Wednesday, July 15, 2009
आगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकायची!
अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
आगामी विधानसभा निवडणूक मतदारांनी लढवायची... जिंकायची!
"गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपल्याला कोण उमेदवार, का हवा?' या मतदारांच्या आम्ही घेत असलेल्या "एन्ट्री पोल'ला अद्भूत म्हणावा असा प्रतिसाद लाभतो आहे. हजारो वाचकांनी आणि मतदारांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे. राजकीय पक्षांनी उमेदवार लादण्यापेक्षा जे मतदार त्याला मतदान करणार त्यांनाच आधी विचारून उभे करणे योग्य. या मुद्यावर मतदारांचा आम्हाला जबरदस्त पाठिंबा मिळातो आहे. प्रस्थापित नेते "एन्ट्री पोल' मधून आपला "पॉलिटिकल एक्झीट' होईल या भितीने हादरले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही युवा मतदारांच्या प्रभावाखालील निवडणूक असणार आहे. "एन्ट्री पोल' या अभिनव कल्पनेपाठोपाठ आज आम्ही आणखी एक क्रांतिकारी विचार "मुंबई मित्र'च्या माध्यमातून मांडत आहोत. युवा मतदारांना आमचे आवाहन आहे की, यावेळी प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोणताही निवडून आला तरी लोकांनी म्हटले पाहिजे "यावेळी मतदार जिंकला'.
निवडणूक प्रक्रियेचे दोन भाग असतात. एक प्रशासकीय आणि दुसरा राजकीय. दोन्ही ठिकाणी मतदाराने, निवडणूक "लढणे' मला अपेक्षित आहे. प्रशासकीय आघाडीवर "लढायचे' म्हणजे, मतदाराने नेमके काय करायचे? निवडणूक आयोगाची रचना आणि यंत्रणा समजावून घ्या. त्यात तुम्ही काय योगदान करू शकता? याची माहिती घ्या. तुम्ही स्वत:ची मतदार म्हणून नोंद करून घेतलीत? धन्यवाद! पण, "लढाई' तेव्हा होईल, जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या नागरिकांना विचारा झालात का मतदार? नोंदवलेत का नाव यादीत? मिळवलेत का फोटोसहित मतदार ओळखपत्र? नोंदवले नसेल त्यांना प्रश्र्न करा "का नाही नोंदवले?' जे म्हणतील "वेळ नाही' त्यांना "मी माझा वेळ काढतो, बरोबर येतो. तुम्ही थोडा वेळ द्या. चला. आपण तुमची मतदार यादीत नोंद करू.' कुणी म्हणाले "राहून गेले' तर सांगा "रेशनकार्डासाठी नाही ना टाळाटाळ केलीत? ते कसे जीवनावश्यक आधार वाटले. मग शिधापत्रिका पोटासाठी जेवढी महत्त्वाची, पत्याच्या, अस्तित्वाच्या पुराव्यासाठी जितकी मोलाची, तितकीच मतदार ओळख पत्रिका, तुमच्या देशाचा नागरिक म्हणून, अस्तित्वासाठी, भवितव्यासाठी महत्त्वाची आहे, हे ओळखून त्यासाठी चला.' एका मतदाराने मतदार यादीत नाव न घातलेल्या, 5 मतदारांना त्यासाठी प्रवृत्त करणे याला मी मतदाराची "लढाई' समजतो.
कदाचित प्रशासकीय यंत्रणेकडून काही नावे वगळली गेली असतील. ही मंडळी मग मतदानाच्या दिवशी जागी होतात. "आमचे नाव यादीत नव्हते, नाही तर...' वगैरे रडगाणे गातात. मतदार याद्यांची निदान आपल्या बिल्डींग किंवा चाळ किंवा कॉम्प्लेक्सपुरती छाननी, मतदार किंवा मतदारांमधील युवकांचे गट करू लागतील आणि प्रशासकीय यंत्रणेला हलवतील, त्या दिवशी मी मतदार "लढाईत' उतरले म्हणेन. मतदार यादीत रहात नसलेल्यांची नावे घुसडली, दोनदोनदा आली, निघून गेल्यावर ही कायम राहिली, बोगस वोटींगसाठी खोटी नावे टाकली, त्यावर "वॉचडॉग'च्या भूमिकेत जर नागरिक मतदार, स्वत:च्या मर्यादित परिसर क्षेत्रापुरते जर उतरले, तरी बोगस मतदानाने निवडणुकीचा खरा कौल बदलता येणार नाही. फार नाही 25-50 मतदारांची जबाबदारी, 5-5 युवकांच्या गटांनी आपापल्या परिसरात घ्यावी; मतदारांची नोंदणी करणं, बोगस नावं हुडकून काढणं, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं, ही कामे आज नागरिक मतदार, आपले कर्तव्य मानीत नाहीत. हे काम राजकीय पक्षांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, उमेदवारांचं असं गृहीत धरलं आहे, हे चूक आहे. अयोग्य आहे. ही प्रशासकीय आघाडीवरील कामे, तुम्ही राजकीय नेत्याकार्यकर्त्यांवर सोपविली की, मग ते फक्त राजकीय हितसंबंधांचा विचार करून, आपल्याला मतदान करणाऱ्या किंवा न करणाऱ्या मतदारांपुरती करतात. मग ती मतदारांची "लढाई' होत नाही. प्रशासनाशी सहकार्य प्रसंगी संघर्ष करून ही कामे करण्यासाठी नागरिक मतदार पुढाकार घेतील, तेव्हा ती मतदारांची निवडणूक होईल. राजकीय पक्षांच्या उमेदवारांची रहाणार नाही.
उमेदवार नव्हे, तर मतदार जर या निवडणुकीत जिंकायला हवा असेल तर, सामान्य मतदारांनी, विशेषत: युवकांनी राजकीय आघाडीवरही निवडणुकीत उतरले पाहिजे. असा समज करून घेऊ नका की, मी प्रत्येक मतदाराने कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्हावे, असे सुचवतोय, नाही, अजिबात नाही. मतदाराने राजकीय आघाडीवर निवडणूक "लढवायची' म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे विचार समजावून घ्यायचे. मुद्दे लक्षात घ्यायचे. भूमिका विचारात घ्यायची. इतिहास आठवायचा. नेत्या, कार्यकर्त्यांप्रमाणेच उमेदवाराचे चरित्र-चारित्र्य तपासायचे. गेल्या 5 वर्षात सत्तेवर असो वा नसो, समाजाकरता त्यांनी काय केले? ते बघायचे. जाती, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा या मुद्यांवर समतोल किंवा एकांगी पक्षपाती भूमिका घेतले असेल तर, ती आपल्याला मान्य आहे की अमान्य? या प्रश्र्नाचे उत्तर शोधायचे. आश्र्वासन, जाहीरनामे, पत्रके रद्दी न समजता वाचायची, एक दुसऱ्यांशी त्याची तुलना करायची, जमेल तेव्हा नेत्यांची, वक्त्यांची भाषणे ऐकायची, आपले कुटुंबिय, मित्र, सहकारी, सह रहिवासी यांच्याशी विविध पक्ष आणि उमेदवारांच्या गुणा व गुणांविषयी चर्चा करून, निष्कर्ष काढायचे. ही माझ्या मते "रक्ताचा एक थेंब न सांडता, हिंसाचार न करता केलेली वैचारिक लढाई' आहे आणि त्यासाठी तुम्ही मतदार राजकीय पक्षाशी संबंधित असण्याची गरज नाही. "मतदार' एवढी भूमिका पुरे आहे.
मतदार जागृत झाला, चौकस आला, निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाला की, मग राजकीय पक्षांची मतदारांना फसविण्याची, दिशाभूल करण्याची, संकुचित मुद्यांवरून त्याला चिथवण्याची, जात-धर्म प्रदेश अशा आव्हानांनी प्रक्षुब्ध करून, एक गठ्ठा मतदानासाठी प्रवृत्त करण्याची क्षमता घटते. साम, दाम, दंड, भेदाच्या साधनांनी, उमेदवार मतदारांना मतदान करण्यास, भाग पाडू शकत नाही. राजकीय पक्षाची विचारमूल्ये, चरित्र आणि उमेदवाराची जीवनमूल्ये व चारित्र्य यांचा विचार करून, मतदार तुलनात्मक विचार करून सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, समाजाचे, देशाचे, मतदारसंघाचे हित डोळ्यापुढे ठेवून मतदान करतात तेव्हा, ते मतदार मग त्या निवडणुकीतले उमेदवार होतात. नी "लढाई' मग त्यांची होते. कोणालाही, कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी विजयी झालेला असतो-मतदार! म्हणूनच मतदारांना उद्देशून मी म्हणतो आहे-निवडणूक मतदारांनी लढायची आणि जिंकायची आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment