Tuesday, July 14, 2009

महाराष्ट्राच्या राजकारणातील शहाणे विरुद्ध दीड शहाणे

महाराष्ट्रापुढील सर्वात मोठी समस्या कोणती? या प्रश्र्नाचे उत्तर आहे पत्रकार आणि पुढाऱ्यांमधील शहाण्यांपेक्षा दीड शहाण्यांची वाढलेली संख्या! पत्रकार तर स्वत:ला डेमी गॉड-प्रति ईश्र्वरच समजतात. परमेश्र्वराने स्पेशल कोट्यातून आपल्याला अकलेचे विशेष वाटप केले आहे अशी त्यांची ठाम धारणा असते. अकलेचा मक्ता फक्त आपल्यालाच काय तो दिला आहे आणि बाकी सारे अकलेचे अकालग्रस्त आहेत अशी त्यांची नामदार, खासदार, आमदार, पक्ष पदाधिकारी यांना ढोसबाजी चालू असते, जे संपादक कंत्राटी मजुरांवर अग्रलेख लिहून कंत्राटी सिस्टीम बंद करा म्हणून सरकारला सांगतात ते स्वत: संपादक म्हणून 3-3 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर मालकाचे जोडे पुसत असतात. याची त्यांना लाज वाटत नाही. आयुक्त एकाहून अधिक प्रश्र्न पत्रकार परिषदेत विचारू देत नाहीत म्हणून तोंड वेंगाडणारे हेच पत्रकार आपल्या मालकाला एकदेखील प्रश्र्न विचारू शकत नाहीत. कबुतराच्या खुराड्यात पत्रकारांना कोंबून धड श्र्वासदेखील घेता येत नाही, अशी अवस्था करणाऱ्या मालकाच्या एक्सप्रेसखाली हे मुकाट्याने आडवे पडतात. टेन पर्सेंटच्या जागांसाठी यांच्या रांगा वर्षावर घुटमळत असतात. वृत्तपत्र मालकाला भूखंड मिळवून देण्यासाठी पी.आर.ओ. म्हणून संपादक राबत असतात. पण राजकारण्यांना शहाणपणा शिकवण्याची संधी मिळाली की या गांडुळांचे लगेच फणा काढलेले शेषनाग होतात आणि हितसंबंधांच्या पुंगीच्या तालावर डोलत फुत्कारू लागतात. दीड शहाण्या संपादकांच्या जातकुळीचे दीड शहाणे नेते राजकारणातही खूप झाले आहेत. स्मशानातल्या लाकडे पुरविणाऱ्या ठेकेदाराने प्रवेशद्वाराकडे डेडबॉडी केव्हा येते याकडे नजर लावून बसावे तसे हे राजकारणी नेते आपल्याला जाळ पेटवायला इश्यू कुठून कसा येतो याची जणू वाटच पहात असतात. या दीड शहाण्यांना खरे-खोटे, हिताचे-अहिताचे अशी काही चाड नसते. यापैकी काहीजण विरोध करायचा. मग कुणीही काही करो या भूमिकेत असतात. तर काहीजण स्वभावाने विघ्नसंतोषी असतात. काही नेत्यांना पॉलिटिकल ऍसिडीटीचा त्रास असतो. त्यांच्या छातीत, पोटात कुणा ना कुणा विरुद्ध सतत जळजळ होत असते. ही जळजळ अन्य पक्षीयांइतकीच स्वपक्षीय अन्य नेत्यांबाबतही असते. काहींना तर पॉलिटिकल ऍलर्जी असते. कुणी काही निर्णय घेतला, कृती केली की यांना आलीच ऍलर्जी. यांचे उसळलेच पित्त. काही नेत्यांना पॉलिटिकल कॉन्स्टीपेशन म्हणजे राजकीय बद्धकोष्ठाचा विकार असतो. त्यांचे मन कधी मोकळेच होत नाही. ते सारखे कुंथत आणि खंतावत सुस्कारे टाकत असतात. याउलट काही नेत्यांना उठसूठ प्रतिक्रियांच्या उलट्या आणि पत्रकांंचे ढाळ जुलाब होत असतात. या असल्या विविध विकृती आणि राजकीय विकारांनी व्याधीग्रस्त झालेल्या दीड शहाण्या नेत्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण कलुषित, प्रदुषित झाले आहे आणि प्रत्येक गोष्टीचा निषेध आणि विरोध करण्याच्या आणि वेगळ्या सुचनांचे फाटे फोडून अपशकून करण्याच्या या नेत्यांच्या स्वभावामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा भांडकुदळ अप्पलपोट्या मत्सरी नेत्यांचा आपल्याच पायावर धोंडे पाडून घेण्यात पटाईत प्रदेश अशी होत आहे.
मध्यंतरी एका इंग्रजी दैनिकात एका चमत्कारिक सर्वेक्षणाचे धक्कादायक निष्कर्ष प्रकाशित झाले होते. आमची अशी कल्पना होती की, या निष्कर्षावर महाराष्ट्रात खळबळ उडेल, राजकीय नेत्यांचे अनुयायी निषेध करतील, पण तसे काही झाले नाही. कारण मराठी नेते इंग्रजी येत असून इंग्रजी वृत्तपत्रे वाचत नाहीत आणि बहुसंख्य राजकीय कार्यकर्त्यांना इंग्रजीच येत नसल्यामुळे त्यांना इंग्रजी दैनिक वाचण्याचा प्रश्र्नच उद्‌भवत नाही. त्यामुळे सहाजिकच या सर्वेक्षणावर मराठीजनांनी प्रतिक्रियाच दिली नाही. या स्फोटक सर्वेक्षणात 80 टक्के लोकांनी असे मत व्यक्त केले होते की, विद्यमान राजकीय नेतृत्वापैकी साठ वर्षांपुढील नेते वय, वार्धक्य, मृत्यू, गंभीर आजार अशा काही कारणांनी राजकारणातून कायमचे बाहेर गेल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातील अराजक संपणार नाही. आम्हाला मात्र तसे वाटत नाही. इंग्रजी वृत्तपत्राने उघडपणे छापले, अनेक मराठी माणसे खाजगीत कुणी ऐकत नाही ना अशी काळजी घेत सर्रास बोलत असतात. अमुक एक नेता मरण पावला तर ही पनवती जाईल, राजकारणाची नवी फे्रश विधायक मांडणी होईल, असे लाखो लोक, कानफटात बसणार नाही अशी खबरदारी घेत बोलत असतात पण असे घडत नाही. समाजाला नकोसा झालेला नेताही एका वर्गाला हवासा वाटत असतो आणि त्यामुळे तो नेता मृत्यू पावल्यामुळे रिलीफ अनुभवणाऱ्या लोकांच्या लक्षात येते की, त्या नेत्याच्या मृत्यूनंतर तो नेता ज्या वृत्ती-प्रवृत्ती-विकृतींचे प्रतिनिधीत्व करत होता त्याच प्रवृत्तींचा अधिक जहाल कहर तरुण नेत्याने त्याची जागा घेतली आहे आणि तो आधीच्या वयोवृद्ध थकलेल्या नेत्यापेक्षा अधिक कडवटपणे जहाल भाषेत आणि आक्रमक वृत्तीने तोच जुना अजेंडा राबवित आहे. हे आपण कामगार क्षेत्रात पाहिले आहे. उद्योग-धंद्यांविरुद्धच्या आंदोलनात अनुभवले आहे. भाषिक, प्रादेशिक, धार्मिक उग्रवाद्यांच्या आंदोलनातही जुन्या अतिरेक्यांची जागा त्यांच्या मृत्यू किंवा निवृत्तीनंतर नव्या जहाल तरुणांनी घेतल्याचे बघितले आहे. त्यामुळे बुजुर्ग दीड शहाण्या राजकीय नेते, संपादक यांचा अस्त झाला तरी दीडशहाण्यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी नवे तरुण दीड शहाणे पुढे येत राहणार हे आपणही गृहित धरायला हवे.
सध्या या दीड शहाण्या संपादक आणि राजकीय नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय शहाणपणावर लघुशंका करण्याचा उद्योग आरंभला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्राच्या राजकारणातील या घडीचे सर्वात सूज्ञ-तज्ञ-प्रज्ञ असे अनुभवी चाणक्य आहेत. त्यांना शहाणपणा शिकवणे म्हणजे उंदराने आपलेही दोन दात हत्तीच्या सुळ्यांसारखेच बाहेर आलेले असतात म्हणून आपणही त्याच्या जातकुळीतले आहोत असा दावा करून हत्तीला शहाणपणा शिकविण्यासारखे आहे.
शरद पवार हे राजकारणातील हिमालय असतील, तर महाराष्ट्रातील हे दीडशहाणे मलबार हिलवरील पाण्याची टाकी आहेत. शरद पवार जंबोजेट असतील तर हे दीडशहाणे जागीच फडकणारे कागदी बाण आहेत. शरद पवार राजकारणातील राजहंस असतील तर हे दीडशहाणे संपादक-नेते म्हणजे टर्की कोंबड्या आहेत. शरद पवार बावनकशी सोने असतील, तर हे ऍल्युमिनियमच्या भिकाऱ्यांच्या थाळ्या आहेत.
ज्यांची स्वत:ची पोरे त्यांचे ऐकत नाहीत आणि जे बायकोपुढे नंदी बैलासारखे बुगूबुगू करतात हे साऱ्या जगाला ठाऊक आहे असे संपादक-नेते जेव्हा आपल्या दीड शहाणपणाचे अकलेचे दिवे शरद पवारांच्यासमोर पाजळायला लागतात तेव्हा त्यांना हसावे की त्यांची कीव करावी तेच कळत नाही.
श्री शरद पवार साहेब एकही गोष्ट विचार केल्याशिवाय करीत नाहीत. दीड शहाण्यांना उमगत नाही अशाही त्यांच्या गूढ निर्णयांमागे दूरदृष्टी असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी पंतप्रधानपदाची आकांक्षा जाहीर केली. याबद्दल अकलेचे दिवाळे निघालेल्या अनेक संपादकांनी खूप टीका करून पवारांना हास्यास्पद ठरविण्याचा प्रयत्न, त्यांची टर उडवून केला. पण या गाढवांना पवारांचे राजकीय डावपेच काय कळणार? मराठी मावळ्यांच्या गनिमी काव्याचे पोवाडे गाणाऱ्या मराठी बोरुबहाद्दर संपादकांना शरद पवार साहेबांच्या पंतप्रधानपदाच्या घोषणे मागेही काही गनिमी कावा असेल अशी शंकादेखील येऊ नये हे त्यांच्या बालीश फुलीशपणाचे द्योतक आहे.
असे पहा की शरद पवारांना हे पक्के ठाऊक होते की, आपले 8-10 खासदार निवडून येणार आणि या बळावर कुणी पंतप्रधान होत नाही. पण त्यांनी पंतप्रधानपदाचा मुद्दा स्वत:बाबत उपस्थित करून देशातल्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या उसनभर नेत्यांना दावा करण्यासाठी रिंगणात खेचले. परिणाम असा झाला की डझनभर पक्षांचे नेते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहेत म्हटल्यावर उद्या हे एकत्र येऊन काय राज्य करणार? या विचाराने 50 कोटी मतदार बिथरले आणि एकाच पक्षाला बहुमत देऊया या विचाराने त्यांनी कॉंग्रेसला मतदान केले. कॉंग्रेसला भरघोस मते पडण्याचे एकमेव कारण विविध पक्षात विशेषत: तिसऱ्या आघाडीत पंतप्रधानपदासाठी डझनभर नेत्यांमध्ये भांडणे जगजाहीर करण्यासाठी पवारांनी खेळलेली खेळी हेच आहे. म्हणजे तिसऱ्या आघाडीच्या पराभवाचे खरे शिल्पकार शरद पवारच आहेत. कॉलरा, देवीसारख्या रोगांच्या प्रतिबंधक लसी तयार करताना त्या रोगाचे मृत जंतू टोचून शरीराची प्रतिकार क्षमता वाढवून खऱ्या जंतुंना नेस्तनाबूत केले जाते हेच आहे. शरद पवार या चाणक्याने पंतप्रधानपदाची मागणी अशीच लसीसारखी टोचली आणि कॉंग्रेसला बहुमताकडे नेले. हे इतर दीडशहाण्यांना कळले नाही, तरी सोनिया गांधींना ठाऊक होते म्हणूनच त्या धूर्तपणे पवारांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्यावर इतर पक्षांच्या मूर्ख नेत्यांना बळी पडताना पहात, एन्जॉय करीत होत्या.
शरद पवार जेव्हा एकदा डाव खेळतात तेव्हा तो यशस्वीच करतात. शरद पवारांच्या लोकसभा निवडणुकीतील गनिमी काव्याचे सर्वात मोठे यशस्वी उदाहरण म्हणजे त्यांनी शिवसेनेची लावलेली वाट हे आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे "समर्थ रामदास' महागुरु शरद पवार हे होते हे आता संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाच्या मंत्र्यांनी उघडपणे विरोध दर्शवीत आतून गृहखाते पोलीसदल राज ठाकरे यांना "हिरो' बनविण्यासाठी कसे शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार वापरले हे उघडे गुपित आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस विरोधातली मते फोडायची असतील तर राज ठाकरे यांना जाहीर विरोध आघाडी सरकारने करावा आणि दुसरीकडे त्यांना मोठे करण्यासाठी लुटुपुटीचे आरोप, खटले, अटकेची नाटके करावीत हे संपूर्ण प्लॅनिंग चाणक्य पवारसाहेबांचे. एका वर्षात राज ठाकरे आणि मनसे दोन्ही शिवसेनेला शह देण्याइतके मोठे करण्याचे काम "बाहेरून' केल्यावर शरद पवारांनी थेट शिवसेनेच्या आतून आपले राजकीय सुरुंग पेरले.
"मनसे'चे शिल्पकार शरद पवार हेच आहेत, राज ठाकरे यांचे पडद्यामागील "गॉडफादर' शरद पवार हे आहेत हे ठाऊक असूनही उद्धव ठाकरे चक्क राष्ट्रवादीच्या जाळ्यात स्वत:हून अलगद जाऊन बसले. सोनिया कॉंग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुका लढवायचा हा निर्णय झालेला असताना शिवसेनेची राजकीय विश्र्वसनीयता खच्ची करण्याचा आणि भाजप आणि शिवसेनेत संशयाची पाचर मारण्याचा गेम शरद पवारांनी बुद्धिबळाच्या जोरावर असा बजावला की, भाजपाचे शिवसेना नेत्यांच्या राष्ट्रवादीसोबतच्या चुंबाचुंबीमुळे अस्वस्थ झालेले मतदार नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत होलसेलमध्ये "मनसे'कडे गेले. राष्ट्रवादी सोबतची चुंबाचुंबी शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत महागात पडली. जर शरद पवारांनी उद्धवजींच्या भाबड्या उताविळेपणाचा असा लाभ घेऊन त्यांना सत्तेच्या मृगजळात ढकलले नसते तर शिवसेनेच्या जागा अजून वाढल्या असत्या. कॉंग्रेसला मुंबईत लोकसभेत मिळालेले यश हे पवारसाहेबांच्या "मनसे'ला मोठे आणि शिवसेनेला छोटे करण्याच्या स्ट्रॅटेजीत आहे हे दीडशहाण्या नेत्या-संपादकांच्या लक्षात आले नाही हे त्यांचे दुर्दैव!
वरळी-वांद्रे सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव देण्याची सूचना करून शरद पवारांनी एक पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक मारला आहे. त्यामुळे विलासराव देशमुखांसारख्या शहाण्या नेत्याच्या तोंडावर सुद्धा थेट दिल्लीवरून आता पट्टी बसली आहे. शरद पवारांनी शरणागती पत्करली, माघार घेतली हा, दीडशहाण्या नेत्यांनी लावलेला शोध म्हणजे त्यांना शरद पवार काय चीज आहे हे न कळल्याचाच पुरावा आहे. शरद पवारांनी सोनियाजींच्या उपस्थितीत राजीव गांधींचे नाव ब्रिजला देण्याची सूचना करून एका दगडात चारपाच पक्षी मारले आहेत. सोनियाजींचे गुडविल मिळवून संघर्षाचे वातावरण संपुष्टात आणले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी विधानसभा एकत्र लढवणार याची निश्चिती केली आहे. केंद्रातील आपले महत्त्व वाढवले आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. उद्या गरज पडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस आय पक्षात विलीन करण्याचा पर्याय शोधून ठेवला आहे. राहूल गांधींचे "पालकत्त्व' स्वीकारण्याच्या दृष्टीने आपल्या गांधी घराण्यासोबतच्या नव्या भूमिकेचा उच्चार केला आहे. उद्या राहूल गांधींनी पंतप्रधानपद एवढ्यात स्वीकारायला नकार दिला आणि मनमोहन सिंग निवृत्त झाले, तर राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करून पंतप्रधानपदाचाही पर्याय त्यांनी स्वत:साठी मोकळा केला आहे. पण चाणक्य शरद पवार साहेबांचे हे राजकीय चातुर्य दीडशहाण्या संपादक नेत्यांना कसे उमगणार? दुर्दैवाने अशा दीड शहाण्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही!

No comments:

Post a Comment