Friday, July 24, 2009

खाकी वर्दीतील "माणूस'"पालक'"शिक्षक'विश्र्वासराव नांगरे पाटील "देशरक्षक'!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
खाकी वर्दीतील "माणूस'"पालक'"शिक्षक'विश्र्वासराव नांगरे पाटील "देशरक्षक'!
दोन दिवसांपूर्वी आम्ही ऑन लाईन ऍडमिशन्सच्या प्रश्र्नावर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा घेऊन गेलो होतो. महाराष्ट्र शासनाने ज्या पध्दतीने 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशन्सचा विषय हाताळला आहे, त्यामुळे विद्यार्थी प्रक्षुब्ध आहेत. पालक संतप्त आहेत.आम्ही चार्नीरोडच्या शिक्षण खात्याच्या कार्यालयापाशी समूहाने पोहचलो तेव्हा वातावरण तापलेले होते. काहीही घडू शकेल अशी स्थिती होती. नेहमीप्रमाणे विद्यार्थी-पालक भेटायला येत आहेत म्हटल्यावर महत्त्वाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पळ काढला होता. परिस्थिती स्फोटक आणि नाजुक, संवेदनाशील होती. कोणतीही चळवळ एक लढाई समजून त्यात उतरायचे हा आमचा स्वभाव आहे. आमजनतेच्या सोबत त्यांच्या प्रश्नांसाठी वेळ आली तर प्राणांचीही पर्वा करायची नाही हा आमचा बाणा आहे."तन,मन,धन, प्राण, क्षण,असेे सर्व काही समर्पित करून युध्दात उतरणाऱ्या सेनापतीवरच त्याचे सैन्य विश्र्वास ठेवून आपल्याही प्राणांची बाजी लावते' हे महात्मा गांधींचे वचन आम्ही मार्गदर्शक सूत्र मानतो. आज मराठा महासंघ, अभिजीत राणे फाऊंडेशन आणि मुंबई मित्र-वृत्त मित्र वृत्तपत्र समूह यांच्याकडे मुंबईतला ऑन लाईन 11वी ऍडमिशन विरोधातील चळवळीचे नेतृत्व आले आहे.कारण आमच्या बांधीलकीची विद्यार्थी पालकांना खात्री आहे. इतर राजकीय नेते 11 वीच्या पालक-विद्यार्थी यांच्याऐवजी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना, ज्यांचा 11 वीशी तर सोडाच पण महाविद्यालयांशी, शिक्षणाशी देखील काही संबंध नाही, घेऊन "स्टंट' आणि "शोबाजी' करत असताना हजारो विद्यार्थी- पालक आमचे नेतृत्व स्वीकारून झुंजीत उतरतात हा विश्वास जपण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.
प्रक्षुब्ध विद्यार्थी आणि संतप्त पालक यांचा एवढा मोठा जमाव घेऊन आम्ही शिक्षण खात्याच्या इमारतीवर "बेधडक देधडक' पोहोचलो आणि तडक आणि कडक कारवाईसाठी शंखनाद केला. साधारणत: जमावाने असे उग्ररूप धारण केले की पोलिसांची एकच भूमिका असते लाठीमार, अश्रुधूर करून जमावाला बेदम मारझोड करीत पिटाळून लावायचे. मोर्चातील नेत्यांना अटक करून "मॉब' ला"लिडरलेस' करायचे. पुन्हा असा मोर्चा काढायची हिंमतच होणार नाही अशी दहशत पोलिसी बळावर निर्माण करायची. पण यावेळी आम्हाला आणि आमच्या सहकाऱ्यांना अगदी वेगळा अनुभव आला. आजवर आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. मेट्रो रेल्वे सारख्या उग्र, गंभीर आंदोलनामुळे तर आमच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. एस.आर.ए. स्कीममध्ये भाडेकरूंची फसवणुक-शोषण-अन्याय करणाऱ्या अनेक मस्तवाल बिल्डर्सचा माज आम्ही आमच्या मुंबई मित्र-वृत्तमित्र या दोन तोफातून उतरवल्यामुळे पोलिसांनी आम्हाला विशेष संरक्षण दिले आहे.
संघर्ष आम्हाला नवीन नाही, "आल अंगावर तर घेऊ शिंगावर' ही आमची जीवनशैली आहे. आमचे अनुयायी जेंव्हा आमची ढाल होऊन पुढे उभे राहतात तेव्हा नेत्याने तलवार होऊन वार करायचे असतात हे सूत्र आम्ही मानतो. त्यामुळे शिक्षण खात्यावरच्या मोर्चात काहीही घडू शकते याची मानसिक तयारी आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी केली होती. प्रसंगी जेेलमध्ये देखील जाण्याची तयारी होती. 11 वीच्या ऑनलाईन ऍडमिशनमधील गोंधळामुळे 10-15 लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे आम्ही चिंताक्रांत होतो. व्यथित होतो. संतप्त होता. तप्त होतो. विद्यार्थी-पालकही काय व्हायचे ते होईल पण आज धडा शिकवून इथून निघू अशा तयारीत होते. ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी तोंड लपवून पळून गेल्याचे कळल्यानंतर तर हा उद्रक अनावर झाला होता. शिवसेना स्टाईल,मनसे स्टाईल या दोन स्टाईल सध्या आंदोलनात प्रसिध्द आहेत. आम्ही "अभिजीत राणे स्टाईल' ही तिसरी आंदोलनाची स्टाईल दाखवून देण्याच्या तयारीत होतो.
पण एक चमत्कार घडला. अघटीत घडले. अनपेक्षित घडले. सुखद आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईचे नामवंत वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्र्वासराव नांगरे पाटील यांनी "पोलीस' म्हणून नव्हे तर एक "माणूस' ही परिस्थिती हाताळली. विश्र्वासराव नांगरे पाटील हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त पोलीस अधिकारी म्हणून उपस्थित असले तरी त्यांच्यामधला "पालक' जागा होता. त्यांना कळत होते की या हजारो मुलांवर अन्याय झाला आहे. त्यांना ठाऊक होते की 11 वी ऑनलाईन ऍडमिशनच्या घोळामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा संताप समजून येत होता. राग साहजिक वाटत होता. विद्यार्थी-पालकांमधील हा असंतोष कारवाईचे तेल ओतून अधिक भडकण्याची ही वेळ नाही हे ते ओळखून होते. त्यांची सहानुभूती विद्यार्थी पालकांसोबत होती. "साप भी मरे और लाठी भी-ना तुटे' असा मार्ग विश्वासरावांनी शोधून काढला आणि विद्यार्थी-पालकांना न्याय दिला.
मराठा महासंघ, अभिजीत राणे युथ फोऊंडेशन, मुंबई मित्र- वृत्तमित्र यांच्यावतीने महाराष्ट्रातील 10 लाख 11 वीच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळ शिक्षण खात्याचे अधिकारी एन.बी. चव्हाण यांना भेटले.शिक्षण खात्याच्या चुकांचे माप या शिष्टमंडळाने त्यांच्या पदरात घातले. विद्याथ्यार्र्ंच्या होणाऱ्या अतोनात नुकसानीची तपशीलवार उदाहरणे आणि पुराव्यांसहित माहिती दिली. आम्ही दिलेले तपशील इतके बालके , निर्विवाह होते की चूक कबूल करण्यावाचून अधिकाऱ्यांना गत्यंतरच नव्हते. अर्थात चुका कबूल करून घेण्यावर आमचे समाधान होणे शक्यच नव्हते. आम्हाला ऑनलाईन ऍडमिशनला थेट महाविद्यालयीन प्रवेशाचा पर्याय मान्य करून घ्यायचा होता. पहिली ऑनलाईन यादी प्रसिध्द झाल्यावरही 70 हजार मुले त्यानुसार मिळालेले प्रवेश स्वीकारत नाहीत यावरून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे फसली आहेे हे स्पष्ट होत नाही का? या आमच्या खड्या प्रश्र्नावर शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते.
ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी प्रसिध्द झाल्यावर आणि त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे नाकारल्यावर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्य प्रवेशाच्या हमीचे काय करणार? याही प्रश्र्नाला त्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. 10 वीच्या विद्यार्थ्यांना ए.टी.के.टी दिल्यामुळे आणखी जे दीड-दोन लाख विद्यार्थी प्रवेशासाठी येणार त्यांना प्रवेश कुठे आणि कसा देणार? याही प्रश्र्नावर अधिकारी निरुत्तर झाले. अखेर आम्ही शिक्षण खात्याला "जुलाब इशारा' दिला. 72 तासात ऑनलाईन ऍडमिशनचा गोंधळ संपुष्टात आणून सर्व अगदी एकूण एक 11 वीत प्रवेश घेेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला जर हव्या त्या आभ्यसक्रमात आणि सोयीस्कर कॉलेजात प्रवेश मिळाला नाही. तर होणाऱ्या परिणामांची आणि आंदोलनांची जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि शिक्षण खात्यावर राहील असा "कडक - तडक-भडक' कारवाईचा इशारा दिला. 72 तास महाराष्ट्र शासनाला आम्ही दिले आहेत. आता विद्यार्थी-पालकांच्या सहनशक्तीचा अंत होत आला आहे.
या सर्व घटनाचक्रात आम्हाला जेष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्र्वासराव नांगरे पाटील यांची भूमिका स्वागतार्ह आणि कार्यपध्दती गौरवास्पद वाटली. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी"वज्रादपि कठोराणी' होेऊन बाजी प्रभू देशपांड्यांच्या बाण्याने एकाकीपणाने "ताज' ची खिंड लढविण्याबद्दल जगात नाव झालेले विश्र्वासराव नांगरे पाटील यांचे एक "मृदूनि कुसुमादपि' असे समंजस, संयमी, सहकार्यशील "पालका'चे किंबहुना "शिक्षकां'चे रूप आम्हाला या निमित्ताने पहायला मिळाले. "पोलीस हा जनतेला मित्र वाटला पाहिजे' असे म्हटले जाते. विश्र्वासराव नांगरे पाटलांचा पोलीस आम्हाला पालक-शिक्षक देखील वाटला याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी युवक "पब्लिक' आंदोलनाबाबत अशी सौहर्दाची, सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे सुचविण्यासाठी आजच्या या अग्र लेखाचा प्रपंच आहे!

No comments:

Post a Comment