Wednesday, July 15, 2009

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत

अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यातील "प्राजक्ता'ची फुले आणि "बाभळी'चे काटे
श्रीमती प्राजक्ता लवंगारे यांनी नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचनालयाच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. 2001 च्या आय.ए.एस.तुकडीतील त्या अधिकारी आहेत. म्हणजे तशा नवीन आणि नव्या दमाच्या अधिकारी आहेत. याआधी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आणि धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. याआधीच्या महासंचालक श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या महाराष्ट्र स्थापनेपासूनच्या 50 वर्षांच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी अशी असामान्य कामगिरी बजावली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना योजना आखण्याचे आणि अंमलबजावणीचे संपूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार दिले. लालफीत त्यांच्या संकल्प-प्रकल्पात अडथळा आणणार नाही असे अभय दिले. त्यामुळे "क्रांती' या शब्दात वर्णन करावे लागेल असे आमुलाग्र परिवर्तन मनिषा म्हैसकरांनी खात्यात घडवून आणले. आकाशवाणीवरील "दिल खुलास', दूरदर्शनवरील "जय महाराष्ट्र' लोकराज्य या मासिकाचे नवे लोकाभिमुख आणि लोकप्रिय असे वाचनीय, प्रेक्षणीय स्वरूप, लोकराज्य ची इंग्रजी ग्लॉसी, ग्लॅमरस एडीशन, प्रसिद्धी खात्याचे संगणकीकरण, वेबसाईटस्‌, ई-मेल, इ.गव्हर्नन्स फॅसीलीटीज, पत्रकांपासून पुस्तिकांपर्यंत महाराष्ट्राच्या प्रसिद्धी खात्याच्या लिटरेचरला दिलेले "स्मार्ट' रूप अशा एक नव्हे अनेक "अचीव्हमेंटस्‌' मनिषा म्हैसकर यांच्या वैयक्तिक कल्पकता, बुद्धिमत्ता, योजनता यांची साक्ष देणाऱ्या आहेत. आता मनिषा म्हैसकर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त झाल्या आहेत. तिथेही त्या आपल्या व्यक्तिमत्त्व-कर्तृत्व-प्रभुत्व-वक्तृत्व-नेतृत्वाचा प्रत्यय मुंबईकरांना आणून दिल्याशिवाय राहणार नाहीत. मनिषा म्हैसकर आणि डॉ.जयराज फाटक हे दोघे परस्परांच्या सहकार्याने मुंबईच्या देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर या प्रतिमेला उजाळा देण्यात यशस्वी होतील, यात शंका नाही.
मनिषा म्हैसकर यांच्याजागी महासंचालक म्हणून आलेल्या प्राजक्ता लवंगारे यांची पाटी तशी "कोरी' आहे. मुंबईत, पत्रकारांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये फारसा कुणाला त्यांचा परिचय किंवा ओळख असल्याचे दिसत नाही. एका अर्थान हे मॅडम प्राजक्तांच्या हिताचे ठरणार आहे. कारण त्यांना कोणत्याही पूर्वग्रहाला तोंड न देता आपल्या नव्या पदावरील कामाने आपली प्रतिमा नव्याने निर्माण करता येईल. त्यांचे महासंचालक पदावरील काम अर्थातच या टप्प्यावर सोपे नाही. किंबहुना 15 ऑगस्टपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये नवे राज्य सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांना काळजीवाहू सरकारच्या काळजीवाहू महासंचालक म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करीत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नवे सरकार येईपर्यंत नवे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नव्या योजनाही आखता येणार नाहीत. आधीच्या महासंचालिका मनिषा म्हैसकर या हाय प्रोफाईल, ग्लॅमरस आणि शार्प, स्मार्ट पर्सनॅलिटीच्या अधिकारी होत्या. त्यांचे स्वत:चे ट्रिमेंडस गुडवील राजकीय नेते मंत्री यांच्यात होते. आय.ए.एस.अधिकाऱ्यांमध्येही त्यांचे कौतुक असलेली मोठी लॉबी होती. त्या ज्या कार्यक्रमात सहभागी होत तो कार्यक्रम त्या चित्र-नाट्यसृष्टीतल्या भाषेत सांगायचे तर "खाऊन टाकत' प्राजक्ता लवंगारे यांच्या व्यक्तिमत्त्व, कार्यशैली, निर्णयक्षमता, जनसंपर्क माध्यमांसोबतचे संवाद कौशल्य या सर्वांची तुलना निदान सुरुवातीचे काही दिवस मनिषा म्हैसकरांच्या "झपाटा' व्यक्तिमत्त्वाशी होणे अपरिहार्य आहे.
अर्थात प्रत्येक अधिकाऱ्याची स्वत:ची अशी कार्यशैली, व्यक्तिमत्त्व, विचार आणि योजना-कार्यक्रम-उपक्रमांची संकल्पना स्वतंत्र असते. तशी ती वेगळी स्वतंत्र असायलाच हवी. कुणी कुणाची कॉपी करू नये. झेरॉक्स होऊ नये. कॉपीकॅट मनिषा म्हैसकरांसोबतच्या तुलनेचा विचार न करता स्वत:च्या स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण अशा विचार-कार्य-व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवावा लागेल आणि त्यांच्या "स्वाभाविक' प्रतिमेसाठी लोकांचा आदर-स्नेह-कौतुक संपादन करावे लागेल आणि तेच मग त्यांचे स्वत:चे असे चिरस्थायी यश असेल.
लवकरच लागू होणारी निवडणूक आचारसंहिता हा जसा प्राजक्ता लवंगारे यांच्या मार्गातील अडथळा आहे, तसाच आणखी एक "रोड ब्लॉक' म्हणजे "मुख्यमंत्री' विलासराव देशमुख आणि आताचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यात असलेला मुलभूत फरक. मनिषा म्हैसकरांना योजना-कल्पना डॅशिंग पद्धतीने डेअरिंगने राबवता आल्या कारण, त्यांचे "बॉस' विलासराव हे नुसतेच त्यांचे "बॉस' नव्हते, "गॉडफादर' होते. अशोकराव असे कुणा अधिकाऱ्याला झुकते माफ देऊन मोठे होण्याची, लार्जर दॅन लाईफ इमेज करू देण्याची, त्याचे "गॉडफादर' होऊन अमर्याद स्वातंत्र्य आणि संपूर्ण अधिकार देण्याची अजिबात शक्यता नाही. विलासरावांचा एक स्वभाव होता. त्यांना जे अधिकारी त्यांच्यासाठी उपयुक्त वाटत त्यांच्या डोक्यावर विलासरावांचा वरदहस्त तर असेच पण शिवाय त्या अधिकाऱ्याला विरोध-टीका करणाऱ्यांपासून लालफितीचा बाऊ करणाऱ्या नोकरशहांपासून पूर्णपणे अभय असे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मनापासून प्रसिद्धीची हौस, आवड, शौक होता. त्यामुळे प्रसिद्धी खात्याला त्यांच्या दृष्टीने विलक्षण महत्त्व होते. विलासरावांना महाराष्ट्राचा भाग्यविधाता, शरद पवारांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा तितक्याच राजकीय ताकदीचा नेता, राज्यकारभारावर "कमांड' असलेला कुशल प्रशासक, लोकप्रियतेची रेकॉर्ड मोडणारा उत्तम वक्ता मुख्यमंत्री, फिल्मी अदाकारीने प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने लोकांची मने जिंकणारा राजकारणी अशी आपली इमेज पुढल्या 10 वर्षांच्या राज्य-राष्ट्र स्तरावरील राजकारणाचा पाया म्हणून निर्माण करायची होती. आपल्याला कुणी राजकीय आव्हान देण्याचे आव्हान करणार नाही. असा सुपरहिरो-सुपर लीडर म्हणून प्रोजेक्ट करण्याची मोहीमच संपूर्ण 9 वर्षांच्या कारकिर्दीत विलासरावांनी मुख्यमंत्री असताना चालवली आणि त्या इमेज मेकींग आणि इमेज मार्केटींगमध्ये मनिषा म्हैसकर यांचा मोठा वाटा होता, यात शंका नाही. 26/11 ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख राम गोपालवर्मा आणि रितेश देशमुखसह ताजमहल हॉटेलची पाहणी करायला गेले आणि त्याची व्हिडीओ फिल्म मनिषा म्हैसकरांच्या अधिपत्त्याखालील माहिती संचालनालयातर्फे "मिडीया'ला रिलीज होऊन दिल्लीत प्रतिक्रिया उमटली आणि विलासरावांचे मुख्यमंत्रीपद गेले. एवढा एक अपवाद वगळता मनिषा म्हैसकर यांच्या कारकिर्दीत अन्य एकही चूक, अशी दाखवता येणार नाही की, जी विलासरावांना भोवली, अंगाशी आली, अडचणीची ठरली. ज्या मनिषा म्हैसकरांच्या प्रसिद्धी खात्याच्या सिद्धीने विलासराव "सुपर सी.एम.' झाले. त्याच खात्याच्या चुकीमुळे सोनिया-राहुल नाराज होऊन विलासराव एक्स सी.एम.झाले, हा नियतीचा अजब न्याय म्हणावा लागेल.
मुद्दा असा की, विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाचा काळ हा माहिती आणि जनसंपर्क कार्यालयासाठी सुवर्णकाळ होता. कारण, विलासरावांना प्रसिद्धीची आवड होती. मनिषा म्हैसकरांची कार्यशैली ही एखाद्या मल्टीनॅशनल ऍडव्हर्टायझिंग कंपनीच्या सी.इ.ओ.सारखी होती. पेप्सी, कोका कोला असे एखादे "प्रॉडक्ट' हॅमर करावे, मार्केट करावे तसे त्यांनी विलासराव देशमुख आणि त्यांचे आघाडी सरकार नावाचे "प्रॉडक्ट' ऍडव्हर्टाईज मार्केट केले. हे आम्ही टीका म्हणून नव्हे तर स्तुती म्हणूनच लिहीत आहोत. कारण या युगाची, काळाची ही अशीच प्रसिद्धी, इमेज मेकींग-मार्केटींग गरज आहे. उद्या मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना हौस, आवड नसली तरी जर "पब्लिक ओपिनियन' त्यांना सरकारसोबत ठेवायचे असेल तर ही "गिमिक्स' वेगळ्या प्रकारे वापरावी लागतील आणि हे काम प्राजक्ता लवंगारे यांनाच महासंचालिका म्हणून करावे लागेल.
विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रसिद्धी आणि इमेज मेकींग मार्केटींगबाबतची भूमिका विलासरावांपेक्षा नुसती वेगळी नाही तर विरुद्ध आहे. त्यामुळे प्राजक्ता लवंगारे यांना अनेकदा तारेवरची कसरत करूनही "आपण केले ते चूक कसे? आपण तर सद्‌भावनेने ही गोष्ट केली होती. मग ती बॅक फायर-बुमरॅंग होण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना का वाटतो?' असे प्रश्र्न पडणार आहेत. "चांगले म्हणणारा एक निघाला की लगेच दहा विरोधक वाईट म्हणायला पुढे येतात त्यापेक्षा चांगले न म्हटलेले बरे' हे उद्‌गार सी.एम.अशोकरावांचे आहेत. कुणी स्तुती केली की टीका करणारे निघतात, अशी भीती अशोकरावांच्या मनात आहे. आपल्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही की आपण विरोधकांचे "लक्ष्य' होणार नाही ही धारणा असलेल्या अशोकरावांसारख्या मुख्यमंत्र्यांची संचलनालय काय इमेज करणार? पुन्हा पब्लिसीटीच्या एखाद्या पत्रक, परिपत्रक, कार्यक्रमामुळे जर खरेच "मिडीया'त काही "प्रोटेस्ट' किंवा पब्लिक आऊटक्राय निर्माण झाला तर प्राजक्ता लवंगारे मॅडमच्या मदतीला कुणी असणार नाही. अशोकरावांनी पहिल्या भेटीत प्राजक्ता मॅडमना काय सांगितले असणार त्याचा तर्क आम्ही करू शकतो. ते म्हणाले असणार,"आता निवडणुका जवळ आल्यात. महिनाभरात आचारसंहिता लागेल मग तुमचे काम ठप्प होईल. तोपर्यंत सरकारची इमेज कशी करता येईल बघा. माझी 8 महिन्यांची कारकीर्द नीट लोकांसमोर आली पाहिजे. पण बुमरॅंग होणार नाही बघा' अर्थात प्राजक्ता लवंगारे यांना माहिती करून घेण्यात आणि शब्दांच्या पलीकडले अर्थ समजावून घेण्यात महिना जाईल. त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात निवडणूक निकालानंतर होईल. "मुंबई मित्र'तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment