अग्रलेखांचे शहेनशहा अभिजीत राणे सादर करीत आहेत
लोकप्रिय शासक, लोकाभिमुख प्रशासक
महाराष्ट्र शासनाचे "भूषण' गगराणी!
महाराष्ट्र शासनाची कार्यक्षमता, कार्यकुशलता, लोकाभिमुखता, लोकप्रियता आणि प्रतिमा ज्या काही ज्येष्ठ, बुद्धीमान, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमुळे, अखिल भारतात गौरवाचा विषय झाली आहे. त्यापैकी एक आहेत प्रसिद्धी खात्याचे सचिव भूषण गगराणी! आपली सद्सद्विवेकबुद्धी प्रमाण मानून प्रशासकाची भूमिका निभावत असल्याने सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा मंत्री कोणत्याही स्वभाव, कार्यशैली, विचारशैलीचे असले तरी, भूषणजी त्यापुढे दबले, नमले नाहीत किंवा प्रशासकीय नैतिक, कायदेशीर अलिखित-लिखित आचारसंहितेशी त्यांनी कधी प्रतारणाही केली नाही. प्रत्येक पद हे त्यांनी आव्हान समजून स्विकारले. त्या पदावरुन काम करीत असताना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, प्रतिमा, शान वाढविण्याचा निष्ठेने, जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सरकारी नोकरीत साच्यात राहून कधी नवे-हवे ते घडवता येत नाही. नवे साचे, पद्धती, मार्ग शोधून दरवेळी नव्याने पुढे येणाऱ्या समस्यांचे समाधान, उपाय शोधावे लागतात. संवेदनाशील, हरघडी परिवर्तनशील परिस्थितीला सामोरे जाऊन निरगाठीही सोडवून न्याय देण्याचे अतुलनीय कौशल्य असलेले अधिकारी म्हणून मंत्रालयात भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. दरारा आहे.
चार्ल्स मॉरीस या विचारवंत सेनापतीचे एक वचन आहे. तो म्हणतो "एका बकरीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा मला अधिक भय वाटतं ते एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 बकऱ्यांच्या सैन्यांच' खाते प्रमुख हा असा "सेनापती सिंह' असावा लागतो, जसे भूषण गगराणी आहेत हे त्यांनी जेव्हा ज्या खात्याचे प्रमुखपद भूषविले तिथे दाखवून दिले आहे. भूषणजी राजकारणात असते तर उत्तम नेते झाले असते असे विशेष नेतृत्वगुण त्यांच्यामध्ये आहेत. भूषणजीं मधील कृतीशील सद्भावना हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उत्तम चारित्र्य आणि त्याचप्रमाणे वागण्याचे धैर्य भूषणजींपाशी आहे. राज्य सरकारची यशस्विता ही बुद्धिमान शासक, कार्यक्षम प्रशासक, नागरिकांचा सजग-सक्रिय सहभाग असलेली लोकशाही, मुबलक साधन-संपत्ती आणि जनसामान्यांची प्रगती, विकासाची मन:पूर्वक इच्छा यावर अवलंबून असते. स्वराज्याचे सुराज्य करणाऱ्या या घटकांमध्ये भूषण गगराणींसारखे कार्यक्षम अधिकारी म्हणजे भक्कम आधारस्तंभ असतात.
भूषण गगराणी स्वत: कुशल प्रशासक आहेत. इतकेच नव्हे तर पुढाकार घेऊन "टीमवर्क' उभे करण्याच्या स्वभावामुळे ते इतर सहकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रेरित करतात. प्रामाणिकपणाने परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात हे आम्हांला महत्त्वाचे वाटते. सु-व्यवस्थापनावर खात्याच्या कारभाराची परिणामकारकता अवलंबून असते. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणारा खातेप्रमुख असेल तर, खात्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. भूषण गगराणींसारख्या श्रेष्ठ-ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक, भावनैक, वैचारिक भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये देखील पडत असल्यामुळे खात्याची कार्यक्षमता, लोकाभिमुखता आणि प्रतिष्ठा वाढते यात शंका नाही. भूषणजींनी कधी नैतिक मूल्यांशी तडजोड केली नाही. प्रशासकीय आचारसंहितेचा भंग केला नाही. प्रत्येकाने आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे बजावले तर शासन आपोआप आपल्या कर्तव्यात यशस्वी ठरेल असे त्यांचे सूत्र आहे. नैतिकतेने वागण्याचीही कधी कधी एक किंमत द्यावी लागते आणि त्यासाठी काळजात हिंमत असावी लागते, तशी हिंमत असलेल्या महाराष्ट्रातील उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांपैकी भूषण गगराणी हे एक आहेत.
प्रशासनात विश्र्वासार्हता हा पाया असतो. भूषण गगराणी यांच्या प्रशासकीय शैलीत ही विश्र्वासार्हता सत्ताधारी मंत्री आणि सामान्य जनता या दोघांमध्ये कटाक्षाने जपण्याचा प्रयत्न सातत्याने जाणवतो. मंत्री, जनता, सहकारी, कर्मचारी यांचा विश्र्वास संपादन केल्याखेरीज खाते प्रमुख यशस्वी होऊ शकत नाही याचे भान भूषणजींना आहे. विश्र्वासार्हतेचा पाया हा पारदर्शिता असतो. त्यामुळे भूषणजींच्या कामकाजात पारदर्शकता सर्वत्र सदैव असते, हे ओघानेच आले. प्रश्र्न विचारणारा नव्हे तर उत्तरे देणारा, उत्तरे शोधून काढणारा भूषणजींसारखा अधिकारीच खात्यातील अनेक नित्य आणि नैमित्तिक समस्यांची कोंडी फोडू शकतो. भूषणजींसारखा विचारी, विवेकी अधिकारी जाणतो की एकेकटा अधिकारी, कर्मचारी अपेक्षित रिझल्टस् देऊ शकत नाही. सर्वांनी मिळून आपापल्या अधिकार कक्षेतील छोटीशी कृती केली तरी त्याचा सामायिक, सामूहिक परिणाम फार मोठा असतो. प्रशासनात फार अवघड गुंतागुंतीचे पेचप्रसंग क्वचित उद्भवतात. दैनंदिन कामकाजात असतात ते सहज, साधे, सोपे, सरळ मुद्दे आणि त्यांची स्वाभाविक, कायदा आणि नीतीमत्तेच्या चौकटीतील सोडवणूक, साधे निर्णय, सोप्या मार्गाने, "ऑन दि स्पॉट' घेऊन पूर्वग्रहविरहित दृष्टीने आणि कुणाविरुद्ध किंवा कुणाच्या बाजूने असा पक्षपात न करता दिले तर प्रशासन कार्यक्षम, न्यायी, जलदगतीने कारभार करणारे आहे ही भावना जनमानसात निर्माण होते हे ओळखलेल्या भूषण गगराणी यांनी जनतेची नाडी अचूक ओळखली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
शब्दाला जागणारा अधिकारी हा भूषण गगराणी यांचा लौकिक आहे. "शासन-प्रशासन व्यवस्था ही गोष्ट काहीतरी गूढ धाक बाळगण्यासारखी नसून, आपलीच आहे, आपल्यासाठी आहे, आपला मित्र आहे, असा एक समान नात्याचा विश्र्वास प्रशासनाबाबत जनतेत हवा' असा एक मूलभूत मुद्दा ख्यातनाम विचारवंत आणि "चाणाक्य' ग्रुपचे प्रणेते अविनाश धर्माधिकारी यांनी मांडला आहे. भूषण गगराणी यांचा प्रयत्न सरकारची अशी प्रतिमा उभारण्याचा आहे आणि म्हणूनच ते ज्या खात्याची सूत्रे हाती घेतात तिथे हे "मैत्री'चे संबंध आमजनतेशी प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जाणवतो. भूषणजी नुसते सल्ले देणारे अधिकारी नाहीत. कृतीतून स्वत: अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असतो. समस्या सोडविण्याची तीव्र इच्छा, दूरदृष्टी आणि त्याप्रमाणे वागण्याची जिद्द असलेले असे ते अधिकारी आहेत. प्रत्येक समस्येवर उपाय असतो असे ते मानतात त्यामुळे त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन कुणी गेला आहे आणि निराश, हतबल, अगतिक होऊन "डेड एन्ड' अनुभवून परत आला आहे, असे कधीही होत नाही.
"माझ्या पदावरून मला माझ्या देशासाठी, राज्यासाठी, माझ्या बांधवांसाठी जे जे करता येईल ते ते मी करीन' अशा व्रताने वागणारे भूषणजींसारखे अधिकारी हिच सामान्य जनतेची आशा असते. आजकाल कर्तव्य हा शब्द विसरल्यासारखे वागणारे अधिकारी जागोजागी दिसत असताना भूषणजींसारखे अधिकारी "सारेच दिवे मंदावलेले नाहीत' हा दिलासा देतात. भूषण गगराणींच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अगदी एक वैयक्तिक असा अनुभव आम्हाला नमूद करावासा वाटतो. आम्ही आमच्या "व्हास्ट मिडीया'तर्फे रोज सकाळी अनेक व्ही.व्ही.आय.पी.आणि लोकप्रतिनिधी, लोकसेवकांना देशभर सुविचाराचे "कोटेशन्स'चे एस.एम.एस. पाठवतो. केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी अशा 20 हजार लोकांकडे हे एस.एम.एस. जातात. प्रेरणादायी, विचाराला चालना देणारे, मार्गदर्शक, बोधप्रद असे हे एस.एम.एस.असतात. ते आवडल्याचे, उपयुक्त वाटल्याचे, सकाळीच त्यामुळे एक नवा प्रेरक विचार मिळाल्याचे, धन्यवादाचे असे असंख्य फोनकॉल्स, एस.एम.एस. आम्हांला येतात. आम्हांलाही आपण काहीतरी उपयुक्त सामाजिक प्रबोधनात्मक काम करीत असल्याबद्दल धन्यता वाटते. हजारो कोटेशन्स वाचून त्यातून निवडक वेचून काढण्यासाठी घेतलेल्या श्रमांचे अशा प्रतिक्रिया आल्या की सार्थक झाल्यासारखे वाटते. रोज, नियमित आणि प्रदीर्घ काळ असे एस.एम.एस. पाठविणारी (आणि तेही विनामूल्य) "व्हास्ट मिडीया' ही देशातली एकमेव संस्था असून काही जणांनी या विक्रमाची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये होऊ शकते असे म्हटले आहे.
तर आम्ही ज्या मान्यवर ज्येष्ठ अधिकाऱ्यांना हे "इनस्पायरिंग कोटेशन्स'चे एस.एम.एस.पाठवतो. त्यात भूषण गगराणी यांचा समावेश आहे. एक दिवस त्यांनी कळवले की,"अभिजीत, मला तू पाठवतोस ते प्रेरक कोटेशन्सचे एस.एम.एस. अतिशय आवडतात. माझ्या सकाळची सुरुवात त्यामुळे सुखद, सुंदर आणि थॉट प्रव्होकींग होते. पण मी महिनाभर परदेशी जातो आहे. माझा मोबाईल या काळात बंद असेल तर तू मी परतल्यावर पुन्हा पूर्ववत एस.एम.एस.पाठव, पण तोपर्यंत तुला उगाच भूर्दंड नको म्हणून मुद्दा कळवतो आहे. थॅंक्स!' आम्ही भूषण गगराणींच्या या कृतीने भारावून गेलो. कोटेशन्स आवडतात हे कळवणारे भूषणजी आपण महिनाभर नाही त्या काळात अभिजीत स्व खर्चाने पाठवतो त्या एस.एम.एस.चा भुर्दंड पडू नये म्हणून इतकी काळजी घेतात ही अक्षरश: हृदयस्पर्शी गोष्ट म्हणावी लागेल. त्याहीपेक्षा भूषणजींनी परदेशातून महिनाभराने परतल्यानंतर कळवले की, अभिजीत मी परतलो आहे, मला माझा मॉर्निंग ब्रेकफास्ट-थॉट प्रव्होकींग इनस्पायरिंग एस.एम.एस.चा सिलसिला आता पुन्हा सुरू कर. ग्रेट! आम्ही रोमांचित झालो. आता मॉर्निंग एस.एम.एस.साठी कोटेशन्स सिलेक्ट करताना आम्हाला दरवेळी भूषणजींची न चुकता आठवण येते, वाटते, एवढ्या थोर व्यक्ती, ज्येष्ठ-श्रेष्ठ अधिकारी आपले हे एस.एम.एस.आवर्जून वाचतात तेव्हा आपणही त्यांचे समाधान होईल, अशा दर्जाचे एस.एम.एस.निवडून पाठवले पाहिजे. भूषण गगराणी हे खरोखरच महाराष्ट्र शासनाचे भूषण ठरावेत असे अधिकारी आहेत यात शंका नाही. महाराष्ट्र "महा'राष्ट्र झाला आहे तो भूषण गगराणींसारख्या अशाच महान अधिकाऱ्यांमुळे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment