Wednesday, July 15, 2009

आरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत!

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
आरोग्य सेवा : सेवाभावापासून बाजारभावापर्यंत!
वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नवागताने पदवीदान समारंभात एक शपथ घ्यायची असते. तिला हिपोकॅ्रटिस ओथ-हिपोक्रॅटिसची शपथ म्हणतात. अडीच हजार वर्षांपूर्वीची ही शपथ आजही या व्यवसायामधील नैतिकता आणि सेवाभावाच्या भूमिकेचे प्रतिक आहे. ही शपथ अशी आहे-मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की माझं आयुष्य मानवतेच्या सेवेत व्यतीत करीन. सद्‌सद्‌विवेक बुद्धीस आणि सभ्यतेस अनुसरून मी माझा व्यवसाय करीन. माझ्या रुग्णाचं आरोग्य हाच माझा प्रमुख विचार असेल. माझ्या रुग्णाने मला सांगितलेली गोपनीय खाजगी माहिती मी पूर्णपणे गुप्त ठेवीन. गर्भावस्थेत असलेल्या रुग्णासह प्रत्येक रुग्णाची मानवी प्रतिष्ठा मी जपेन, मानवी मूल्यांची अवहेलना मी लोभापायी लाभासाठी करणार नाही. रुग्ण सेवेच्या मोबदल्याव्यतिरिक्त अन्य अनैतिक मार्गाने रुग्णाच्या नकळत मी कोणताही आर्थिक व्यवहार करणार नाही.
हिपोक्रॅटिसची ही शपथ जर प्रामाणिकपणे पाळली जात असती तर आज वैद्यकीय व्यवसायाला धंद्याचे स्वरूप आले नसते. आजाराचा बाजार भरला नसता. व्यवहाराची जागा व्यापाराने घेतली नसती. "पैसा मिळवण्यासाठी कोणताही मार्ग अनुचित नाही' या एकविसाव्या शतकातील "गुरुमंत्रा'चा सर्वाधिक दुष्परिणाम आरोग्य सेवांवर झालेला आहे.
रुग्णाचे अनपेक्षितपणे निधन किंवा औषधोपचारांना विलंब अशा कारणांमुळे डॉक्टरांना मारहाण, दवाखाने इस्पितळांची मोडतोड अशा प्रकारांची वाढती संख्या, लोकांच्या मनात आरोग्य व्यवस्थांविषयी जो अविश्र्वास आणि असंतोष धुमसतो आहे त्याच ज्वालामुखीचा हिंसक प्रक्षोभक उद्रेक आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या ज्या प्रतिनिधीक संघटना आहेत. उदा. मेडिकल कौन्सील, मेडिकल असोसिएशन त्यांचा नेहमीचा युक्तिवाद आहे की,"वैद्यकीय व्यवसायातील काही थोड्या डॉक्टरांमुळे संपूर्ण व्यवस्था बदनाम होते.' पण "या थोड्या' डॉक्टरांवर आपणहून किंवा रुग्णांनी तक्रारी केल्यावर या कौन्सील किंवा असोसिएशन्सची कधी कारवाई केली आहे का? उलट अगदीच कायदेशीर कचाट्यात सापडून गुन्ह्याची नोंद होत नाही आणि प्रकरण पोलिसात, कोर्टात जात नाही तोपर्यंत कौन्सील, असोसिएशन "असल्या' डॉक्टरांचीही पाठराखण करून रुग्णावरील अन्यायाऐवजी झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करताना दिसतात.
वैद्यकीय व्यवसायाचा पाया नैतिकता हाच असायला हवा. शिक्षण आणि आरोग्य या दोन व्यवसायातून नैतिकतेचा आग्रह वगळता येणार नाही. वैद्यकीय सेवांमधील भ्रष्टाचार, गैरव्यवहार या व्यवसायाच्या नैतिक अध:पतनाचं प्रतिक आहे. हे अध:पतन रोखण्यासाठी संबंधित डॉक्टरांची इच्छा नाही, संघटना "युनियन' म्हणून फक्त डॉक्टरांच्या हितसंबंधांसाठी कटीबद्ध आहेत तर, कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करणारी शासकीय यंत्रणा अकार्यक्षम आणि संगनमताने या लबाडीत सामील आहे. परिणामी एकेकाळी "फॅमिली डॉक्टर' हा ज्या आरोग्य सेवेचा आधार होता त्यातच डॉक्टर आणि समाज यात वाढता दुरावा निर्माण होतो आहे.
शारीरिक-मानसिक आरोग्य हा "युनो'ने मूलभूत हक्क म्हणून मान्य केला आहे. भारतीय धर्म-संस्कृती-वैद्यक परंपरेत मानसिक संतुष्टी आणि शारीरिक सहनशक्ती याला अपरंपार महत्त्व दिलेले होते. मृत्यूला सामोरे जाण्याचे धैर्य सामान्यातल्या सामान्य माणसातही संस्कारांमधून निर्माण होत होते. वेदना सहन करण्याची शारीरिक शक्ती या मानसिकतेतून विकसित झाली होती. आज मात्र वैद्यकीय व्यवसाय तुम्हाला कितीही वय झाले तरी सुखाने मरुही देत नाही. किंबहुना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्याच 2003 मधील अहवालानुसार संपूर्ण आयुष्यात मिळून एखाद्या व्यक्तीचा औषधोपचारांवर जेवढा खर्च होतो, त्याहून अधिक त्याच्या वृद्धावस्थेतील अटळ अशा मृत्यूपूर्वीच्या शुश्रुषा-औषधोपचारात होतो. शरपंजरी शांतपणे पहुडणाऱ्या भिष्माच्या या देशात आता साध्या डोकेदुखीसाठीही वेदनाशामक गोळ्यांचा मारा केला जातो.
समाजाच्या जीवनमूल्यांशी औषधपद्धतीचा निकटचा संबंध असतो. अन्न आणि औषध यांचा विचार आयुर्वेदात एकत्रितपणे केलेला आहे. अन्नाला पर्याय म्हणून औषध हा (अ) विचार आधुनिक काळाची देणगी आहे. "सर्वांसाठी आरोग्य' हा सध्याचा जागतिक मंत्र आहे तर, आयुर्वेदाने "सर्वांसाठी अन्न' महत्त्वाचं मानलं आहे. पाश्र्चात्यांच्या अंधानुकरणाने आपण अन्नाऐवजी औषधाला प्राधान्य देणारी संस्कृती स्वीकारतो आहोत. आजही बहुसंख्य भारतीयांपुढील अन्न ही गरज आहे, औषध नव्हे. किंबहुना अन्नाची समस्या सोडवली तर त्यातल्या बहुसंख्यांकांना औषधाची गरजच राहणार नाही.
पाश्र्चात्यांच्या प्रभावाखाली वैद्यकीय व्यवसायाचा असा दावा आहे की, "आम्ही अनेक जुने असाध्य रोग नष्ट केले. पण नव्या रोगांची भर टाकण्यात याच वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वाटा आहे. याकडे कसे दुर्लक्ष करता येईल? सामान्य माणसाच्या शरीरातील, मनातील नैसर्गिक संतुलन आधुनिक वैद्यक शास्त्राच्या कृत्रिम आणि अनैसर्गिक उपचारांमुळे ढळल्यामुळे निर्माण झालेले "डॉक्टरनिर्मित' रोग हिच आजची मोठी आरोग्यविषयक समस्या नाही का?'
काही रोगांच्या निर्मूलनाचे श्रेय वैद्यक शास्त्राने घेण्याआधी बदलत्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक वसाहतींच्या संदर्भांचेही योगदान लक्षात घ्यावे लागेल. साथीचे रोग कमी झाले याचे श्रेय रोगप्रतिबंधक लसींना, जंतूनाशकांना, घरांच्या नव्या प्रकाश-हवायुक्त रचनांना आहे. पण आजही कुपोषणामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांमुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. हृदयविकार फुफ्फुसाचे रोग, लठ्ठपणा, रक्तदाब, कर्करोग, संधिवात, मधुमेह, एडस्‌ आणि असंख्य मनोविकार यांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. याचे एक कारण आरोग्य व्यवस्थेचे "अनारोग्य' हे नाही का?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.रामोदासा यांनी एक नवा महत्त्वाचा मुद्दा नुकताच मांडला आहे. ते म्हणतात,"ज्या ठिकाणी हवा आरोग्याला पोषक आहे, स्वच्छ आणि मुबलक पाणी आहे, लोकांना रोजगार कामधंदा बरा आहे आणि त्यामुळे डॉक्टरांना चांगली फी मिळू शकते अशाच ठिकाणी डॉक्टर मंडळी दवाखाने, इस्पितळे टाकायला उत्सुक असतात. म्हणूनच शहरांमधून आरोग्यसेवांमध्ये जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा वाढत असताना जिथे या सेवांची खरी गरज आहे अशा ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात किंवा झोपडपट्‌ट्यात मात्र सरकारी सेवेव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत.'
दरवेळी वैद्यकीय उपचार अपायकारक म्हणूनच आक्षेपार्ह असतो असे नाही. पेशंटकडून अधिकाधिक फी, केमिस्टकडून कमिशन, औषध कंपन्यांकडून नजराणे उकळण्याकरता डॉक्टर्स जो "व्यर्थ' उपचार करतात त्यामुळे पेशंटस्‌चे पैसे तर खर्च होतातच पण त्याची मानसिकता औषधावलंबी आणि आत्मविश्र्वास गमावणारी होते ही हानी अधिक चिंताजनक आहे. सकस, चौरस आहारामुळे टळू शकणाऱ्या आजारांवरही औषधोपचार आणि जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा कृत्रिम मारा केला जातो. चुकीची, अनावश्यक आणि बनावट औषधे यांनी उडविलेला हाहाकार हा तर आणखी एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. अँटीबायोटिक्समुळे एक उसळलेला आजार तात्काळ पण तात्पुरता आटोक्यात येतो तर, त्याचवेळी इतर आजार आणि दुर्बलतेची बीजे पेरून ठेवतो. पुढे अँटीबायोटिक्सलाही रोगजंतू दाद देईनासे झाले की डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी शस्त्रे परजून सिद्ध असतातच.
पाश्र्चात्य देशांमध्ये तर विमा कंपन्या आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी साटेलोटे करून औषध कंपन्यांनी आरोग्यसेवांच्या हॉस्पिटल्सचे मेडिकल "मॉल'मध्ये रुपांतर करून टाकले आहे. मेडिकल टुरीझमच्या नावाखाली आता भारतात परदेशीयांच्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटल्स उभी राहत आहेत. काही दिवसांनी मेडिकल टुरीझममुळे आज जशी फाईव्हस्टार हॉटेल्स सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत तशीच ही फाईव्हस्टार हॉस्पिटल्स भारतीयांच्या क्षमतेबाहेर जाऊन उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रापासून भारतीय वंचित होतील.
खा.शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. ते नेहमी म्हणतात की, या देशात दोन देश आहेत एक इंडिया दुसरा भारत. पण या देशात मेडिकल टुरीझमच्या नावाखाली आता एक "विदेश' निर्माण होतो आहे. आरोग्य म्हणजे जणू एखादी उपभोग्य वस्तू आहे आणि तिचे कारखान्यात उत्पादन करून "रेडी टू इट फूड' किंवा "रेडीमेंड शर्टा'सारखे ते विकत घेण्याची क्षमता असलेल्या कुणालाही देता येते या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, औषध कंपन्या, फिटनेस-हेल्थ सेंटर्स-स्पा यांनी मार्केटिंग गिमिक्समधून निर्माण केलेल्या भ्रमाला उच्चभ्रूंप्रमाणेच सामान्य समाजही बळी पडताना दिसतो आहे. आयुर्वेदात अ-नैतिक वर्तन करणाऱ्या स्वार्थी, अज्ञानी वैद्याला "यमराज सहोदर' म्हटले आहे. (सहोदर म्हणजे बंधू) यम हालहाल करून मारतो तसा अयोग्य वैद्य हालहाल करून मारतो असे वर्णन आहे. प्राण आणि पैशाचे हरण करणाऱ्या आधुनिक वैद्यांना "यमराज सहोदर' म्हटले तर वावगे ठरेल का?
आयुर्वेदाचे किंबहुना प्राचीन भारतीय वैद्यक परंपरेचे हे वैशिष्ट्य होते की त्यात निसर्गात जे उपलब्ध होते त्याचाच वापर केला जाई. जिथे ज्या भूमित जो रोग तिथे त्याच भूमीतल्या वनस्पतींमध्ये त्याचे औषध असते, अशा आशयाच्या ऋचा वेदात आहेत आणि तेच या भारतीय वैद्यकाचे सूत्र होते. वैद्य झाडपाल्याने जखमा बऱ्या करीत. आजही अनेक प्राणी, पक्षी परिसरातल्या वनस्पतींचा असा उपयोग जन्मजात प्रेरणांनी करून स्वत:वर उपचार करताना आढळतात. नैसर्गिक प्रतिकारशक्तीच्या माध्यमातून रोगजंतुंवर मात केली जात असे. आता निरोगी व्यक्तिवरही काल्पनिक संभाव्य आजारांचा भयगंड निर्माण करून अ-नैसर्गिक रोगप्रतिबंधकाचा मारा गोळ्या, लसींच्या रुपाने केला जातो आहे. हेपिटायटीस बीच्या लसीचे अब्जावधी रुपयांचे स्कॅंडल हा त्याच गैरव्यवहाराचा हिमनगाच्या शिखरासारखा भाग आहे. प्रतिकारशक्ती कृत्रिमरित्या वाढवून त्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती मोडीत काढून माणसाला गोळ्या औषधांवर अवलंबून रहाणे भाग पाडले जाते आहे. विशिष्ट गुंतागुंतीच्या अवघड परिस्थितीत डॉक्टरांवर अवलंबून रहाणे आपण समजू शकतो पण, लहान सहान तक्रारींकरिता डॉक्टरांकडे धावण्याची काय गरज? ही मानसिकता वैद्यकीय व्यवसायाचे यश की अपयश? इस्पितळे म्हणजे मॉल तर दवाखाने म्हणजे दुकाने झाल्यावर दुसरे काय होणार? रुग्ण आता नुसता ग्राहक-कस्टमर नव्हे तर उपभोक्ता-कनझ्युमर झाला आहे. याचेच परिणाम म्हणजे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांनाही आता "स्टेटस्‌ सिंबॉल' म्हणून नवश्रीमंत लोक "ट्रीट' करू लागले आहेत. अमुक डॉक्टर, तमुक हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट घेतो हाही आता ग्लॅमर प्रेस्टीजचा "गर्व से कहो'चा भाग झाला आहे. डॉक्टर्स आता फिल्मस्टार्स, मॉडेल्स, सोशलाईट इंडस्ट्रीयॅलिस्टप्रमाणे "पेज थ्री' वर झळकू आणि पार्ट्यांमधून मिरवू लागले आहेत. यामागील त्यांची आणि समाजाची मानसिकता समजून घेण्यासारखी आहे. यामुळे पूर्वीजसा झोपडपट्टीतला माणूसही परवडत नसेल. आणि साध्या औषधाने बरा होणारा रोग असेल तरी "डॉक्टर सुई मारा' सांगायचा तसे आता उच्चभ्रूच नव्हे तर मध्यमवर्गीयही कर्जबाजारी होत "नामवंत' डॉक्टर-स्पेशालिस्ट आणि "फेमस' हॉस्पिटलमागे धावू लागले आहेत.
सर्वाधिक आयकर "मेडिकल प्रोफेशन'मधील लोक चुकवतात असा आरोप केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच केला आहे. बिनपावतीचे व्यवहार डॉक्टर जेवढे करतात तेवढे फारतर बिल्डींग कन्स्ट्रक्शन व्यवसायात होत असतील. महागडी तपासणी, उपचार यंत्रे आणून मग त्यांची किंमत वसूल करण्याकरिता रुग्णांच्या माथी अनावश्यक तपासण्या मारणे हा तर आता डॉक्टरांचा युगधर्म तर दवाखाना हा खाटिकखाना समजून रुग्णांना "बळीचा बकरा' समजून ट्रीट करणे हा असंख्य डॉक्टरांचा स्वाभावधर्म झाला आहे.
आधुनिक औषधांमुळे वैयक्तिक, सामाजिक आरोग्यावर जणू आक्रमण चालू आहे. संपूर्ण जीवनाचे वैद्यकीकरण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आज याच मानसिकतेतून राज्य, केंद्र सरकारांचीही 40 टक्के बजेट आरोग्य-औषधोपचार सेवांसाठी खर्च होत आहेत. वास्तविक पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा, प्रदूषण, विरहित हवा-पाणी यावर अधिक खर्च व्हायला हवा. अन्नाचा अभाव, नित्कृष्ठ जीवनसत्त्वहीन आहार, अस्वच्छता यामुळे होणाऱ्या आजारांचे मूळ कारण दूर न करता आजारांवर उपचार करणे ही केंद्र-राज्य सरकारची प्राथमिकता आहे.
"सर्वांना औषधाऐवजी सर्वांना जीवनसत्त्वयुक्त अन्न आणि स्वच्छ पाणी' हे सूत्र हवे. पाश्र्चात्य देशांच्याही आता हे लक्षात येते आहे की औषधोपचारांवर ज्या प्रमाणात तिथली सरकारे खर्च वाढवीत आहेत त्या प्रमाणात आजारही उलट वाढत चालले आहेत. कारण आजार झाल्यावर ते बरे करण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी सरकारे आजार होऊ नयेत म्हणून जे हवे ते करीत नाहीत. आधुनिक व्यसनांच्या यादीत आता औषधांच्या व्यसनांचा समावेश करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृतीच औषधमय होते आहे. आजाऱ्यांपेक्षा निरोगी माणसे आजाराच्या काल्पनिक भयगंडाने पछाडून अधिक औषधांच्या आहारी जात आहेत. "पी हळद-हो गोरी' असे होत नाही म्हणणाऱ्या भारतीयांची मात्र आता "इन्स्टंट कॉफी'सारख्या "इन्स्टंट एनर्जी' डिं्रक्सवरील श्रद्धा वाढत चालली आहे. "एक हॉटेल एका हॉस्पिटलसाठी पेशंटस्‌ची निर्मिती करते' ही म्हण आता खरी ठरते आहे. औषधांमध्येही आता कुणाला साधे औषध नको आहे, जालीम, अतिपरिणामकारक तात्काळ रिझल्ट देणारे हवे. मग त्याचे "साईड इफेक्टस्‌' नंतर काहीही होवोत.
हजारो वर्षे भारतातील वैद्यकीय व्यवस्था कुटुंबसंस्थेशी आणि ग्रामरचनेशी निगडीत होती. "आजीबाईचा बटवा' लहानपणापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या आरोग्याची काळजी वहात होता. परसातल्या वनस्पती आणि स्वयंपाक घरातल्या डबे-बरण्यात आजी-आई-मावशी-मामीला प्रत्येक दुखण्या-खुपण्यावरचा इलाज ठाऊक होता. सहन करणं, वेदनेची वाच्यता न करणं आणि गरजेशिवाय घरगुती औषधही न घेणं यात काही विशेष नव्हते. क्वचित ग्रामवैद्यापर्यंत प्रकरण पोचायचे. बाळंतपणासाठी आई-मावशीसोबत गावातलीच सुईण माहेरवाशीणीच्या-पहिलंटकरणीच्या सेवेला मायेनं हजर असायची. दवाखाना तालुक्याच्या गावी तर सरकारी इस्पितळ जिल्ह्याच्या ठिकाणी असायचं. आता "आजीबाई'ला सल्ला देण्याची हिंमत नाही आणि दिला तर ती मूर्ख ठरवली जाणार.
तहानलेल्याला पाणी पाजणे हा धर्म होता. त्यासाठी पैसे घेणे पाप होते. त्याकाळात "प्री-बिसलेरी इरा' मध्ये वैद्यदेखील बारा बलुतेदारांसारखा समाजव्यवस्थेत पैसे न घेता उपचार करीत होता. औषधांचा मोबदला घेणे अनैतिक मानले जात होते. आजार सहन करायला शिकले पाहिजे आणि आजार दाबून टाकून नव्हे तर मुळातून त्याच्या कारणाचे निवारण करून कायमचा बरा होण्यासाठी वेळ लागतो हे पूर्वी वडीलधारे समजावून सांगत. आता मुलाला शिंक आली तरी पप्पा-मम्मी घाबरेघुबरे होवून टी.व्ही.वरच्या जाहिरातीतली आठवतील तेवढी औषधे द्यायला आणि मलमे चोळायला सुरुवात करतात. निसर्गाची आणि शरीराची स्वत:ची अशी काळजी घेणारी रोगप्रतिकार-निवारण करणारी शक्ती असते हा भारतीय वैद्यकशास्त्राचा सिद्धांत आता विस्मृतीत गेला आहे.
वृद्धापकाळ हा काही रोग नव्हे पण वयोवृद्धांना जबरदस्तीने जगविण्याच्या प्रयत्नात आपण त्यांचे किती हाल, किती काळ करून आपल्या खोट्या समाधानाकरिता त्यांना वेदना सहन करायला लावत त्यांची सुटका करणारा मृत्यू लांबवत राहतो. वृद्धापकाळ ही अवस्था आहे. आजार नव्हे. पण आता वैद्यकाने आपल्या स्वार्थाकरता सुखाने मरणेही अशक्य केले आहे. परावलंबी, निरुपयोगी वेदनामय जीवनाची नैसर्गिक इतिश्री टाळून वैद्यकशास्त्र काय साधते? प्राचीन वैद्यकाला अशा अवस्थेतील "मुक्ती' मान्य होती.
प्राचीन काळी 96 टक्के माता एक वर्षांहून अधिक काळ मुलांना अंगावर पाजत असत आणि तेच या बाळांचे अन्न आणि औषध होते. आज 96 टक्के स्त्रिया स्तनपानाला पर्याय म्हणून जाहिरातबाजीला भुलून कृत्रिम बालआहाराकडे वळतात आणि नंतर बाळाच्या आरोग्याची काळजी करीत बसतात.
डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, औषध कंपन्या साऱ्या समाजालाच "गिनीपिग्ज' मानून प्रयोग करण्यात आघाडीवर आहेत. श्रीमंतांच्या रोगांवरील संशोधनावर अवाजवी खर्च केला जातो आहे. साथीचे रोग ही या देशापुढील समस्या असताना श्रीमंतांसाठी "हार्ट' हॉस्पिटल्स जिकडेतिकडे उभी राहत आहेत. गरज नसताना सिझेरियनपासून बायपासपर्यंतच्या शस्त्रक्रिया करणे भाग पाडले जात आहे. महागड्या अनावश्यक तपासण्यांना तर सुमार नाही. अनेक डॉक्टरांची "कट्‌ प्रॅक्टीस' अधिक उत्पन्न देणारी आहे. शस्त्रक्रिया करण्यातील धोके, महागड्या औषधांचे दुष्परिणाम रुग्णांपासून लपविले जात आहेत. जो हौशी क्रेझी नवश्रीमंत वर्ग या "मेडिकल फ्रेंझी'त सापडला आहे तोच याचा सर्वाधिक संख्येने बळी आहे. या वर्गाला साध्या तापासाठीही आय.सी.यू.लागतो. मग डॉक्टरही त्याच्या खिशावर शस्त्रक्रिया सुरू करतात आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर दीर्घकालीक घातक परिणाम काय होतात याची पर्वा करीत नाहीत. आधुनिक तपासणी यंत्रे-तंत्रे-साधने म्हणजे डॉक्टरांसाठी "पैशाची झाडे' झाली आहेत. पेशंटस्‌च्या नातेवाईकांना डॉक्टर्स कसे "इमोशनल ब्लॅकमेल' करून तपासण्या-शस्त्रक्रिया अनावश्यक असूनही करणे भाग पाडतात याची हजारो-लाखो उदाहरणे पहाल तिकडे सापडतील.
सार्वजनिक आरोग्यसेवा भ्रष्ट आणि अकार्यक्षम तर खाजगी आरोग्यसेवा शोषण आणि अनैतिक व्यापारीकरणाने ग्रस्त मग सामान्य माणसाने अशा परिस्थितीत काय करायचे?

No comments:

Post a Comment