Tuesday, July 14, 2009

शिवसेनाप्रमुख आले घरा
धन्य झाला "मातोश्री'चा देव्हारा
शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट, शिवसैनिकांचे परमेश्र्वर, महाराष्ट्राचे पंचप्राण, मराठी माणसाचे श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे यांना लिलावती इस्पितळात दाखल केल्याची बातमी आल्यापासून सर्वत्र एक बेचैनी, अस्वस्थता, काळजी, घोर, हुरहुर जाणवत होती. शिवसेनाप्रमुख सुखरुप "मातोश्री'वर परतल्याच्या बातमीने साऱ्या महाराष्ट्राने सुटकेचा नि:श्र्वास सोडला. शिवसेनाप्रमुख व्हीलचेअरवर बसून नव्हे तर चालत "मातोश्री'वर आले ते दृश्य पाहताना ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत असा मराठी माणूस नसेल. बाळासाहेबांच्या रुपाने मराठी माणसाचे आराध्य दैवत "मातोश्री'च्या देव्हाऱ्यात परतले याचा आनंद, हर्ष, संतोष, सुख, समाधान, आल्हाद, उल्हास, जल्लोश, प्रसन्नता ही मराठी माणूस म्हणून जन्माला आल्याशिवाय कळणार नाही.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत नवे
एकच प्रार्थना-शतायुषी व्हावे
मा.बाळासाहेबांकडे मराठी माणूस कुटुंबप्रमुख म्हणून पाहतो. सारी मराठी माणसे त्यांचा परिवार आहे. नातेवाईक, सोयरे, स्वजन, गणगोत आहे. मा.बाळासाहेब आजारी आहेत हे कळल्यापासून प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडी एकच प्रार्थना देवाला उद्देशून होती-माझ्या आयुष्यातील 5-10 वर्षे काढून ती बाळासाहेबांना दे, त्यांना शतायुषीच फक्त नव्हे तर चिरंजीव कर, सप्त चिरंजीवानंतरचा आठवा चिरंजीव कर आणि महाराष्ट्राचा हा तेजस्वी, मनस्वी महापुरुष अमर कर. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब म्हणजे साक्षात परब्रह्म, आदिपुरुष, ॐकार, विराट पुरुष, महातेज, सर्वेश्र्वर, सर्वसाक्षी, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी ईश्र्वर आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या हक्कासाठीच्या लढ्याचा महाराष्ट्रात श्रीगणेशा केला. मराठी बाणा जागवून एका चळवळीचा प्रारंभ केला. मराठी माणसाने त्यांच्या नेतृत्वाखाली घराचा उंबरठा ओलांडून रस्त्यावर उभे राहून आवाज दिला. बाळासाहेबांनी पेरलेला शिवसेनेचा अंकूर आज एक वटवृक्ष होऊन बहरला आहे.
शिवरायांचा गनिमी कावा
बाळासाहेबांनाच पुरता ठावा

छत्रपती शिवरायांनंतर साडेतीनशे वर्षांनी मा.बाळासाहेबांनी पुन्हा एकदा स्वराज्याचे तोरण महाराष्ट्रात बांधले. मराठी संस्कृतीच्या पुनरुथ्थानाचा नारळ फोडला. मराठीचा झेंडा अटकेपार नेणाऱ्या मोहीमेसाठी प्रस्थान ठेवले. भगव्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेची गळचेपी रोखली. मराठी राजकारणातली कोंडी फोडली. भगव्या ज्वाला उफाळत रोंरावणाऱ्या वणव्याची पहिली ठिणगी टाकली. मराठी माणसाला मराठी बाण्याची दीक्षा दिली. मराठी माणसाला महाराष्ट्राच्या नकाशावर आपला ठसा कसा उमटवायचा हे बाळासाहेबांनी शिकवले. मराठी माणसाला संकल्प दिला. प्रकल्प दिला. कार्यक्रम दिला. उपक्रम दिला. प्रयोग दिला. प्रयत्न दिला. महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा दिला. महाराष्ट्र धर्माची मांडणी केली. महाराष्ट्राच्या प्रगतीची आखणी केली. मराठी माणसाच्या हक्कांची सनद बाळासाहेबांनी मराठी माणसाला दिली. मराठी माणसाला शिवछत्रपतींच्या "गनिमी काव्या'ची आठवण आणि शिकवण दिली.
बाळासाहेबांनी दिली धमक
शिवसेनेने दिली चमक

मा.बाळासाहेब ठाकरे यांनी वैभवाचे, सत्तेचे, प्रतिष्ठेचे, श्रीमंतीचे, उत्कर्षाचे, भरभराटीचे, राजलक्ष्मीचे स्वप्न मराठी माणसाने बघण्यात गैर नाही, किंबहुना बघीतले पाहिजे हे ठणकावून सांगितले आणि "पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी' या परंपरागत दरिद्री मनोवृत्तीतून बाहेर काढले. ईश्र्वरावर विश्र्वास ठेवताना प्रयत्नात कसूर करू नका हे बजावले. मराठी तरुणाला शिवसेनेचा शिंपला देऊन तेजस्वी मोत्यासारखी प्रभा दिली. चैतन्य दिले. जोम दिला. जोश दिला. पाणीदारपणा दिला. स्फूर्ती दिली. प्रेरणा दिली. पुरुषार्थ दिला. धमक दिली. चमक दिली. अवसान दिले. अमराठी माणसांच्या उद्धटपणाला, उर्मटपणाला, चढेलपणाला, दांडगाईला, आगळिकीला, अनादराला आव्हान देऊन कानाखाली आवाज काढण्याची हिंमत दिली. शिवसेनेमुळे महाराष्ट्रधर्माची महाराष्ट्र पुनर्स्थापना झाली.
मराठी माणसांची होती दुर्दशा
बाळासाहेबांनी दिली दिशा

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनातली उदासीनता, खिन्नता, नैराश्य, मरगळ, निरुत्साह, अनास्था, बेपर्वाई, बेफिकीरपणा, थंडपणा, तटस्थपणा, चालढकल वृत्ती आपल्या शब्दांच्या अंगाराने भस्म करून टाकली. मा.बाळासाहेबांनी मराठी माणसांविरुद्धची अमराठी आणि मुस्लीम धार्जीण्या विचाराच्या व्यक्ती-शक्ती-पक्ष-संघटना यांची कटकारस्थाने, खलबते, राजकारण, व्युहरचना, षड्‌यंत्र, बनाव, योजना, कावा, डाव, संगनमत, उधळून लावीत मराठी माणसांची एकजूट बांधली. मराठी माणसांना बाळासाहेबांनी व्यवसाय, धंदा, उद्योग, व्यापार, स्वयंरोजगार, गृहोद्योग, उदयमशीलता, मेहनत, कष्ट, खटाटोप, दीर्घोद्योग यातून स्वत:चा उत्कर्ष, प्रगती, उन्नती, भरभराट, विकास, भाग्योदय करून घेण्याचे व्रत दिले. संधी दिली. पाठिंबा दिला. समर्थन दिले. दिशा दिली.
"ठाकरी' भाषेचा अविष्कार
जणू तळपती तलवार
मा.बाळासाहेब ठाकरे म्हणजे उत्तम वक्ते, अत्युत्तम व्यंगचित्रकार, सर्वोत्तम नेते, सर्वोत्कृष्ठ संघटक, दर्जेदार संपादक, अव्वल दर्जाचे टीम लीडर, श्रेष्ठ राजकीय व्युहरचनाकार! मा.बाळासाहेबांच्या वाणी आणि लेखणीने निगरगट्ट, निर्ढावलेल्या, निर्लज्ज, बेरड, कोडग्या सरकारची वेळोवेळी अक्षरश: लक्तरे लोंबिवली. "ठाकरी भाषा' हा एक नवा साहित्यिक अलंकार मा.बाळासाहेबांमुळे मराठीला मिळाला. बाळासाहेबांच्या भाषणातले वाक्यांचे चौकार, षटकार यांनी अनेक नेत्यांना सीमापार टोलवले. एखाद्याची टर उडवून, चेष्टा, नक्कल करून फजिती करावी तर ती बाळासाहेबांनीच. उपरोध, उपहास, थट्टा करून विरोधकांचे वस्त्रहरण करणारे व्यासपीठावरील बाळासाहेब म्हणजे हंशा आणि टाळ्यांच्या उफाळणाऱ्या भरतीच्या लाटांनी गर्जणारा जणू महासागरच!
"महाराष्ट्र धर्मा'साठी संघटना
बाळासाहेबांची शिवसेना

मा.बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रुपाने मराठी आणि हिंदू माणसांना एक भक्कम, मजबूत, अचल, अभेद्य, अजिंक्य, दुर्गम, सुरक्षित असा किल्ला उपलब्ध करून दिला. मा.बाळासाहेबांइतका पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. रोखठोक, स्पष्टपणे, मनात जे असेल ते बाळासाहेब ठणकावून बोलतात. मग विरोधकांपैकी कोण काय म्हणेल, कोण काय विपरीत अर्थ काढून गहजब करील याची ते पर्वा करीत नाहीत. मा.बाळासाहेब म्हणजे प्रबोधनकारांचा प्रगल्भ वारसा. परिणामांची चिंता न करता ठामपणे वागणारा निश्र्चयी नेता. बाळासाहेब म्हणजे ढाण्या वाघाची जबर आक्रमकता. दिल्या शब्दाला शंभर टक्के जागणारे नेतृत्व. बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा श्र्वास. ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मराठी माणसांच्या न्याय्य, हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना. "मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या चळवळीचे संघटनात्मक मूर्त रूप म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना.
मराठी माणसासाठी कवचकुंडले
शिवसेनारुपे महाराष्ट्रा दिले
मा.बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ती मराठी माणसाने मराठी माणसाला पाण्यात न पाहता मदत करावी आणि परस्पर उत्कर्ष साधावा यासाठी. मराठी माणसाने आपल्या जागा परप्रांतीयांना विकू नयेत हा बाळासाहेबांचा विचार जर मराठी माणसाने वेळीच शिरोधार्य मानून दादर-गिरगाव-परळमधील जागा विकून मिरा-भाईंदर, डोंबिवली-बदलापूरचा रस्ता धरला नसता तर आज मुंबईतला मराठी माणसाचा टक्का चिंता वाटावी इतका घटला नसता. मराठी अधिकाऱ्यांनी मराठी तरुणांनाच नोकऱ्या द्याव्यात आणि 80 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांसाठी राखून ठेवाव्यात ही मागणी आज महत्त्वाची ठरली आहे, सर्व पक्ष तिच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेत. पण ही मागणी देशात प्रथम केली ती बाळासाहेबांनी. मा.बाळासाहेबांनी मराठी माणसाची नाडी अचूक ओळखली आणि म्हणूनच शिवसेना मराठी मनात सर्वत्र रुजली, वाढली आणि मराठी मनाशी शिवसेना कायमची जोडली गेली.
बाळासाहेब जणू ध्रुवतारा
महाराष्ट्राचा भाग्यतारा
मा.बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हक्कांची जणू सनदच दिली. 80 टक्के नोकऱ्या मराठी माणसांसाठी राखून ठेवाव्यात, जमीन लिलावात अग्रहक्क मराठी माणसाला असावा, म्हाडा-हाऊसिंग बोर्डात 80 टक्के गाळे केवळ 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्यांसाठी नव्हे तर जन्माने मराठी मातृभाषा असलेल्यांसाठी राखून ठेवावेत, महाराष्ट्र शासनात अधिकारांच्या जागांवर मराठी अधिकारी असावेत, परप्रांतीय, बांगलादेशी गुंड, भिकारी, बेकार यांना महाराष्ट्राबाहेर हद्दपार करावे, परप्रांतीय झोपडपट्टी वासियांना पुनर्वसनात स्थान देऊ नये, उपऱ्यांना नव्या झोपड्या बांधायला देऊ नयेत, बांधल्या तर तोडाव्या आणि उपऱ्यांना मदत केल्याबद्दल पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, फुटपाथवरील विक्रेत्यांचे परवाने फक्त मराठी तरुणांनाच द्यावेत या सर्व मागण्या म्हणजे मराठी माणसांच्या हितरक्षणाची सनद ठरली. शिवसेनेने सत्तेत आणि सत्तेबाहेर असतानाही या मागण्यांचा सर्व शक्तीनिशी पाठपुरावा केला.
गर्वसे कहो, हम हिंदू है
बाळासाहेब हमारे मानबिंदू है

शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे "मातोश्री'च्या देव्हाऱ्यात सुखरुप परतल्यामुळे केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला आनंद झाला आहे. जागृत देवस्थानासारखी बाळासाहेबांची चैतन्यस्वरूप मूर्ती आता साक्षात प्रत्यक्ष तिथे प्रत्येक मराठी भक्ताला दिसणार, भेटणार आहे. "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या लो.टिळकांच्या सिंहगर्जनेनंतर अखिल हिंदुस्थानात दुमदुमली ती बाळासाहेबांनी दिलेली "गर्व से कहो, हम हिंदू हैं' ही घोषणा! मराठी मनाच्या, मराठी कण्याच्या, मराठी बाण्याच्या या महापुरुषाला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो आणि मा.बाळासाहेबांचे कृपाछत्र महाराष्ट्रावर अखंड राहो हिच परमेश्र्वरचरणी प्रार्थना!

No comments:

Post a Comment