Friday, July 24, 2009

मुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
मुंबईकरांचे लई नाही मागणे, सुसह्य करा रोजचे जगणे
विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळे येत जातील तसे राजकीय नेते, व्यावसायिक वक्ते आणि मैदानात उतरलेले कार्यकर्ते या निवडणुकीमधील "कळीचा मुद्दा-मुख्य इश्यू' काय यावर नाना प्रकारचे अंदाज व्यक्त करू लागतील. वृत्तपत्रांमधून वाचकांचे कौल मतदान कोणत्या मुद्यावर होणार? या प्रश्र्नावर आजमावले जातील. टी.व्ही.चे चॅनल्स, एस.एम.एस.च्या माध्यमातून निवडणूक कोणत्या प्रश्र्नावर लढली जाते आहे याचे तर्क मांडतील.
मग कुणी म्हणतील की आगामी विधानसभा निवडणूक भाषिक अस्मितेच्या मुद्यावर लढली जाईल. लगेच या युक्तिवादाचा प्रतिवाद करणारे पुढे येतील. म्हणतील कुठल्या एका भाषेची अस्मिता हा विषय घेणाऱ्याला मुंबईतील मतदारांचे व्यापक समर्थन कसे मिळणार? कारण मुंबईत कुठल्याच भाषिक वर्गाचे बहुमत नाही. म्हणजे ज्याला कुणाला निवडणूक नुसती लढवायची नसून जिंकायची आहे त्याला आपला पाया एका नव्हे अनेक भाषिकांमध्ये घालावाच लागणार. मुंबईच्या लोकसंख्येची भाषिक वर्गवारी जर 2001 च्या जनगणनेच्या आधारे पाहिली तर मराठी भाषिक सुमारे 23 टक्के, हिंदी भाषिक सुमारे 43 टक्के, उर्दू भाषिक सुमारे 17 टक्के, इंग्रजी भाषिक सुमारे 7 टक्के, गुजराथी भाषिक 9 टक्के आणि दक्षिण व इतर भाषिक सुमारे 1 ते 2 टक्के अशी मुंबईची भाषिक रचना आहे. हिंदी भाषिक म्हणून जरी गट 43 टक्के एवढा मोठा असला तरी त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, बांगलादेशी असे भाषनिहाय बोली आणि प्रदेशानुसार पोटभेद पडतात. भाषा हिंदी असा उल्लेख असला तरी त्या हिंदी भाषिकातही प्रादेशिकतेचे रंग स्वतंत्रपणे आहेत ते विचारात घ्यावे लागतात.
याचा अर्थ असा की कुठलाही पक्ष किंवा उमेदवार त्या त्या भाषेच्या जनसमुदायासमोर बोलताना त्या त्या भाषिकांच्या अस्मितेला आवाहन करीत असला, भाषिक अहंकाराला त्यांची मने आणि पर्यायाने मते जिंकण्यासाठी फुंकर घालीत असला तरी तो मनातून हे ओळखून असतो की केवळ याच एका भाषिकांच्या भरवशावर मी राहिलो तर निवडणुकीत माझे काही खरे नाही. किंबहुना मी वाजवीपेक्षा जास्त भर देऊन या भाषिकांच्या सभेत बोललो आणि ती बातमी किंवा माझे बोलणे इतर भाषिकांमध्ये पोहचले तर मला त्यांच्या नाराजीला तोंड देण्याची पाळी येईल.
मग चतुर राजकारणी वक्ता एका भाषेला आई म्हणतो दुसरीला मावशी तिसरीला आत्या तर चौथीला काकी. श्रोतेही काही कमी बिलंदर नसतात. त्यांनाही कळत असते की वक्ता राजकीय नेता आहे त्यामुळे तो "गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास' असे दोन्ही दगडांवर पाय ठेवून "चित भी मेरी, पट भी मेरा, छाप आया तो मै जिता, कॉंटा आया तो तू हारा' अशी चलाखी करतो आहे. पण प्रेमात आणि युद्धात तसेच निवडणुकीत सारे काही क्षम्य असते. असे आता उमेदवारच नव्हे तर मतदारही मानू लागले असल्यामुळे कुणी नेत्याच्या-वक्त्याच्या या भाषिक दुटप्पीपणाला आक्षेपही घेत नाही किंवा त्यामुळे हुरळून मतेही देत नाहीत.
केवळ भाषिक भावनेला आवाहन करून मते मिळवण्याचे दिवस कधीच संपले. हे ज्या नेत्यांना अजून उमगलेले नाही ते कुठलाच मुद्दा, मते मागण्यासाठी किंवा भावना चेतवण्यासाठी सापडला नाही की शिळ्या कढीला ऊत आणावा, विझलेल्या निखाऱ्यावरची राख फुंकून ठिणगी पेटते का पहावे, सूत्र तुटलेल्या पतंगाला शेपटी धरून उडविण्याचा प्रयत्न करावा तसे भाषिक अहंकार, अस्मिता यावर गदारोळ उठवण्याचा प्रयत्न करून बघतात. पण आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व भाषिक सरमिसळ बघता याविषयावर, मुद्यावर ना कुणा पक्षाला मते मिळतील ना उमेदवाराला.
गेल्या लोकसभा, निवडणुकीत बदलत्या काळाची पावले ओळखू न शकलेल्या काही पक्षांनी, नेत्यांनी, उमेदवारांनी भाषिक अस्मिता, अहंकार हा निवडणुकीचा मुद्दा करून पाहिला पण तो साफ अपयशी ठरला. अर्थात आश्र्चर्याची गोष्ट अशी की आजही त्या मुद्याला हवा देण्याचा आणि काही साधते का बघण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पण ही गोष्ट आता पक्की लक्षातच ठेवायला हवी की महापालिका निवडणूक भाषिक आवाहनावर जिंकणे कुणालाही शक्य नाही. किंबहुना कुठल्या एका भाषिकांचा अनुनय करताना इतर भाषिकांची नाराजी ओढवून घेण्याचे प्रसंग अधिक येणार!
मग जर भाषिक आवाहनावर ही विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे तर काय धार्मिक आवाहनावर ही निवडणूक कुणी जिंकू शकेल काय? अर्थातच याही प्रश्र्नाचे उत्तर नाही असेच आहे. लोकसभा निवडणूक ही स्थानिक दैनंदिन समस्या, प्रश्र्न, अडचणी, सोयी-सुविधा, नागरी साधने यांच्याशी बिलकुल निघडीत नसते तर एका व्यापक राष्ट्रीय धोरणासाठी तिथे मतदान होते. अनेक पक्षांना, नेत्यांना तिथे असे वाटले होते की एका विशिष्ट धर्माच्या भावनैक आवाहनावर मते मिळवता येतील. आणखी एका वर्गाला अमुक एकामुळे आपला धर्म धोक्यात आहे अशी आवई उठवून विशिष्ट धर्माच्या मतदारांना मतदानासाठी एक गठ्ठा बांधता येईल असे वाटले होते. जवळ जवळ प्रत्येकच धर्मात एक हितसंबंधी गट असा असतो की जो त्या धर्माच्या बाजूने बोलण्यासाठी कुठल्यातरी दुसऱ्या धर्माला विरोध करीत असतो आणि तमक्यामुळे आपला धर्म धोक्यात असल्याची आवई उठवीत असतो. पण भारतीय परंपरा, संस्कृती आणि कित्येक हजार वर्षांपासून सातत्याने चालू असलेले सामाजिक अभिसरण यांचा प्रभाव भारतीय जनमानसावर इतका जबरदस्त आहे की इथे कुठल्याही धार्मिक भावनेला चेतवून निवडणुका जिंकणे आजवर कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही आणि धार्मिकतेचा दावा करणाऱ्या पक्षांनाही सत्तेवर इतरांच्या मदतीने यावे लागले आणि सर्वसमावेशकतेने सर्व धर्मियांना आश्र्वासित करावे लागले. मुंबई महानगर हे मन:पूर्वक सर्व जाती, धर्म, पंथीयांचे सामाजिक अभिसरण जपणारे आहे. इथे जातीयता, कट्टर पंथीय धार्मिकता, दुजाभाव, पक्षपात, विषमता नाही हे तर मुंबईकडे ग्रामीण भागातून येणाऱ्या दलित, पीडित, उपेक्षित अशा लाखो लोकांचे भारतभरातून आकर्षण आहे. मग हे मुंबई शहर धार्मिकतेला जर लोकसभा निवडणुकीत थारा देत नाही तर विधानसभा निवडणुकीत धार्मिक आवाहनाला कोण प्रतिसाद देणार? अर्थातच येत्या विधानसभा निवडणुकीत भाषिक तशाच धार्मिक मुद्यावर मतदारांना आकर्षित करता येणे अशक्य आहे. मुंबई हे जातीयता न पाळणारे शहर आहे. इथला मुंबईकर जातीपातीच्या जंजाळातून सार्वजनिक जीवनात तरी मुक्त आहे. त्यामुळे धार्मिक नाही. तशीच जातीय भावना निवडणुकीत भडकवणे कुणाला राजकीयदृष्ट्याही परवडणारे नाही. मग निवडणुका काय मुद्यावर लढल्या जाणार? तर तो मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य आम जनतेला जीवन सुसह्य आणि सुखद करणारा पक्ष किंवा उमेदवार कोण वाटतो यावर मतदान होणार आहे. मुंबईकरांना भव्य दिव्य स्वप्नांची ओढ नाही. शांघाय, हॉंगकॉंग, सिंगापूर अशा एखाद्या शहराची डुप्लीकेट प्रतिकृती होण्यात मुंबईकरांना स्वारस्य नाही. मुंबईकरांचे मागणे एकच आहे आमचे दैनंदिन जीवन सुसह्य होईल एवढे बघा. सुसह्य जीवनाची मुंबईकरांची अपेक्षा कल्पना काय आहे? हे जो पक्ष आणि उमदेवार ओळखेल आणि आपण ते करू असा विश्र्वास निर्माण करील त्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विजय येत्या विधानसभा निवडणुकीत पक्का आहे.
मुंबई शहराचे व्यक्तिमत्त्व काही निराळेच आहे. एखाद्या व्यक्तीला आपण अष्टपैलू म्हणतो तशी मुंबई आहे. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तिच्या लक्षात मुंबईत काळाच्या ओघात होत गेलेले बद्दल प्रथमदर्शनी आणि सहजपणे लक्षात येत नाहीत पण बाहेरून, अधुनमधून बऱ्याच वर्षांनी मुंबईत आलेली व्यक्ती दोनपाच वर्षातही मुंबईत झालेले बदल पाहून आश्र्चर्यचकित होते. तिला आमुलाग्र बदलत चाललेली मुंबई पाहून धक्काच बसतो. त्याला दरवेळी मुंबई अधिक उंच, अधिक देखणी, अधिक आकर्षक आणि अधिकच श्रीमंत वाटते. पण हा मुंबईचा चेहरा नाही तो उत्कृष्ट मेक-अप्‌ केलेला आणि दोष लपवून फक्त दर्शनीय बाजू अधिक प्रदर्शनीय केलेला मुखवटा आहे. मुंबई सुंदर आहे तेवढीच कुरुप आहे. श्रीमंत आहे तशीच ती गरीब आहे. सुव्यवस्थित आहे तशीच अव्यवस्थित आहे. हवीशी वाटणारी आहे तेवढीच नकोशी होणारी आहे. एखाद्या वर्तमानपत्रात जसे फ्रंटपेज पासून स्पोर्टस्‌पेजपर्यंत आणि पेज थ्रीपासून क्राईम स्टोरीपर्यंत सर्व प्रकारचा मसाला ठासून भरलेला असतो, तशी मल्टी डायमेन्शनल मल्टीपरपज मल्टीपल प्रॉब्लेम्स असलेली मुंबई आहे. अशी ही मुंबई ज्याला कळली त्याला ब्रह्मज्ञानप्राप्तीचा आनंद व्हायला हरकत नाही. जगात आहे आणि मुंबईत नाही असे काही नाही. मुंबईत आहे पण जगात नाही असे मात्र खूप काही आहे.
पूर्वी नदीकाठाने वस्ती वाढायची. एकेक परिसर एकेका व्यवसायाची माणसे वाटून घेतल्यासारखी आपली जात, धर्म, भाषा यांचा दुवा पकडून घरे, झोपड्या बांधायची. मुंबईत नदी नाही. नदीची उणीव मुंबईची लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वे लाईन्सनी भरून काढली आणि रेल्वेच्या पूर्व-पश्र्चिमेला वसाहती होत गेल्या. रेल्वे पश्र्चिम असो की मध्य पण आणखी एक वैशिष्ट्य 1990 पर्यंत सरसकट आढळायचे आणि ते म्हणजे रेल्वेच्या पश्र्चिम तिरावर अधिक सधन सुखवस्तू, उच्चभ्रू, वर्गाची प्रतिष्ठित मानली जाणारी वस्ती वाढायची तर रेल्वेच्या पूर्वेला कष्टकरी, श्रमिक, कामगार, कनिष्ठ आणि मध्यम वर्गीयांची स्थानिक मराठी भाषिकांची वस्ती वाढत राहिली. 1990 नंतर मुंबईतले कामगार केंद्रित उद्योगधंदे बंद होत गेले आणि त्याऐवजी व्हाईट कॉलर जॉबस्‌ हजारोंनी निर्माण झाले. बांधकाम आणि गृहनिर्माण व्यवसायात अभूतपूर्व तेजी आली. दिसेल, मिळेल तिथे भूखंडांवर उत्तुंग इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्या चाळी, वाडे, इमारतींच्या जागी येणाऱ्या या गगनचुंबी इमारतींमध्ये नवश्रीमंत वर्ग रहायला आला आणि आधी त्या भूखंडावर राहणारे गरीब झोपडपट्टयांमध्ये तर मध्यमवर्गीय डोंबिवली-कल्याण-बदलापूर-वसई-विरार-भाईंदर असे उप-उपनगरात मिळणारी भाड्याची किंवा कमी किंमतीची घरे यात स्थलांतरित झाले. यामुळे मुंबईचे बाह्यस्वरूप तर बदललेच पण अंतरंग, अंतर्गत रचनाही बदलली. मुंबई समजावून घ्यायची असेल त्याला लोकवस्तीत झालेले आर्थिक सामाजिक स्थित्यंतर आणि स्थलांतर हाही विषय समजावून घ्यायला हवा.
2000 सालानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे निकाल राजकीय पक्षांना आणि अंदाज बांधणाऱ्या व्यावसायिक पंडितांना धक्कादायक वाटले याचे कारण भूगर्भातील हालचालींची नोंद न घेणाऱ्यांना जसा भूकंपाचा मानसिक धक्का बसतो तसा मुंबईअंतर्गत लोकप्रवाहातील मानसिक शारीरिक स्थित्यंतर, स्थलांतराची नोंद न घेणाऱ्यांना निवडणूक निकाल अनपेक्षित वाटले. मुंबई शहरात अध्यात्मिक कार्यक्रम-उपक्रमांना लाखो लोक गर्दी करीत असले तरी या महानगराला ध्यास, आकर्षण आणि ओढ आहे ती भौतिक सुख-सोयी-सुविधा-साधनांची गरीबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला उपलब्ध संधी, संपत्ती आणि साधनांचा पुरेपूर उपभोग घ्यायचा आहे. आधी स्वार्थ मग जमला तर परमार्थ या दृष्टीकोनाचा सर्वच चंगळवादी संस्कृतीत प्रभाव सर्वत्र असतो. श्रीमंत माणूस बारमध्ये जाऊन चैन करतो, ती न परवडणारा त्याला परवडेल अशा ठेल्यावर कंट्री पिऊन नशा करतो. दोघांची ओढ एकच असते-नशा! मल्टीप्लेक्स आले तरी अजून जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स हाऊसफुल करणारा आणि झोपडपट्‌ट्यांमधल्या गोडाऊनवजा व्हिडीओ पार्लरमध्ये असल्यातसल्या मसालेदार अनसेन्सॉर्ड फिल्म्स्‌ 5-10 रुपयात पाहणारा वर्ग हजारोंच्या संख्येने आहेच. हायफाय शॉपिंग मॉलमध्ये लाखो रुपये खर्च करणारे कस्टमर आहेत. तसेच छोट्या-मोठ्या दुकानात शेकडो रुपये कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चैनीची प्रसाधने यावर उधळणारा वर्गही आहेच. मुंबई शहरावर झालेला चंगळवाद, भौतिकता आणि आर्थिक मोहाची जादू याचा सर्वात मोठा परिणाम राजकारणावर झाला आहे हे अद्याप अनेक राजकीय पक्षांच्या आणि प्रस्थापित परंपरागत साच्यातून विचार करणाऱ्या नेत्यांच्या लक्षातच आलेले नाही.
चंगळवाद मनात असतो. ज्यांना तशी संधी, संपत्ती मिळते त्यांच्या चंगळवादाचे दर्शन-प्रदर्शन आपण बघतो. पण संधी आणि संपत्ती किंवा साधनांअभावी अव्यक्त राहिलेला पण मनात, शरीराच्या रोमरोमात भिनलेला चंगळवाद, सुखसाधनांचा अनिवार मोह लाखो मुंबईकरांची भूमिका ठरवीत असतो. अनेक विचारवंत, बुद्धिमंत मुंबईतील रस्त्यावर येऊन होणारी उग्र, तीव्र आंदोलने कुठे गेली? असा प्रश्र्न हल्ली वारंवार विचारताना दिसतात. याचे एक उत्तर असं आहे की एकेकाळी आंदोलनात पुढे असणारा "नाही रें'चा वर्ग आता प्रस्थापित "आहे रें'मध्ये गेला. आणि आज "नाही रें' मध्ये मोडणाऱ्या वर्गाचे सारे लक्ष आपण कधी "आहे रें'मध्ये जातो याकडे इतके लागलेले आहे की त्यांनाही आता आंदोलन करताना अपरिहार्यपणे सोसावी लागणारी झळ, त्रास, मनस्ताप यातले काही नको आहे. त्यांनाही स्थिर, सुरक्षित, सुखरूप आणि शारीरिक-मानसिक क्लेशाशिवाय आहे त्या परिस्थितीत शांतपणे जगायचे आहे. संघर्षाऐवजी सहभागातून, झगडण्याऐवजी समन्वयातून त्यांना मिळेल तेवढे हवे आहे.
सर्वसामान्य माणूस संघर्ष, आंदोलनं, चळवळी, मारामाऱ्या, द्वेषभावनेवर आधारित जाती-धर्म-भाषिक वैमनस्य यापासून स्वत:ला, कुटुंबाला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात इतका आहे की त्याचमुळे कुठला असा द्वेष-मत्सर-वैमनस्य यावर आधारित निवडणूक प्रचार आता प्रभावी ठरेनासा झाला आहे. उलट जात-भाषा-धर्म-प्रदेश यातील द्वेष आणि वैमनस्याचे राजकीय भांडवल करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांमुळे आपले आर्थिक हितसंबंध, सुख, शांती, स्वास्थ्य धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे आता मुंबईचे मतदार कुणातरी विरुद्ध असणाऱ्या पक्ष किंवा उमेदवारांऐवजी कुणाच्या तरी, कशाच्या तरी बाजूने मुख्यत: स्थैर्य आणि सुबत्ता यांची संधी आश्र्वासित करणाऱ्या पक्ष व उमेदवारांच्या मागे जाण्याच्या मन:स्थितीत आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत वादाऐवजी संवादावर आणि संघर्षापेक्षा समन्वयावर भर देणाऱ्या पक्षांना सुख-समृद्धी-सुरक्षितता यांचा ध्यास लागलेल्या मुंबईकरांचा कौल मिळण्याची शक्यता आहे. उमेदवाराची जात, धर्म, भाषा, प्रदेश याला आजवरच्या निवडणुकांमध्ये बरेच महत्त्व असे. शक्यता अशी आहे की येत्या निवडणुकीत मतदार जात, भाषा, धर्म, प्रदेश याऐवजी स्थैर्य आणि सुरक्षितता, सुख-सोयी-सुविधांची हमी यावर मते देतील.

No comments:

Post a Comment