Tuesday, August 18, 2009

महाराष्ट्राचे भूषण, राष्ट्राचे आभूषण उर्जामंत्री ना.सुशिल कुमार शिंदे

महाराष्ट्राचे भूषण, राष्ट्राचे आभूषण
उर्जामंत्री ना.सुशिल कुमार शिंदे
ख्यातनाम पत्रकार रविकिरण साने यांनी केंद्रीय उर्जामंत्री यांच्या जीवनप्रवासाविषयी फार मार्मिक शब्दात सारांश कथन केला आहे. ते म्हणतात,"सुशिलकुमार शिंदे यांची जीवनकहाणी ही कहाणी आहे एका विलक्षण प्रवासाची. सोलापूरच्या ढोरगल्लीतल्या पित्याचे छत्र हरपलेल्या "दगडू'च्या धडपडीची. दिवस-रात्र कष्ट करीत, नापास होत, जिद्दीने शिकणाऱ्याची. जातपात, अंधश्रद्धा नाकारीत प्रकाशाची वाट धरणाऱ्याची. प्रत्येक संधीचे सोने करीत आव्हान झेलणाऱ्याची. राजकारणाच्या धकाधकीतही "स्वत्त्व' जपणाऱ्या रसिकाग्रणीची. तळागाळातल्यांचे उथ्थान करीत राष्ट्रीय नेता होणाऱ्या कर्तृत्वाची. प्रयत्नातून जाणीवपूर्वक आयुष्य घडविण्याची प्रेरणा देणारी कहाणी म्हणजे सुशिलकुमार शिंदेंची जीवन गाथा आहे.'
सुशिलकुमारांचे घराणे मूळचे मराठवाड्यातले. पण त्यांचे आजोबा सोलापुरात येऊन स्थायिक झाले. वडील संभाजीराव आणि आई सखुबाई यांच्या घरी 4 सप्टेंबर 1941 ला सुशिलकुमारांचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातले नाव गेनबा. नवसाने झालेला म्हणून दगडू म्हणत. शाळेतही दगडू संभू शिंदे अशीच नोंद झाली. 1947 साली सुशिलकुमार 6 वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले आणि कुटुंब गरीबीच्या खाईत गेले. शिकून मोठे होण्याचे स्वप्न त्यांच्या आईने त्यांना दिले. एकीकडे किरकोळ वस्तू विकून घरखर्चाला हातभार लावायचा आणि दुसरीकडे शिकायचे अशी वाटचाल सुरू झाली. दलित जातीत जन्माला आल्याचे दु:ख वाढविणारे, जातीपातीवरुन होणाऱ्या अन्यायाचे चटके लहान वयात बसले. शिपायापासून वॉर्डबॉयपर्यंत आणि कोर्टातल्या पंखे हलवणाऱ्या चोपदारापासून सबइन्स्पेक्टरपर्यंत एकीकडे शिक्षण घेत त्यांनी वाटचाल केली. रात्रशाळेत शिकत असताना नाट्यस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा गाजवल्या. कॉलेजातही वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व गुणांवर, देखण्या व्यक्तिमत्त्वावर "हिरो' ठरले. "गेनबा'चे सुशिलकुमार संभाजी शिंदे असे बदललेले नाव गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले.
एकीकडे वकिलीचा अभ्यास करीत असताना योगायोगाने सुशिलकुमारांनी मुंबई पोलिसांच्या विदेश शाखेत सबइन्स्पेक्टरची नोकरी मिळवली. अनेक बड्या व्ही.आय.पी.च्या ओळखी होऊ लागल्या. त्याचवेळी दादरच्या सुधीर वैद्यांची बहीण उज्वला हिच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. अर्थात विकसित होणारे हे प्रगल्भ नेतृत्व नोकरीत रमणे शक्य नव्हते. नेत्यांची भाषणे ऐकताऐकता आपणही असे नेते व्हावे ही उर्मी त्यांना अनावर होत होती. नेमक्या याचवेळी मा.शरद पवारसाहेबांनी त्यांचे नेतृत्वगुण हेरून त्यांना आमदारकीची ऑफर दिली आणि 4 नोव्हेंबर 1971 ला पोलीसदलाच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पवारसाहेबांनी स्थापलेल्या "कॉंग्रेस फोरम फॉर सोशॅलिस्ट ऍक्शन'च्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. लोकांशी संवाद-संपर्क साधला. राजकारणाचे तळापासूनचे मूलभूत धडे घेतले. करमाळ्यातील पोटनिवडणुकीत निवडून आले. आमदार झाले इतकेच नव्हे तर थेट राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री म्हणून त्यांचा सोलापूरच्या सत्रन्यायालयात सत्कार झाला. जिथे ते एकेकाळी पंखा हलविणारे शिपाई होते.
