Tuesday, August 18, 2009

भारताचे "स्वातंत्र्य' कोणाच्या हातात?

भारताचे "स्वातंत्र्य' कोणाच्या हातात?
आज 15 ऑगस्ट 2009 म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन. गेल्या 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण "स्वतंत्र' झालो. 1947 च्या 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या लोकसभेत पंडित जवाहर लाल नेहरू म्हणाले होते,"आज भारत स्वातंत्र्यात जागा होत आहे.' ते पुढे असेही म्हणाले,"आपण एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहोत आणि जनतेचा मी पहिला सेवक आहे.' पुढे दोन वर्षांनी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण भारतीयांनी राज्य घटना स्वीकारली. तिला कायद्याचे स्वरुप दिले आणि ती घटना देशाला पर्यायाने स्वत:ला बहाल केली. त्या घटनेच्या अन्वये आपण असा एक गंभीर निश्र्चय केला की या मातृभूमीला सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राज्य बनवू आणि देशाच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्राप्त करून देऊ. या प्रजासत्ताक राज्याच्या मूलभूत रुपरेषांचा विचार करीत असताना आपण काही गोष्टी सोयीस्करपणे विसरलो. स्वातंत्र्याचा लढा आपण ज्या तत्त्वांवर लढलो ती तत्त्वे कदाचित उत्तरोत्तर वाढतच जाणार आहेत. अशा विश्र्वासामुळे असेल किंवा हा अनेक पैलूंचा इमला आपल्या एकात्मिक समाज रचना असलेल्या प्राचीन संस्कृतीच्या पायावर भक्कम उभा राहू शकेल, या खात्रीमुळेही असेल. आज स्वतंत्र भारतीयांची दुसरी पिढी देशाच्या राज्यकारभाराची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे सोपविण्याच्या तयारीत आहे. त्या वेळीही "स्वातंत्र्य' हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्र्न अजूनही अनुत्तरित आहे.
आता प्रश्र्न असा आहे की आपण आपली महत्त्वाकांक्षी ध्येये पूर्ण करू शकलो आहोत का? आणि असल्यास किती प्रमाणात पूर्ण केलेली आहेत? या सर्वात एक गोष्ट प्रामुख्याने आढळते की पुढच्या पिढीसाठी फार कमी आशा, आकांक्षा मागे ठेवत आहोत. विशेष हक्क असणाऱ्या मूठभर लोकांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय बळकावले आहेत. विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, श्रद्धा व धार्मिक स्वातंत्र्य यामुळे मानवी आत्म्याची आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षितिजे विस्तारली जावीत, अशी कल्पना होती. परंतु आज याच गोष्टी सामान्य माणसाच्या पिळवणुकीची सहजसुलभ साधने झाली आहेत. अप्रामाणिकता आणि भ्रष्टाचार यांच्या ढिगाखाली समान स्थान आणि समान संधी गाडल्या गेल्या आहेत. बंधुभाव, माणसाच्या प्रतिष्ठेचा मान राखणे आणि देशाची एकसंघता ही तर फक्त गणतंत्र दिवस असो किंवा स्वातंत्र्य दिवस असो फक्त "शोभा यात्रां'साठी खास राखून ठेवलेली व्यापारी प्रदर्शने झाल्यागत आहेत!
आपण जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र आहोत. भारताकडे सर्व प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा संपन्नस्त्रोत आहे. तांत्रिक मानवी शक्तीच्या गणनेने आपण जगातील तृतीय क्रमांकाचे राष्ट्र ठरतो. मानव साधन संपत्ती उपलब्धतेच्या गणनेने आपण जगातील द्वितीय क्रमांकाचे मोठे राष्ट्र ठरतो तरी सुद्धा आपण सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सखोल आत्मपरीक्षण व आमुलाग्र सुधारणावादी विचार करणे फार आवश्यक होते.
आपल्या विकासाच्या त्रुटींकडे आज त्रयस्थपणे विचार करताना उर्जाशक्तीचा विचार केला तर असे आढळेल की गंगा आणि कावेरी नद्य़ा एकमेकांना जोडणे किंवा माळेप्रमाणे कालवे तयार करणे व ते ब्रह्मपुत्रा आणि गंगा यांना जोडणे अशा कागदावर तयार झालेल्या योजना अद्यापपणे प्रत्यक्षात आल्या नाहीत. या योजना अद्यापपर्यंत अंमलात का आणल्या गेल्या नाहीत? त्यांना कडीकुलुपात का बंद करून ठेवण्यात आले आहे? या योजनांनी खरे तर देशाची बेकारी, इंधन, वीज आणि अन्न तसेच कायदा आणि व्यवस्थेवर जोडलेल्या समस्या जास्त विलंब न लागता सुटल्या असत्या. केवळ महाराष्ट्राकडे जरी एक नजर टाकली. तरी ग्रामीण भागातले चालणारे 4 ते 8 तासांचे लोडशेडींग, वीज गायब असणे हे कोणत्या प्रगतीचे लक्षण मानावे?
कोणत्याही देशाला विकासासाठी पन्नास वर्षांचा काळ अपुरा पडत नाही. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या कालावधीपर्यंत देशाचे विकासाचे अजिबात कार्य झाले नाही, असे नाही. काही विकासाचे प्रकल्प जरूर पुरे झाले. पण समृद्धीच्या पर्वतांची उंच शिखरे आणि विपन्नावस्थेची खोल दरी या मधील अंतर एवढे वाढले आहे की, 1947 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपला देश सर्व घरगुती उत्पादनात जगात बाराव्या क्रमांकावर होता, तो संपूर्ण समृद्धीमय झालेला म्हटला तरी तेविसाव्या क्रमांकावर घसरला आहे. या मागील गुढ काय? समृद्धी सर्व जनतेपर्यंत अजून पोहोचायची आहे. खरोखर कोट्यवधी हात कामावाचून बेकार बसून आहेत हाच "स्वातंत्र्याचा' अर्थ अपेक्षित आहे का?
सर्वांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करणे, सर्वांना मोफत शिक्षण देणे, गरिबी हटविणे, सर्वांच्या आरोग्याचा विचार करणे, लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, स्वच्छ प्रशासन व न्याय प्रणाली निर्माण करणे व कायद्याचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे, क्रीडाक्षेत्रात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणे या केवळ सरकारी जबाबदाऱ्या न राहता सर्वांच्या विकासासाठी कोणी व किती हातभार लावला हे शोधून काढणे हा संशोधनाचा विषय होईल!
व्यक्तीची प्रतिष्ठा, चारित्र्याची अंगभूत ताकद, स्वत:च्या सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने दाखविलेला योग्य मार्ग स्वीकारण्याचे धाडस खऱ्या शिक्षणाने आणि सततच्या जोपासनेमुळे वाढणारे स्वाभिमानाचे तेज या सर्व गोष्टींमुळे राष्ट्र महान आणि बलवान होते. परंतु आज काय दिसते? आज स्वतातील विमानांच्या जमान्यातही या सर्व गोष्टी बैलगाडीच्या काळात होत्या तशाच राहीलेल्या आढळतात.
आपण "लोकशाही' पद्धत स्वीकारली. लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकांच्या संमतीने कायदे तयार करायचे आणि त्या कायद्यानुसार राज्यकारभार चालवायचा. लोकांना मतभेदाचा अधिकार राज्य घटनेने दिला आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर व अप्रामाणिक तत्त्वांना व घटनांना आव्हान देण्याचा अधिकारही दिला आहे. आज काय होताना आढळते? हे कधी थांबणार? लोकशाहीमध्ये जनतेची खरीखुरी निवड तिच्या प्रतिनिधींमुळे दिसते. या दिशेने आपण अजून एकही पाऊल उचलले नाही. भारतातील निवडणुका अजूनही विशेष हक्क असणाऱ्या, मूठभर घराणे हक्क असणाऱ्याच्या कुशल कारवायांना बळी पडताना दिसतात.
संसदेमध्ये लोकप्रतिनिधींच्या "दूरदर्शन वर' दाखवल्या गेलेल्या मारामाऱ्या, गोंधळ हे कोणत्या "स्वातंत्र्य' प्राप्तीचे द्योतक मानावयाचे? स्त्रियांवर होणारे अमानुष अत्याचार, बलात्कार, विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी म्हणजे स्वातंत्र्यावर घातलेली बंधने वा घाला नाही का? स्वातंत्र्यपूर्व काळात चेतवलेली मने पुढच्या पिढीत पूर्णपणे थंड झालेली दिसतात. हे "स्वातंत्र्य' आपल्याला हवे होते का?
सन 1991 मध्ये अरबस्तानात ज्या भारतीय स्त्रियांवर बलात्कार केला गेला. त्यांचीच गोष्ट घ्या. सहा महिन्यातच खटला चालून आरोपींना फाशीही देण्यात आले. आणि या गोष्टीची तुलना 1991 मध्येच आपल्या देशात घडलेल्या हजारो बलात्काराच्या घटनांशी करा. यापैकी काही प्रकरणात आरोप पत्रक दाखल करण्यात आले असले तरी बाकीची प्रकरणे अजून तपासाच्या अवस्थेतच आहेत. अशा स्थितीत न्याय हा विनोदच ठरतो!
"पुस्तकामध्ये काय शिकलो, ते विसरून गेल्यावर शिल्लक राहाते, ते शिक्षण!' असे शिक्षण क्षेत्रातल्या युरोपियन प्रकांड पंडिताने इझॅलिटने म्हटले होते. भारतातले शिक्षण अजूनही पुस्तकी व उपजिविकेशी संबंधितच आहे. आजच्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धात्मक आणि संघर्षात्मक परिस्थितीत स्त्रिया किंवा पुरुष हे शिक्षण घडवू शकत नाहीत. आपल्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या स्त्रिया शिक्षणासाठीही वंचित आहेत. भारत आज आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि स्वयंपूर्ण वाटत असला तरी त्याचा पाया शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने संपन्न झालेल्या माणसाच्या चारित्र्यावर, व्यक्तीमत्त्वावर आणि प्रामाणिक पणावर उभा नसेल तर "स्वातंत्र्याचा' खरा अर्थ कोणता?
देशाची आर्थिक समृद्धी हा पाठीचा कणा असतो. आपली आंतरराष्ट्रीय व्यापार स्थिती शिलकीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. हजारो कोटींची परकीय कर्जे आपल्या डोक्यावरचा बोजाचा भार हलका न करता वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातली तूट वाढत वाढत काही हजार कोटी रुपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित करेल, अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ असा की आपल्या आयातीच्या गरजांचा निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाशी ताळमेळ घालणे आपल्याला अद्यापपणे जमलेले नाही. निर्यातीपेक्षा आपण आयात अधिक करीत आहोत. आपल्या संरक्षण सामग्रीच्या व तेल उद्योगाच्या गरजा आपल्या एकूण निर्यातीच्या उत्पन्नापेक्षा अधिक आहेत. यामध्ये देशाच्या संरक्षण खर्चात कपात करता येत नाहीत. तर तेल उद्योगाच्या गरजा औद्योगिककरणाचा वेग विचार करताना येत्या काही वर्षात तिप्पट होण्याची शक्यता आहे.
आपल्या वस्तूंना आणि सेवांना आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी येण्यासाठी व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमीतकमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे अधिकाधिक उत्पादन होणे गरजेचे आहे. आपल्याला आपली उत्पादकीय अर्थव्यवस्था (प्रॉडक्ट्रिव्ह इकॉनॉमिक सिस्टिम) पूर्णत: सुधारावी लागेल. आपल्याकडे लोह खनिजाचा जगातील सर्वात मोठा साठा आहे व त्याचा पोलादात रुपांतर करण्याची आपली क्षमता आता आहे, त्यापेक्षा दुप्पटीने वाढवावी लागेल. पण गंमत म्हणजे आपण लोहखनिज निर्यात करतो म्हणजेच अन्य देश आपल्याकडून खरेदी करतात. त्याचे पोलादात रुपांतर करतात आणि चांगल्या दर्जाचे पोलाद आपल्यापेक्षा कमी दरात आपल्यालाच विकतात! यावरुन एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या पोलाद कारखान्यांची उत्पादकता व कार्यक्षमता सुधारण्याची गरज लक्षात येते. आपली उत्पादकता सुधारण्यासाठी व वाढविण्यासाठी आपल्या सार्वजनिक व खाजगी सेवा क्षेत्रांच्या कठोर परीक्षणाची गरज आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान व प्रभावी व्यवस्थापन या दोन गोष्टींची आज नितांत गरज आहे. तंत्रज्ञान व औद्योगिक प्रगती यामध्ये असुरक्षितता, सवय, बदल, आळशीपणा, भावनिक, व्यक्तिगत टीका, स्वार्थ, या कारणांमुळे लोक बदल स्वीकारत नाहीत. पण एकदा परिवर्तनाचा अंगिकार केला की त्या कल्पना अंगिकारल्या जाण्याची, त्याला विरोध होण्याची तयारी ठेवली पाहिजे. परिवर्तन किंवा निर्णय अंमलात आणण्यासाठी सुसंवाद असणे गरजेचे असते. बदल का आवश्यक आहे याबाबत विचारपूर्वक आणि प्रामाणिक संवाद केल्यास बराचसा विरोध मावळतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे.
इतिहासाने हे दाखवून दिले आहे की ज्या राष्ट्रांनी स्वस्त आणि उपयुक्त उर्जेची साधने विकसित केली आहेत, अशी राष्ट्रे भरभराटीस आली. ब्रिटन किंवा ्रफ्रान्स या राष्ट्रांनी उर्जेबाबत ठोस विचार केला. योजना आखल्या व प्रत्यक्षात राबवल्या. ब्रिटनने सर्वप्रथम वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हा कोळशाचा उपयोग कार्यक्षमरित्या केला. म्हणूनच त्याला "ग्रेट ब्रिटन' म्हणून ओळखले जाऊ लागले!
उर्जा ही काम करण्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा घटक आणि साधन आहे. म्हणूनच उर्जा आपणा सर्वांना उपयुक्त आहे. गृहिणींसाठी ती रॉकेल, गॅस व विजेच्या स्वरुपात उपयुक्त ठरते. तर विद्युत अभियंत्याच्या बाबतीत ती उद्योग व्यवसायाच्या भट्टीची उष्णता किंवा यंत्र सामग्री चालविणारी विद्युतशक्ती या स्वरुपात ती उपयुक्त ठरते. अर्थतज्ज्ञांसाठी ती राष्ट्रीय उन्नतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून उपयुक्त ठरते. उर्जा नसती तर आपणास वापरायला कपडे मिळाले नसते. प्यायला पाणी मिळाले नसते किंवा आपली शहरे राहण्याजोगी होऊ शकली नसती. आपले पूर्ण चलनवलनच थांबले असते. याचाच अर्थ एखादा देश उपलब्ध उर्जा साधनांचा आणि उर्जेचा उपयोग कसा आणि किती चांगल्या रितीने करतो यावरुन त्या देशातल्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा, त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेची वाढ आणि त्या देशाची राष्ट्रीय उन्नतीची क्षमता याची गणना होत असते. उर्जेची पारंपारिक साधनेही बदलतात. कोणकोणते व किती उत्कृष्टतेचे इंधन वापरतो. या वरुन देशाची आर्थिक, औद्योगिक प्रगती ज्ञात होते. प्रगत राष्ट्रांत जळावू लाकूड, टाकावू भाजीपाला आणि शेण या सारखी अव्यापारी इंधने वापरली जात नाहीत. तर ते देश कोळसा, तेल व नैसर्गिक वायू या सारख्या व्यापारी साधनांचा अवलंब करतात. आपल्या देशात अव्यापारी उर्जा साधनांचे प्रमाण पंचवीस टक्के आहे. जळाऊ लाकूड हे अठराव्या शतकातील लोक उर्जेचे इंधन म्हणून वापरत होते. हळूहळू त्याची जागा कोळशाने घेतली. त्यानंतर नैसर्गिक तेल व शीघ्र ज्वालाग्रही इंधन साधने उपयोगात आणली गेली. यावरुन एक गोष्ट निदर्शनात येते की दर पन्नास वर्षाच्या कालावधीत इंधनाच्या नवीन आणि अत्यंत सोयीस्कर अशा साधनांचा शोध लागला आहे.
इंधन निर्मिती, इंधन वितरण प्रणाली व इंधनाच्या वापराच्या दृष्टीने बघता आपण मध्य पूर्व देशाचे डोळस उदाहरण लक्षात घेतले तर एक गोष्ट जाणवते की त्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: त्यांच्या तेल साठ्यामुळेच प्रगती पथावर टिकून आहे. याची जाण ठेवून आपण नवीन इंधन साधने शोधून काढण्याच्या दृष्टीने संशोधन करणे ही काळाची गरज आहे. कधीही न संपणारे सौर उर्जेचे साधन आपल्याकडे उपलब्ध आहे. या साधनाचे व्यापारीकरण योग्य पद्धतीने आपण केले नाही. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या एकूण उर्जेपैकी 60 टक्के उर्जा घरगुती वापरासाठी तर 17 टक्के वाहतुकीसाठी व उरलेली 23 टक्के औद्योगिक वापर व शेतीसाठी वापरली जाते.
सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे "आज भारत स्वातंत्र्यात जागा होत आहे' हे वाक्य आज प्रत्येकाने स्वत:ला चिमटा काढून मोठ्याने उद्‌गारल्यास असे दिसेल की प्रत्येक वर्गातली प्रत्येक व्यक्ती, जनतेचा प्रामाणिक सेवक असण्याऐवजी फक्त स्वत:चे हित पाहण्यात गुंग झालेली आहे. स्वत:चे भले करून घेण्याचे काम तेवढे चोख करीत आहे. पटकन मुळवून घ्या, पटकन पैसे द्या-काही बिघडत नाही ही भावना किंवा सामाजिक परिस्थिती अपेक्षित होती का? किंवा गांधीजींनी आपल्याला सांगितल होत-"साध्या इतकच साधनही महत्त्वाचं आहे,' पण आज साधनाची पर्वा कुणालाच राहिलेली दिसत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे आपण स्वतंत्र आहोत, आपण सार्वभौम आहोत, पण स्वतंत्र कुणासाठी? सार्वभौम कुणासाठी? या प्रश्र्नाचे उत्तर आज प्रत्येकाने ठरवायचे आहे. प्रत्येक भारतीयाने आज आत्मपरीक्षणाने ठरवायचे आहे की स्वतंत्रता निर्माण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूल्यांची, गुणांची, संस्थांची जी अधोगती झालेली आहे ती थांबवणे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. माझे काम आहे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आमची पहिली पिढी ज्या नेटाने व धीराने लढली. ज्यांनी भारतास स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले बलिदान केले त्यांचे नित्य स्मरण ठेवणे आवश्यक आहे. नेते पण म्हणजे स्वत:चा फायदा करून घेण्याचा परवाना नव्हे तर अंगावर पडलेल्या किंवा जाणीवपूर्वक घेतलेल्या जबादारीचा स्वीकार करण्याची मागणी आहे. दुसऱ्यांना शिस्त लावण्याआधी ती स्वत:च्या अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे हे नेत्यांनी प्रथम ओळखले पाहिजे. एका बाजूला शब्द आणि दुसऱ्या बाजूला कृती, एका बाजूला वर्तन आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा, मूल्य आणि दोन्ही बाजूंचा सुरेख समतोल म्हणजे व्यक्तीगत प्रामाणिकपणा, एकसंघपणा असणे गरजेचे आहे.
मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्रींकडे बघताना एक जाणवेल की ही माणसे, हे नेते फार सामर्थ्यवान होते. पण आज काय दिसते की आज नेते आहेत पण "महान नेते' सापडत नाहीत.
"स्वातंत्र्य' आणि सार्वभौम लोकशाही आल्यावर आपल्या पुढच दुसरे ध्येय असायला हवे होते ते सामान्य जनतेचे हित. आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना औपचारिक शुभेच्छा देताना सुद्धा मनात एक प्रश्र्न घोंघावतो आहे की, तुमच्या वाडवडिलांनी जो गरीब देश तुमच्या स्वाधीन केला तो पुरता दरिद्री करूनच तुम्ही तुमच्या पिढीच्या हातात देणार आहात का?

No comments:

Post a Comment