""पांढरी माणसे आणि काळा पैसा''
"सिनेमा नटीच्या बाथरूममध्ये दडवलेला 50 लाखांचा काळा पैसा बाहेर ' अशी बातमी वाचताना सामान्य माणूस "आ' वासतो! पैसा कोणी किती मिळवावा हा वादाचा विषय आहे. आपल्या खिशात जेव्हा पुरेशा पैसा नसतो तेव्हा पैसा बाळगणाऱ्या उद्योगपती सिनेमातले नट-नट्या किंवा धंदेवाईक, राजकारणी कोण कसा पैसा मिळवेल याचा नेम नसतो.
जगामध्ये स्वित्झरलॅंडमध्ये स्विस बॅंक अशी एकच बॅंक आहे की तुम्हाला तुमचा पैसा कोठून आला, कसा आला, कधी आला, केव्हा आला असले प्रश्न विचारत बसत नाही. तुमच्याकडे पैसा आहे ना मग त्याचा सांभाळ करण्यासाठी आम्ही आहोत. तुमचे पैेसे तुम्हाला हवे तेव्हा काढा. हवे तेवढे वापरा त्या बद्दल आम्ही दुसऱ्या कोणाकडे या कानाची बातमी त्या कानाला लागू देणार नाही. हे आश्वासन देते. आता अशी एखादी बॅंक की ज्या बॅंकेमध्ये जगातल्या लाखो धनाढ्य व्यक्तींचे अब्जावदी रुपये "पडलेले' आहेत म्हणजे समुद्रात तुम्ही एक लोटाभर पाणी घातल्या सारखे झाले! स्विस बॅंकेत आज लाखो लोकांची खाती आहेत, ज्यात अब्जावधी रुपये जमा आहेत. "पैसा' अशी गोष्ट आहे की माणूस त्यासाठी काहीही करतो! "लक्ष्मी चंचल आहे'."पैसा एका ठिकाणी राहत नाही.'"पैशाला पाय फुटले' अशा अनेक प्रकारच्या म्हणी आपण लहानपणी शाळेत शिकलेले असतो. जेव्हा आपण पैसे कमवत नाही तेव्हा घरातले आई-बाबा किती उपदेश करतात. हे तरुणपणी प्रत्येकजण अनुभवतोच! लग्नाच्या बाजारात सुध्दा तुमची किती पैसे कविण्याची ऐपत आहे. किंवा मुलगा काय करतो म्हणजे मुलगा किती पैसे कमावतो हे अभिप्रेत असते. मुलाच्या कमाईचा असा आडप्रश्न मुलाच्या बापाच्या मनात सगळी खरी उत्तर सांगतो. तर मुलीचा बाप म्हणून त्याचे मोठ"कर्तव्य' पार पडले अशा थाटात पैसे वाला जावई मिळाला म्हणून खुश असतो. मग असा हा पैसा निर्माण कसा होतो? काळा पैसा म्हणजेे काय? तो कसा व कोठे वापरतात? तो कोण वापरतो? त्यामुळे पुढे काय होते? असे प्रश्न सामान्य माणसाला जरी पडले नाहीत तरी सरकारला मात्र नक्की पडतात याचे कारण म्हणजे मूलभूत राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने काळ्या पैशावर निर्बंध घालणे हे कोणत्याही सरकारचे प्रमुख काम असते. कारण हाच काळा पैसा देशाची समांतर अर्थ व्यवस्था चालवतो. आथिर्ंक उलाढाल व त्याचे फायदे मोजण्याच्या दोनच मोजपट्या आहेत. पहिली उत्पादक क्रिया (प्रॉडक्टिव्ह ऍक्टिव्हीटी) व दुसरी हस्तांतर क्रिया (ट्रान्सफर ऍक्टिव्हीटी) यात पहिल्या प्रकारच्या क्रियेत संपत्तीवाढी द्वारा समाजाची संपत्ती वाढविते तर दुसरी क्रिया संपत्तीचे हस्तांतरण करते. त्यामुळे पहिली प्रक्रिया विकसनशील आहे तर दुसरी ""जैसे थे'' या पध्दतीची आहे.
उत्पादकाने कोणत्याही उत्पादन क्रियेत ग्राहकांच्या उपयोगाची मूल्यवान वस्तू उत्पादित केली पाहिजे म्हणजेच खरेदी केलेल्या उत्पादनातून किंवा मिळवलेल्या सेवेतून उपभोक्त्याचे समाधान व्हावे.
हस्तांतरण कार्यात वस्तू रुपात असे काहीच उत्पादन केले जात नाही. परंतु उत्पादित माल एकाकडून दुसऱ्याकडे पुन:पुन्हा हस्तांतरीत केला जातो. या पध्दतीमुळे सरकार निर्माण करत असलेली कर पध्दती विरूध्द काळा पैसा अशी समांतर प्रक्रिया सदैव चालूच राहते.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर उत्पादनापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत हस्तांतरणाच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तूच्या उपयोगितेत काही एक भर न घालता, नफ्याची विशिष्ट टक्केवारी मात्र त्या वस्तूच्या किंमतीत वाढत जाते. म्हणजेच हस्तांतर क्रियेत काही व्यक्ती किंवा जी व्यक्ती समूहाने अशा वस्तू खरेदी करतात त्यांची संपत्ती कमी होते.हस्तांतर क्रियेत साधनसामुग्री उपभोगली जाते व समाजाचे एकूण उत्पादन कमी होते म्हणूनच म्हटले आहे की उत्पादन क्रिया हा बेरजेचा खेळ आहे. व त्यातून सामाजिक देवाण घेवाणीस मदत होते. तर हस्तांतर क्रियेत वजाबाकीचा खेळ म्हणता येईल. ज्यात सामाजिक देवाणघेवाण अंतिम ग्राहकाचा तोटा होतो. ही हस्तांतरण प्रक्रिया जरी थांबविता येत नसली तरी उत्पादन आणि हस्तांतरण या दोन प्रक्रियांमध्ये योग्य समतोल साध्य करून अधिकाधिक समाजाचे नुकसान न होता काही वरिष्ठ लोकांचा होणारा फायदा थांबवणे आवश्यक आहे.
भारतीय धर्मशास्त्र व इतर पुराणांच्या अनुषंगाने जर विचार केला तर संपत्ती, पाप आणि सत्ता हे तीन विषय प्रामुख्याने विचारांत घेणे गरजेचे ठरते.
संपत्ती विषयी अनुकूल दृष्टीकोन घेणारा हिंदू धर्म हा कदाचित जगातील एकमेव धर्म असू शकेल. संपत्ती जवळ बाळगणे हे हिंदू धर्मशास्त्र नुसार एक मानाचे आणि मोठेपणाचे लक्षण समजले जाते. कुबेर ही संपत्तीची , धनाची देवता आपण मानतो. कुबेराची गणना आठवैदिक देवतांमध्ये होते. संपत्तीमुळे येणाऱ्या सुबत्तेची देवता म्हणून मग लक्ष्मीची उपासना केली जाते. अनेक श्रीमंत मंडळींच्या घरात तसेच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीची प्रतिमा ठेवलेली असते. बहुसंख्य हिंदू घरांमध्ये दिपावळीच्या काळात "लक्ष्मी पूजन' केले जाते आणि या लक्ष्मीला आपल्या घरात सहज गत्या प्रवेश करता यावा म्हणून घराची दारे खिडक्या उघडी ठेवली जातात. श्रीमंतच काय पण सुशिक्षित मंडळींच्या फ्लॅटचे एरवी कायम बंद असलेले दरवाजे "लक्ष्मी पूजनाच्या' दिवशी मात्र जाणीवपूर्वक उघडे ठेवले जातात!
सामान्य माणसांनी ज्या तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करावा असे धर्मशास्त्रात सांगितले गेले त्या पैकी "अर्थ' हा पुरुषार्थ आहे. "धर्म' (नैतिक आचरण) आणि "काम'(इच्छाशक्ती) हे अन्य दोन पुरुषार्थ आहेत. तर अध्यात्मिक कल असणाऱ्या व्यक्तींसाठी "मोक्ष' हे आणखी पुरूषार्थाचं लक्षण असल्याचे सांगितले गेले आहे.
"अर्थशास्त्र' या आपल्या सुप्रसिध्द ग्रंथात कौटिल्याने असे नमुद केले आहे की"धर्म' आणि"काम' यांची प्राप्ती केवळ अर्थामुळेच होउ शकते. मनाजोगी धर्मकृत्ये पारपाडायची असली तरी त्यास "अर्थ' म्हणजे संपत्तीची गरज भासतेच. कोणत्याही प्रकारच्या समर्पणासाठी धनसंपत्तीची आवश्यता असते. ब्राह्मणाकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नसावी असे म्हटले गेले पण त्यालाही जर एखाद्य़ा प्रकारचे"दान' करण्याची इच्छा प्राप्त झाली तर त्याच्याकडे किमान शंभर गाई असल्या पाहिजेत असे धर्मशास्त्र सांगते. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वराला खुश करण्यासाठी का होईना ब्राह्मणालाही संपत्तीचा उपयोग करावा लागतो.
पण याचा अर्थ असा नाही की कोणताही मार्ग अनुसरून संपत्ती गोळा करणे. म्हणजेच काळा पैसा निर्माण करणे. काळ्या पैशाचा वापर करणे किंवा त्या द्वारे उपभोग घेण. आपल्याकडे धर्मशास्त्रात वर्ण श्रमांच्या संकल्पने नुसार प्रत्येक वर्णाच्या लोकांनी कोणती कामे करावीत ते स्पष्टकरण्यात आले आहे. त्या नुसार "संपत्ती' जमा करण्याचे अधिकार "वैश्य' वर्णीयांनाच प्रदान करण्यात आले. हिंदू नितीशास्त्र हे व्यवहाराचा अधिक विचार करणारे असल्याने मानवी व्यवहारातील संपत्तीचे महत्त्व लक्षात घेण्यात आले. केवळ आदर्शवादात आनंद मानता येणे फार काळ कठीण असते. नुसत्या आदर्श वादी कल्पनांची चर्चा करणे सोपे असते, पण त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी "अर्थाची' म्हणजेच पैशाची जोड असणे महत्त्वाचे असते.
ज्यू-ख्रिच्चन धर्मशास्त्रात सुध्दा धनलोभी माणसांचा धिक्कार केला आहे. सुईच्या नेढ्यातून एखाद्या वेळेस उंट प्रवेश करू शकेल पण श्रीमंत माणसाला मात्र स्वर्गात कधीच प्रवेश मिळणार नाही असे त्यांच्या धर्मशास्त्राचे सार आहे. आता या मध्ये "श्रीमंती' किंवा श्रीमंत माणूस याचा अर्थ असा की सामान्य माणसांना आपल्या स्वार्थासाठी लुबाडणे किंवा आपल्या स्वार्थासाठी सर्व प्रकारचे नीति नियम व संकेत पायदळी तुडवून संपत्ती गोळा करणे. अशी संपत्ती की ज्या कमाईला मान मरतब नसेल. अशी संपत्ती किंवा पैसा मग काळा पैसा या स्वरूपातच ओळखला गेला किंवा या पुढेही त्याचे स्वरूप असेच राहील. त्याग आणि सर्मपण या गुण विशेषांचा हिंदू धर्मानेही, धर्मशास्त्रानेही आदराने उल्लेख केलेला आहे. परंतु त्याच वेळी "अर्थ' व त्याग या दोन संकल्पना परस्पर विरोधी नसल्याचेही स्पष्ट केले.
प्रत्येक माणसाने मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा असो, कोणत्याही वंशाचा, देशाचा असो, त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात गृहसौख्य मिळविण्यासाठी अर्थाजन करणे हे एक प्रमुख मानले गेले आहे. पण उत्तम रितीने अर्थार्जन केल्यावर ऐहिक सुखांचा त्याग करावा अशी कल्पना हिंदू धर्माने मांडली .
"पूर्वीच्या काळी एखाद्या राजाने आपल्या प्रजेचे रक्षण न करता उलट तिचे धन लुबाडण्याचा प्रयत्न केला तर त्या राजाला सुध्दा कळीचा अंश समजून ठार मारावे' असे महाभारतातही स्पष्ट दिसते. राजा तर सद्गुणंचा, नैतिकतेचा आणि शक्तीचा असेल तर त्याच जनतेने वाळीत टाकावे असा उल्लेख "शांती पुराणात' आहे. दृष्ट, जुलमी व लोभी राजाला लोकांनी शिक्षा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
काळा पैसा जमा करणारे, निर्माण करणारे धनाढ्य किंवा चित्रपट तारे-तारका असे आज वर्तन करताना दिसतात. त्याच प्रकारे वैदिक काळात व्यापाराची भरभराट झाली आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा एक नवीन वर्ग उदयास आला. भल्या बु़ऱ्या मार्गाचा अवलंब करून त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. पण त्यामुळे त्यांची बदनामी ही झाली. ऋग्वेदात अशा व्यक्तींची ओळख स्वार्थी, लोभी, लांडगे अशा शब्दांत करण्यात आली आहे. संयमी स्वभावाच्या भगवान बुध्दांनीही नफे खोरीवर कडाडून टीका केली आणि अशा प्रकारचे लोक समाजाच्या समूळ नाशास कारणीभूत असल्याचे नमूद केले. लबाड नसलेला व्यापारी आणि चोर नसलेला सोनार सापडणे कठीण असे शुद्रकानेही लिहून ठेवले आहे!
सद्य परिस्थितीत काळा पैसा हा वरचड ठरला. त्यामुळे राज्याच्या, देशाच्या अनेक कल्याणकारी योजनांना विपरीत स्वरूप आले.नवीन सुधारणांच्या अनेक कार्यक्रमांच्या आड हेच आर्थिक हित संबंध उभे राहिले आहेत. त्यामुळे आर्थिक विषमता दूर करण्याची उद्दीष्टे पराभूत झाली. सार्वजनिक क्षेत्राची प्रकृती खालावत गेली आणि याचा परिणाम एकच झाला की सरकारला प्रत्येक अंदाजपत्रकात त्रूटींची अर्थव्यवस्था राबवावी लागते आहे तर खाजगी उद्योग क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणावर प्रगती करते आहे.
जेव्हा खाजगी क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्र ग्राहकांवर हुकमत गाजवायला आणि त्यांनी काय खरेदी करावे हे ठरवायला सुरुवात करते तेव्हा राजकीय पातळीवर बदल घडवून आणणे फारच अवघड होउन बसते.
कोणत्याही क्षेत्रात होणारी काळ्या पैशाची घुसखोरी म्हणजे मग ती राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो ही अधिक धोकादायक ठरणार यात संशय नाही.
अनुत्पादक स्वरूपातील काळापैसा चंगळबाजीच्या निमित्ताने व्यवहारात यायला लागल्यावर बेसुमार चलनफुगवटा ही अपरिहार्य परिणीती होती. श्रीमंत आणि धनिक वर्गावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण सर्व स्तरावर निर्माण झालेल्या काळ्या पैशामुळे गरिबांना मात्र जबरदस्त फटक बसला.
अर्थाजन प्राप्ती कशी करावी व त्याचा समाजाला कोणता फायदा होत आहे ही संकल्पना जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत काळापैसा वाढतच राहणार एवढे नक्की!
Tuesday, August 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment