अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
ना.विलासरावांना "व्हिलन' ठरवू नका
अन्यथा कॉंग्रेसवर प्रसंग येईल बाका
महाराष्ट्रात "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष ना.शरद पवार यांच्याशी राजकीय मुत्सद्दीपणा, वैचारिक झेप, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद-संपर्क याबाबतीत नुसती तुलना नव्हे तर बरोबरी होऊ शकेल असा एकच नेता महाराष्ट्रात कॉंग्रेस आयकडे आहे आणि ते म्हणजे ना.विलासराव देशमुख! कॉंग्रेस आयच्या महाराष्ट्रातील नेतृत्वात "चिल्लर नाणी' खूप आहेत पण नेतृत्वगुणांचा खणखणीत बंदा रुपया एकच आहे - विलासराव देशमुख! झाडाझुडपांच्या गर्दीत एकच डेरेदार आम्रवृक्ष उठून दिसावा तसे कॉंग्रेस नेत्यांच्या भाऊगर्दीत उठून दिसणारे आहेत विलासराव देशमुख! चिमण्या, कावळे, कबुतर, तितर यांच्या थव्यावर उंचावरून भरारी घेत जाणाऱ्या गरुडासारखे व्यक्तिमत्त्व आहे. विलासराव देशमुख! कॉंग्रेस आयमध्ये नेत्यांची संख्या मोठी आहे पण अनेक शून्यांची बेरीज केली तरी उत्तर शून्यच येते. याउलट आकडा एक त्यापुढे ठेवला की त्या शून्यांनाही मूल्य प्राप्त होऊन बेरीज लाख, करोड, अब्ज अशी कितीही वाढू शकते. विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील कॉंग्रेससाठी तो जादूचा "एक' आकडा आहेत, त्यामुळे इतर शून्यांनाही मूल्य येते.
महाराष्ट्रातून केंद्रात जे कॉंग्रेस आयचे नेते गेले आहेत ते मंत्री असले तरी त्यांच्यात महाराष्ट्राला राजकीय नेतृत्व देणारे विलासरावांखेरीज दुसरे कोणी नाही. सुशीलकुमार शिंदे उर्जा मंत्री असले तरी त्यांच्यात राजकीय ऊर्जा अजिबात नाही. त्यांचे आडनाव खरेतर शिंदे ऐवजी गोडबोले असायला हवे होते. पाकात मुरलेल्या गुलाबजामूनसारखे "हलदीराम'च्या पॅकमध्ये सुरक्षित असावे, तोंडातून पिठीसाखर सांडावी तसे मधुरमधुर पण निरर्थक बोलावे, कुणीही साहित्यिक, पत्रकार समोर दिसला की,"मित्रवर्य या' म्हणत "पेज थ्री' पार्टीमधल्या "सोशलाईट'सारख्या "जादू की झप्पी' देत त्याचे स्वागत करावे, राजकीय वादाचा विषय निघाला की तोंडाला कुलुप लावून ऐकूच न आल्यासारखे दाखवावे, कार्यकर्त्यांना "पाहूया' "काय जमते बघूया' "ऍडजेस्ट करून घ्या, वाद वाढवू नका सांगून गोलगोल बोलून जागच्या जागी फिरवावे असे करणारे, वागणारे' सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राला काय कपाळाचे राजकीय नेतृत्व देणार?
केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे जागीच ठेवलेली गुळाची ढेप. बूड हलायचे नाही. तोंडावरची माशी उडायची नाही. तोंडातल्या तोंडात बोलणे, घुटमळत चालणे, वेड पांघरून पेडगावला जाणे आणि देशात असून परदेशस्थ भारतीय असल्यासारखे कार्यकर्त्यांशी अलिप्तपणे वागणे ही पृथ्वीराज चव्हाणांची वैशिष्ट्ये. पंतप्रधान कार्यालयातला "हेड कारकून' म्हणून दिल्लीतले लोक त्यांना ओळखतात. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असून दिल्लीत मराठी माणसाचे एक काम कधी करीत नाहीत. त्यांची राजकीय पत दिल्लीत नाही हे एव्हाना महाराष्ट्रातल्या लोकांना कळून चुकले आहे, त्यामुळे त्यांना कोण नेता मानणार आणि कोण त्यांच्यामागे जाणार? मुकुल वासनिक केंद्रात मंत्री आहेत, पण त्यांचे मित्रांचे असे एक दिल्लीतले कोंडाळे आहे, त्या पलीकडे त्यांचा जनसंपर्क नाही. राहुल गांधींचे स्तुतीपाठक, भाट यापलीकडे त्यांची स्वत:ची अशी ओळख नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा गट नाही. कार्यकर्ता नाही. राहुल गांधींच्या झब्ब्याची किनार धरून फिरत राहिलो तर जराही कर्तृत्व नसताना ज्याप्रमाणे आपल्याला दलित तरुण म्हणून केंद्रात मंत्रिपद मिळाले, तसेच एक दिवस महाराष्ट्राचे मंत्रिपद मिळेल, या आशाळभूतपणे जगणारा हा तरुण नेता. एकेकाळी त्याच्याबद्दल वाटणाऱ्या अपेक्षांचा गेल्या 10 वर्षात पूर्णपणे भंग झाला आहे. शुभ्र कपड्यातले राजकीय बुजगावणे यापलीकडे त्याचे अस्तित्व नाही. प्रतिक पाटील नवे मंत्री आहेत. अजून ते कांगारूच्या पिल्लासारखे पिशवीत बसून कुतुहलाच्या नजरेने राजकारण निरखून पहात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नेतृत्वाची अपेक्षाच नाही.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे स्वत:ला राजकीय नेता म्हणून एस्टॅब्लिश करू पहात नाहीत. एक कुशल लोकप्रिय समाजाभिमुख कल्याणकारी धोरणे राबविणारा प्रशासक ही त्यांना स्वत:ची अपेक्षित प्रतिमा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी पंगा घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्यात अडथळा येऊ नये याची काळजी घेत आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणजे,"असून अडचण, नसून खोळंबा' असे गृहस्थ आहेत. सरळ, साधा, पापभिरू, मेणचट, मिळमिळीत, गुळगुळीत, बुळबुळीत शेवाळलेल्या व्यक्तिमत्त्वाचा तेजोहीन, प्रभावहीन, वक्तृत्वहीन, कर्तृत्वशून्य असे माणिकराव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातही अशी एक शेळीची शेपटी आहे, जिच्यामुळे माशाही उडत नाहीत आणि अब्रूही झाकता येत नाही. महाराष्ट्रातील कॉंग्रेस संघटनेला जोश, मर्दानगी, चैतन्य आणि पुरुषार्थ देण्याची अद्भुत ताकद नारायण राणे यांच्यात आहे पण त्यांच्या उताविळेपणामुळे आणि घायकुत्या, अवधिऱ्या, इपेशंट स्वभावामुळे त्यांनी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतला आणि आता राजकीय अपंगत्वाच्या काळातून त्यांची मंत्रिपदाच्या कुबड्या घेऊन वाटचाल चालू आहे. अन्यथा हा नारायण महाराष्ट्रातल्या कॉंग्रेससाठी सूर्यनारायण ठरू शकला असता.
कॉंग्रेस आयमधील केंद्र-राज्य पातळीवरील ही दुरावस्था पाहिल्यावर लक्षात येते की महाराष्ट्रात विलासराव देशमुखांच्या तोडीचा, जोडीचा दुसरा नेता कॉंग्रेसकडे नाही. राष्ट्रवादीतही शरद पवारांचा अपवाद वगळता विलासरावांशी बरोबरी करू शकेल असा एकही नेता नाही. भाजपाचे गोपीनाथ मुंडे लोकप्रिय आहेत, पण बाकी नुसतेच पेहलवान आहेत. मनोहर जोशींसारख्या नाना फडणीसाने त्यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात जेरीस आणले होते. त्यांचा शरद पवार-विलासरावांसारख्या चाणाक्य-कौटील्य बुद्धीच्या नेत्यांपुढे काय पाडाव लागणार? महाराष्ट्रात विलासरव देशमुख हेच प्रति-शरद पवार आहेत, असे माधव गडकरींनी लिहिले त्याला आता दहा वर्षे झाली. महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, संपादक यांनी सोनियाजींनाही वेळोवेळी सल्ला-सूचना दिली होती की जर तुम्हाला शरद पवारांना महाराष्ट्रात शह देऊन कॉंग्रेस आय मजबूत करायची असेल तर तुम्ही विलासराव देशमुखांना ताकद द्या.
2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी सुशीलकुमार मुख्यमंत्री होते आणि ते कायम राहण्यास वरकरणी अडचण नव्हती. पण अहमद पटेल आणि सोनियाजींच्या कानाला लागणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना असे पटवून दिले की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाढत्या प्रभावाला रोखायचे असेल तर सुशीलकुमार शिंद्यांसारखा मवाळ दलित नेता चालणार नाही तर शरद पवारांइतकाच मुत्सद्दी असा मर्द मराठा नेता म्हणजे विलासरावच पाहिजेत. त्यावेळी कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला आमदारकीच्या दोन जागा जास्तीच्या मिळाल्यामुळे सोनिया गांधींना देखील राष्ट्रवादीला रोखण्याची गरज वाटत होती आणि राष्ट्रवादी आणि शरद पवारांना शह देणारा नेता या क्वालिफिकेशनवर विलासराव देशमुख दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. अर्थात विलासरावांनी तिथेही आपल्या बुद्धिचातुर्याने "गेम' वाजवला. त्यांनी जाहीर भाषणात शरद पवार आणि राष्ट्रवादीला शह देण्याची, रोखण्याची कॉंग्रेस पक्ष वाढविण्याची, स्वबळावर पुढील वेळी कॉंग्रेस सत्तेवर आणण्याची भाषा करून कॉंग्रेस श्रेष्ठींना खुश केले तर त्याचवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या खात्यात हवे ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही देऊन शरद पवारांनीही सुचविलेले निर्णय जाहीर करून पवारांना हवी ती प्रत्येक फाईल असेल तशी-जिथल्या तिथे क्लिअर करून पवारांनाही संतुष्ट करून त्यांचाही विरोध संपुष्टात आणला आणि आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम त्यांनी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार या दोघांनाही खुश ठेवण्याची तारेवरची कसरत पार पाडत केला. धिस् इज व्हॉट विलासराव इज!
आताही विलासराव देशमुखांनी स्वबळावर कॉंग्रेसने विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात ही मागणी केली आणि एकट्याने लावून धरली आहे, त्यामागे मोठी चाणाक्यबुद्धी आणि ग्रॅण्ड गेम आहे. उद्या शरद पवार सुप्रिया सुळ्यांकडे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व सोपवून निवृत्त झाले किंवा प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणातून बाहेर पडले तर महाराष्ट्रात शरद पवारांची जागा घेणारा नेता म्हणून पुढील 10वर्षे सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी विलासरावांची चतुर व्यूहरचना चालू आहे, यात शंका नाही.
एका नेत्याची दुसऱ्या नेत्याशी बरोबरी एकाने दुसऱ्याला पाठिंबा देऊन होत नाही तर विरोध करूनच होते. राज ठाकरे शिवसेनेत राहून, उद्धवना पाठिंबा देत होते तोवर मोठे झाले नाहीत. ज्या राज ठाकरे यांनी उद्धवजींना कार्याध्यक्ष करावे अशी सूचना शिवसेना अधिवेशनात मांडली तेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहिले आणि बरोबरीचे नेते, पर्यायी नेते झाले. उद्धव ठाकऱ्यांविरुद्ध ते उभे राहिले नसते तर ते "प्रति-सरकार' झाले नसते. शरद पवारांना शह देऊन, आव्हान देऊन विलासराव देशमुख स्वत:ला प्रति-शरद पवार म्हणून एस्टॅब्लिश करीत आहेत आणि पुढल्या दहा वर्षांसाठी महाराष्ट्रात शरद पवारांचे स्थान काबीज करण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला कुणीतरी समर्थ कॉंग्रेस नेत्याने आव्हान देणे आणि वेळ पडली तर स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करणे ही काळाची गरज एवढ्याकरता आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आर.आर.पाटील, गुरुनाथ कुलकर्णी अशी काही मंडळी कॉंग्रेसला वारंवार "बिहेव्ह युवरसेल्फ' "मित्रपक्षाचा धर्म पाळा', "आम्हाला पर्याय आहेत' अशी भाषा करीत असतात. यामुळे राष्ट्रवादीला आघाडीची गरज नाही. मात्र कॉंगे्रस लाचारीने, मजबुरीने, शरण जाऊन राष्ट्रवादी सोबतची आघाडी टिकऊ पहात आहे, असा बदनामीकारक मेसेज समाजात जातो. कॉंग्रेसचे महाराष्ट्रभरचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकीय टगेगिरी आणि दबावतंत्रापुढे हतबल होत "डिमॉरलाईज' होतात. इकडे राष्ट्रवादीची केंद्र-राज्यात कॉंग्रेसशी आघाडी असताना पुण्यापासून पनवेलपर्यंत अनेक महापालिका, पालिका, जिल्हा परिषदात राष्ट्रवादीच्या स्थानिक शाखा बिनदिक्कतपणे शिवसेना-भाजपा या कॉंगे्रसच्या शत्रूपक्षांशी हातमिळवणी करून मोकळ्या होतात आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली तर ते स्थानिक पातळीवरील तडजोडींशी आमचा संबंध नाही, असा सोयीस्कर विश्र्वामित्री पवित्रा घेतात. मधल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेशी युती झालीच आणि कॉंगे्रस एकाकी पडलीच असे वातावरण निर्माण करून कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंग हे यु.पी.ए.चे नव्हे तर कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे म्हणण्यापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कॉंग्रेसकडूनही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो या मुद्याचा दबाव ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्यावेळी नियंत्रणात ठेवणे ही कॉंग्रेसची गरज आहे. पक्षश्रेष्ठींना हे ठाऊक आहे. म्हणून सोनिया गांधींची भेट घेऊन आल्यानंतरही विलासरावांनी स्वबळावर लढण्याची भाषा बंद केली नाही. हा प्रश्र्न खुला आहे पण पक्षश्रेष्ठींनी ठरवायचे आहे, असे म्हणून राष्ट्रवादीपुढे गाजर आणि चाबूक दोन्ही टांगण्यात विलासराव यशस्वी झालेत. कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला विलासरावांची स्वबळाची भाषा आवडते आहे, कारण त्याला राष्ट्रवादीवाले कॉंग्रेसजनांना मतदानात ताक घुसळायला लावून स्वत: सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकवतील अशी भीती वाटते. तात्पर्य विलासराव जे करीत आहेत त्यामागे मास्टर प्लॅन आहे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment