Tuesday, July 14, 2009

ठाण्यातील "राम-लक्ष्मण' विरुद्धाशिवासेनेतिल "घटोत्कच-रावण'

ठाण्यातील "राम-लक्ष्मण'
विरुद्धशिवसेनेतील "घटोत्कच-रावण'
ठाण्यात पत्रकारांना हाताशी धरून "सुपाऱ्या' वाजविण्याचे काम सर्वच पक्षांचे बहुतेक नेते करीत असतात. कधी या "सुपाऱ्या' विरोधी पक्षातल्या प्रतिस्पर्धी नेत्यांविरुद्ध बातम्या "पेरण्या'साठी दिल्या जातात. अनेकदा स्वत:च्याच पक्षातल्या "पुढे' जाणाऱ्या "नेत्या'ला "मागे' खेचण्यासाठी "पुड्या सोडण्या'साठी पत्रकारांना हाताशी धरले जाते. ज्योतिष शास्त्रात देवगण, मनुष्यगण, राक्षसगण असे माणसांचे तीन प्रकार सांगितले जातात. तसेच ते पत्रकारांमध्येही असतात. काही पत्रकार नितीमत्ता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता या त्रिसूत्रीवर आपली पत्रकारिता करतात. काही पत्रकार माहितीचे प्रामाणिक संकलन करून त्यात "बात' किंवा "मी' न मिसळता, मीठमसाला न लावता जे घडले-बिघडले, ते जसे आहे तसे, भाष्य किंवा टीका न करता सादर करतात. काही पत्रकार "राक्षस' गणातील असतात. त्यांना ह्याला "खाजव', त्याची "वाजव', अमक्याची "गाजव' अशा "सुपाऱ्या' घेण्यात भरपूर इंटरेस्ट असतो. "मटेरियल' हिंडून, फिरून गोळा करावे लागत नाही. बसल्याजागी "माल' आणि "मसाला' दोन्ही आणून दिला जातो. सगळ्यात कहर म्हणजे काही "सुपारी' बहाद्दर पत्रकार आधी एखाद्या नेत्याच्या विरोधकाकडून "सुपारी' वाजवतात आणि मग त्या "सुपारीबाज' बातमीचा खुलासा छापण्याचे जाहिरातीच्या दराने प्रत्येक सेंटीमीटरच्या हिशेबाने पैसे घेऊन "सुपारी'सोबत "तंबाखू'ही जमवतात.ठाण्यात कुठल्याही नेत्याच्या बाजूने बातमी आली की त्याचे अभिनंदन करताना एक प्रश्र्न हमखास विचारला जातो, "केवढ्याला पडली?' कारण "देवाणघेवाणी'चा व्यवहार न करता "बातमी म्हणून बातमी' किंवा "वस्तुस्थिती म्हणून स्तुती' तीही एखाद्या राजकीय नेत्याची, कुणी पत्रकार छापील यावर राजकीय नेत्या-कार्यकर्त्यांचाच स्वानुभवाने विश्र्वास उरलेला नाही. अर्थात सर्वसामान्य वाचकाला सहसा आणि फारसा या "ऑन दि रेकॉर्ड' बातमी मागच्या "ऑफ दि रेकॉर्ड' अर्थकारणाचा पत्ता लागत नाही. त्याला फक्त एकच कोडे पडलेले असते की एकाच वर्तमानपत्रात तोच एक नेता एक दिवस "थोर' आणि नंतर एक दिवस "चोर' कसा ठरतो? पण त्याला ठाऊक नसते की वृत्तपत्र आणि त्याचा संपादक एकच असला तरी त्याचे ठाण्यातील वार्ताहर वेगवेगळे असतात आणि त्याच वृत्तपत्राच्या एका वार्ताहराला जो नेता "थोर' वाटतो, तोच नेता दुसऱ्या वार्ताहराला "चोर' वाटतो. कारण एकाने "थोर' म्हणायला "वर्गणी' किंवा जाहिरात घेतलेली असते, तर दुसऱ्याला खंडणी किंवा जाहिरात नाकारल्यामुळे तो त्या नेत्याला "चोर' म्हणत असतो. पुन्हा गंमत अशी की तो वार्ताहर आणि नेत्याची "मांडवली', "सेटींग' झाले की पुढल्या बातम्यात तोच चोर नेता अचानकपणे "थोर' कॅटेगरीत बसवला जातो.ठाण्यात रोज सुमारे दीडशे वर्तमानपत्रे येतात. यातली काही मुंबईसह कुठून कुठून प्रकाशित होतात. काही शहरातून, जिल्ह्यातून प्रसिद्ध होतात. ठाणे शहराची लोकसंख्या 15-20 लाख असल्यामुळे बहुतेक बाहेरची वृत्तपत्रे ठाण्यातील जाहिरातदारांच्या जाहिराती स्वतंत्रपणे मिळाव्यात म्हणून ठाणे आवृत्ती किंवा ठाणे पुरवणी काढतात. आता बड्या-मध्यम-छोट्या वृत्तपत्रांच्या संपादक आणि मालक यांना ठाण्यातील काही प्रतिनिधी स्थानिक नेत्यांच्या कशा सुपाऱ्या वाजवतात हे बातम्या वाचतानाही कळत असते. कानावर तक्रारीही येत असतात. पण अपवाद वगळता अनेक पत्रकारांनी ठाण्यातील नेते, व्यापारी, उद्योगपती यांच्यात आपली वैयक्तिक "बाजारपेठ' अशी जमवली आहे की मूळ वृत्तपत्राला संपादक-मालकाला ठाणे आवृत्ती किंवा पुरवणीसाठी लागणाऱ्या नित्य आणि पुरवण्या-विशेषांकांसाठीच्या जाहिराती, इलेक्शन काळात "पेड न्यूज' देण्याचे काम ठाण्यातील हे काही वार्ताहरच करतात, करू शकतात. आम्ही देतो त्या बातम्या जशाच्या तशा आल्या नाहीत तर आम्ही या नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून जाहिराती गोळा करू शकणार नाही, असे वृत्तपत्र संपादक मालकाला धमकावतात. परिणामी संपादक-मालक त्यांना ठाण्यातील वसुलीची जहागिरी "सवता सुभा' तोडून देऊन प्रदान करतात.अपवाद सर्वत्र व्यवसायात असतात. तसे ते ठाण्यातील पत्रकारांमध्येही आहेत. खरे म्हणजे "राक्षस' गणातील काही पत्रकारांमुळे "देवगण' "मनुष्यगणा'तील बहुसंख्य पत्रकार बदनाम होतात ही त्या पत्रकारांची व्यथा, चिंता आहे. काही सुपारीबाज, खंडणीखोर पत्रकारांमुळे संपूर्ण पत्रकारजमात ठाण्यात बदनाम होते आहे, यासाठी कोणती उपाययोजना करावी हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्र्न आहे. पण आजतरी तत्त्व-सत्त्व-न्याय-निती पाळणारे पत्रकार "राक्षस' गणापुढे हतबल झालेले दिसतात आणि त्यामुळे "सुपारी' पत्रकारितेला ठाण्यात ऊत आला आहे. पुन्हा या "सुपाऱ्या' वाजविणाऱ्या छोट्या-मध्यम-मोठ्या-स्थानिक-मुंबईच्या सर्वच प्रकारच्या वृत्तपत्रातील "गॅंगस्टर' पत्रकारांचा समावेश आहे, ही सच्च्या पत्रकारांप्रमाणेच नेते-अधिकारी यांचीही डोकेदुखी आहे.सध्या ठाण्यामध्ये शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे आणि उपप्रमुख नरेश म्हस्के यांच्याविरुद्धची 25 लाखांची "सुपारी' अपप्रचार, चारित्र्यहनन आणि आरोपांची चिखलफेक यासाठी काही मोजक्या पत्रकारांच्या ग्रुपला दिली गेली असल्याची जोरदार चर्चा आहे. या पत्रकारांकडे कुणी जाहीरपणे बोट दाखवीत नसले तरी या पत्रकारांनी छापलेल्या बातम्यांवर बोट ठेवून या "सुपारी'चे पुरावे दिले जात आहेत. विशेष म्हणजे एरवी आपण दिलेल्या बातमीवर आपली "बायलाईन' नाव हवे म्हणून आग्रह धरणारे हे सुपारीबहाद्दर पत्रकार आ.एकनाथ शिंदे-नरेश म्हस्के यांच्या विरुद्धची "सुपारी' मात्र प्रतिनिधी, वार्ताहर अशा बुरख्यामागे दडून वाजवीत आहेत. यातली सर्वात धक्कादायक गोष्ट ही नाही की काही पत्रकार आ.एकनाथ शिंदे-नरेश म्हस्के यांच्याविरुद्धची सुपारी वाजवीत आहेत. पण खरी धक्कादायक "शॉकिंग फॅक्ट' ही आहे की, 25 लाखांची ही "शिंदे-म्हस्के' विरुद्धची सुपारी शिवसेनेतल्याच दोघा नेत्यांनी दिली आहे. "शिंदे-म्हस्के' विरोधी गटातील हे दोन नेते कोण हे ठाण्यातील प्रत्येक राजकीय नेत्या-कार्यकर्त्याला ठाऊक आहे. बातम्यांमध्ये ज्या गोपनीय, अंतर्गत आणि ठराविक नेत्यांपलीकडे माहीत नसलेल्या गोष्टींचे जे गौप्यस्फोट केले जात आहेत त्यावरून या बातम्यांचा "सोर्स' शिंदे-म्हस्के विरोधक शिवसेना नेते हाच आहे, हे स्पष्ट होते आहे. शिवसेनेचे नुकसान झाले, संघटनेत बेदिली, बेशिस्त निर्माण झाली, आगामी विधानसभा निवडणुकीत पानीपत झाले तरी हरकत नाही, पण आम्ही आता शिंदे-म्हस्के यांचा लोकसभा निवडणुकीतील विरोधाचा बदला घेणारच या जिद्दीने हे शिवसेना नेते उतरल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे.मतभेद, सत्ता स्पर्धा, संघर्ष, असूया, मत्सर, हेवेदावे सर्वच राजकीय पक्षात असतात. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ते उघडपणे करण्याची परंपरा आहे. पण शिवसेना याला अपवाद होती. शिवसेना पक्षश्रेष्ठींच्या दबाव-दबदबा आणि दरारा यामुळे पक्षातील नेते एकमेकांची अब्रू रस्त्यावर नेऊन लोंबवीत नव्हते. ठाणे जिल्ह्यात तर जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पक्षशिस्त आणि अनुशासनाचा वेगळाच आदर्श निर्माण केला होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा "पर्याय' सापडल्यापासून काही शिवसेना नेते "तिकडे' जाण्यापूर्वी "इथली' शिवसेना खिळखिळी करून, शिंदे-म्हस्के यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावून ठाण्यातील शिवसेना नेतृत्वहीन करण्याचे कटकारस्थान शिजवीत आहेत. सध्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मराठी परिषदेसाठी अमेरिकेत असल्याची संधी घेऊन शिंदे-म्हस्के यांच्याविरुद्ध शिवसेनेतील असंतुष्टांनी उठाव केला आहे आणि त्यांच्या कारस्थानाचा एक भाग म्हणून वृत्तपत्रातून शिंदे-म्हस्के विरोधातल्या बातम्यांची सुपारी देण्यात आलेली आहे.ठाणे जिल्ह्यात यापूर्वीची प्रत्येक निवडणूक आ.एकनाथ शिंदे-नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिंकली आहे. मुंबईतल्या 6 खासदारकीच्या जागा शिवसेना हेड क्वार्टर्समध्ये गमावल्या गेल्या तरी कल्याणची जागा शिंदे-म्हस्के यांच्या प्रयत्नांमुळेच केवळ मिळाली. ठाण्याची जागा विजय चौगुले उमेदवार नसते तरी शिवसेनेला मिळाली नसती कारण गणेश नाईक यांचे इलेक्शन बजेट 50 कोटी रुपयांच्या पुढे होते आणि "मनसे' उमेदवार राष्ट्रवादीने "दत्तक' घेऊन त्याच्यासाठीही परस्पर 5-7 करोड रुपये खर्च केले होते. ठाण्यात शिवसेनेची मते शिवसेनेला मिळाली. पण भाजपाची मते एकगठ्ठा "मनसे'कडे गेली. मुंबईतही शिवसेना उमेदवारांचा पराभव होण्याचे मुख्य कारण "भाजपा' मतदारांनी "मनसे'ला मते दिली हेच होते.ठाणे लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे खापर आ.शिंदे-म्हस्के यांच्यावर फोडून त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्याचे काही विरोधकांचे कारस्थान फसले. कारण, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे शिंदे-म्हस्के यांची पाठराखण केली आणि "तुम्ही प्रयत्नात कसूर केली नाही. मराठी मतांचे विभाजन झाल्यामुळे मुंबई या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 6 जागा आम्ही सर्व नेते तिथे पूर्णशक्तीनिशी उतरलो असताना गेल्या तर तुम्ही निदान दोनपैकी एकतरी मिळवली. याबद्दल तुमचे अभिनंदन' असे म्हणून नेतृत्वबदलाचा प्रश्र्न निकालात काढला. यामुळे संतप्त झालेल्या, वैफल्यग्रस्त झालेल्या आणि उघडपणे शिंदे-म्हस्के यांना विरोध करून सर्वसामान्य निष्ठावंत ठाणेकर शिवसैनिकांच्या प्रक्षोभाला सामोरे जाण्याची हिंमत नसलेल्या शिवसेनेतील "घटोत्कच-रावण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी आता ठाण्यातील शिवसेनेचे "राम-लक्ष्मण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आ.एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध पत्रकारांना "सुपारी' देऊन कलियुगातील नव्या रामायणाचे आणखी एक कांड रचले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्वध ठाकरे यांना अमेरिकेतून परतल्यावर आपल्याच संघटनेतील नेत्यांविरुद्ध पत्रकारांना "सुपारी' देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना "नारळ' देण्याचे काम करावे लागणार आहे, अन्यथा दोनपैकी एक लोकसभा जागा गेलीच आहे. पुढल्या विधानसभा निवडणुकीत 24 पैकी 20 जागा गमावण्याची वेळ येईल. धर्मवीर आनंद दिघ्यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात आता एकनाथ शिंदे-नरेश म्हस्के या दोघांना जर धक्का लागला तर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या सत्तेचे सारे बुरुज ढासळून संघटना भुईसपाट होईल हा नियतीचा इशारा विसरता कामा नये!

No comments:

Post a Comment