Friday, July 24, 2009

स्वयंसेवी संस्थांचे "इमेज मार्केटींग' दानापासून अनुदानापर्यंत कसे करावे?

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
स्वयंसेवी संस्थांचे "इमेज मार्केटींग' दानापासून अनुदानापर्यंत कसे करावे?
समाजातील सधन व्यक्तींच्या संख्येत सतत वाढ होते आहे. फाईव्ह स्टार हॉटेल्स भरून वहात आहेत. शॉपिंग मॉल्सपासून ब्रॅण्डेड ज्वेलर्सपर्यंत पैसे उडविणाऱ्यांची झुंबड गर्दी उडालेली दिसते आहे. बंगले, अलीशान गाड्या, फार्म हाऊसेस, सर्वत्र वैभवाची रेकॉर्डब्रेक दर्शने-प्रदर्शने होताना दिसत आहेत. कोट्यवधी रुपये लग्न समारंभ, बर्थ डे पार्ट्यांवर खर्च केले जात आहेत. एकीकडे संपत्ती आणि साधनांचा असा महापूर आलेला असताना एन.जी.ओ.म्हणजे स्वयंसेवी संस्थांना मात्र दात्यांचा दुष्काळ का भेडसावतो आहे? शासकीय अनुदाना व्यतिरिक्त धनिकांच्या दानाचा लाभ स्वयंसेवी संस्थांना का होत नाही? एन.जी.ओ.स्वयंसेवी संस्था आपल्या सेवाकार्याची "इमेज' मॅनेजमेंट करून आपल्या "प्रोजेक्ट'चे "प्रॉडक्ट'मध्ये रुपांतर करून त्याचे "सेलेबल कमोडीटी' सारखे आकर्षक "पॅकेजिंग' करून हाय इन्कम सोसायटीत "मार्केटींग' करू शकत नाहीत का? की करीत नाहीत? की केले पाहिजे हे त्यांना समजत नाही? की कसे करावे हे उमगत नाही? की एन.जी.ओ.स्वयंसेवी संस्थांनी तुटपुंज्या, अपुऱ्या साधनात कार्य करण्यात त्यांना भ्रामक धन्यता वाटते? की स्वत: उपाशी राहिल्याशिवाय उपाशी लोकांची आणि स्वत: दळभद्री राहिल्याशिवाय दरिद्री लोकांची सेवा प्रामाणिकपणे करता येत नाही या गैरसमजुतीत ते भारतीय समाजसेवकांच्या परंपरेमुळे आजही आहेत? आपण सधन असू आणि आपल्या हाताशी साधने असतील तर आपण अधिक सक्षमतेने, कौशल्याने, प्रोफेशनली इफेक्टीव्ह ऍडमिनीस्ट्रेटीव्ह सेटअप्‌ उभारून अन्याय, शोषण, अत्याचार, पीडा, दारिद्रय, आजार, अनारोग्य, अशिक्षितपणा, बेरोजगारी, अज्ञान यांनी ग्रासलेल्या तळागाळातल्या समाजाला अधिक समर्थपणे उपयोगी पडू शकू हे या स्वयंसेवी संस्थांना पटलेले नाही का?
साधने ही संपत्तीच्या माध्यमातून संस्थांना मिळू शकतात पण संपत्ती संस्थांना दात्याकडूनच प्राप्त होते. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो तिचा भोग-उपभोग, मुक्त-मनसोक्त पद्धतीने घेत असतो, त्यातच त्याला त्याच्या संपत्तीचे सार्थक आणि भोागच्या परमावधीत पुरुषार्थाची परिसीमा वाटत असते. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी त्याला फक्त काम आणि अर्थ यात अर्थ आणि स्वार्थ आढळत असतो. हे सर्व काही माझे एकट्याचे आहे, माझ्या उपभोगासाठी आणि मला अधिक सधन करण्यासाठी आहे या भूमिकेत तो असतो. जे पीडित, वंचित, दु:खी, दरिद्री, अज्ञानी, अशिक्षित आहेत ते त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापाची किंवा या जन्मीच्या कर्माची फळं भोगत आहेत आणि तेच तसेच जीणे जगण्याची त्यांची लायकी आहे, असे त्या "सधन' माणसाचे मत असते. त्यामुळे आपण समाजाचे देणे किंवा या वंचितांचे काही करणे लागतो असे त्याला बिलकुल वाटत नाही.
तो "भीक' घालून "ड्राईव्ह इन' पद्धतीने "पुण्या'चे "रिफील' करून जातो पण भीक आणि दान यातला फरक त्याला कळत नाही आणि स्वयंसेवी संस्था तो कधी प्रबोधन करून त्याला सांगत नाहीत. भीक म्हणजे भिकाऱ्याला जन्मभर भीक मागत राहण्यासाठी उत्तेजन आहे तर, दान करणे म्हणजे भिकाऱ्याला भीक मागणे थांबवून स्वावलंबी होण्याची संधी देणे आहे. हे स्वयंसेवी संस्था सांगत नाहीत. त्यामुळे मुंबईत रोज भीक म्हणून 3 कोटी रुपये हजारो भिकाऱ्यांमध्ये वाटले जातात पण, स्वयंसेवी संस्थांची काही हजार-लाख वर्षाकाठी मिळवताना दमछाक होते.
"भीके'चा उगम उपभोगातून येणाऱ्या अपराधी भावनेतून होतो तर दानाचा उदय सद्‌भावना, सहभावना, सहयोग, सहकार्य, सहवेदना, सहानुभूती सहजीवनाच्या भावनाशील भूमिकेच्या कृतीशीलतेतून होतो आणि म्हणूनच भीक म्हणजे वाऱ्यावर विखुरलेले तण आहे तर दान म्हणजे मनाची मशागत करून सधन लोक पैसे मागणाऱ्याला भिकारी समजतात. कारण त्यांच्याकडे धनाची श्रीमंती असली तर मनाची श्रीमंती नसते. भिकारी हा लाचारीतून पैसे मागत असतो तर एन.जी.ओ.कर्तबगारीतून धनरुपाने बीज भांडवल मागत असतो. निसर्गात परागीभवनाचा सिद्धांत मूलभूत आहे. या फुलातल्या पुंकेसरांचे परागीभवन दुसऱ्या फुलातल्या स्त्री केसराशी होऊन दोन्ही फुले फुलतात आणि बाग बहरते. स्वयंसेवी संस्थांसाठी दान हे एक प्रकारचे सामाजिक समृद्धीचे परागीभवन आहे. यानेच समाजाची बाग बहराला येणार आहे. जो देतो तोही काही घेतो ही प्रक्रिया फक्त दानात घडते. तो धन देतो आणि ज्याला देतो त्याचे मन घेतो. यापेक्षा आणखी मिळवायचे ते काय?
मधमाशा हजारो फुलांवर फिरतात. बसतात. त्या फुलांमधला मध गोळा करतात पण त्याचवेळी त्यांच्या पायाला परागकण लागून इतर फुलांमध्ये संयोग होऊन फळे साकारतात. म्हणजे मधमाशांच्या "मध' घेण्यातही ज्याच्याकडून मध घेतला त्या फुलांना जीवन देणे आहे. स्वयंसेवी संस्था या मधमाशांच्या भूमिकेतून समाजात स्वत:साठी "मधुसंचय' करता करता मनांमध्ये "जीवना'ची स्पंदने जागवीत असतात.
सधन माणसांच्या मनातली सहृदयता जागविण्यासाठी कोणते आवाहन करायला हवे? याचा विचार स्वयंसेवी संस्था करतात का? सधन माणसाला अपराधी, दोषी ठरवून, दोषारोप, टीका करून त्याला दानासाठी प्रवृत्त करता येणार नाही. तो तशा टीकेमुळे आणखी दुरावेल. दुखावेल. सूड भावना जागेल. कटूता वाढेल. तो प्रतिटीका, प्रतिहल्ला, प्रत्यारोप करून आपल्याबद्दल हेवा, मत्सर, द्वेष आणि यशाबद्दल, संपत्तीबददल दुस्वास वाटतो म्हणून तुम्ही आरोप करता म्हणेल. दोष दिल्याने फक्त रोषच वाट्याला येतो. वाईट बोलून चांगले घडत नाही.
"सधन' माणसाला स्वयंसेवी संस्थेसाठी दान करायला प्रवृत्त करायचे असेल तर सर्वप्रथम त्याचा द्वेष करणे कार्यकर्त्यांनी सोडून दिले पाहिजे. श्रीमंतीचा द्वेष करून श्रीमंत होता येत नाही त्याचप्रमाणे श्रीमंतांचा द्वेष करून श्रीमंतांचा सहयोग मिळवता येत नाही. त्यांनी तुमच्यावर प्रेम, स्नेह, आत्मीयता, आपुलकी या भावनांचा वर्षाव करायला हवा असेल तर आधी प्रथम तुम्ही तुमच्याकडून त्यांना या भावनांचा अनुभव दिला पाहिजे.
तुम्ही कोण आहात हे जोपर्यंत या सधन माणसाला कळत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी का आणि काय करायचे हे त्याला समजत नाही. प्रत्येकाच्या हृदयात एक राम आणि एक रावण असतो. तुम्ही द्वेष करण्याच्या नादात रावणाचे नाव घ्याल तर रामायणातल्या वानरसेनेप्रमाणे तुमची गत होईल. तुम्ही रामनाम घ्याल तर तुमच्या कार्यात "रामावतार' होईल. डोंगरात "एको पॉईंट'वर जशी तुम्ही घालाल तिच हाक प्रतिध्वनी होऊन येते तशी तुम्ही "सधन' माणसाला जशी हाक घालाल तसा "प्रतिध्वनी' येईल. आंबा झाडावर तयार होतो पण तो पिकतो इतर आंब्यांसोबत गवत अंथरून घातलेल्या आढीमध्ये. तसे "सधन' माणसाच्या मनाचे आंबे समाजाच्या आढीत घालून पिकवले की ते रसाळ मधुर होतात. म्हणून आंबे आपोआप झाडावर पिकण्याची वाट न पाहता काढून आढी लावायची असते.
सधन माणसांच्या मनातला देव जागा करणं ही माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण माणसातला माणूस जागा करणं ही गोष्ट माणसाला शक्य आहे. आपल्याला आपल्या साधन-संपत्तीच्या संकलनासाठी दानाच्या योगदानासाठी माणसांचीच गरज आहे आणि माणसातला माणूस जागवणं म्हणजे माणुसकी जागवणं. माणुसकीची मोठी सुंदर व्याख्या गौतम बुद्धांनी केलेली आहे. मी माझे, मला, ऐवजी आपण, आपले, आपल्याला या भूमिकेत जाणे म्हणजे माणुसकी. इतक्या साध्या सोप्या शब्दात गौतम बुद्ध सांगून गेले आहेत. ज्ञानेश्र्वर "हे विश्र्वची माझे घर, ऐसि मति जयाची स्थिर' त्याला माणुसकी कळली असे म्हणतात. "तुका आकाशाएवढा' म्हणत तुकारामाने अंतरंगातल्या जगलेल्या माणुसकीचा अविष्कार आभाळाएवढा असल्याचे सांगितले. महंमद पैगंबर माणुसकीला त्यांच्या अनुभवातील उपमा देताना सांगतात, माणुसकी म्हणजे वाळवंटात गवसणारा आणि तृष्णार्ताची तहान भागवणारा झरा आहे म्हणतात. भगवान येशू ख्रिस्तांनी माणुसकी-ह्युमॅनरी म्हणजे वृक्षाची सावली आहे असे सांगितले. भगवद्‌गीतेत माणुसकीला युगधर्म, स्वभावधर्म, यापेक्षा श्रेष्ठ असा मनुष्यधर्म मानून पशू आणि माणसातला फरक म्हणजे माणुसकी असा निर्वाळा दिला आहे. गुरुनानक करुणा ही आई तर कर्तव्य हा बाप, त्यांचे अपत्य माणुसकी मनुष्यधर्म मानतात.
सधन माणसाच्या मनात माणुसकी जागवली की तो स्वत:पलीकडे जाऊन बघायला शिकेल आणि त्यावेळी आपण त्याला दिसू अशी काळजी स्वयंसेवी संस्थेने घेतली तर तो त्याच्या करुणेचे पाणी समाज सिंचनासाठी धाडण्यासाठी पाट कॅनॉल म्हणून तुमच्या एन.जी.ओ.चा वापर करू शकेल.
21 व्या शतकातल्या सधन माणसाला समजून घेतल्याशिवाय त्याला "अपील' करता येणार नाही. ख्रिश्र्चन धर्माने तत्कालीन श्रद्धा, अंधश्रद्धांच्या आधारे चर्चकरीता धन संकल्प करण्यासाठी करुणा, कर्तव्यापेक्षाही पापशालन, पापमुक्तीच्या संकल्पनेचा वापर कित्येक शतके केला. एका पोपने तर दानधर्मासाठी वेगवेगळ्या मूल्यांचे "पास' काढून थेट स्वर्गप्राप्तीची तिकीट विक्रीही करून दाखवली. आजच्या भारतीय सधन वर्ग पूर्वीच्या श्रीमंतांप्रमाणे पाप-पुण्य-प्रायश्र्चित्ताच्या संकल्पनांना दाद देणे अवघड आहे. नीती-अनिती कशाही मार्गाने पैसा मिळवा शेवटी तो पैसा आहे आणि बाजारात काळा-गोरा, चांगला-वाईट, कायदेशीर-बेकायदेशीर असे काहीही नसते पैसा हा पैसा असतो. हे त्याने अनुभवलेले असल्यामुळे त्याच्यादृष्टीने "सबसे बडा रुपय्या' असतो. मग काय सांगितले तर त्याला या सबसे बडा झालेल्या रुपय्या पेक्षा "बडे' असे काही आहे आणि ते आपल्याला अजून मिळालेले नाही, असे जाणवेल.
भोगाकडून एकदम त्यागाकडे नेणे शक्य नसते म्हणून अशा सधन माणसाला सहभागासाठी प्रवृत्त करणे हीदेखील मोठी महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे. सधन माणसाला सहभागासाठी प्रवृत्त केल्याशिवाय त्याच्या मनातील सद्‌भावना कृतीत उतरणार नाहीत. मग दानासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगासाठी सधन व्यक्तींना प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी वाद नव्हे तर संवाद प्रस्थापित करावा लागेल. आपल्याला जे सांगायचे आहे तेच त्यांना म्हणायचे होते अशी आत्मप्रचितीची भावना द्यावी लागेल. सधन माणसांना असे वाटले पाहिजे की हे सगळे केव्हातरी आपल्याही सब कॉन्शस माईंडमध्ये आले होते पण ते मनातून जीवनात आले, ना उक्तीतून कृतीत प्रगटले.
त्या सधन माणसाला स्वयंसेवी संस्थेच्या वक्त्या-प्रवक्त्याचे बोलणे ऐकून असे वाटले पाहिजे की, हे कुणी बाहरेचा माणूस नव्हे तर "अरे हा तर माझा आजवर दबून राहिलेला आवाज बोलतो आहे' हा माझ्यातला "मी' जागा होतोय. मीच जणू आज माझ्याशी बोलतोय. "बाहेरूनी आला परी आतलाची झाला, आतमधी होता, बाहेरी असा आला, आतला बाहेरी एकरूप झाला' या समर्थांच्या दासबोधातील प्रत्ययाचा अनुभव आपले बोलणे ऐकताना त्या सधन माणसाला झाला पाहिजे.
स्वयंसेवी संस्थेचा उद्देश स्वत:करता दान मिळवणे एवढाच मर्यादित असेल तर त्याला धंदा कळला पण सार्वजनिक जीवनाचा धर्म कळला नाही, असे खेदाने म्हणण्याची वेळ येईल. आपल्याला धनापलीकडे सधन "माणूस' हा तेवढाच हवा आहे. जर त्याचा सहभाग या सहयोगामागे नसेल तर योगायोगाने मिळालेली देणगी एवढेच त्याचे महत्त्व राहील. पण त्याच्या धनाइतकेच त्याचे मन आपल्याला कार्यात येणे आवश्यक आहे. ही आंतरिक उर्मी जेव्हा स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रबळ ठरेल तेव्हा तन+मन+धन+क्षण = (वेळ) या चारही गोष्टी त्या सधन माणसाकडून मिळतील आणि मग तोही दाता नव्हे तर तुमचा कार्यकर्ता होऊन इतर साधनांसाठी साधन म्हणून तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. स्वयंसेवी संस्थेच्या कार्याचा कस आणि प्रभाव वाढविणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. मतलब साधणे हा मानवी स्वभाव आहे. पण समाजाचा विचार हा शिकावा, शिकवावा लागतो. महात्मा गांधींनी सात बदकर्मे, पापकर्मे सांगितली होती. त्या सात पाप कर्मांपासून समाजाला दूर करणे. मुक्त करणे हे स्वयंसेवी संस्थांचे काम आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात काम करीत असो. सधन व्यक्तींना धार्मिक पापपुण्याच्या कल्पनांपेक्षा महात्मा गांधींनी सांगितलेल्या या सात पापकर्मांपासून परावृत्त होण्यासाठी आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यात प्रवृत्त होण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. कारण या सात पापकर्मातून मुक्ती हाच खऱ्या सुखाचा आणि सार्थक मन:शांतीचा मार्ग आहे हे आपण सधन माणसांना सांगितले तर ते भोगाकडून त्यागाकडे जाण्याच्या मार्गावर निघून सहभागाच्या आणि हविर्भागाच्या (हविर्भाग म्हणजे आहुती यज्ञात टाकतात ती) टप्प्यावर हळूहळू येतील. सधन समाज हा कधीच क्रांती स्विकारीत नाही तर उत्क्रांतीच्या मार्गानेच परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होतो हे लक्षात ठेवायला हवे. त्यांची मन:स्थिती बदल्याखेरीज आपली परिस्थिती त्यांच्या सहकार्याने सुधारणार नाही.
महात्मा गांधींनी सांगितलेली सात पापकर्मे अशी-
1) तत्वहीन राजकारण- झेश्रळींळली थळींर्हेीीं झीळपलळश्रिशी
2) नीतिमत्तारहित व्यापार- उेााशीलश थळींर्हेीीं ोीरश्रळींू
3) कष्टविना संपत्ती- थशरश्रींह थळींर्हेीीं थेीज्ञ
4) चारित्र्यविना शिक्षण- एर्वीलरींळेप थळींर्हेीीं उहरीरलींशी
5) मानवतेविना विज्ञान- डलळशपलश थळींर्हेीीं र्कीारपळींू
6) विवेकहीन सुखोपभोग- झश्रशर्रीीीश थळींर्हेीीं उेपीलळशपलश
7) त्यागरहित भक्ती- थेीीहळि थळींर्हेीीं डरलीळषळलश
अभिलाषापूर्तीच्या हव्यासातून घडणाऱ्या या सात पापकर्मा-बदकर्मांपलीकडे सत्कर्माचे म्हणूनही काही सुख, आनंद आणि समाधान, मन:शांती आहे आणि ती देणारी माध्यम म्हणजे आमची स्वयंसेवी संस्था आहे. हे पटवून दिले तर सधन माणसे भोगाकडून सहभागाकडे यायला तयार होतील. प्रथम साक्षीदार आणि मग त्या कार्यातले साथीदार होतील.

No comments:

Post a Comment