भाजप-पक्षाच्या खांद्यावर नेत्यांचे ओझे
भाजप-नेत्यांच्या उरावर "परिवारा'चे बोजे
भारतीय जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष भारत केसरी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 मध्ये झाला. त्यांच्या वैचारिक प्रेरणेने भारतीय "जनसंघाचा' 55 वर्षापूर्वी जन्म झाला. कोणतीही संस्कृती किंवा इतिहास स्थितीशील किंवा मौन धारण करून थांबू शकत नाही. संस्कृती आणि इतिहास हा अखंडित प्रवाह म्हणजेच सुज्ञतेचा आविष्कार असतो. भारताच्या राजकीय क्षितीजावर संस्कृती आणि इतिहासाचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी. अखंडित ठेवण्याचे दायित्व ज्या पक्षावर ठेवले तो पूर्वीचा भारतीय जनसंघ किंवा आजची भारतीय जनता पार्टी.भारतीय जनता पार्टीचे सहज सिंहावलोकन केले तर "स्वयमेव मृगेंद्रता' या संस्कृत वाक्याची आठवण होते- भारतीय जनसंघाची मुळे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिकतेत रुजलेली आहेत. 1934 च्या डिसेंबरमध्ये वर्धा येथे भरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला महात्मा गांधीनी भेट दिली होती. आणि 1947 मध्ये दिल्लीतल्या संघ स्वयंसेवकापुढे महात्मा गांधीनी भाषणही केले होते. संघाची शिस्त आणि राष्ट्रीयतेची प्रखर भावना पाहून ते प्रभावीतही झाले होते. मात्र महात्माजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सर संघचालक श्री गोळवळकर गुरुजी यांच्या सह संघावर वेगवेगळे आरोप केले. वस्तुतः या हत्येनंतर या हत्येविरोधात संघाने निषेध व्यक्त केला होता. परंतु त्याबाबतचा एक शब्ददेखील एकाही आमदाराने किंवा खासदाराने विधिमंडळात उच्चारला नाही. ऑगस्ट 1947 मध्ये देशाच्या विभाजनाबरोबरच पूर्व पाकिस्तानातून म्हणजे आजच्या बांगला देशातून शरणार्थींचे जथ्थेच्या जथ्थे भारतीत येत होते. सरदार वल्लभभाई पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यात वैचारिक साम्य होते. त्या वेळी नेहरू, लियाकत अली समझोत्यानुसार भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यास बाध्य होते. पुढे पाकिस्तानने समझौता पाळला नाही. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याबाबत पाकिस्तानला पाऊल उचलण्यास बाध्य करू शकले नाहीत. आणि पंडितजींची तटस्थ भूमिका पाहून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निश्चय केला. त्यांनी पिपल्स पार्टी या नावाने बंगालमध्ये एक दल स्थापन केले. त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुद्धा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत विचार विनिमय सुरू झाला होता. पुढे डॉ. मुखर्जी आणि संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यात विचार विनिमय सुरू झाला होता. आणि त्या विचार मंथनातून "भारतीय जनसंघाचा' जन्म झाला. 1951मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे नेतृत्व श्यामाप्रसाद मुखर्जींकडे सोपविले गेले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वजनिक निवडणुकीत "दोन' खासदारांच्या साह्याने आपले खाते उघडले आणि भारतीय जनसंघ एक सशक्त राजकीय पक्ष म्हणून मान्यता पावला.भारतीय जनसंघाच्या स्थापनेचे पहिले दशक म्हणजे संघटनात्मक बांधणी व नियोजिन वाढ आणि तात्विक दृष्ट्या धोरण निश्चितीही झाली. त्यावेळी काश्मीर, कच्छ आणि बेरूबारी हे विषय उपस्थित करून देशाच्या मध्यवर्ती सीमेचा प्रश्न जनसंघाने प्रभावीपणे हाताळला. याच कारणासाठी 23 जून 1953 मध्ये काश्मीरचे वजीर ए आझम शेख महम्मद अब्दूला यांच्या जेल मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींना हौतात्म्य पत्करावे लागले.जनसंघाने या काळात गो संरक्षण कायदा, जमीनदारी आणि जहागिरी, लायसन्स कोटा राज, अण्वस्त्र सज्जता या मुद्यांनाही राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त करून दिले.आणीबाणीतल्या भूमिगत चळवळी आणि संघाच्या योजनापूर्वक कार्यामुळे 1977च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी सहभागी झाले होते. सरकारी कामकाजामध्ये जनसंघाचे लोक समर्पणशीलतेने काम करीत असतानाच जनता पार्टीतील अंतर्गत संघर्षाने मात्र परिसीमा गाठली. काही लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघ या दोन्ही पक्षांशी संबंध ठेवता येणार नाही हा दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उचलून धरला आणि पुढे पक्ष फुटला!पुढे राजकीय परिस्थितींचा हा अंदाज घेऊन 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर संमेलन होऊन "भारतीय जनता पार्टी' या नावाने पक्ष स्थापन केला आणि भारतीय जनता पार्टी पुढे महत्त्वाचा पक्ष ठरला. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उभे केले गेले. त्या काळात भारतीय जनता पार्टीला फक्त दोन जागा मिळाल्या.अटल बिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष आणि लालकृष्ण अडवाणी यांनी महामंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.देशात सुराज्याची स्थापना व्हावी म्हणून निघालेली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सुराज्य रथयात्रा, मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काश्मिर रथयात्रा या उपक्रमांनी संपूर्ण भारत देश ढवळून निघाला. त्याचा परिणाम भाजपाला भरभरून मते मिळाली. पण म्हणतात ना "घर फिरले की घराचे वासे फिरतात!' या म्हणीप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाची झालेली दिसते. सर्व सामान्य कार्यकर्ता आज गोंधळात व संभ्रमात पडलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झाले ते एका अर्थी बरेच झाले कारण प्रत्येक वेळी भाजपाच्या नेत्यांनी गोंधळ घालायचा आणि वाजपेयींनी सारवा सारव करायची असा मामला होता, आता वाजपेयी सक्रिय नसल्यामुळे जनतेने भाजपाला माफ करावे किंवा कानाडोळा करावा अशी स्थिती नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारच्या चौफेर यशस्वी कामगिरीचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने न जमल्याने केवळ इंडिया शायनिंग अशी कवी कल्पना प्रत्यक्षात न उतरता फक्त कागदावरच राहिली. अटलजींची कविता जनतेच्या हृदयापर्यंत न जाता केवळ कागदावरच राहिली कारण भोवतालचे लोक तोंडपूजक होते. वाजपेयींची कारकिर्द यशस्वी ठरली, पण भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व सक्षमपणे उभे राहण्यात अपयशी ठरले.प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमध्ये खऱ्या अर्थाने चौकस किंवा अनुभवी नियोजन कर्ता नव्हता. पक्ष चालविण्यास पैसा लागतो हे शेंबडं पोरंही सांगेल पण भाजपचे अंतर्गत वाद किंवा आर्थिक व्यवहार अतिशय संशयास्पद तऱ्हेने चर्चीले गेले. पक्ष कार्यालयातून दोन कोटी रुपयांची चोरी म्हणा किंवा संसदेत उघडून दाखवलेली नोटांची बंडले याचा स्त्रोत किंवा विचार सामान्य मतदार "मत' देताना नक्की ठेवेल याची जाणीव नेत्यांनी ठेवली नाही.जसवंत सिंह यांच्या जीना ः इंडिया-पार्टिशन इंडिपेंडन्स या पुस्तकाने जीना नावाचं भूत पुन्हा बाटली बाहेर आलं. ज्या जीनांना आज पाकिस्तानात जाणीवपूर्वक विसरलं जात आहे ते जीना भारतात पुन्हा धुमाकूळ घालू लागले. भारतीय बुद्धिमंतासाठी बॅरिस्टर जीना नेहमीच कुतूहलाचा विषय बनले. जीनांना भारत अखंड ठेवायचा होता. पण जीनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना फाळणीकडे ढकललं. असे मत जसवंत सिंह यांनी मांडलं.नेहरूंना भाजपने प्रथम पासूनच खलनायक बनवले आहे. भाजपला "गांधी घराण्या'पासून कधीही आपुलकी नव्हती. ज्या पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आणली याकडेही हेतुपूर्वक डोळेझाक केली गेली. नेहरूंविरोधाची भूमिका अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या जीना स्तुतीमधला समान धागा आहे. याला भाजपा किंवा संघाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. जीनांच्या अटी मान्य केल्या असत्या तरी अखंड हिंदुस्तान राहिला असता हा तर्कही योग्य वाटत नाही. या साठीही जीनांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदास संघ, घटना समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने मुस्लिमांना द्या अशा भविष्यात नागरी युद्धाला आमंत्रण देणाऱ्या अनेक अटी घातल्या होत्या. देशभर असले धगधगते अंगार ठेवण्यापेक्षा एकदाच पाकिस्तानचा तुकडा करावा या निष्कर्षापर्यंत नेहरू-पटेल आले होते या वास्तवात जीनांच्या प्रेमात पडणे गैर आहे.भाजपाच्या आजच्या फुटीचं मुळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार सरणीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकांची शाखा म्हणजेच जनसंघ व भाजपा अशी जनतेत ओळख आहे. संघाचा अतिराष्ट्रवादी विचार गेली 70 वर्षे कायम आहे. आणि यामध्ये भिकारदास हे लक्ष्मीधर झाले. संघाच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे वाजपेयींसारखा दुसरा वाजपेयी नाही. काळानुसार बदलण्याची हिंमत नाही. अथवा भाजपाला मोकळीक देणारा संघ विचार व्यापक नाही. संघ विचारांचे ओझे वाहणारे अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचा एक गट तर यशवंत सिन्हा, अरुण गौळी, सुषमा स्वराज, सुधिन्द्र कुलकर्णी, बाबूलाल मिरांडी, अरुण जेटली या नेत्यांचा गट दुसऱ्या बाजूला असल्याचं चित्र आहे. वाजपेयींना वृद्धापकाळानं ग्रासलं. प्रमोद महाजनांची त्यांच्या भावनेच हत्या केली या दोन महत्वाच्या कारणांनी भाजप दुभंगला. या दूढीचा पहिला धमाका उमा भारतींनी अडवाणींच्या उपस्थितीत मिडिया समोर उडवला. 2004 मध्ये उमा भारतींनी आडवाणी आणि त्यांच्या निकटवर्ती नेत्यांना निवडणूकीच्या पराभवासाठी जबाबदार धरलं.गेल्या लोकसभा निवडणुकीत अडवाणींचे नेतृत्व जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा यशवंत सिन्हा, वसुंधरा राजे, जसवंत सिंह, ब्रजेश मिश्रा, सुधीर कुलकर्णी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह यापैकी पंतप्रधान होण्याच्या क्षमतेचा नेता जनतेला दिसत नाही.आपापसातल्या अहंकार आणि गर्वामुळे भाजपाचे जहाज बुडू लागल्याचे चिन्ह दिसत. असताना जहाज बुडताना प्रथम उंदिर पळतात तसे हे नेते पक्षापासून दूर जात राहिले तर यांचे भवितव्य हेच नेते आपल्या हाताने घडवत आहेत असे खेदाने म्हणावे लागेल. या वाताहतीत भाजप संपणार नाही. कारण संघविचार धारेची गरज आहे. संघ परिवाराचा तो आधार आहे. पण भाषा आणि वर्तन यात संघपरिवार नेहमीच वेगळा राहिला आहे. या एकूण पार्श्वभूमीवर आता येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीपूर्वी किंवा दिवाळी नंतर होतील त्या वेळेस भाजपा बरोबर असलेल्या शिवसेनेने वेळीच सावध व्हावे. भाजप बरोबरीचे संबंध वेळीच तोडून स्वबळावर निवडणुका लढवाव्या, "षंढ नवऱ्यापेक्षा ढळढळीत वैधव्य पटकावलेले बरे!' या नात्याने शिवसेनेने आपल्या तरुण नेत्यांच्या रक्ताला वाव द्यावा. पंचवीस वर्षापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, "माझ्याकडे पंचवीस "ढाण्या वाघ' असतील! आज हे "ढाण्या वाघ' गुहेतून कधी डरकाळ्या फोडत बाहेर येतील याचीच महाराष्ट्रातील जनता वाट पाहात आहे.
Friday, October 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment