Friday, July 24, 2009

मरणांत खरोखर जग जगते

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मरणांत खरोखर जग जगते
जीवन हे एक कोडे आहे. मृत्यू हे एक रहस्य आहे. कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अडकलेला कीटक जसा, सुटकेसाठी जेवढा अधिक धडपडतो, तेवढा त्या जाळ्यात अधिक गुरफटतो, तसे जीवनाचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करणारा, अधिकच कोड्यात पडत जातो. मृत्यूचे रहस्य तर अंतराळातल्या कृष्णविवरासारखे आहे. सुरुवात कळत नाही, शेवट आढळत नाही. जीवनाची प्रीती आणि मृत्यूची भीती या हिंदोळ्यावर माणसाचे मन कायम आंदोलत असते.
10 वर्षांपूर्वी बाळ सामंत यांचं एक अद्‌भुत पुस्तक वाचलं. "मरणात खरोखर जग जगते' हे त्या पुस्तकाचं नाव! अस्वस्थ झालो. बेचैन झालो. लक्षात आलं. मरण्याची कल्पना प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा भयंकर आहे. जगण्याच्या नादात अटळ अपरिहार्य अशा आपल्याच मरण्याच्या क्षणाचे भान राहिलेले नाही. मृत्यू पाहिले होते. मृत्यूची अनेक रूपे पाहिली होती. श्वास सोडावा तितक्या सहजतेने प्राण सोडताना आजोबांना पाहिलं होतं. महापुराच्या पाण्याबरोबर वहात जाणाऱ्या माणसाने काठावर येण्यासाठी हातपाय मारीत आधार शोधीत प्राणांतिक धडपड करावी आणि अखेर पाण्याच्या लोंढ्याने त्याला भोवऱ्यात भिरकावून गिळून टाकत फरफटत घेऊन जावे तसे प्राण हिरावून काळाने ओढून नेताना पाहण्याचं दारुण दु:ख माझ्या जिवलग मित्राला अनंताला झालेल्या प्राणघातक अपघाताचे वेळी असहाय्यपणे पाहिले होते.
उंदराला मांजराने खेळवावे तसे मृत्यूने जीवघेणा खेळ करीत मारलेला प्रकाश माझ्या डोळ्यापुढे आहे. अचानक फ्यूज जाऊन अंधार पसरावा तसा गप्पा मारीत बसलेला अप्पा हार्टऍटॅकने वाक्य अर्धे सोडून जाताना पाहिला होता. अजगराने विळखा घालून हळूहळू प्रदीर्घ काळ एखाद्या हरणाला ते जिवंत असतानाच गिळत रहावे तसे कॅन्सरच्या अजगरी विळख्यात गुदमरत गेलेले अण्णासाहेब पाहिले होते.
मृत्यूची अनेक रूपे पाहताना कधीतरी आपल्याही वाट्याला यातले एक रूप घेऊन मृत्यू येणार आहे हे जाणवले नव्हते. पण बाळ सामंतांचे पुस्तक वाचले आणि मरण्याच्या जाणीवेने माझ्या जगण्याची शैली बदलली. मृत्यूचा शोध घेण्यासाठी मी जन्माच्या घटनेचा अभ्यास सुरू केला. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनिश्र्चित कालीन प्रवासाचे नाव जीवन असेल तर आपण हा प्रवास कोणत्या दृष्टीकोनातून काय भूमिका घेऊन करायचा हा एक नवाच विचार मनात पिंगा घालू लागला.
जीवन हा एक प्रवास असेल तर तो आपण केवळ रोजीरोटी देणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नाईलाजाने कराव्या लागणाऱ्या लोकल प्रवासासारखा करायचा? की पर्यटनासाठी मौजमजा, आनंद, सुख, समाधान शोधत प्रेक्षणीय स्थळे पाहत आणि नवनवीन अविष्कार अनुभवत करावा तसा जीवनाचा प्रवास करायचा हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा आणि भूमिकेचा प्रश्र्न आहे. पर्यटनाऐवजी काहीजण तीर्थयात्रेच्या निमित्ताने आत्मिक, अध्यात्मिक, मन:शांतीसाठी पवित्र क्षेत्रे, पूज्य मंदिरे, साधू संत, सत्पुरुष यांची पावन दर्शने घेत प्रवास करतात तसाही काही जणांना जीवनप्रवास करावासा वाटेल.
माझ्या असं लक्षात आलं की आपल्या हातावर घड्याळ आहे, त्यामुळे आपल्याला वेळाची जाणीव कायम राहिली पण काळाचे भान त्या घड्याळाने कधी करून दिले नाही. झालेली वेळ दाखविणारी शेकडो घड्याळे भिंतीवर दिसली पण गेलेली वेळ सांगणारे घड्याळ त्यात एकही नव्हते. वाढदिवस साजरे करताना वयाची किती वर्षे झाली हे सांगणाऱ्या मेणबत्त्यांनी किती वर्षे वाया गेली त्याचा आकडा कधी दाखवला नाही. कॅलेंडर जुने झाले म्हणून बदलले, पण नव्या वर्षात नव्या कॅलेंडरला जुन्याच खिळ्यावर नव्याने टांगावे तसे मी तोच तसाच राहून फक्त वर्ष नवे म्हणून सारे नवे मानले, स्वत:ला वर्षानुसार बदलण्याऐवजी कॅलेंडरेच फक्त बदलत राहिलो.
टी.व्ही.वरच्या "कौन बनेगा करोडपती'मध्ये कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना आणि प्रश्र्नाचे उत्तर आता हॉटसिटवरला स्पर्धक सांगणार आणि करोड रुपये जिंकणार असे वाटत असताना अचानक टोल पडावा आणि "समय समाप्ती की घोषणा' व्हावी आणि प्रकाशझोतासह वलयांकित रंगमंचावर सन्नाटा पसरावा तशी मृत्यूची जाणीव बाळ सामंतांचे ते "मरणात खरोखर जग जगते' या पुस्तकाने करून दिली आणि मग काय गमावले, काय कमावले, काय सापडले, काय हरपले, काय मिळाले, काय गळाले, काय जिंकले, काय हरले, काय केले, काय करायचे राहून गेले याचा जमाखर्च करायला बसलो तर हिशेबच लागेनासा झाला. बेरीज करायला गेलो तर वजाबाकीचे आकडे छेद द्यायला लागले, गुणाकाराचे चिन्ह मांडूनही उत्तर भागाकार केल्यासारखे येऊ लागले. मनासारखे पत्ते आले नाहीत तरी डाव खेळावाच लागतो, आहे त्या पानांमधून रमी जुळवता येत नसेल तर गड्डीतून अनुकूल पत्त्यांचा शोध घेऊन रमी जुळवायचा प्रयत्न करावा लागतो, आपलं नशीब केवळ आपले पत्ते जुळण्यावर नसते तर दुसऱ्याची रमी आपल्याआधी लागण्या न लागण्यावर अवलंबून असते. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, पद हे सगळं असंच आपल्या आणि त्याहीपेक्षा दुसऱ्याच्या हातात कोणते पत्ते येतात यावर अवलंबून असतं. मग आपल्या हातात या खेळात काय असतं? पत्ते लपवून नसलेले पत्ते असल्याचा आभास निर्माण करून समोरच्याला चकवणं की असलेल्या पत्त्यांची अनपेक्षित उतारी करून प्रतिस्पर्ध्याला चुकवणं? मग जीवन हे यशस्वी कशामुळे होतं? माझ्यामुळे की दुसऱ्यामुळे? अपयशाचं कारण कोण असतो? मी किंवा दुसरा असाच कुणी? जगणं तर माझ्या हातात नाही. मरणं देखील नाही. मग जगण्या-मरण्याच्या संदर्भात माझं असं काय आहे? मी जर इतका पराधीन, परावलंबी आहे तर मग "मी-माझे-मला' याचा एवढा अहंकार कुठून आला, कसा आला, का आला. मरण्याचा क्षण "त्यांने' ठरविला मग जगण्याचा क्रम तरी माझ्या हातात आहे का?

No comments:

Post a Comment