नगरसेवकांनी "गुंड' दिसायलाच हवे का?
महाराष्ट्राच्या कुठल्याही नगरपालिका, महापालिका क्षेत्रात फिरताना रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर, चौकाचौकात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांची होर्डिंग्ज लागलेली दिसतात. राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याचा फोटो बॅकग्राऊंडला असतो आणि खाली स्थानिक नेत्या-कार्यकर्त्या-नगरसेवकाचा जंबो फोटो आणि त्याखाली पुन्हा शेळीने टाकलेल्या लेंढ्या असाव्यात तसे छोट्या कार्यकर्त्यांचे, शुभेच्छुकांचे फोटो या होर्डींग्जवर असतात. निमित्त काहीही असते. चालते. कधी यांनी जनतेला कुठल्यातरी प्रसंगानिमित्त शुभेच्छा दिलेल्या असतात. कधी जनतेच्यावतीने यांच्याच बगलबच्च्यांनी, चमच्यांनी, पंटरलोकांनी त्या नेत्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. या सर्व होर्डींग्जवर या मंडळींचे जे फोटो झळकत असतात ते पाहिल्यावर असा प्रश्र्न पडतो की सभ्य, सुसंस्कृत जंटलमन दिसणारी माणसे नगरसेवक म्हणून निवडूनच येत नाहीत का? राजकीय कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर सारे गुंड आणि गॅंगस्टरच भरले आहेत का?
याचे महत्त्वाचे कारण नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते यांच्यात "दादा', "भाई', "अण्णा', "बॉस', "साहेब' म्हणवून घेणाऱ्या गुंड आणि गॅंगस्टर्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दारू, मटका,. लेडीज सर्व्हीस बार, पेट्रोल-डिझेल भेसळ, जकात चोरी, वर्गणी आणि खंडणी यांच्याशी संबंधित "माफिया'शी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने संबंध आहे, हे आहेच. पण त्याहीपेक्षा पोस्टर, होर्डिंग्जवरील हे नगरसेवक, कार्यकर्ते यांना "भाई', "दादा', "गुंड' दिसण्यात गैरतर वाटतच नाही. उलट भूषण वाटते हे देखील आहे. "साऊथ'च्या चित्रपटातील एखाद्या नटासारख्या फिल्मी पोझेसमधील यांचे फोटो पाहताना आपण एखाद्या "वॉन्टेड' गुन्हेगाराचेच पोस्टर पाहतो आहोत, असे वाटते. आमचे एक स्नेही "मेक ओव्हर' आणि "इमेज मॅनेजमेंट' एक्स्पर्ट म्हणून काम करतात. ते कॉम्प्युटरवर तुमच्या चेहऱ्याची, वेशभूषा, केशभूषा, परिधान केलेले कपडे यांची "कॉंबीनेशन्स' तयार करून, मिशी, दाढी, केस, अलंकार, घड्याळ, ब्रेसलेट, अंगठ्या यात कमी-जास्त फेरबदल करून तुमचे तेच रूप, व्यक्तिमत्त्व आमुलाग्र बदलता येते. "फर्स्ट इंप्रेशन' तुम्हाला हवे तसे निर्माण करता येते. समोरच्याच्या मनात तुम्हांला तुमची हवी तशी प्रतिमा निर्माण करता येते. समोरच्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीला छायाचित्रात किंवा प्रत्यक्षात तुम्ही कसे वाटायला, दिसायला हवे तशी तुमची प्रतिमा तुमच्या "असेट ऍण्ड लायबलीटीज् ऑफ पर्सनॅलिटी' म्हणजे तुमच्या दिसण्या-असण्यातील जन्मजात किंवा स्विकृत गुणदोषांचा विचार करून मेकअप् न करताही बदलता येते.
आमचे इमेज मॅनेजमेंट एक्स्पर्ट मित्र एकदा आमच्या बरोबर होते. आम्ही गाडीने रस्त्यावरची ती तसली होर्डींग्ज पहात चाललो होतो. चर्चा निघाली ती होर्डिंग्जवरच्या "डरावन्या' चेहऱ्यांची. भरकटलेले केस. फिस्कटलेली दाढी. दरोडेखोरासारखी क्रूर, टेरर नजर. गळ्यात साखळदंडासारख्या सोन्याच्या चेन्स. हातात बेड्या असाव्यात तशा ब्रेसलेटस्. बोटात खड्यांच्या अंगठ्यांचा जुलूस. चेहऱ्यावर भाईगिरीचे भाव. "गाठ माझ्याशी आहे' अशी तंबी देण्याची झलक. फोटो पाहिल्यावर भीती, दहशत वाटावी, निदान कसली भयानक चेहऱ्याची आणि गुंड व्यक्तिमत्त्वाची माणसे या शहरातील राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची सूत्रे सांभाळतात. हे "बघून' अस्वस्थता सभ्य, सामान्य माणसाच्या मनात यावी असा सगळा मामला जागोजागी होर्डिंग्जवर होता. आमचे मित्र म्हणाले की, "हे गुंड चेहरे सभ्य, सुसंस्कृत निदान भीती दहशत वाटणार नाही, असे करता येणे शक्य आहे. मी "अशा' खतरनाक चेहऱ्याच्या काही नगरसेवक कार्यकर्त्यांना असा "मेकओव्हर' करून "जंटलमन लुक' देण्याची "ऑफर' दिली होती. पण तुम्हाला आश्र्चर्य वाटेल या नगरसेवकांनी मला सांगितले की, आम्ही जसे "खतरनाक' दिसतो. तसेच दिसायला हवे. आमच्यावर लोकांनी प्रीती करावी, अशी आमची अपेक्षाच नाही. त्यांना आमची भीती, दहशतच वाटली पाहिजे, तरच ते आमचे ऐकतील, आमच्यापुढे झुकतील, आम्हाला आव्हान देण्याची हिंमत करणार नाहीत.'
पुढे ते "मेकओव्हर' इमेज मॅनेजमेंट एक्स्पर्ट म्हणाले की,"मी पुढाकार घेऊन काही नगरसेवकांचे फोटो घेऊन ते कॉम्प्यूटरवर त्यांचा "लूक' बदलून त्यांना जंटलमन इमेज देऊन दाखवले. त्या नव्या चेंज केलेल्या फोटोत तोच गुंड दिसणारा नगरसेवक दाढी-मिशांची थोडी छाटणी, डोक्यावरील केसांची नवी मांडणी, गळ्यातल्या सोन्याच्या जाड चेन्सच्या जुडग्याऐवजी एखादीच डिसेंट चेन आणि लोढण्यासारख्या लोंबणाऱ्या पेंडणच्या जागी त्यात देव किंवा बाबाचे छोटे स्मार्ट पेंडण, हातात बेडीऐवजी रेखीव नक्षीचे एखादे ब्रेसलेट, शर्टाची, कुडत्याची खुली बटणे टाळून लावलेली वरपर्यंतची बटणे अशी नवी प्रतिमा आम्ही त्या नगरसेवकांना दाखवली. त्यावर ते नगरसेवक फोटो पहात म्हणाले की,"यात आम्ही चांगले स्मार्ट जंटलमन दिसतो. पण नगरसेवक दिसत नाही. नगरसेवक असा मध्यमवर्गीय, पांढरपेशा, सभ्य, बॅंक मॅनेजर दिसला तर लोक त्याला गुंडाळून ठेवतील, अधिकारी धाब्यावर बसवतील, सहकारी, कार्यकर्ते, पंटर चॅलेंज करतील. आम्ही तुमच्या आयडीयेमुळे प्रेक्षणीय दिसू हे खरे पण तसे दिसून महाराष्ट्राच्या गावात-गल्लीत राजकारण करता येणार नाही.'
असे दिसते आहे की, ज्या नगरसेवक कार्यकर्त्यांची ही "खतरनाक' चेहऱ्यांची होर्डिंग्ज असतात त्यांना आपण "हॉरर शो'मधील व्हिलनसारखे दिसतो याची पूर्ण कल्पना आहे. पण त्यांना तसेच दिसायचे आहे कारण, नेता हा असाच दिसणार, दिसायला हवा, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. नगरसेवकांच्या मते त्यांची दहशत, भीती, दरारा हाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील यशाचा मूलमंत्र असतो. त्यांच्या या "रूपा'मुळे समाजातील बुद्धिवादी, मध्यमवर्गीय, पांढरपेशी, मूल्य, विचार जपणारी, नैतिकतेचा आग्रह धरणारी, वृत्तपत्रातून मते मांडून "पब्लिक ओपिनियन मोल्ड' करणारी मिडल-अपर क्लासची माणसे. ओबामा-बुश-सोनिया-राहूल-पवार-लालू-ममता-अडवाणी यांच्याबद्दल तावातावाने मते आणि मतभेद जाहीरपणे मांडतात. पण त्याच माणसांची गल्लीतल्या दादाशी किंवा वॉर्डातल्या नगरसेवकाशी गाठ पडली की, दातखिळी बसते आणि नुसत्या होर्डिंग्जकडेही पाहून ते "पतली गली से' सटकतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याचमुळे नगरसेवकांनाही आपण सभ्य दिसण्यापेक्षा "गुंड' दिसण्यात फायदा आहे, असे वाटते. गुंडगिरी, दादागिरी हेच आपल्या यशाचे, लोकप्रियतेचे, प्रभावाचे वर्चस्व आहे, असे एकदा त्यांनी अनुभवले की, मग "जंटलमन' ही त्यांच्या दृष्टीने नपुंसकाला दिलेली शिवी ठरते. राजकीय जीवनात जंटलमन दिसणे-असणे हे त्यांना डिसक्वालीफिकेशन वाटू लागते. मग ते गुंड असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर देऊन असल्या होर्डिंग्ज लावण्याच्या उद्योगाकडे वळतात.
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील मंत्री, नेते, पक्षाचे पदाधिकारी यांना प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला सामोरे जाताना गुंड, असभ्य, चीप न दिसण्याची खबरदारी घ्यावी लागते. पण स्थानिक नेत्याकार्यकर्त्या, नगरसेवकांचे स्थानिक मिडीयावरही दबावतंत्र प्रभावी असते की, स्थानिक पत्रकार त्याच्या गुंडगिरी, दादागिरीच्या इमेजबद्दल जपूनच लिहीतात. आज अनेक शहरात झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, मटकावाले, नंबर दोनच्या धंद्यातील लोक हेच मतदारांना विकत घेऊन, दहशत दाखवून नगरसेवक होतात. एकेका घरात आई, बाप, भाऊ, वहिनी असे चारचार नगरसेवक या भाईगिरीच्या इमेज आणि बळावर होतात. महापालिकेतील पदे मिळवतात. आपल्या नगरसेवकांची संख्या वाढावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष या "दादा', "भाई'ना उमेदवारी देतात. महापौरस्थायी आणि अन्य समित्यांचे सभापती करतात. मग हे दादा, भाई टेंडर्सपासून सर्व खर्चात "रिंग' आणि सेटींग करून 40/50 टक्के खिशात घालतात. राज्य, राष्ट्र पातळीवरील नेत्यांच्या स्वागत, सभांवर पैसे उधळले, त्यांच्या वाढदिवसांना मोठ्या-छोट्या वृत्तपत्रातून आपल्या फोटोसह जाहिराती दिल्या की, ते नेतेेही यांच्या दादागिरीबद्दल आक्षेप घेत नाहीत. मग हे दादा थेट मंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची टेकवून स्टेजवर सन्माननीय पाहुणे म्हणून बसतात. मंत्र्यांशी त्यांची जवळीक पाहून अधिकारीही त्यांना बिचकून राहू लागतात.
होर्डिंग्जप्रमाणेच या गुंडांना आपल्या भाईगिरीचा एक भाग म्हणून अलिशान गाड्यांचाही गोल्ड-डायमंडच्या दागिन्यांसारखा शौक असतो. सामान्य माणूस त्याच्याच सारख्या एखाद्या सामान्य माणसाने साधी मारूती घेतली तरी जळतो, कॉमेंटस् करतो. पण त्याच्या गल्लीतल्या नगरसेवकाने खंडणी जमवून टेंडरचे पैसे खाऊन घेतलेल्या अलिशान गाडीकडे मात्र तोच सामान्य माणूस वेगळ्या दराऱ्याने प्रभावित होऊन बघतो. नगरसेवकांच्या अलिशान गाड्या हा खरे तर सी.बी.आय.इनक्वायरीचा विषय आहे. नगरसेवकांचे अलिशान बंगले, त्यांचे गावाकडचे इमले हे सारे संपत्तीचे प्रदर्शन पुन्हा आपली "दादा, भाई'ची टेरर इमेज एस्टॅब्लीश करण्यासाठीच ते वापरत असतात. सर्वसामान्य नागरिकांना सर्वच नगरसेवकांच्या गाड्या, बंगले दिसतात असे नाही, कळतात, ठाऊक असतात, असे नाही. पण होर्डिंग्जवरील खतरनाक चेहरे मात्र कंपलसरी नाक्यानाक्यावर त्याच्याकडे "ठसन' देत झळकत असतात, ते त्याला पहावेच लागते. त्याच्या मनात एकच प्रश्र्न असतो "नगरसेवक, राजकीय नेत्या-कार्यकर्त्याने गुंड दिसायला आणि खतरनाक इमेजमध्ये वावरायलाच हवे का?'
Wednesday, July 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment