Tuesday, August 18, 2009

आला नाचत गोविंदा, नाही सीमा आनंदा! थरावर थर उभे, रोमांचित होती बघे।।

आला नाचत गोविंदा, नाही सीमा आनंदा!
थरावर थर उभे, रोमांचित होती बघे।।
सारा भारत देश आज श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात दंग झालेला असेल. "श्रीकृष्ण जयंती' मग ती गुजराथमध्ये, जगन्नाथ पुरीच्या ओरिसामध्ये किंवा बालाजी-तिरुपती या आंध्रात असो सर्वत्र उत्साह सारखाच आणि दांडगा असतो! आपले सणवार, व्रतवैकल्य आणि उत्सव साजरे करण्यामागे आपला काही विशिष्ट उद्देश आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरे होणारे हे सण आणि उत्सव यामुळे आपल्यातील संस्कारांची आणि संस्कृतीची जपणूक तर होतेच, परंतु आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून प्रत्येक व्यक्तिला या निमित्ताने थोडा मोकळा श्वास घ्यायला फुरसत मिळते. जीवनाच्या जडतेला जणू मोकळं अंगण मिळत, या मोकळ्या अंगणात प्रत्येक जण क्षणभर बागडून मनाची खिन्नता, मनाचे ताण दूर करून आनंद मिळवत असतो आणि दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामाला लागतो. शिवाय या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात. मनातील एकमेकांविषयीची मलिनता दूर होते. भेद-भाव निघून जातो. परिवार, समाज व राष्ट्र या मधील परस्परांच्या नातेसंबंधाचे संतुलन साधले जाते. मनं मोकळी होतात. जगण्याची नवी उमेद मिळते. जगण्याची नवी दिशा मिळते. जगण्याची उर्मी तर प्रत्येक प्राणीमात्रात आहे. पण जगावे कसे हे आपले सण व व्रतवैकल्य सांगतात.
भगवान श्रीकृष्णाचं सारं जीवन, सामान्य माणूस अचंबित होईल इतक्या घटनांनी भरलेलं आहे. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार "कृष्ण' रुपाने या भूमीवर अवतरला असे सारा हिंदू समाज मानतो. विष्णू प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने त्याने वामनावतार, नृसिंहअवतार, वराह अवतार, मत्स्यावतार, कुर्मावतार असे वेगवेगळे अवतार म्हणजेच अशा प्रकारचे आयुष्य परमेश्वराने या भूतलावर व्यतीत केलेले आहे. आपण पौराणिक कथांमध्ये वाचलेले आहे की देवकीला प्रथम सात मुली झाल्या व देवकीचा भाऊ कंस राजा याला शापवाणी झाली होती की देवकीच्या पोटी येणारे संतान तुझा समूळ नाश करील. त्यापासून तुझा मृत्यू होईल. आणि "मृत्यूच्या' भीतीने कंस राजाने आपल्या बहिणीला व मेव्हण्याला म्हणजे देवकी व वासुदेवाला बंदिवान केले. आपल्या सैनिकांच्या पहाऱ्यात ठेवले, कारण देवकीच्या कोणत्याही आपत्यापासून त्याला आपला मृत्यू ओढवून घ्यायचा नव्हता. आपल्याला हे सुद्धा माहित आहे की विष्णूने, प्रत्यक्ष परमेश्वराने देवकीच्या पोटी कृष्ण रुपाने जन्म घेताच वसुदेवाला बुद्धी झाली की या नवजात बाळाचे कंस राजा पासून रक्षण करावयाचे असेल तर आपला मित्र किंवा ओळखीचा राजा नंद आणि त्याची पत्नी वसुमती उर्फ यशोदा हे बाळाचं रक्षण प्राणपणाने करतील. कारण कंस राजापेक्षा नंदराजा अधिक बलवान आहे आणि न्यायप्रिय आहे. वसुदेवाच्या, पित्याच्या मनात आल्याक्षणीच त्याला बांधलेले साखळदंड आपोआप गळून पडले व बंदिशाळेतून छोट्या बाळाला म्हणजेच कृष्णाला घेऊन असहाय्य पिता यमुना नदी पार करून नंदराजाकडे पोहोचला. नंदराजाने वसुदेवाचे योग्य स्वागत करून लहान बाळाच्या पालन पोषणाचे, संगोपनाचे वचन आपल्या मित्राला दिले. यशोदेचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण प्रत्यक्ष परमेश्वर छोट्या बाळाच्या रुपात यशोदेकडून आईचं प्रेम स्वीकारणार होता! जन्म देवकीच्या पोटी आणि सांभाळ यशोदे कडून या कविकल्पना नसून हे प्रत्यक्ष घडलेले वास्तव आहे.
लहान बाळात दडलेला परमेश्वर मग त्याच्या लहान सहान खोड्या साऱ्या गोकुळनगरीच्या चर्चेचा विषय झाला. नंदराजा गोकुळाचा राजा होता. त्याच्या राज्यात दूधदुधते अमाप होते. गोधन अमाप होते पण प्रजेतल्या गवळी व गवळणी मात्र मिळत असलेले सारे दूध बाजारात विक्रीस नेत असत. लहान बाळांच्या तोंडी हे दूध, दही पडत नसे. हे पाहून छोट्या कृष्णाने मग शिक्याला बांधलेल्या मडक्यातले दूध, दही, लोणी मिळवण्यासाठी हंडी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. या हंड्या हस्तगत करणे व त्यातले दूध, लोणी व दही सर्व सवंगड्यांना वाटणे हा कृष्ण लिलेचा एक दररोजचा भाग झाला. हंड्या हस्तगत करताना होणाऱ्या धांदलीमुळे, गोंगाटामुळे या हंड्याची रास फुटू लागली आणि हा "दहीहंडी' उत्सव गोकुळात सुरू झाला अशी आख्यायिका आहे. अंगावर रोमांच उभी करणारी ही घटना मग प्रत्येक घराघरात चर्चेला आली. लहान बाळांचे हे उपद्‌व्याप, यांच्या तक्रारी कोणाच्या समोर करावयाच्या तर गवळणींनी यशोदी मातेकडे या तक्रारी सादर करण्यास सुरुवात केली. एका राजाची राणी आपल्या लाडक्या आपत्याच्या तक्रारी व खोड्या ऐकताना एकीकडे मनातून सुखाऊन गेली तर जनतेची गाऱ्हाणी रास्त असल्यास, प्रजाजनांना योग्य न्याय मिळण्यासाठी यशोदा माता छोट्या "कन्हैया'ला बांधून ठेवू लागली. परमेश्वराला "बांधून' ठेवण्याची कल्पना कोणत्या भक्ताला आवडेल मग या गवळणींनी आपणहून निर्धार केला की मथूरेच्या बाजाराला जाताना दूध विकण्यापूर्वी काही भाग छोट्या बालगोपाळांसाठी राखून ठेवला जाईल, जेणे करून लहान बाळांना, छोट्या शिशूंना दूध, दही किंवा लोणी हवे त्या प्रमाणात मिळू शकेल.
"दहीहंडी' फोडण्याची सुरुवात कृष्णापासून सुरू झाली आहे असे सारा भारतीय समाज मानतो, नव्हे ती त्याची श्रद्धा आहे. या श्रद्धांना कोठेही तडे जाता कामा नयेत. कारण या मागे काही मूल्यं आहेत. प्रेरणा आहेत.
भक्तीभाव किंवा श्रद्धा थोड्या बाजूला ठेवून तटस्थपणे निरीक्षण करताना या कृतीमागे बघितले तर काय दिसते? सामान्यपणे माणसाच्या शरीराचा बालपणापासून ते वृद्धावस्थेचा विकास होताना कोणत्याही माणसाला प्रोटिन्स, कार्बोहाइड्रेस, लवण, व्हिटामिन्स यांची गरज असते. हाडांची बळकटी, मांस किंवा स्नायूपेशींची होणारी वाढ यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. शारीरिक वाढीच्या दृष्टीने विचार केला, तर माणूस शाकाहारी किंवा मांसाहारी अन्न ग्रहण करतो. सामान्यपणे भारतीय हा शाकाहारी असल्याने त्याचा आहार शाकाहारी आहे. मग दूधदुभत्यामध्ये काय आहे? असा खोचक प्रश्न जेव्हा काही विद्वान मंडळी विचारतात तेव्हा त्याचे उत्तर असे आहे की लोण्यामध्ये प्रोटीन्स 0.4 आणि "ए' व्हिटामिन आहे. दुधामध्ये प्रोटीन्स 3.3 कार्बोहाइड्रेटस्‌ 4.7 "ए' व्हिटामिन तर दह्यामध्ये 5.0 प्रोटीन्स्‌, 6.2 कार्बोहायड्रेटस्‌ आणि ए. बी. सी. हा व्हिटामिन्स आहेत. याचाच अर्थ असा की दह्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन्स आणि कार्बोहाइड्रेटस आहेत. दुधामध्ये 65 कॅलरीज, दह्यामध्ये 50 कॅलरीज इतके प्रमाण आहे.
भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये आहारावर जे भाष्य केले आहे ते आजच्या आहारतज्ज्ञांनी पुन्हा तपासून पाहावे. जे अन्न तिखट, आम्लमय, अतिशय उष्ण असते ते राजस व्यक्तींना अधिक आवडते.
जे अन्न शिळे आहे, मृत अथवा सडलेले आहे असे अन्न तामसिक आहार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आळस वाढतो. निद्रा वाढते, मांस, मासे, अंडी हे पदार्थ भोजनात तामसिक प्रकृती निर्माण करतात.
तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, तेल, तूप, वापरून केलेल्या अन्नामुळे राजसिक वृत्ती निर्माण होते. गरम मसाले, चहा, कॉफी, तंबाखू, काळे मिरे हे सर्व राजसिक प्रकारात येते. असे अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्ती अधिक लालची, लोभी, क्रोधी स्वभावाच्या असतात. "जसे खातो अन्न तसे होते मन' या उक्तीप्रमाणे माणूस जे जे अन्न ग्रहण करतो त्या नुसार त्याचे विचार व प्रवृत्ती बनतात. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे श्रीकृष्णाने लहानपणी दह्यादूधासाठी ज्या "दहीहंड्या' फोडल्या होत्या त्या मागचे कारण सर्वांना कळावे.
कान्हा, कन्हैया, नंदलाल, किशन कन्हैया, नंदकिशोर ही भगवान श्रीकृष्णाची बालपणाची नावे आज हजारो वर्षानंतरही आपल्याला मोहित करतात. एखाद्या घरात छोटे बाळ असल्यावर जो आनंद असतो, जे वातावरण असते, ज्या बाललिलांचे कौतुक होत असते त्यामुळे माणूस आपली दुःख क्षणभर विसरतो. त्याला जगण्याच्या नव्या उर्मी व प्रेरणा मिळतात. कोणतीही आई मग आपल्या बाळाचे कोडकौतुक करताना या छोट्या "कन्हैया'ला कधीच विसरत नाही. श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कथा वेड लावणाऱ्या आहेत. पायात घुंगराचे वाळे, हातात लोण्याचा गोळा, ओठावर पसरलेले लोणी व निरपराधीपणाने चेहऱ्यावरचे भाव कोणत्याही व्यक्तीच्या अंतकरणाचे ठाव घेणारे असतात. इतक्या लाडीक बाळाला शिक्षा ती काय करणार? माणसाचं मन कोमल होऊन जातं. लोण्यापेक्षा ही मऊ होऊन जातं. आणि मग निर्माण होते ती प्रेमाची, वात्सल्याची भावना! परमेश्वराचे अपराधीपण हे मग अपराध न वाटता त्याचे गुणच वाटतात आणि लाडीकपणे यशोदा माता त्याला प्रेमाने दही लोणी खाऊ घालते! भारतीय परंपरेत आईची महती जेवढी सांगितली गेली आहे तेवढी अन्य देशांच्या परंपरात सापडत नाही. मग आधी ओळख आईची असते. कौसल्येचा "राम' असतो, यशोदेचा "कान्हा' असतो! सारा भारत देश आज गोकुळअष्टमी, कृष्णाष्टमी, गोकुळोत्सव, दहीकाला, कृष्णजन्म, कृष्णावताराचा प्रारंभ या प्रसंगाने ओळखतो.
कृष्णावताराचे तीन टप्पे पाहिले असता पहिला टप्पा श्रीकृष्णाचे बालपण, दुसरा टप्पा श्रीकृष्णाचे तारुण्य आणि तिसरा टप्पा महाभारतकाळात कौरव पांडव युद्धात पांडवांच्या बाजूने त्याचे लढणे.
श्रीकृष्ण महान योद्धा आहे. त्याने अर्जुनाचे सारथ्य केल्यामुळे पांडवाना विजय मिळाला. श्रीकृष्ण उत्तम योगी आहे. कुरुक्षेत्रात युद्धाला उभा राहिलेला अर्जुन जेव्हा मानसिकरित्या गोंधळला व त्याने कृष्णाला सांगितले की माझ्याकडून युद्ध होणे शक्य नाही. मी माझ्या काका, मामांना मारणार नाही तेव्हा "कर्मणेवास्ते अधिकारः मा फलेषू कदाचन' म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रत्येक माणसाने कर्म करीत राहाणे किंवा "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः परित्राणाय साधूंना धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे' म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, एकूणच धर्म भूमिका खिळखिळी होते, समाजमनाची घडी विस्कळीत होते त्या त्या वेळेस आपण धर्माची पुनश्च उभारणी करण्यासाठी अवतीर्ण होतो.
श्रीकृष्ण हा पेंद्याचा जीवलग मित्र, अर्जुनाचा जीवलग सखा, द्रौपदीचा भाऊ, राधेचा प्रियकर, यादव कुळाचा वंशज, पूतनेचा वध करणारा शत्रू, कालिया नागाचे मर्दन करणारा वीर, अशा जीवनातल्या अनेक नात्यांनी आपल्या समोर येतो. रुक्मीणीचा पती, मीरेचा गिरिधर, गोपाल किंवा सोळा सहस्त्र नारींचा उद्धारक अशा विविध रुपात कृष्णाचे कार्य आहे.
दहीहंडीचे अंर्तःमुख करणारे रुपक बघताना एक प्रमुख विचार असा आढळतो की द हा संस्कृत धातू आहे. द म्हणजे देणे, दान करणे, दातृत्व तर ही म्हणजे हिंसा, अनाचार, जुलुम जबरदस्ती याचाच अर्थ असा की मनातली हिंसा वृत्ती नाहीशी करून, कोणावरही जुलुम, जबरदस्ती न करता अहिंसेच्या मार्गाने जावे. कोणासही दुखवू नये. दातृत्व म्हणजे आपल्याकडे जे चांगले आहे ते सदैव दुसऱ्याला देत राहाणे. दुसऱ्याच्या सदैव मदतीस, उपयोगी पडावे, हिनतेची, कटूतेची, द्वेषाची हंडी फोडावयाची व मांगल्याचे पवित्रपण जपणे आहे.
"दहीहंडी'ला आज जे स्वरूप आले आहे ते बघताना व्यापारीकरण किंवा त्यात घुसलेले राजकारण कितपत योग्य आहे असा विचार कोणीही करण्यास धजावेल परंतु दहीहंडी हा विषय गेली अनेक शतके तमाम भारतीयांच्या मनात इतका भरला आहे की काळाच्या ओघात त्यात कितीही बदल घडले तरी त्याचे महत्त्व अबाधित राहील.
"दहीहंडी' हा बालगटाचा, शिशुगटाचा विषय आहे आणि त्यातले औत्सुक्य न संपणारे आहे. दहीहंडी फोडण्यासाठी आज 9 थर किंवा 10 थर लावून हंडी फोडण्याच्या नव्या कल्पना उचलून धरल्या तरी त्यातली म्हणजे हंडी फोडण्यातली मजा काही और आहे. माणसाच्या दुःखाच आणि त्याच्या अध्यात्मिक उत्कर्षाचं कारण माणसाच्या मनात दडलेले आहे. केवळ मनाच्या दुर्बलतेमुळे व्यावहारिक बंधनात अडकलेला जीव मनाच्याच सामर्थ्यामुळे भव सागर तरुन जाऊ शकेल व विचार रुपी हंडी फोडून जीवनाचे कार्य आणि जीवनाचे सार समजावून घेईल असे प्रतिकात्मक रूप आहे.
जन्माष्टमी व गोपालकाला या कार्यक्रमासाठी देशातल्या तमाम बालगोविंदाना आमच्या शुभेच्छा!

No comments:

Post a Comment