Tuesday, July 14, 2009

राजकारण्यांनी ठेवलेत ओलीस-मुंबईचे पोलीस डॉ. शिवानंदन यांना साकडे घालतो- मुंबईचा पोलीस

राजकारण्यांनी ठेवलेत ओलीस-मुंबईचे पोलीस
डॉ. शिवानंदन यांना साकडे घालतो- मुंबईचा पोलीस
मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. डी. शिवानंदन यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर "योग्य जागी-योग्य माणूस' अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. मुंबईचे पोलीस आयुक्तपद हे कोणत्याही आय.पी.एस. अधिकाऱ्यासाठी ड्रीम पोस्टींग असते. या पदाला प्रतिष्ठा, मान, सन्मान, स्थान तर आहेच, पण त्याहीपेक्षा कर्तृत्व-नेतृत्व गुणांना संधी देणारी अनेक आव्हाने आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाऊन स्वत:ला सिद्ध करता येते याचे कर्तबगार महत्त्वाकांक्षी पोलीस अधिकाऱ्यांना विशेष महत्त्व वाटते. डॉ. शिवानंदन यांचा स्वभाव आणि कर्तव्यकठोर कार्यशैलीशी मिळतीजुळती व्यक्तिरेखा मम्मुटी या दाक्षिणात्य अभिनेत्याने "कंपनी' या राम गोपाल वर्माच्या चित्रपटात रंगवल्यापासून डॉ. शिवानंदन यांच्यावर प्रकाशझोत कायम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलीसी चाकोरीबाहेर जाऊन पोलिसांचा "माणूस' म्हणून विचार करणारा आणि पोलिसांचे सर्वप्रथम कर्तव्य माणुसकी हे आहे, असे मानणारा एक कल्पक, प्रतिभाशाली, अभ्यासू, अनुभवी, समतोल बुद्धी या परिपक्व, कुशल प्रशासक ही डॉ. शिवानंद यांची त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीतून पटलेली ओळख आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी हॉस्पिटल, शाळा, पोलीस जिमखाना, प्रशासकीय वास्तु, पोलिसांची कार्यशैली यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणले. विधायक समाजसेवकवृत्तीचा पोलीस अधिकारी ठरवले तर समाजहिताच्या कामाचे कसे पर्वत उभे करू शकतो हे डॉ. शिवानंद यांनी दाखवून दिले. राजकीय हस्तक्षेपाला वाव न देता त्यांनी कठोरपणे ठाण्यातील गुन्हेगारी मोडून काढली. पोलीस दलातील भ्रष्टाचार निर्धाराने निपटून काढला. ठाण्यातील उद्योगपती, व्यापारी, बिल्डर्स यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या आणि उद्योगधंद्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. सर्वसामान्य माणसाला पोलीस हा आपला संरक्षक, कैवारी, पाठीराखा आहे ही भावना दिली.डॉ. शिवानंदन यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सौदार्हाचे स्नेहसंबंध ठेवले, पण त्यापैकी कुणाचेही ते हस्तक किंवा मिंधे झाले नाहीत. दबावाखाली निर्णय घेतले किंवा बदलले नाहीत. पारदर्शक कारभार म्हणजे काय असतो हे त्यांनी तसा कारभार करून ठाण्याला दाखवून दिले. डॉ. शिवानंदन आयुक्त असूनही थेट साधा पोलीस शिपाई त्यांच्यापर्यंत आपले गाऱ्हाणे पोचवू शकत होता. केवळ पोलिसांच्या गुप्तहेर यंत्रणेवर अवलंबून न राहता त्यांनी स्वत:ची अशी फीडबॅक "इन्फॉर्मेशन' देणारी यंत्रणा उभी केली होती. कुठल्याही प्रकरणाची फाईल वाचताना "रिडींग बिटवीन द लाईन्स' ची त्यांची नजर इतकी चाणाक्ष होती-आहे की जे लिहिले आहे त्यातील न लिहिलेल्या माहितीचाही त्यांना अचूक अंदाज असतो. अनेक ज्येष्ठ आय.ए.एस.-आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी डॉ. शिवानंदन यांच्या नियुक्तीची प्रतिक्रिया जर 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी डॉ. शिवानंदन मुंबईचे पोलीस आयुक्त असते, तर या हल्ल्याचा प्रतिकार आणि प्रतिबंध वेगळ्यारितीने झाला असता अशी दिली. यातच डॉ. शिवानंदन यांनी मिळवलेल्या विश्र्वासार्हतेची पावती आहे. गृहमंत्री जयंत पाटील यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी डॉ. शिवानंदन यांच्यासारख्या स्वच्छ, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, कर्तबगार अधिकाऱ्याची नियुक्ती करून स्वत:च्याही प्रतिमेला उजाळा दिला आहे. मुंबईसारख्या महानगरात मुंबई पोलीस हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. 26/11 नंतर तर मुंबईकर पोलिसांकडे सुरक्षेची अभेद्य कवच कुंडले म्हणून पाहतो आहे. पोलिसांकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात अबू आझमी, संजय निरुपम, उद्धव-राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांमधील राजकीय संघर्षामुळे समाजातील विविध घटकांमध्ये भाषा-प्रदेश-धर्म या मुद्दयांवरून तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून रोजच्या रोज कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी हिंसक आंदोलने आणि प्रक्षोभक भाषणे करण्याची स्पर्धा शिवसेना-मनसे यांच्यात लागली आहे. मिडियाला उद्रेक, भडका, संघर्ष, हिंसाचार यातूनच हवी तशी भडक, टी.आर.पी. वाढविणारी बातमी मिळत असल्यामुळे न्यूज चॅनेल्सचा कल लोकांच्या भावना चिथावून, मॉबला प्रक्षुब्ध करून आगीत तेल ओतून किंवा नसेल तेथे, जमेल तिथे आग लावण्याकडे आहे आणि या सर्व उपद्रवांचा ताण पोलीस दलावर मुंबईत पडतो आहे. गुन्हेगारी रोखण्याचे प्राथमिक कर्तव्य करण्याऐवजी राजकीय हेतूने केलेल्या आंदोलनाचा मुकाबला करण्यातच पोलिसांचे बळ व्यर्थ खर्च होत आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते आंदोलन पेटवताना परिणामांचा विचार न करता हिंसाचार करतात, पण पोलिसांनी पब्लिक प्रॉपर्टी आणि लोकांच्या जिविताचे रक्षण करण्याकरता बळाचा वापर केला की हेच नेते पोलिसांवर बळाचा अतिरेक केल्याचा आरोप करून बडतर्फी-कारवाईची मागणी करतात. अनेकदा सरकारही या दबावापुढे झुकून पब्लिक अपीझमेंट करीता कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना "डिमॉरलाईज' करीत कारवाई करते. हल्ली तर लोकांच्या प्रश्र्नांवर विरोधक करीत असलेल्या आंदोलनाबाबत पोलिसांच्या कारवाईला लगाम घालून त्यांचे हात बांधणारे आदेश ऑफ दि रेकॉर्ड दिलेले असतात. आंदोलकांवर कठोर कारवाईस प्रतिबंध केल्यामुळे सरकारवरचा रोष कदाचित कमी होत असेल, पण त्याचमुळे आंदोलनांमध्ये जखमी, जबर जखमी, जायबंदी होणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. डॉ. शिवानंदन यांना ठाण्यात काम करणे तुलनेने सोपे होते कारण ठाण्याची लोकसंख्या अवघी 15 लाख होती आणि पाच पक्षांचे 25 नेते एवढीच उपद्रवी माणसे होती. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 30 लाखाच्या आसपास आहे. मुख्यमंत्र्यांपासून 33 मंत्री, 200 हून अधिक अधिकारी, 500 हून अधिक व्ही. आय. पी., स्टार, उद्योगपती आंतरराष्ट्रीय पाहुणे असा मोठा पसारा आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि दिल्लीपेक्षा मुंबईला दहशतवादी हल्ल्यांचा धोका, टोळीयुद्धाची भिती, राजकीय नेत्यांच्या हिंसक आंदोलनाची शक्यता अधिक आहे. या सर्व आव्हानांना मुंबईच्या कलेक्टर किंवा म्युनसिपल कमिशनरना नव्हे तर एकट्या पोलीस कमिशनरला सामोरे जावे लागते. सर्वांचे एकाचवेळी समाधान करणे शक्य नसते. "मिडिया' कपडे फाडायला आणि विरोधी पक्ष वर्दी उतरवायला टपलेलेच असतात. सत्तारुढ पक्ष माकडीण आणि तिचे पिल्लू या बिरबलाच्या गोष्टीतल्या माकडीणीप्रमाणे स्वत:ची इज्जत वाचवून मगच त्या अधिकाऱ्याची पाठराखण करीत असते. डॉ. शिवानंदन मुंबईचे आयुक्त झाल्यामुळे आता त्यांची अवस्था रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच होणार आहे. अर्थात डॉ. शिवानंदन हे बाबा रामदेवांचे भक्त आहेत. प्राणायामासह योगासने करून परिस्थिती बदलता आली नाही तरी मन:स्थिती कशी बॅलन्स ठेवायची याचे शास्त्र त्यांना अवगत आहे. त्यामुळे न डगमगता, न डळमळता, दबावापुढे न झुकता ते प्रत्येक आव्हानांवर मात करतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही. डॉ. शिवानंदन यांना केवळ मुंबईकरांनाच न्याय द्यायचा नाही तर खुद्द पोलीस दलालाही बरेच काही द्यायचे, करायचे आहे. 26/11 हल्ल्यानंतर आणि अनामी रॉय गफूर एपिसोडनंतर मुंबईतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे. पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्रे, बुलेटप्रुफ गाड्या आणि जाकीटे देण्याइतकेच त्यांना धैर्य, शिस्त, आत्मविश्र्वास देणे आवश्यक आहे. डॉ. शिवानंदन ठाण्यातही कधी पोलिसांसाठी बॉस नव्हते, टीमचे कॅप्टन होते. मुंबईच्या अवाढव्य पोलीस दलाला आजवर बॉस अनेक मिळाले आता त्यांना 20-20 मॅच खेळण्यासाठी कॅप्टन धोनीची गरज आहे. ही गरज भागवून पोलिसांना लीडरशिप, कॅप्टनशिप देण्याची क्षमता, योग्यता, कल्पकता, बुद्धिमत्ता डॉ. शिवानंदन यांच्यामध्ये निर्विवाद आहे. ती पणाला लागणार आहे. पोलिसांवरील कामाचा ताण दरदिवशी वाढतो आहे. आता पोलीस स्टेशन्स म्हणजे केवळ कायदा सुव्यवस्था राखणारी केंद्रे राहिलेली नाहीत. नवरा-बायको, आईबाप-मुले-भाऊ-शेजारी यांच्या भांडणात मध्यस्थी करण्यापासून फेरीवाल्यांच्या बंदोबस्तापर्यंत आणि अनधिकृत बांधकामे रोखण्यापासून भिकारी, हिजडे यांना नाक्यावरून हुसकावण्यापर्यंत सोशलवर्क पोलिसांकडूनच अपेक्षिले जाते. शिवाय पोलीस म्हणून कामे आहेतच. त्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनपासून घुसखोर बांगलादेशीयांना शोधून काढण्यापर्यंत इतर अतिरिक्त कामांचा भार आहेच. रजा, सुट्‌ट्या न घेता पडणारा कामाचा ताण, रक्तदाब, हार्टऍटॅक असे विकार हे उपद्रव आहेत. मुंबईतल्या नागरिकांइतकाच खुद्द पोलिसांच्याही अपेक्षांचा भार डॉ. शिवानंदन यांच्यावर आहे. पूर्वी धार्मिक सणांसाठी पोलीस बंदोबस्त लागत नसे. आता शिवसेना, विश्र्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदूचे सण हे इतर धर्मियांना आव्हान देण्याचे साधन म्हणून वापरायला सुरुवात केल्याने धार्मिक सण, उत्सव पोलीस संरक्षणात साजरे करण्याची वेळ हिंदू-मुस्लिम-शीख, ख्रिश्र्चन अशा सर्व धर्मियांवर आली आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुतळे यांचे संरक्षण करताकरता पोलिसांची दमछाक होते आहे. जगाच्या किंवा देशाच्या कुठल्या कोपऱ्यात जरी एकही घटना घडली तरी मुंबईत हल्ली त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंसाचार, बंद, रास्ता रोको, रेल रोको करणाऱ्या संघटना नागरिकांना अचानकपणे ओलीस धरून पोलिसांना वेठीस धरतात आणि इश्यू जर भावनैक असेल, तर पोलिसांना दगड खाऊनही प्रतिकार संयमाने करावा लागतो. न्यूज चॅनेल्समुळे बातमी झटकन देशभर जाते आणि मुंबईचे जीवन पाहतापाहता विस्कळीत होते. पोलिसांना यामुळे 18-18 तास ड्युटी करावी लागते. त्यांना ताण असह्य होतो. ते आत्महत्या करतात. मतांसाठी लाचार राजकीय नेते शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भांडवल करतात, पण याच राजकीय नेत्यांमुळे ताण पडून आत्महत्या करण्याची पाळी पोलिसांवर येते याचे त्यांना सोयरसुतक नसते. पण डॉ. शिवानंदन यांच्यासारख्या संवेदनाशील मनाच्या अधिकाऱ्याला कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांना न्याय देणे क्रमप्राप्त आहे. 50 टक्के पोलिसांना आज राहती घरे नाहीत, हवालदारच नव्हे तर अधिकारीही नाईलाजाने झोपडपट्टीत राहत आहेत. यांना डॉ. शिवानंदन यांच्याशिवाय कुणी वाली-कैवारी नाही. येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. 15 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू होणार आहे. सुदैवाने जयंत पाटलांसारखे सूज्ञ-समंजस, अभ्यासू गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी डॉ. शिवानंदन पोलीस दलाच्या हिताचे काही निर्णय गृहमंत्र्यांकडून करून घेऊ शकतील. मुंबई फार मोठ्या आशेने-अपेक्षेने-विश्र्वासाने मुंबईचे नवे पोलीस आयुक्त डॉ. शिवानंदन यांच्याकडे बघत आहे. डॉ. शिवानंदन यांची कारकीर्दी सर्वार्थाने यशस्वी, कल्याणकारी आणि सुखद होवो हिच त्यांना मुंबईकरांच्यावतीने मुंबई मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment