंगल्यावर पाचारण करा. त्यांच्या मागण्यांचे निवेदन आलेले आहे. त्या सर्व मागण्या मान्य असल्याचे, चुका कबूल असल्याचे आणि एकही विद्यार्थी प्रवेशाशिवाय राहणार नाही अशा आश्र्वासनाने लेखी पत्र तयार करा.'
मधल्या काळात आम्हाला असंख्य विद्यार्थी पालकांचे फोन, एस.एम.एस., ई-मेल येत होते. आम्ही "हल्ला बोल' भूमिका घेतल्याबद्दल आभार आणि आशा-अपेक्षा व्यक्त करणाऱ्या या विद्यार्थी-पालकांचे म्हणणे होते की आत्तापर्यंत शिवसेना, मनसेपासून अनेक विद्यार्थी, युवक संघटना, राजकीय पक्षांनी 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशन प्रश्र्नावर भाषणबाजी, घोषणाबाजी खूप केली पण सरकारवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. जबरदस्तीने, घाईगर्दीत अजूनही याद्या बनवल्या, प्रसिद्ध केल्या जात आहेत. चुकीच्या कॉलेजात, नको त्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यामुळे ज्यांना ऑनलाईन प्रवेश मिळाला आहे. त्यांच्याही आनंदावर विरजण पडले आहे. अशा स्थितीत आता अभिजीत राणे ही आमची अखेरची आशा आहे. आचार्य अत्रे आणि निळूभाऊ खाडीलकर अशा दोन ज्येष्ठ श्रेष्ठ झुंजार पत्रकारांचे आपण "एकलव्या'सारखे स्वयंप्रेरित, स्वयंभू, स्वावलंबी शिष्य आहात. मुंबई मित्र/वृत्त मित्र सारखी लक्षावधी वाचक असलेली आणि महाराष्ट्राभर खप असलेली मुलुख मैदान तोफेसारखी दैनिके आपल्या हाती आहेत. महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांसाठी आपण मानसपुत्राच्या स्थानी आहात. तेव्हा आता गुंतागुंतीचा झालेला "प्रश्र्न सोडविणारे कृष्ण' म्हणून आम्ही तुमच्याकडेच आशेने, अपेक्षेने पहात आहोत.
विद्यार्थी-पालकांच्या या उत्कट भावनांच्या दर्शनाने आम्ही अक्षरश: भारून-भारावून-गहिवरून गेलो होतो. कुठल्याही पदावर नसताना लोकविश्र्वासाचे मिळालेले हे पदक आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव देत होते. अर्थात आम्ही नम्रतेने या भावनांना प्रतिसाद देताना आणि जबाबदारी मान्य करीत असताना हेही पालक-विद्यार्थ्यांना सांगत होतो की एक लक्षात ठेवा शंभराव्या घावाला आपल्याला झाड तुटलेले दिसते पण, म्हणून ते एका शंभराव्या घावात तुटलेले नसते. त्याआधींच्या 99 धावांनी त्याला तुटण्याच्या स्थितीत आणलेले असते. तसे आम्ही शंभराव्या अंतिम तोडण्यास कारण होणाऱ्या धावाचे धनी जरूर असू पण मनसे, शिवसेना सकट इतर संघटना, पक्षांनी आधी घातलेल्या 99 धावांचे ऋण आम्ही मान्य करतो. ते आम्ही विसरू शकत नाही. योगायोगाने आमचा शंभरावा घाव शासकीय धोरणाचे झाड छाटणारा ठरला.
शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर सकाळी साडे आठ वाजता आम्हाला पाचारण करण्यात आले होते. आम्ही मराठा महासंघ, मुंबई शाखा आणि अभिजीत राणे फाऊंडेशनच्या आमच्या सहकाऱ्यांसह बंगल्यावर पोहोचलो तेव्हा तिथे प्रचंड तणावाचे वातावरण होते. शिक्षणमंत्री लगबगीने दालनात आले. म्हणाले,"अभिजीतजी तुमच्या निवेदनात केलेल्या 11 वी ऑनलाईन प्रवेशासंदर्भातल्या सर्व मागण्या शिक्षणमंत्री या नात्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी मान्य केल्या आहेत. तसे लेखी पत्र मी आपल्याला देतो आहे. दोन दिवसात सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया आम्ही पूर्ण करू. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. त्यातून एखादा चुकून राहिला तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणा. आम्ही त्याच्या प्रवेशाची व्यवस्था करू.'
शिक्षणमंत्र्यांनी "पॉझ' घेतला. मग म्हणाले,"अभिजीतजी, महाराष्ट्र शासन आणि शिक्षण खात्याच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आहे की आपल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या असल्यामुळे आता आमच्या लेखी आश्र्वासनाचा आणि विनंतीचा मान ठेवून आपण आपले "हल्लाबोल' आंदोलन मागे घ्यावे.' 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी ताटकळत, तगमगत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा क्षण किती मोठा, महत्त्वाचा, आनंदाचा, विजयाचा, थरारक, रोमांचक आहे हे आम्हांला कळत होते. आम्ही तर "बेधडक दे धडक' भूमिकेतून या "हल्लाबोल' आंदोलनाची तयारी केली होती. त्याच्या यशस्वीतेचा तो क्षण आता आला होता. हा एकट्या अभिजीत राणे या व्यक्तीचा विजय नव्हता. तो विद्यार्थी पालकांच्या आणि मराठा महासंघाच्या शक्तीचा विजय होता. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विद्यार्थी पालकांनी पेढे वाटले. अभिनंदन आणि आभाराच्या फोन, एस.एम.एस. चा वर्षाव झाला. काही मराठी न्यूज चॅनल्सनी "ब्रेकींग न्यूज' म्हणून "शिक्षण मंत्र्यांचे मराठा महासंघाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अभिजीत राणे यांना लेखी आश्र्वासन, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार.' असे वृत्त झळकवायला सुरुवात केली. श्रेयासाठी आणि राजकीय भांडवल करण्यासाठी सदैव धडपडणाऱ्या अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांना शिक्षणमंत्र्यांनी अभिजीत राणे यांना लेखी आश्र्वासन द्यावे याचे "सखेद' आश्र्चर्यही वाटले. अर्थात आमची धडपड श्रेयासाठी नव्हती. विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्र्न सुटावा यासाठी होती. त्यामुळे आम्ही त्या इतर पक्षांचे, नेत्यांचेही श्रेय मोकळेपणाने, स्वत:हून त्यांना दिले.
दुपारी आझाद मैदानातील मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या भवनात आमची भरगच्च पत्रकार परिषद झाली. अभिजीत राणेंना शिक्षणमंत्र्यांनी लेखी आश्र्वासन दिले ही चॅनल्स, न्यूजपेपर्ससाठी मोठीच न्यूज होती. आतापर्यंत शिक्षणमंत्री शिष्टमंडळांना शक्यतो टाळत आणि तोंड चुकवून पळत होते. त्यामुळे लेखी आश्र्वासनाचे अप्रुप पत्रकारांना होते. शिवाय आपल्यातील एक पत्रकार संपादक जनतेच्या प्रश्र्नावर थेट "योद्धा', "क्रुसेडर' म्हणून रस्त्यावर आंदोलनात उतरतो याचे कौतुकही पत्रकारांच्या बोलण्यातून जाणवत होते. आमची पत्रकार परिषद दणक्यात झाली. पत्रकारांना बसायला आणि चॅनल्सना कॅमेरे ठेवायला जागा नव्हती इतकी दाटी झाली होती. आम्ही शिक्षणमंत्र्यांच्या पत्राच्या प्रती, आमचे निवेदन पत्रकारांना दिले. प्रश्र्नांची उत्तरे दिली. त्याचवेळी ऑनलाईन प्रवेशाचा प्रश्र्न सुटला असला तरी शिक्षणखात्यातील, शिक्षण प्रक्रियेतील इतर अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नसल्यामुळे, "हल्ला बोल' आंदोलन जरी आम्ही मागे घेतले असले तरी शैक्षणिक सुधारणांकरता दबावगट म्हणून अभिजीत राणे यूथ फाऊंडेशन यापुढेही काम करीत राहील हेही आम्ही ठामपणे सांगितले. आमच्या पाठोपाठ सायंकाळी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन आम्हाला दिलेल्या आश्र्वासन आणि चुकांच्या कबुलीची उजळणी केली. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल हेही मान्य केल्याची माहिती दिली. मराठा महासंघ, मुंबई शाखा आणि अभिजीत राणे यूथ फाऊंडेशन यांच्या आंदोलनाची आज यशस्वी सांगता झाली आहे. पण आमच्या मते शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊन पुन्हा "क्रायसीस' निर्माण होण्याआधी लक्ष घालावे असे अनेक विषय शिक्षणखात्याशी संबंधित आहेत आणि आज 11 वी ऑनलाईन प्रवेश परीक्षांचा गुंतागुंतीचा प्रश्र्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानत आणि अभिनंदन करीत असतानाच आम्ही शिक्षणक्षेत्राशी संबंधित अशा इतरही काही मुद्यांकडे आजच्या अग्रलेखाच्या समारोपात लक्ष वेधू इच्छित आहोत. या मुद्यांवर शिक्षण मंत्र्यांकडून गांभीर्याने विचार आणि दूरदृष्टीने निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे.
1986 साली भारताने आपले राष्ट्रीय शिक्षण धोरण निश्र्चित केले आणि गेल्या दोन दशकात शिक्षणक्षेत्रात वेगाने बदल झाले. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे शिक्षणावर नवे आक्रमण झाले. पारंपारिक अभ्यासक्रमांचे महत्त्व आता कमी होत असून विज्ञान तंत्रज्ञानावर आधारलेल्या अपारंंपारिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढले आहे. भारतीय शिक्षणक्षेत्राला जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे. यात टिकण्यासाठी अभ्यासक्रमात मूलभूत बदल करावे लागतील. आपली गुणवत्ता जागतिक पातळीवर आणावी लागणार आहे. त्यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक अपेक्षित आहे. जी करण्याची केंद्र-राज्य सरकारांची अद्याप तरी मानसिकता दिसत नाही. सामान्य घरातील गोरगरीब विद्यार्थी "नव्या' जागतिकीकरणाच्या विळख्यातील शिक्षणातून बाहेर तर फेकला जाणार नाही ना? अशी भीती वाटते आहे. शिक्षणाचे जुने प्रश्र्न कायम असतानाच नवे प्रश्र्न निर्माण होऊ लागले आहेत.
आजही देशातील अवघे साडेसात टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहचतात. शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडेतीन टक्के फक्त आहे. तो किमान 6 टक्के हवा असे तज्ज्ञांचे मत आहे. असंख्य शाळा-कॉलेजात मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. खाजगी शिक्षण संस्था देणग्यांशिवाय प्रवेश देत नाहीत. शिक्षणाची तथाकथित समान संधी फक्त कागदावरच आहे. भारताला जर जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर शिक्षणाला प्राधान्य देण्यावाचून गत्यंतर नाही. विकासप्रक्रियेशी शिक्षण प्रक्रिया निगडीत करावी लागेल. प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करावे लागेल. हे सारे आपोआप आणि तरतूद न करता होणार नाही. माहिती तंत्रज्ञानातील क्रांती पाठोपाठ एका शैक्षणिक क्रांतीची प्रतिक्षा राष्ट्राला, महाराष्ट्राला आहे!
Tuesday, August 4, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment