अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
आरे गवळीवाड्यातील "कालीया'मर्दन
पत्रकारीतेत ज्यांना आम्ही आदर्श, दीपस्तंभ, मराठी पत्रकारीतेचे महागुरू मानतो ते आहेत "मराठा' दैनिकाचे संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आचार्य अत्रे यांनी "मराठा' दैनिकाचे संपादन करीत असतानाच 1957 ते 1960 या काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीचे नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे त्यांनी निवडणूकदेखील लढवली. मुंबईतल्या साम्यवादी आणि समाजवादी कामगार चळवळीत सक्रिय सहभागी होत आचार्य अत्रे यांनी "मराठा' हे मराठी कामगारांच्या सुखदु:खांच्या अविष्काराचे माध्यम आणि आंदोलनांचे मुखपत्र बनवले. आचार्य अत्रे यांचा सक्रिय संपादकाचा वारसा चालविणारे मराठी पत्रकारीतेतील उत्तुंग "टॉवर' म्हणजे "नवाकाळ'कार निळूभाऊ खाडीलकर. "नवाकाळ'चे संपादन करीत असतानाच त्यांनी "प्रॅक्टीकल सोशॅलिझम फ्रंट' ही संघटना काढली. गिरणी कामगारांच्या प्रश्र्नावर निळूभाऊ थेट रस्त्यावर उतरले. आम्ही आचार्य अत्रे आणि गुरुवर्य निळूभाऊ खाडीलकर या दोन आदर्श संपादकांनी चालविलेल्या व्रताचा निष्ठेने अंगीकार केला असल्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्र्नांवर थेट रस्त्यावर उतरून,"पब्लिक'च्या खांद्याला खांदा भिडवून आंदोलनात सहभागी होत आहोत. मेट्रो रेल्वेचा प्रश्र्न, 11 वीचा ऑनलाईन ऍडमिशनचा प्रश्र्न याच भूमिकेतून आम्ही हाताळले.
दैनिक मुंबई मित्र आणि दैनिक वृत्तमित्रच्या माध्यमातून आम्ही समाजातील अनेक अन्यायग्रस्तांची दुखणी वेशीवर टांगत असतो. व्यथा मांडत असतो. असंतोषाला वाचा फोडत असतो. प्रश्र्न सोडविण्याचे काम ज्या शासकीय-प्रशासकीय यंत्रणांचे आहे त्यांच्यावर लोकमताचा दबाव निर्माण करणे हे वृत्तपत्रांचे काम आहे. लोकमत जागृत करणे, संघटित करणे आणि त्यांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर प्रश्र्न सोडवून घेणे यात संपादकाने पुढाकार घ्यायला हवा असे आमचे मत आहे. त्यामुळे "मुंबई मित्र'च्या कार्यालयात रोज साऱ्या मुंबईतून लोक येत असतात. त्यांच्या समस्या सांगत असतात. दाद-फिर्याद मांडत असतात. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेतो. जिथे बातमी किंवा अग्रलेख देऊन प्रश्र्न सुटेल असे वाटते तिथे ते करतो अन्यथा आंदोलन पुकारतो.
गोरेगावच्या आरे कॉलनीतील कर्मचारी, रहिवासी जेव्हा आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी कथन केलेली आरे डेअरीच्या वाताहतीची "दास्तान' ऐकून आम्हाला सखेद आश्र्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्र दु:शासनाने शासकीय दूध योजनेचा गळा घोटण्याचे जे कारस्थान रचले आहे ते भयानक आहे. महाराष्ट्र शासनाला आरे डेअरी बंद पाडायची आहे. नुसती डेअरीच बंद करायची नाही तर शासकीय दूध व्यवस्था बंद करून या क्षेत्रात खाजगी उत्पादक आणि वितरकांना रान मोकळे करायचे आहे. शासकीय दुग्धव्यवसाय खात्याकडे असलेले हजारो एकरांचे भूखंड खाजगी बिल्डर, उद्योगपती, स्पेशल झोनचे प्रवर्तक यांच्या घशात घालण्याचा डाव महाराष्ट्र शासनाने रचला आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकाला रास्त भाव देणारी आणि गोरगरीब मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या भावात दूध देणारी ही शासकीय योजना जर महाराष्ट्र सरकारने आपणहून बंद केली तर टीका होईल हे ठाऊक आहे. त्यामुळे शासनाने ही शेतकरी दूध उत्पादकाचे शोषण टाळणारी आणि ग्राहकाला शुद्ध कसदार दूध रास्त भावात देणारी योजना स्वत:हून बंद केली नाही तर तोट्यात जाऊन बंद पडली असा कांगावा करता यावा हा महाराष्ट्र शासनाचा डाव आहे.
आरे दूध डेअरीत महाराष्ट्र शासनातील "विषारी कालीयां'नी दूधात विषाचे गरळ मिसळण्याचा उद्योग कसा चालवला आहे याचा पर्दाफाश आम्ही करावा असा आग्रह आम्हाला आरे डेअरीतील गोरेगाव युनिटच्या कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून हे प्रकरण फार गंभीर आहे हे आमच्या लक्षात आले. आरे डेअरीच्या फक्त गोरेगाव युनिटचा हा प्रश्र्न नसून कुर्ला, वरळी अशा सर्वच डेऱ्या बंद करण्याचा कुटील डाव उघडकीस आणण्याची गरज आमच्या लक्षात आली. शासकीय दूधयोजना सध्या मुडदूस झालेल्या अवस्थेत आहे ही वस्तुस्थिती आहे पण एकेकाळी बाळसेदार असलेल्या या "बाळा'ची अशी कुपोषित अवस्था कोणी केली? ती करणारे लबाड लोक "आरे'च्या व्यवस्थापनात आहेत. ज्या गैरप्रकार आणि गैरव्यवहारांमुळे एकूणच दुग्धविकास खात्याची वाट लागली ते "शासकीय बाजीराव' मंत्रालयात आणि कार्यालयातच आहेत. ज्या दुग्ध सम्राटांनी शासकीय दूध योजनेचे लोणी एकेकाळी मटकावले आणि आता पाणी ओतून मोकळे झाले ते राजकीय नेतेच आज मंत्री, आमदार म्हणून सत्तेत आहेत. दुग्धविकास खात्याची वाट बाहेरून कुणी येऊन लावलेली नाही ती आतल्या आणि आपल्याच लोकांनी लावली.
जेव्हा दुधाला भाव बाहेर मिळत नाही तेव्हा दबाव आणून आपल्या खाजगी किंवा सहकारी दूध डेऱ्यांचे दूध शासकीय दूध योजनेला ज्यांनी घ्यायला लावले तिच मंडळी आता बाहेर दुधाला चांगला भाव मिळतो आहे म्हटल्यावर शासकीय दूध योजनेला करारानुसार दूध देणे कंपलसरी असूनही दूध द्यायला तयार नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या बड्या नेत्यांच्या दूध डेअऱ्यांनी थेंबभर देखील दूध शासकीय दूध योजनेला दिले नाही आणि चढत्या भावाने बाहेर विकले त्यांना कसलाही जाब महाराष्ट्र शासनाने किंवा दुग्धविकास खात्याने विचारलेला नाही. कसा विचारणार? कारण ज्यांनी दुग्धविकासखात्याचा करार मोडला त्या डेअऱ्यांचे गॉडफादर हर्षवर्धन पाटील, अजितदादा पवार असे मातब्बर मंत्रीच आहेत. महाराष्ट्रात सध्या खाजगी आणि सहकारी दूध उत्पादकांनी दूध आणि दूधापासून बनविलेल्या पदार्थांचे मार्केट काबीज केले आहे. त्यांची गुजरातमधल्या "अमूल'सारख्या ब्रॅंडशी जीवघेणी स्पर्धा चालू आहे. गोकूळ, वारणा, महानंद अशा डझनभर "दूध'वाल्यांना "आरे'चे स्वस्त आणि मस्त, ताजे आणि निर्भेळ दूध स्पर्धेतून बाद व्हायला हवे आहे. त्यासाठी आरे डेअरीचा गळा घोटण्याचे कारस्थान चालू आहे.
शासकीय दूध योजना बदनाम करण्याच्या कटाचा एक भाग म्हणजे डेअरीला दूध पुरवठा पुरेसा करायचा नाही. त्यामुळे विविध केंद्रांवर दुधाचा तुटवडा निर्माण होतो. अनियमीत आणि अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे ग्राहक तुटतो. तो खाजगी दूध डेऱ्यांकडे वळतो. मग दूधजन्य पदार्थांबाबतही अशीच बोंब झाली की तेही मार्केट नामशेष होते. एकदा ग्राहक दुसऱ्या दूध आणि दूधजन्य पदार्थांकडे वळला की मग तो पुन्हा "आरे'कडे येत नाही आणि मग दूध आणि माल खपत नाही म्हणून दिवाळे जाहीर करायला "आरे'चे व्यवस्थापन आणि मंत्री मोकळे. या सर्व कारस्थानातला अत्यंत हीन आणि नीच प्रकार म्हणजे गोरेगावच्या आरे प्रकल्पाची दुग्धविकास खात्याशी संगनमत करून मुंबई महापालिकेने केलेली नाकेबंदी. गोरेगावच्या आरे प्रकल्प आणि वसाहतीचे पाणी तोडून महापालिकेने या कटातली आपली सह-खलनायकाची भूमिका पार पाडली. "आरे' व्यवस्थापनाने गोरेगाव युनिटचे दूध तोडून "डेअरी'ची विल्हेवाट लावण्याचा घाट घातला. गोरेगाव डेअरीचे कर्मचारी-कामगार आम्हाला भेटले तेव्हा या सर्व प्रकाराने व्यथित आणि संतप्त झालेले होते. आम्ही त्यांना "शब्द' दिला आणि त्याप्रमाणे "मुंबई मित्र'ने तोफ डागली.
"मुंबई मित्र'च्या भडीमारामुळे आरे व्यवस्थापन हादरले. मंत्रालयात भूकंप झाला. महापालिकेत सुरुंग फुटले. "मुंबई मित्र'च्या दणक्याने आरे डेअरीचा आणि कर्मचारी वसाहतीचा गोरेगाव प्रकल्पासाठीचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू झाला. गोरेगाव प्रकल्पावरील दुधाचा स्त्रोत पुन्हा पूर्ववत केला गेला. गोरेगाव आरे वसाहतीमधील कामगार कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमचा भव्य सत्कार केला. सत्काराच्या निमित्ताने कामगार कर्मचाऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यामुळे आम्ही भारावून गेलो. आमची जबाबदारी यामुळे अधिक वाढली आहे. "आरे'च्या केवळ गोरेगावातीलच नव्हे तर वरळी, कुर्ल्यातील कामगार-कर्मचाऱ्यांनीही आम्हाला सोबत येण्याची विनंती केली आहे. आम्ही ती मान्य केली आहे. आम्ही "आरे' गवळीवाड्यात एक कालीया मर्दन नुकतेच केले आहे. आता दुग्धविकास खात्यातील कंसमामांचे दमन करण्याचेही कार्य सर्वांनी मिळून करायचे आहे. आम्ही सिद्ध आहोत. "आरे'च्या कर्मचाऱ्यांनीही सज्ज रहावे!
Saturday, July 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment