Friday, July 24, 2009

प्रकृती आणि संस्कृती : "निसर्गधर्मा'ची महती

समाज म्हणजे काय! ज्ञात-अज्ञात, दृश्य-अदृश्य, व्यक्त-अव्यक्त अशा भावना-विचार-आचार सूत्रात सामूहिक रुपात एकमेकांशी बांधलेली पण व्यक्तिगत स्वतंत्र, स्वायत्त, स्वयंभू अस्तित्व अबाधित ठेवणारी मानवी समूह संरचना म्हणजे समाज!
समाज आणि त्यातील व्यक्ती यांचे परस्परांशी नाते कसे असते? समूहरुपात समाज म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती, व्यक्तिगत पातळीवर एक स्वतंत्र अस्तित्व टिकवून असते. बहुसंख्य व्यक्तींचे सामाजिक गुण-दुर्गुण यांच्या सामुदायिक बेरजेतून "समाजा'चे म्हणून "विशेष' व्यक्तिमत्व आकाराला येते. समाजाचा व्यक्तिंवर आणि व्यक्तिंचा समाजावर असा प्रभावाचा "टू-वे-ट्रॅफिक' सतत चालू असतो. व्यक्तींच्या घडण्या-बिघडण्यातून समाज घडतो. बिघडतो. घडणे किंवा बिघडणे कशाला म्हणायचे याचे निकष काही चिरंतन शाश्वत जीवनमूल्यांच्या आधारे निश्र्चित झालेले असतात. ही चिरंतन शाश्वत मूल्ये माणूस आणि प्राणी यांच्यातील भेद-फरक अधोरेखित करून माणसाचे "माणूसपण' कशात आहे हेच आपल्याला सांगतात. माणसाचे शरीर हे संगणकाच्या भाषेत "हार्डवेअर' तर त्याचे मन हे "सॉफ्टवेअर' आहे. "हार्डवेअर' हा "परिसरांचा परिणाम असतो तर "सॉफ्टवेअर' हे "संस्कारा'तून आकार घेत जाते. व्यक्ती आणि समूहांच्या हार्डवेअर+सॉफ्टवेअर च्या कॉंबीनेशनमधून "समाज' नावाचा "सुपर कॉम्प्युटर' कार्यरत होतो.
व्यक्तीच्या मनाचा "सॉफ्टवेअर' संस्कारातून घडतो किंवा बिघडतो म्हणजे नेमके काय-कसे होते? या प्रश्र्नाचे उत्तर काही उदाहरणांमधून आपण बघुया. माणूस जन्माला आल्यापासून डोळे, नाक, कान, त्वचा, मुख या पंचज्ञानेंद्रियांमार्फत ज्ञान म्हणजे संस्कार घेत असतो आणि त्यातून त्याची वृत्ती-प्रवृत्ती-दृष्टीकोन-अविष्कार संस्कारित होत असतो. समाज नावाच्या "सुपर कॉम्प्युटर'मध्येही व्यक्तीप्रमाणे सामूहिक स्वरुपात असे "संस्करण' होत असते. व्यक्तिंमध्ये आढळणाऱ्या वृत्ती-प्रवृत्ती-दृष्टीकोन यातील गुणदोषांचे मूळ या "सॉफ्टवेअर' घडविणाऱ्या संस्कारांमध्ये असते म्हणूनच भारतीय संस्कृतीत संस्काराला विशेष स्थान-मान-महत्त्व आहे. सोळा संस्कारांपासून सांस्कृतिक परंपरेची सुरुवात फक्त भारतातच आहे. भारतीय संास्कृतिक-सामाजिक जीवनातला प्रत्येक सोहळा-कृती-कर्म-कांड-पूजा-अर्चा हा एक संस्कार मानला आहे. विवाहालाही "विवाह संस्कार' म्हणणारा हा जगातला एकमेव देश आहे. मुंज हा संस्कारच. इतकेच नव्हे तर अंत्यविधीलाही "अंत्यसंस्कार' फक्त या भारतातच म्हणताना दिसेल. प्रत्येक मंत्र, प्रत्येक यंत्र, प्रत्येक तंत्र, प्रत्येक स्त्रोत यातील अक्षरे आणि कृतींसोबतच्या आकृतीमधील रचना ही सगळी संस्कारांची परिभाषा आणि प्रतिकरुपे आहेत. संस्कारांना असे महत्त्व देणारी भारतीय संस्कृती माणसाच्या शारीरिक सुखांपेक्षा मानसिक उन्नतीचा अधिक विचार करते. मानसिक उन्नतीचे मूल्य भौतिक प्रगतीपेक्षा अधिक मानते. अध्यात्मिक, पारलौकिक जीवनाचा केंद्रबिंदू आत्मा तर ऐहिक जीवनाचा मध्यबिंदू मन मानणारी भारतीय संस्कृती आहे. म्हणून "मना'ची चिंता करणारी भारतीय संस्कृती "मनी'ची विवंचना करणाऱ्या पाश्र्चात्यांपेक्षा वेगळी आहे.
आज भारतीय समाज आणि या समाजातील व्यक्ती चक्रव्यूहात मध्यभागी जाऊन बाहेर पडता येऊ न शकणाऱ्या "अभिमन्यू'सारख्या संभ्रमित झालेल्या अवस्थेत असण्याचे कारण चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारा सद्‌सद्‌विवेकबुद्धी रुपी कृष्णाचा सल्ला अर्धवट ऐकून पूर्ण ऐकण्याआधी चक्रव्यूहात शिरण्याची केलेली घाई हेच आहे. बाहेर कुठून, कसे पडायचे! याची माहिती करून घेण्याआधी आत-चक्रव्यूहात शिरण्याची घाई करतात ते फसतात आणि अभिमन्यू होऊन धारातीर्थी पडतात. परिस्थिती बदलणे-न बदलणे दरवेळी आपल्या हातात असते असे नाही पण मनस्थिती बदलणे तर निश्र्चितपणे आपल्या हाती आहे. मनस्थिती हा मनावरील संस्कारांचा परीपाक असते. एकाच घटना-प्रसंग-आपत्तीला वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या प्रकारे सामोरी जातात कारण त्या त्या व्यक्तींवरील संस्कार वेगवेगळे असतात. माणसे मुळात फक्त माणसे असतात पण त्यांचे वागणे-बोलणे-करणे किंवा न करणे हे त्यांच्या मनावर बदलते-अवलंबून असते. जो सतत शिकतो-संस्कारित होत असतो तो माणूस! शिकण्याची-संस्कारित होण्याची त्याच्या मनाचे सॉफ्टवेअर घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया जन्मभर चालू असते. लहानपणी ती अधिक तीव्र सखोल आणि दूरगामी परिणाम करणारी असते.
संस्काराचा प्रारंभ हा घरातून होतो हा प्रारंभ, शुभारंभ ठरावा असे वाटणाऱ्या पालकांना "शुभ' "सत्य' बोलण्याची "सुरुवात' स्वत:पासून करण्याची जाणीव असावी लागते. फोनवर समोरच्याशी खोटे बोलणारा, मोबाईलवर दिशाभूल करणारी माहिती देणारा किंवा "मी घरात नाही' असे मुलाला सांगणारा बाप मुलाला "खरे बोलत जा' असे कुठल्या तोंडाने सांगणार आणि खोटारडेपणा करणाऱ्या बापाचा मुलगा "खरे बोलणारा' कसा निपजणार! माझ्या वागण्या-बोलण्याचा नुसता परिणाम नव्हे तर संस्कार माझ्या मुलाच्या मनाच्या-मेंदूच्या सॉफ्टवेअरच्या जडणघडणीवर होतो आणि तो घडतो किंवा बिघडतो हे भान किती टक्के आईबापांना आहे? त्यांना मुलांबद्दल तक्रार करण्याचा काय नैतिक अधिकार आहे? खोटं बोलणारा बाप मुलाला खोटं बोलायला शिकवतो आणि मुलाची खोटं बोलण्याची सुरुवात बापाशी खोटं बोलण्यापासून होते तेव्हा तोच बाप रागावतो आणि खरे बोल म्हणतो. पण हे मुलाच्या मनाचे सॉफ्टवेअर कोणी बिघडवले?
एक वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी भेटले. अधिकारी होते तेव्हा "सुखी माणसाचा सदरा' जणू आपल्याच अंगावर आहे अशा थाटात वावरायचे. सत्ता-संपत्ती-सुख-साधने सारे पायाशी त्यामुळे मुले गेली परदेशी, बायको झाली स्वर्गवासी आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मागचा आकडा गेल्यावर शून्ये उरून शून्यांची बेरीज शून्यच व्हावी तसे साऱ्या नात्यांचे भागाकार आणि संबंधांची वजाबाकी होऊन जीवनात शून्य, जीवन म्हणजे शून्य उरले. मग एक दिवस पूर्वी तुच्छ, क्षुद्र वाटणारा शिपाई नातवंडाला खांद्यावर बसवून आनंदात खेळवताना पाहिला आणि काय कमावलं याचा विचार आयुष्यभर करणाऱ्या त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आपण काय गमावलं ते लक्षात आलं. आपल्या शून्य उत्तर आलेल्या जीवनाच्या गणिताचं कोडं उलगडलं. आपल्या अंगावरचा "सुखी माणसाचा सदरा' त्यांना शिपायाच्या अंगावर नातवंडांच्या खेळण्याने चुरगळूनही फुल चुरगळल्यावर त्याचा गंध दरवळावा तसा झळकताना दिसला. म्हणूनच शकुंतलेच्या भरताला कडेवर घेऊन "नातवाच्या पायाची धुळीने आजोबाचे अंग मळण्यासारखे आणि त्याच्या गोड लाथांनी गुदगुल्या होण्यासारखे सुख गृहस्थाच्या जीवनात नाही' असे कण्वमुनी का म्हणाले हे तेव्हा त्याला कळले. संस्कृतीचा संस्कार माणसे जोडणारा असतो आणि माणसाला एकाकी पडू न देणारा असतो.
निसर्ग म्हणजे प्रकृती तर निसर्गाच्या चक्राशी मानवी जीवनाची समतोल सांगड ही संस्कृती. प्रकृती आणि संस्कृती यांचं नातं अतूट आहे. प्रकृतीतूनच संस्कृतीचा उदय आहे म्हणून संस्कृतीचं कार्य प्रकृतीचं पोषण करणं आहे. प्रकृतीचं-निसर्गाचं शोषण करणं म्हणजे संस्कृतीचं विकृतीत रुपांतर करणं आहे. एक सुंदर कल्पना आहे. परमेश्र्वराच्या जेव्हा लक्षात आलं की तो प्रत्येक मुलाचं पालनपोषण, संरक्षण, संवर्धन करण्यासाठी स्वत: जाऊ शकत नाही तेव्हा त्याने आपल्यातला वात्सल्याचा अंश घेऊन "आई' निर्माण केली. तसंच जेव्हा त्याला वाटले की निसर्गातील जीवजंतू-पक्षीप्राणी-झाडेवनस्पती यांचं व्यवस्थापन ही आपल्या एकट्याची गोष्ट नाही तेव्हा त्याने पक्षी-पशू-प्राप्ती-जीवजंतू यांच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धिचा मानव निसर्गाच्या व्यवस्थापन आणि संवर्धनासाठी निर्माण केला. पण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, तसा माणूसच काळाच्या ओघात इतका स्वार्थी झाला की तो ज्या निसर्गाचा "तारक' व्हायचा तो "मारक' म्हणून वावरू लागला. निसर्गाला गुलाम करण्याची स्वप्ने पाहू लागला. निसर्गाचे नियम आणि निसर्गचक्राची गती बदलण्याचे प्रयत्न करू लागला. निसर्गाला अभिप्रेत, समरसता, एकरूपता सोडून निसर्गाशी संघर्ष करण्यात धन्यता मानू लागला. हा संघर्ष प्रकृती विरुद्ध विकृती असा आहे. निसर्गावरील अत्याचारातून निसर्गाचा प्रतिकार आता वेगवेगळ्या रुपांमध्ये प्रगट होऊ लागला आहे. भूकंपापासून सुनामीपर्यंत, अवर्षणापासून अतिवृष्टीपर्यंत, व्हायरसजन्मरोगांपासून साथीच्या रोगांपर्यंत निसर्ग आपला प्रतिकार करतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटना आणि "ओझोन' थराच्या विपरांपासून उत्तर-दक्षिण धु्रवांच्या वितळण्यापर्यंतच्या दुर्घटना या मानवी विकृतीच्या दुष्परिणामांचे पुरावे आहेत. देवाने ज्या मानवाला निसर्गाचे वरदान दिले त्याच निसर्गाचा शाप मानवाने ओढवून घेतला आहे. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य हे की इथे पापाचे परिमार्जन करण्यासाठी प्रायश्र्चित्ताची व्यवस्था आहे आणि शापासाठी उ:शाप मिळण्याची तरतूद आहे. आपली ही सिरीयल म्हणजे मानवाने निसर्गाच्या संदर्भात केलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी केलेला प्रायश्र्चित विधी आहे. उ:शाप मिळवण्यासाठी केलेली साधना आहे. तपश्र्चर्येने, आराधनेने जसा ईश्र्वर प्रसन्न होतो तशी निसर्गाला देव समजून त्याची साधना-आराधना करणारी भारतीय संस्कृती आहे. इथे झाडं-पानं-फुल-वेली-अंकुर-डोंगर-नद्या-प्राणी-पक्षी याना देवता स्वरुपात पाहिले-पूजले जाते असा हा देश आहे. पंचमहाभूतांना देवत्व देणारी वैहिक संस्कृती आणि निसर्गाला ईश्र्वर शक्तीचा साक्षात्कार मानणारी आर्य संस्कृती या गंगाजमनांच्या संगमातून भारतीय संस्कृती प्रवाहित झाली आहे. भोगातून रोगाकडे, चंगळ करता करता अमंगळाकडे आणि वासनेतून विषाकडे निघालेल्या पाश्र्चात्य संस्कृतीला अडवण्याचे आणि विकृतीच्या जागी पुन्हा प्रकृतीला प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य फक्त भारतीय संस्कृतीत आहे. म्हणून आमची ही मालिका जीवनाच्या व्यवस्थापनाचा गाभा मनाच्या व्यवस्थापनात आहे, असे मानते आणि मनांच्या व्यवस्थापनातून जनांच्या जीवनाचे व्यवस्थापन निसर्गाच्या नियमांशी सुसंगत करून जीवनाची रंगत निसर्गाच्या रंगसंगतीशी जुळवता येईल असे मानते. धरतीवर स्वर्ग आणणे म्हणजे इथला निसर्ग त्याच्या मूळ ईश्र्वरी संकेतांनुसार मुक्त विकसित होऊ देणे हाच आहे. निसर्ग-प्रकृती ही मानवाची माता तर संस्कृतीप्रेरित निसर्गधर्म हा पिता आहे. हिंदू-मुस्लीम-ख्रिश्र्चन-जैन-बौद्ध-शीख या सर्वांचा-सर्व धर्मांचा आद्यधर्म आहे-निसर्गधर्म!

No comments:

Post a Comment