1995 साली शंकररावांचे मंत्रिमंडळ आले त्यात सुशिलकुमार सांस्कृतिक मंत्री झाले आणि कला-चित्र-नाट्य क्षेत्रातील त्यांच्या लोकप्रियतेचा पाया रचला गेला. सांस्कृतिक क्षेत्रातील बारीक-सारीक घडामोडींची ते दखल घेत. राज्यमंत्री झाल्यापासूनच्या वर्षभरात सुशिलकुमार ज्या धडाडीने आणि तडफेने अनेक क्षेत्रात वावरत होते, त्याची दखल घेऊन "जेसीज्‌ क्लब'ने त्यांना देशभरातील दहा उल्लेखनीय तरुणांपैकी एक म्हणून गौरवले. नंतरच्या काळात सुशिलकुमारांनी जवळजवळ सर्व खात्यांची मंत्रिपदे सांभाळली. एकेकावेळी त्यांनी सहासहा-आठआठ खाती सांभाळली. क्रीडामंत्री म्हणून महाराष्ट्रभर क्रिडांगणे उभी करण्याची योजना राबवली. वृद्ध पहिलवानांसाठी वार्षिक अर्थसहाय्य योजना सुरू केली. क्रीडास्पर्धांना उत्तेजन दिले. नाट्यस्पर्धा राज्यभर आयोजित करायला सुरुवात करून नव्या तरुण कलाकारांसाठी संधी उपलब्ध करून दिली. पडद्यामागील कलाकारांसाठी पारितोषिके सुरू केली. मराठी चित्रपटांना सक्तीने चित्रपटगृहे उपलब्ध करून देणारा कायदा केला.
सुशिलकुमारांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनदेखील अनेक नव्या योजनांना चालना दिली. कायम दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्याला उजनी धरण आणि कालवे दिले. पुढे शरद पवारांनी वसंतदादांविरुद्ध बंड करून 1978 साली "पुलोद'ची स्थापना केली. त्यात सुशिलकुमार कॅबिनेट मंत्री झाले. कामगार मंत्री म्हणून कामगारांना अनुकूल असे अनेक कायदे केले. त्याचवेळी कामगार क्षेत्रातील दहशतवादाविरुद्धही कठोर कारवाई केली. मालक आणि कामगार यांच्यात समझोते घडवून आणून औद्योगिक शांतता प्रस्थापित केली. 1974 साली "मनोहर' साप्ताहिकाने घेतलेल्या जनमताच्या कौलात ते सर्वाधिक लोकप्रियमंत्री ठरले.
मंत्री म्हणून सुशिलकुमारांनी आपली जन्मभूमी सोलापुरकरता खूप काही केले. सोलापुरला विमानतळ आला. जनता दरबाराची, गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या ऐकण्याची मूळ कल्पना सुशिलकुमारांची. अनेक अधिकाऱ्यांना घेऊन ते जिथल्या तिथे जनतेच्या दादफिर्यादीचा निकाल करीत असत. सुशिलकुमारांनी कामगारांच्या बाजूने मंत्री म्हणून इतके निर्णय घेतले की त्यांना लोक "कामगारांचा मसिहा' म्हणू लागले.
सुशिलकुमार मूळचे ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांनी ग्रामीण शेतमजुरांचाही प्रश्र्न धडाडीने हाताळला. 1978 मध्ये त्यांनी 58 लाख शेतमजुरांसाठी वेतनवाढीचे तत्पूर्वी न दिले गेलेले "पॅकेज' दिले. विडी कामगार, शिलाई कामगार, तेलगिरण्यांतील कामगार यांचेही वेतन वाढवून दिले. 2 फेब्रुवारी 1980 ला त्यांनी बार्शीमधील साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष या नात्याने अभूतपूर्व यशस्वी केले. पुढे शरद पवारांनी इंदिरा गांधींचा कॉंग्रेस सोडून समाजवादी कॉंग्रेस काढली तेव्हा नाईलाजाने आपल्या "राजकीय गुरुं'ची साथ सोडून ते इंदिराजींसोबत इंदिरा कॉंग्रेसमध्ये गेले. 1983 साली वसंतदादांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ आणि नियोजन खात्याचे मंत्री झाले. सुशिलकुमारांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे-स्वातंत्र्यवीर सावरकर. 1983 च्या सावरकर जन्मशताब्दी वर्षात त्यांनी सावरकर पुतळ्यासाठी नागपूरला अनुदान दिले. शिवाजीपार्कवर शताब्दी मेळा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सुशिलकुमारांच्या पुढाकाराने सोलापूरात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. ग्रामीण बॅंकेची स्थापना झाली. महाराष्ट्रात तमाशा थिएटर बांधण्यासाठी अनुदान दिले. संत विद्यापिठाची स्थापना झाली. लेखकांना सन्मानवेतन घरपोच देण्याची सोय झाली. धनगरांसाठी मेष महामंडळ स्थापन केले. कोल्हापुरच्या चित्रनगरीला चालना मिळाली. सोलापूरला आकाशवाणी आणि दूरदर्शनचे उपकेंद्र झाले. मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिराचे रुपांतर कला संकुलात झाले. अभयारण्यात बससेवा सुरू झाल्या. इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला झालेली हत्या आणि यशवंतराव चव्हाणांचे 25 नोव्हेंबर 1984 ला झालेले निधन हे सुशिलकुमारांसाठी मोठे मानसिक धक्के होते. 10 मार्च 1985 ला वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि सुशिलकुमार अर्थखात्यासह सहा खात्यांचे मंत्री झाले. सुशिलकुमारांच्या पुढाकारामुळे मंत्रिमंडळाच्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी होण्याची प्रथा सुरू झाली. 1885 साली युनोमध्ये भारताच्यावतीने भाषण करण्याचा मान त्यांना मिळाला. 1986 साली शरद पवारसाहेब राजीव गांधींच्या निमंत्रणावरुन पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले आणि मुख्यमंत्री झाले. अर्थात अर्थमंत्रीपद सुशिलकुमारांकडेच कायम राहिले.
देशातील पहिला शून्याधारित अर्थसंकल्प सुशिलकुमारांनी 25 मार्च 1987 ला सादर केला. शून्याधारित अर्थसंकल्पात सरकारी योजना, प्रकल्प, उपक्रम यांची पुनर्रचना करून शिस्त आणली. 27 फेब्रुवारी 1990 ला ते विधानसभेवर विक्रमी बहुमताने निवडून आले. 16 जून 1990 ला ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. करायचे ते मनापासून करायचे आणि त्यामध्ये सर्वस्व झोकून द्यायचे हा सुशिलकुमारांचा शिरस्ता असल्याने प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी पक्षात चैतन्य आणले. 21 मे 1991 ला राजीव गांधींची हत्या झत्तली आणि देशाचे राजकारण बदलले. त्यानंतर सत्तेवर आले सुधाकरराव नाईक. त्यांनी सुशिलकुमारांना नगरविकास खाते दिले आणि शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री झाले. न्यायमंत्री म्हणून त्यांनी वकिलांचा संप मिटवला. वरळी-वांद्रे सी-लिंक पुलासाठीची योजना सुशिलकुमारांनी प्रथम मांडून त्यासाठी 180 कोटींची तरतूद केली. वडाळ्याचे ट्रक टर्मिनस आणि उड्डाणपूल योजनेला मान्यता दिली. 16 मे 1992 ला सुशिलकुमार दिल्लीत अ.भा.कॉंग्रेसचे सरचिटणीस झाले. सुशिलकुमारांचे संघटन कौशल्य आणि पक्षात नवचैतन्य आणण्याची ताकद यांचा प्रत्यय त्यांच्या या पदावरील कारकिर्दीतून आला. 12 राज्यांमध्ये त्यांनी अ.भा.कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून दौरा केला. अमेरिका, चीन यांचे दौरे केले. योग्य दृष्टी असलेल्या व्यक्तीला परदेश प्रवासाची संधी मिळाली तर ती व्यक्ती स्वत: अनेक प्रकारांनी समृद्ध होते. पण देशही समृद्ध होतो हे सुशिलकुमारांनी सिद्ध केले.
4 जुलै 1992 ला सुशिलकुमार राज्यसभेवर निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत सलग अठरा वर्षे आमदारपद आणि 16 वर्षे मंत्रीपद असा अनुभव असल्याने दिल्लीत ते उत्कृष्ट संसदपटू ठरले. शोषित, दलित, मागासवर्गीय, आदिवासी या जिव्हाळ्याच्या प्रश्र्नांवर संसद सदस्य म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना "सिटीझन ऍवॉर्ड' मदर तेरेसा यांच्या हस्ते देण्यात आले.
8 जाने 1996 ला सुशिलकुमार अ.भा.कॉंग्रेसचे सरचिटणीसपद सोडून पुन्हा मुंबईत आले आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले. 27 जानेवारी 1999 ला ते सोनियाजींच्या पाचारणावरुन पुन्हा अ.भा.कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून दिल्लीला गेले. 1999 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. 18 जानेवारी 2003 ला सुशिलकुमारांचा महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. 30 ऑक्टोबर 2004 ला ते आंध्रचे राज्यपाल झाले. 29 जानेवारी 2006 आणि 2009 साली ते उर्जामंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले.
सोलापूरच्या ढोरगल्लीतला एक गेनबा, दगडू केवळ आपल्या कर्तबगारीने, विलक्षण इच्छाशक्तीने प्रत्येक क्षणाला येणाऱ्या संकटाला संधी समजून काम करतो, पुन्हा आपली वाटचाल चालू ठेवतो, कट कारस्थाने, शहकाटशह, डावपेच, द्वेष यांना दूर ठेवतो. पदावर असो की नसो सतत कामात रहातो. हेच सुशिल कुमारांचे वैशिष्टय आहे. उद्या मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून निवृत्त झाले आणि राहुल गांधींनी त्याहीवेळी पंतप्रधानपद स्विकारायला नकार दिला तर सोनियाजी सुशिलकुमार शिंदे यांनाच पंतप्रधान करतील, असे म्हटले जाते. तसेच पंतप्रधान झाले नाहीत तरी एक ना एक दिवस ते राष्ट्रपती तरी नक्कीच होतील, असे सर्वांनी गृहित धरले आहे.

No comments:

Post a Comment