Tuesday, July 14, 2009

खा.गोपीनाथ मुंडे झाले जरी "प्रभारी'

अग्रलेखाचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत

खा.गोपीनाथ मुंडे झाले जरी "प्रभारी'

तरी नितीन गडकरी राहणार "कारभारी'

महाराष्ट्रातील निवडणुकीची सूत्रे, "भाजपा'चे "पर्यायी' किंवा "प्रति' हिंदूहृदयसम्राट, हिंदू भांडवलशाहीचे प्रणेते, गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून, भारतीय जनता पक्षाने काढून घेतली आहेत. आता महाराष्ट्रात राज्य शाखेचे अध्यक्ष नितीन गडकरी असले तरी, आगामी विधानसभा निवडणुकीची सूत्रे, खा.गोपीनाथ मुंडे यांच्याकडे, मोदींऐवजी "प्रभारी' या नात्याने सोपवली आहेत. नरेंद्र मोदी यांना "भाजपा'ने "असेट' म्हणून, महाराष्ट्राचे "प्रभारी' केले. पण ते "पूरक' न ठरता "मारक' ठरले. "लायबलीटी' झाले. तसे होणे अटळ, अपरिहार्य होते. पण "भाजप'वाल्यांना, ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही. खड्‌ड्यात पडेपर्यंत, पुढे खड्डा आहे हे दिसत नाही.अडवाणी कसे पंतप्रधान होणार?बुडालेला दगड पुन्हा कसा तरणार?"भाजप'च्या चुकलेल्या अंदाजाची आणि फसलेल्या राजकीय हिशेबाची, 3 उदाहरणे गेल्या लोकसभा निवडणुकीत उघडकीस आली. पहिले उदाहरण म्हणजे, भाजपाने घोषित केलेली, लालकृष्ण अडवाणींची पंतप्रधान पदासाठीची उमेदवारी! 1999 साली देशात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली, एन.डी.ए.सरकार असताना, अडवाणीच उपपंतप्रधान होते. निवडणुकीनंतर अल्पकाळ वाजपेयी पंतप्रधान राहतील आणि मग अडवाणी त्यांची जागा घेतील, असे भाजपाने सूचित केले होते. पण एन.डी.ए.चा दारूण पराभव होऊन, यु.पी.ए.सत्तेवर आली. याचा अर्थ भारतीय मतदारांनी त्याचवेळी, अडवाणींना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून नाकारले होते. एकदा देशाने नाकारलेल्या अडवाणींना, पुन्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणे, म्हणजे एकदा बुडालेला दगड, पुढल्या वेळेस तरी पाण्यावर तरंगेल, या भाबड्या अपेक्षेने तो पाण्यावर ठेवण्यासारखे होते. पण वाजपेयी नाहीत आणि अडवाणी दुसऱ्या कुणाला होऊ देणार नाहीत, म्हणून पक्षाने रिस्क घेतली."गांधी विरुद्ध गांधी'चा डाववरुण ठरला भाजपावर धावअडवाणींच्या उमेदवारीचा गोंधळ कमी पडला की काय म्हणून, भाजपाने वरुण गांधीला "नॅशनल हिरो' बनवायचा प्रयत्न केला. ज्या गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीबद्दल, भाजपा येता-जाता आक्रोश करतो, त्याच गांधी घराण्यातील, मनेका-वरुण या दोन "गांधीं'चा, "गांधी'विरुद्ध गांधी' असा राजकीय उपयोग करण्याकरिता, "भाजपा' किती निर्लज्ज, निर्ढावलेपणाने वापर करतो, ते पाहण्यासारखे आहे. आपल्या मराठीत "बंब्या' असा एक शब्द आहे. वरुण म्हणजे तसा "बंब्या' व्यक्तिमत्त्वाचा, "ठोकळा' आहे. "बालीश आणि फुलीश'वरुणने, बेजबाबदारपणे मुक्ताफळे उधळून, "मिडीया'चे लक्ष वेधले, एवढ्याकरिता सत्तेसाठी कासावीस झालेले "भाजपा'वाले, त्याला अडवाणींच्या तोडीचा नेता आणि राहूल गांधींसाठी पर्यायी युवा पंतप्रधान मानून, त्याचा उदोउदो करू लागले, यावरून, "भाजपा'च्या वैचारिक दिवाळखोरीची कल्पना यावी. वरुण नावाच्या मूर्खाच्या नादी लागून, भाजपाने स्वत:च्या पायावर दुसरी कुऱ्हाड लोकसभा निवडणुकीत मारून घेतली.प्रति-हिंदू हृदयसम्राट मोदी आलेइतर धर्मीय मतदार दूर गेलेभाजपाने तिसरी कुऱ्हाड, नरेंद्र मोदींना "भाजपा'चा चेहरा म्हणून प्रॉजेक्ट करून, स्वत:च्या पायावर मारून घेतली. गोध्रा हत्याकांडाशी, नरेंद्र मोदींचा चेहरा एकरूप असल्यामुळे आणि "मुस्लीमांना धडा शिकवण्यासाठी दंगली, सरकार पुरस्कृत करून घडविणारा मुख्यमंत्री, ही त्यांची राष्ट्रीय ओळख असल्यामुळे, देशभरातले मुस्लीम "मोदीकल्ट' रोखण्यासाठी, सेक्युलर कॉंग्रेसच्या मागे ठामपणे उभे राहिले. समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव, कॉंग्रेसची मते फोडतील आणि त्यामुळे "भाजपा' निवडून येईल, या भितीपोटी समाजवादी पार्टी, डावे पक्ष, स्थानिक पक्ष या सर्वांना मुस्लीम समाजाने बाजूला ठेवले आणि "मोदींना' रोखण्यासाठी, कॉंग्रेसला एकगठ्ठा मतदान केले. हे मोदी महाराष्ट्राचे "प्रभारी' केल्यामुळे महाराष्ट्रातील ख्रिश्र्चन, बौद्ध, मुस्लीम हे "अहिंदू' मतदार "भाजपा' विरोधात गेले आणि "मोदीं'च्या ओझ्याखाली, महाराष्ट्रात भाजपाच्या लोकसभेच्या जागा 13वरून 9 वर आल्या, तर मते 11 लाखांनी घटली.गडकरी विरुद्ध मुंडे लढाईशिवशाही विरुद्ध पेशवाईमहाराष्ट्रात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात आहे तेवढेच वैर पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि खा.गोपीनाथ मुंडे यांच्यात आहे. नितीन गडकरींमागे "मास बेस' नाही, पण संघ परिवार आहे, त्यामुळे ते "भाजपा'चेही महाराष्ट्रातील "गडकरी' आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा अपमान, अवहेलना, उपेक्षा करण्यात, नितीन गडकरींना विकृत, आसूरी आनंद मिळतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. शिवसेना "शिवशाही'चे स्वप्न बघत असली तरी, "ब्राह्मण' गडकरी महाराष्ट्रात, "पेशवाई' स्थापन करू इच्छितात. त्यात त्यांना मुंडे यांचा अडथळा वाटतो. प्रमोद महाजन गेल्यापासून, गोपीनाथ मुंडे यांना, राजकारणातून देशोधडीला लावून, राजकीय वनवासात पाठवण्यावर, गडकरींनी लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच नाराज मुंड्यांवर, साध्या मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदावरून, सर्व पदांचा राजीनामा देण्याची वेळ आली होती.मुंड्यांची लहर करते कहरत्यामुळे भविष्याला लागे घरघरखा.गोपीनाथ मुंडे यांचेही स्वभाव दोष, एक राजकीय नेता म्हणून यशस्वी होण्यात अडथळा ठरणारे आहेत. खा.मुंडे यांचा स्वभाव विलक्षण तापट आहे. ते चिडतात म्हणण्यापेक्षा, एवढ्या तेवढ्याने भडकतात. जशी नितीन गडकरींना शिवराळ जीभ आवरत नाही. तसे खा.मुंड्यांना आपला राग आवरत नाही. मुंडे फार दूरचा विचार करून राजकारण करीत नाहीत. "मूड'वर त्यांचे शत्रू-मित्र ठरतात. लहरीवर राजकारणाची दिशा ठरते. रसिकतेची "बरखा बहार'सारखी "प्रकरणे' जाहीर करून खा.मनोहर जोशींसारख्या, "नाना फडणीसा'ने त्यांना कायमचे कलंकित करून ठेवले आहे. "महाजन युग' भाजपातून संपले आहे, आता प्रमोद महाजनांचे नातेवाईक म्हणून आपल्याला किंवा रेखा अथवा पूनम महाजनला, भाजपाकडून काही पद-प्रतिष्ठा मिळणार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करायला अद्यापही मुंडे तयार नाहीत.मुंड्यांना सापडेना उपायभाजपाशिवाय नाही पर्यायखरे तर खा.गोपीनाथ मुंडे आता, "भाजपा'त रहायला कंटाळले, त्रासले आहेत. त्यांना मान-स्थान-पद-प्रतिष्ठा देईल, असा पर्यायी पक्ष मिळाला तर, उद्या ते त्या नव्या पक्षात जातील. असा पक्ष महाराष्ट्रात फक्त छगन भुजबळ काढू शकतात. मुंडे त्यात आनंदाने जाऊ शकतात. पण छगन भुजबळांना ठाऊक आहे की, जोवर ते राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांच्या आश्रयाने, ओ.बी.सी.चे राजकारण करीत आहेत, तोवरच त्यांना राजकारणात, स्थान-मान-पद-प्रतिष्ठा आहे. फक्त ओ.बी.सी.चे राजकारण,"मराठा-महाराष्ट्रात' होऊ शकणार नाही. पण खा.गोपीनाथ मुंडे यांना, मायावती पद्धतीने ओ.बी.सी.+बी.सी.+इतर अहिंदू धर्मीय यांचा पक्ष, स्वतंत्रपणे उभा राहू शकतो, असे वाटते. पण अहंकारी, स्वकेंद्रित मायावतींचे नेतृत्व, मुंडेही स्वत: तसेच असल्यामुळे, ते स्वीकारू शकत नाहीत. राष्ट्रवादीतील "मराठा डॉमिनन्स' त्यांना स्विकारता येणार नाही. त्यामुळे भाजपात खितपत राहण्याशिवाय मुंड्यांपुढे पर्याय नाही."ओबीसी' राजकारणाचा पायाशेटजी भटजींचे प्रयास वायाखा.गोपीनाथ मुंडे यांना प्रमोद महाजनांनी भाजपात नेतृत्व दिले याचे एक कारण, ते त्यांचे मेहुणे होते हे आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे कारण, महाजनांना "भाजपा'ची महाराष्ट्रातील "शेटजी-भटजी' चा पक्ष, ही "संघा' चा शिक्का असलेली प्रतिमा बदलून, बहुजन समाजात "भाजपा'चा राजकीय पाया विस्तृत करायचा होता, हे देखील आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची मुंडे यांच्या उदयापासून ही तक्रार आहे की, संघ-जनसंघ आम्ही ब्राह्मणांनी टिकवला, वाढवला पण महाजनांनी मेहुण्याच्या ताब्यात, पक्ष देण्यासाठी, ओ.बी.सी.कार्ड वापरून, "भाजपा'तून ब्राह्मणांना हद्दपार केले. नितीन गडकरींची महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, हा महाजन युगात दबलेल्या ब्राह्मण लॉबीचाच कट होता. तो यशस्वी झाल्यानंतर आता, "भाजपा'वरील खा.मुंडे आणि इतर ओ.बी.सी.नेत्यांचे वर्चस्व मोडून, पुन्हा "भाजपा'त "पेशवाई' आणणे, हाच या संघप्रणित ब्राह्मण लॉबीचा प्रयत्न आहे."प्रभारी' म्हणजे शेपूट शेळीचेनुसतेच असते, नाही कामाचेखा.गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रभारी केल्यामुळे नितीन गडकरी त्यांना सूत्रसंचालन करू देतील, असे खुद्द खा.मुंडे यांना देखील वाटले नसणार. फक्त महाराष्ट्रातून खा.मुंडे यांना "भाजपा'ने तडीपार केल्याची जी खंत, महाराष्ट्रातील ओ.बी.सी.समाजात होती आणि खुद्द मुंडे राष्ट्रीय राजकारणात रमत नसल्यामुळे, अस्वस्थता अनुभवत होते, त्यातून मार्ग काढण्याचा एक प्रयत्न म्हणजे, खा.मुंडे यांची ही नियुक्ती आहे. "निवडणूक प्रभारी' ही सर्वच पक्षात दुखावलेल्या नेत्याला, "लॉलीपॉप' तोंडात कोंबून गप्प करण्यासाठी, दिलेली "पोस्ट' मानतात. या पदाची अवस्था, शेळीच्या शेपटासारखी असते. ना त्यामुळे माश्या उडवता येतात, ना अब्रू झाकता येते. खा.मुंडे यांना "निवडणूक प्रभारी' करण्याआधी नरेंद्र मोदी प्रभारी होते. त्यांनी भाषणे करण्याशिवाय दुसरे कुठे काय केले?गडकरींना नको सेना, हवी मनसेउद्धवऐवजी राज आवडे दिलसेखा.गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणूक प्रभारीपदामुळे, शिवसेना नेते फार खुश होण्याची शक्यता नाही. आधीपासूनच पक्षाध्यक्ष नितीन गडकरी हे, शिवसेनेशी युती तोडण्यास उत्सुक आहेत. गडकरींना अडवाणी-राजनाथसिंग यांनी सक्ती केली आहे, म्हणूनच केवळ सेना-भाजपा युती, अजून कागदोपत्री तरी टिकून आहे. जर नितीन गडकरींवर निर्णय सोपवला तर, आजच ते सेनेशी युती तोडून, राज ठाकरे यांच्या "मनसे'शी युती जाहीर करतील. किंबहुना शिवसेनेत गडकरींबद्दल प्रचंड संशय, संताप, अविश्र्वास आहे, कारण गडकरी यांच्या "मनसे' सुप्रिमो राज ठाकरे यांच्याशी, लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून, "गुफ्तगु' चालू आहे, हे आता गुपित राहिलेले नाही. शिवसेनेऐवजी जिथे "मनसे' उमेदवार होते तिथे "भाजपाई'नी "मनसे'ला मते दिली हे उघडकीस आल्यापासून भाजपाची मते गडकरींनीच कट करून फोडली, असे सेनानेत्यांना वाटते.ओ.बी.सी.बॅंकेचे चेअरमनशिवसेना नेत्यांसाठी अडचणखा.गोपीनाथ मुंडे यांचेही शिवसेना नेत्यांशी वाकडेच आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी मुंड्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी खा.गोपीनाथ मुंडे यांची, एवढी शाब्दिक व्यंगचित्रे, त्यांच्याच उपस्थितीत, वेळोवेळी जाहीर भाषणात रंगविली आहेत की, खा.मुंडे यांचा जळफळाट दरवेळी जाणवला आहे. शिवसेना नेत्यांचा मुंडे यांना विरोध या कारणाकरतादेखील आहे की, मुंडे स्वत:ला ओ.बी.सी.व्होट बॅंकेचे चेअरमन समजतात. तर शिवसेनेला ओ.बी.सी.हे आपल्या व्होट बॅंकेचे शेअर होल्डर वाटतात. मुंडे यांचे नेतृत्व खच्ची झाल्यास, राज्यातील ओ.बी.सी.आपल्याकडे एक गठ्ठा वळतील, असा शिवसेनेचा हिशेब आहे. त्यामुळे गडकरी परस्पर मुंड्यांचा काटा काढीत असतील तर, तो शिवसेना नेत्यांनाही हवा आहे आणि हे मुंड्यांना ठाऊक आहे.कसले कपाळाचे प्रभारीकारभार करणार कारभारीखा.गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रही ओ.बी.सी.नेतृत्वामुळे, महाराष्ट्रातला 37-38 टक्के असलेला मराठा समाज, भाजपापासून दूर गेला आणि राष्ट्रवादीच्या जवळ गेला आहे, असे "भाजपा'तील काही नेत्यांना वाटते. खा.मुंडे यांचे महत्त्व कमी केले तर, दुरावलेला हा मराठा समाज, भाजपाजवळ येऊ शकतो, या हिशेबानेही, मुंड्यांना विरोध करणारे "भाजपा' नेते कमी नाहीत. एकूण खा.गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्र भाजपाच्या निवडणूक यंत्रणेचे "प्रभारी' झाले असले तरी, "कारभारी' नितीन गडकरी राहणार, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जर "भाजपा'चा दारूण पराभव झाला तर, "कारभारी' असलेले गडकरी, "प्रभारी' असलेल्या गोपीनाथ मुंड्यांवर त्याचे खापर फोडून, त्यांना राजकीय वनवासात पाठवतील, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

No comments:

Post a Comment